नवी दिल्ली, 10 नोव्हेबर: देशात लोहमार्गाचं जाळं मोठ्या प्रमाणात विस्तारलं आहे. अनेक शहरांमध्ये रेल्वे (Railway) ही जीवनवाहिनी आहे. दैनंदिन प्रवास असो किंवा लांब पल्ल्याचा असो, अनेक जण रेल्वेला प्राधान्य देतात. प्रवासासोबतच मालवाहतुकीसाठीही मोठ्या प्रमाणावर रेल्वेचा वापर होतो. एकूणच रेल्वे हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा घटक आहे. रेल्वेनं प्रवास करताना आपण लोहमार्गांचं अर्थात ट्रॅकचं (Track) जाळं पाहतो. या जाळ्यातून प्रत्येक रेल्वे कशी धावत असेल, एका ट्रॅकवरून दुसऱ्या ट्रॅकवर कशी जात असेल, अशा अनेक गोष्टींबद्दल अनेकांच्या मनात कुतूहल असतं. या ट्रॅकच्या प्रचंड विस्तारलेल्या जाळ्यात एक विशेष क्रॉसिंग ट्रॅक (Crossing Track) असतो. या क्रॉसिंग पॉइंटला अनेक ट्रॅक जोडलेले असतात. सामान्य माणूस या ट्रॅकचं जाळं पाहून नक्कीच गोंधळून जाऊ शकतो. चार ठिकाणं जोडणाऱ्या क्रॉसिंग पॉइटला डायमंड क्रॉसिंग (Diamond Track) असं म्हटलं जातं. तर जाणून घ्या डायमंड क्रॉसिंगविषयी...
डायमंड क्रॉसिंग हे नाव अनेकांनी फारसं ऐकलेलं नसेल. अर्थात त्याला कारणही तसंच आहे. फार कमी ठिकाणी याची निर्मिती होते. देशातल्या विस्तीर्ण अशा लोहमार्गाच्या जाळ्यात डायमंड क्रॉसिंग दुर्मीळ आहेत. रेल्वे वाहतुकीच्या जाळ्याचा (Network) हा एक भाग मानला जातो.
देशातल्या डायमंड क्रॉसिंगचा उल्लेख अनेक रिपोर्ट्समध्ये आलेला आहे. देशातलं एकमेव डायमंड रेल्वे क्रॉसिंग नागपूरमध्ये (Nagpur) आहे. या ठिकाणी देशातल्या चारही दिशांना जाणाऱ्या रेल्वेसाठी क्रासिंग तयार करण्यात आलं आहे. या ठिकाणी केवळ तीन ट्रॅक एकमेकांशी जोडले गेले असल्यानं याला डायमंड क्रॉसिंग म्हणता येणार नाही असा दावा काही रिपोर्ट्समध्ये केला गेला आहे. यात गोंदियाकडून एक ट्रॅक येतो, हा मार्ग हावडा-रूरकेला-रायपूर असा आहे. एक ट्रॅक उत्तरेकडून म्हणजेच दिल्लीकडून येतो. एक ट्रॅक दक्षिण भागातून येतो. एक ट्रॅक पश्चिमेकडून म्हणजेच मुंबईकडून येतो. हे सर्व ट्रॅक एकाच ठिकाणी येऊन मिळतात आणि त्याच ठिकाणी त्यांची मार्गानुसार विभागणी होते. म्हणून त्या ठिकाणाला डायमंड क्रॉसिंग असं म्हणतात.
डायमंड क्रॉसिंग हा लोहमार्गाच्या जाळ्यातला एक बिंदू असतो. या बिंदूवर चारही दिशांना जाणाऱ्या रेल्वे रूळ बदलतात. डायमंड क्रॉसिंग हा दिसायला रस्त्यावरील एखाद्या चौकाप्रमाणे असतो. ज्याप्रमाणे रस्त्यावरच्या चौकात वाहतूक नियंत्रक दिवे असतात, तसंच हे क्रॉसिंग रेल्वे मार्गासाठी असतं. याला आपण लोहमार्गाचा चौक असंदेखील म्हणू शकतो. यात चार रेल्वे ट्रॅकचा समावेश असतो. हे ट्रॅक्स दोन-दोनप्रमाणे एकमेकांना क्रॉस करतात. याचाच अर्थ चारही दिशांनी या ठिकाणी रेल्वे येऊ शकते. त्यामुळे याला डायमंड क्रॉसिंग असं संबोधलं जातं.
सर्वसामान्यपणे रेल्वे ट्रॅक्स एकाच मार्गावर किंवा सरळ असतात आणि त्याच दिशेनं एकमेकांना क्रॉस करतात; पण डायमंड क्रॉसिंगमध्ये रेल्वे ट्रॅक एकमेकांना क्रॉसप्रमाणे छेदतात. या एकाच ठिकाणी चार रेल्वे ट्रॅक (Railway Track) पाहायला मिळतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.