मुंबई : कोणताही व्यवसायात (Business) ग्राहकांपर्यंत पोहोचण्याकरता फेसबुक (Facebook), व्हॉट्सअॅप (WhatsApp) ही सध्याच्या काळातील महत्त्वाची साधने ठरली आहेत. अगदी एखादा घरगुती व्यवसाय करणारी महिलादेखील फेसबुक, व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून मोठ्या ग्राहकवर्गापर्यंत आपलं उत्पादन पोहोचवू शकत आहे. दूरवरच्या गावातील उत्पादने यामुळे जगभरात पोहोचत आहेत. फेसबुक, व्हॉट्सअॅपच्या मदतीनं योग्य ग्राहकवर्गापर्यंत उत्पादन पोहोचवणे व्यावसायिकांना सहज शक्य होऊ लागले आहे. कोरोना साथीच्या काळात (Corona Virus Pandemic) या ऑनलाइन व्यवसायांनी चांगलाच मदतीचा हात दिला आहे. या पार्श्वभूमीवर, आता जगातील सर्वात मोठे सोशल नेटवर्क असलेल्या फेसबुकनं (Facebook) व्यावसायिकांना इन्स्टाग्राम (Instagram) आणि व्हॉट्सअॅपवर ग्राहकांशी संवाद साधण्यासाठी एक नवीन टूल (Tool) उपलब्ध करण्याची घोषणा केली आहे. हे नवीन टूल या वर्षाच्या अखेरीस दाखल होईल, असं फेसबुकनं म्हटलं आहे.
बुधवारी झालेल्या व्हर्च्युअल डेव्हलपर्सच्या परिषदेत ‘एफ 8 रिफ्रेश’ (F8 Refresh) या नवीन टूलची घोषणा करण्यात आली. आता फेसबुकच्या मालकीच्या इन्स्टाग्रामवर व्यावसायिक आपल्या व्यवसायाची माहिती पोहोचवू शकतील, असं फेसबुकनं स्पष्ट केलं आहे. सुमारे 90 टक्के इन्स्टाग्राम युजर्स किमान एका तरी व्यवसायाला फॉलो करतात. तर फेसबुकचे मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप वेगवेगळ्या पद्धतीच्या मेसेजसाठी उपयुक्त ठरेल. उदाहरणार्थ, वस्तू परत स्टॉकमध्ये आली की व्यावसायिक त्याचा अलर्ट ग्राहकांना पाठवू शकतील. याकरता ‘लॉग इन कनेक्ट’ (Log in Connect) फिचरद्वारे व्यवसायासंदर्भातील मेसेज पाठविण्याच्या वेगळ्या पर्यायाची चाचणी घेण्यात येत आहे.
कंपनीने ई-कॉमर्स (E -Commerce) क्षेत्रात विस्तार करण्यावर भर दिला असून, लोकांना या प्लॅटफॉर्मवर पैसे कमविण्याची संधी उपलब्ध करून देण्यावर फेसबुकनं लक्ष केंद्रित केलं आहे, असं कंपनीचे मुख्य कार्यकारी मार्क झुकेरबर्ग यांनी सांगितलं. कंपनीने नुकतेच आपले आर्थिक निकाल जाहीर केले त्या वेळी त्यांनी ही माहिती दिली.
केंब्रिज अॅनालिटिका डेटा गैरव्यवहारानंतर माहिती सुरक्षितता आणि पारदर्शकता यामुळे फेसबुक वादात सापडले असून, गेल्या काही महिन्यात व्हॉट्सअॅपलाही व्यवसायासाठीची साधने विस्तारित करताना गोपनीयता धोरणावरून मोठी टीका सहन करावी लागली. फेसबुकला आपला डेटा दिला जाण्याची शंका व्हॉट्सअॅप युजर्सना आल्यानं व्हॉट्सअॅपला फटका बसला.
गेल्या वर्षी कोविड-19च्या साथीमुळे ऑनलाइन झालेल्या परिषदेत फेसबुकनं पब्लिक पेजेस, ग्रुप्स आणि इव्हेंट्स याद्वारे शेअर होणाऱ्या डेटाचे विश्लेषण करण्यास संशोधकांना परवानगी देण्यासाठी नवीन टूल्स आणण्याची योजना जाहीर केली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Facebook, Instagram, Small business, Whatsapp