Whatsapp द्वारे चिनी हॅकर्स करताहेत भारतीयांना लक्ष्य; Part Time Job च्या आमिषाला भुलू नका

Whatsapp द्वारे चिनी हॅकर्स करताहेत भारतीयांना लक्ष्य; Part Time Job च्या आमिषाला भुलू नका

भारतातल्या युझर्सना (WhatsApp Users) लक्ष्य करून त्यांना पार्ट-टाइम नोकऱ्यांचं (Part Time Jobs) आमिष दाखवून चिनी हॅकर्स (Hackers from China) आपल्या जाळ्यात ओढत आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 12 जानेवारी : सध्या सगळीकडे चर्चा आहे ती Whatsapp च्या बदललेल्या प्रायव्हसी पॉलिसीज (Privacy Policies) अर्थात गोपनीयता धोरणाची. त्यातच एक भीतिदायक बातमी आली आहे, ती म्हणजे चिनी हॅकर्स (Chinese Hackers) भारतातल्या युझर्सना (WhatsApp Users) लक्ष्य करून त्यांना पार्ट-टाइम नोकऱ्यांचं (Part Time Jobs) आमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढत आहेत. नवी दिल्लीतल्या थिंक टँक सायबरपीस फाउंडेशनने ही माहिती दिली.

अशा प्रकारचे मेसेजेस Whatsapp द्वारे अनेकांना येत असून, त्यासोबत एक लिंकही असते. दर दिवशी 10 ते 30 मिनिटं काम करून 200 ते 3000 रुपये मिळवता येतील, असे भूल पाडणारे दावे या मेसेजेसमध्ये केलेले असतात, अशी माहिती फाउंडेशनने दिली आहे. 'बिझनेस इन्सायडर'ने 'आयएएनएस' या वृत्तसंस्थेच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे.

'अशा प्रकारच्या मेसेजेसमध्ये अनेक वेगवेगळ्या लिंक्स असतात, ज्या शेवटी एकाच यूआरएलवर (URL) जातात. प्रत्येक लिंक मेसेज पाठवण्यासाठी वेगळश्या नंबरचा वापर करते,' असं फाउंडेशनने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.

'निरीक्षणातून हे लक्षात येऊ शकतं, की नंबर्समध्ये वैविध्य आणून वेगवेगळ्या लिंक्स तयार करून त्या एकाच लिंकवर येण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. लिंक्समधील माहितीवरून हे लक्षात येतं, की त्या लिंक्स इंग्लिश वगळता अन्य भाषांमधून आणि सर्व प्रदेशांतल्या Whatsapp वर रिडायरेक्ट करता येऊ शकतात.'

या प्रकरणी सायबरपीस फाउंडेशन आणि ऑटोबॉट इन्फोसेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या तज्ज्ञांनी स्वतंत्रपणे तपास सुरू केला आहे.

'सर्व लिंक्सद्वारे सारखंच रिडायरेक्शन आणि आउटगोइंग सोर्सेची निर्मिती झाली. एका लिंकमध्ये मात्र एक नवा आयपी अॅड्रेस (IP Address) सापडला. तो अलिबाबा क्लाउड (Alibaba Cloud) या चिनी होस्टिंग कंपनीशी निगडित होता,' असं फाउंडेशनच्या अहवालात म्हटलं आहे.

'जेव्हा यूआरएलमध्ये बदल करण्यात आला, तेव्हा एरर कोड चिनी भाषेत दर्शविण्यात आला. तसंच तपासादरम्यान आढळलेली डोमेन नेम्सही चीनमध्ये नोंदणी केल्याचं आढळलं,' अशी माहितीही देण्यात आली आहे.

'त्या लिंकचा IP Address 47.75.111.165 असा होता. तो अलिबाबा क्लाउडशी संबंधित होता, तसंच चीनमधल्या हाँगकाँग (Hong Kong) शहराशी निगडित होता,' असा दावाही करण्यात आला आहे.

व्हॉट्सअॅप युझर्सनी त्यांची वैयक्तिक माहिती फेसबुकला वापरण्याची परवानगी दिली नाही, तर आठ फेब्रुवारीनंतर त्यांना अकाउंट वापरता येणार नाही, असं धोरण व्हॉट्सअॅपने अलीकडेच जाहीर केलं आहे. त्यामुळे भारतासह जगभरात मोठी चर्चा सुरू झाली आहे. व्हॉट्सअॅपवरील डेटा सुरक्षित नसल्याने अनेक कंपन्या, तसंच बड्या उद्योपतींनीही व्हॉट्सअॅप अनइन्स्टॉल करून अन्य अॅप्स वापरायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर, हॅकिंगच्या संदर्भात ही बातमी आल्याने व्हॉट्सअॅपच्या विश्वासार्हतेबद्दल, सुरक्षिततेबद्दल शंका निर्माण होण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. कुठल्याही अज्ञात नंबरवरून मेसेज आल्यास आपण त्यातील लिंकवर क्लिक न करणं हा अशा घोटाळ्यांना बळी न पडण्याचा एकमेव उपाय आहे, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. तसंच, ओळखीच्या नंबरवरूनही काही भलताच मेसेज आल्यासही त्यातील लिंकवर क्लिक न करण्याचंही आवाहन केलं जात आहे.

First published: January 13, 2021, 11:01 AM IST
Tags: whatsapp

ताज्या बातम्या