मुंबई, 03 फेब्रुवारी : सध्या टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात चॅट-जीपीटीची जोरदार चर्चा आहे. चॅट-जीपीटी हा कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित प्रोग्राम आहे. नैसर्गिक पद्धतीच्या संवागातून उत्तरं मिळवण्यासाठी त्याचं डिझाइन केलं गेलं आहे. ओपन आर्टिफिशियल इंटेलिजन्स (ओपन एआय) कंपनीनं त्याची निर्मिती केली आहे. हा प्रोग्राम टेक जायंट गुगलसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. कारण, चॅट-जीपीटी या एआय टूलने लाँच (नोव्हेंबर 2022) झाल्यापासून अवघ्या काही दिवसांत लाखो फॉलोअर्स मिळवले आहेत. एका नवीन अहवालात असं म्हटलं आहे की, हे टूल इतकं कार्यक्षम आहे की त्याच्या कौशल्याच्या आधारे ते गुगलमध्ये एंट्री-लेव्हल कोडिंग जॉब सहज मिळवू शकतं.
विशेष म्हणजे चॅट-जीपीटीची ही कार्यक्षमता गुगललाच आढळली आहे. गुगलनं चॅट-जीपीटीची तुलना स्वतःच्या 'अप्रेंटिस बार्ड' या एआय चॅटबॉट या टूलशी केली. तेव्हा ही बाब लक्षात आली. चॅट-जीपीटीच्या कोडिंग करण्याच्या आणि ते प्रभावीपणे लिहिण्याच्या जन्मजात क्षमतेनं कोडर आणि लेखकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. असं असलं तरी, ओपनएआयचा हा नवीन चॅटबॉट स्वतःच मान्य करतो, की तो कधीही मानवी नोकऱ्यांची जागा घेऊ शकत नाही. कारण, त्याच्याकडे मानवाकडे असलेली सर्जनशीलता, संवेदनशीलता आणि इतर कौशल्यं नाहीत; पण गुगलची गोष्ट वेगळी आहे. चॅट-जीपीटीनं काल्पनिकपणे गुगलवर एल 3 भूमिका प्राप्त केली आहे. एल3 हे गुगलमधल्या एंट्री-लेव्हल सॉफ्टवेअर इंजिनीअरसाठीचं ग्रेडिंग आहे.
हेही वाचा: फक्त AI नव्हे, तर इतर नवं तंत्रज्ञानही बदलेल युजर्सचं अनुभवविश्व
सीएनबीसीच्या अहवालानुसार, गुगल बीटा चॅटबॉटची चाचणी करत आहे, जो गुगलच्या लाएमडीए (LaMDA) या संभाषण तंत्रज्ञानवर आधारित आहे. गुगलनं चॅटजीपीटी आणि लाएमडीएच्या प्रतिसादांची स्वतंत्र डॉक्युमेंट्समध्ये तुलना केली. या तुलनेतल्या नोंदीनुसार, आश्चर्यकारकपणे, कोडिंग पोझिशनसाठी मुलाखत घेतल्यावर चॅटजीपीटीनं एल3 पोशिझनवर जागा मिळवली.
सीएनबीसीनं दिलेल्या वृत्तानुसार, चाचणीदरम्यान, जेव्हा गुगल अभियंत्यांनी लाएमडीए चॅट आणि चॅटजीपीटी या दोघांना विचारलं होतं की, ते भविष्यात मानवी प्रोग्रामर्सची जागा घेतील का? या प्रश्नावर दोन्ही चॅटबॉट्सनी नकार दर्शवला. "नाही, चॅटजीपीटी आणि अल्फा कोड दोघंही प्रोग्रामर्सची जागा घेणार नाहीत," असं उत्तर लाएमडीएनं दिलं. गुगलच्या या चॅटबॉटनं उत्तर देताना चार परिच्छेदांचं स्पष्टीकरणही दिलं होतं. ज्यात 'प्रोग्रामिंग हा एक सांघिक खेळ आहे आणि चॅटबॉट्स प्रोग्रामर्सना अधिक कार्यक्षमतेने कार्य करण्यास मदत करू शकतात; मात्र चॅटबॉट्स उत्कृष्ट प्रोग्रामसाठी आवश्यक असलेली सर्जनशीलता आणि कलात्मकता देऊ शकत नाहीत, असं लाएमडीएनं आपल्या उत्तरात म्हटलं होतं.
चॅट-जीपीटीनेदेखील लाएमडीएच्या उत्तराशी मिळतं जुळतं उत्तर दिलं. सीएनबीसीनं मिळवलेल्या डॉक्युमेंटमधील माहितीनुसार, "चॅटजीपीटी किंवा अल्फाकोड हे प्रोग्रामर्सची जागा घेण्याची शक्यता नाही. कारण, ते मानवी प्रोग्रामर्सचं कौशल्य आणि सर्जनशीलता पूर्णपणे बदलण्यास सक्षम नाहीत. प्रोग्रामिंग हे एक जटिल क्षेत्र आहे. त्यासाठी कम्प्युटर सायन्स प्रिन्सिपल्सची सखोल माहिती आणि नवीन तंत्रज्ञानातल्या गोष्टींशी जुळवून घेण्याची क्षमता आवश्यक आहे," असं चॅट-जीपीटीचं म्हणणं आहे.
चॅट-जीपीटीच्या बुद्धिमत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ शकत नाही. कारण, या चॅटबॉटनं व्हार्टन स्कूल्सची एमबीए परीक्षा आणि यूएस लॉ स्कूलची परीक्षादेखील उत्तीर्ण केली आहे. असं म्हटलं जात आहे की, या एआय टूलमुळे शिक्षकांचीदेखील झोप उडाली आहे. कारण, विद्यार्थी त्यांच्या असाइनमेंट पूर्ण करण्यासाठी एआय टूलकडे वळत आहेत. यामुळे शिक्षकांमध्ये तीव्र चिंता निर्माण झाली आहे. चॅटजीपीटी हे तरुणांच्या विचारक्षमतेला आणि सर्जनशीलतेला बाधा आणेल, अशी भीती त्यांना वाटत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Google