बीजिंग, 9 डिसेंबर : काही महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने विविध चिनी अॅपवर बंदी घातली होती. त्यानंतर आता चिनी सरकारने देखील डिजिटल स्ट्राईक केला असून 105 अॅपवर बंदी घातली आहे. (China Removed 105 Apps) न्यूज एजेन्सी रॉयटर्सच्या (reuters) माहितीनुसार, अमेरिकेसहित अनेक देशांतील लोकप्रिय अॅपचा यामध्ये समावेश आहे. अॅप स्टोअरवरून देखील हे अॅप हटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सप्टेंबरनंतर केंद्र सरकारने पुन्हा एकदा चीनवर डिजिटल स्ट्राईक करत 43 अॅपवर बंदी घातली होती. त्यामुळे आता भारतात एकूण 220 चिनी मोबाईल अॅपवर बंदी असून यामध्ये टिकटॉक, पबजी आणि यूसी ब्राउजर यांसारख्या लोकप्रिय अॅपचा समावेश आहे.
चीनने का घातली बंदी -
चीनने अमेरिकेच्या ट्रॅव्हल फर्म ट्रिप अॅडव्हायझरसह (travel firm trip advisor) 105 अॅप्स अॅपस्टोअरमधून हटवले आहेत. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, नवीन मोहिमेअंतर्गत ही बंदी घालण्यात आली आहे. या अॅप्सवर अश्लीलता, वेश्या व्यवसाय, जुगार आणि हिंसा यासारख्या गोष्टी पसरवल्याचा आरोप आहे. चीनच्या सायबर स्पेस प्रशासनाने मंगळवारी आपल्या वेबसाईटवर दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, या अॅप्सने कोणतीही माहिती न देता एकापेक्षा जास्त सायबर कायद्यांचं उल्लंघन केलं आहे.
भारताकडूनही अनेक अॅप्सवर बंदी -
जून 2020 मध्ये भारत सरकारने टिकटॉकसह विविध मोबाईल अॅपवर बंदी घातली होती. यानंतर 2 सप्टेंबरला आणखी 110 अॅपवर बंदी घालण्यात आली होती. बंदी घालण्यात आलेले अनेक अॅप हे चिनी कंपन्यांचे होते. भारतीय नागरिकांचा डेटा बेकायदेशीरपणे जमा करणे आणि यात खासकरुन सीमाभागात राहणाऱ्या नागरिकांची माहिती गोळा करण्याचा आरोप भारताने केला होता.
भारताच्या सार्वभौमत्व आणि सुरक्षितेतला या मोबाईल अॅपमुळे धोका निर्माण होत असल्याचं भारताने स्पष्ट केलं होतं. त्यामुळेच ही बंदी घालण्यात आली होती. पबजी मोबाइल गेमवर बंदी आल्यामुळे तो वापरणाऱ्या अनेक भारतीयांनी नाराजी व्यक्त केली होती. पण राष्ट्रीय सुरक्षिततेला प्रत्येक भारतीय महत्त्व देतो, त्यामुळे ही बंदी नागरिकांनी स्वीकारली.