Home /News /technology /

चीनशी करार करणार्‍या automobile company ला मोठा फटका, भारतातून गुंडाळावा लागणार आपला गाशा

चीनशी करार करणार्‍या automobile company ला मोठा फटका, भारतातून गुंडाळावा लागणार आपला गाशा

अनेक कारणांमुळे भारतीय बाजारपेठेतून या कंपनीने 2017 मध्येच काढता पाय घेतला होता. मात्र निर्यातीसाठीचं उत्पादन पुण्याजवळच्या तळेगाव इथल्या प्रकल्पात सुरू होतं. आता मात्र 25 डिसेंबर 2020 रोजी तळेगावच्या प्रकल्पातलं उत्पादन पूर्ण थांबवलं जाणार आहे.

पुढे वाचा ...
  नवी दिल्ली, 22 डिसेंबर : कारनिर्मिती करणारा जगप्रसिद्ध ब्रँड असलेल्या जनरल मोटर्सने (General Motors) अखेर भारताला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. वाढलेल्या स्पर्धेसह, अनेक कारणांमुळे जनरल मोटर्सने भारतीय बाजारपेठेतून 2017 मध्येच काढता पाय घेतला होता. मात्र निर्यातीसाठीचं उत्पादन पुण्याजवळच्या तळेगाव (Talegaon) इथल्या प्रकल्पात सुरू होतं. आता मात्र 25 डिसेंबर 2020 रोजी तळेगावच्या प्रकल्पातलं उत्पादन पूर्ण थांबवलं जाणार आहे. तसंच, हा प्रकल्प बंद करण्यासाठीचा अर्जही जनरल मोटर्स (जीएम) कंपनीने सादर केला आहे, अशी माहिती 'जीएम इंडिया'च्या प्रवक्त्याने दिली. 'बिझनेस स्टँडर्ड'ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. जनरल मोटर्स ही अमेरिकेतल्या डेट्रॉइट (Detroit) शहरातली दिग्गज कार उत्पादक (Car Manufacturer) कंपनी आहे. 1996 मध्ये जीएमने भारतात पाऊल ठेवलं. गुजरातमध्ये हलोल आणि पुण्याजवळ तळेगाव अशा दोन ठिकाणी कंपनीने आपल्या फॅक्टरीज सुरू केल्या. कारची किंमत हा भारतीय ग्राहकासाठीचा महत्त्वाचा मुद्दा होता. त्यामुळे इथल्या ग्राहकांची ही मानसिकता लक्षात घेऊन कंपनीने अनेक कार्सची निर्मिती केली. उदा. Chevrolet Beat, भारतातली डिझेल इंजिनची आजच्या घडीची सर्वांत छोटी गाडी, असं तिचं वर्णन करता येईल.

  (वाचा - वाहनांवरील Number Plate बाबत महत्त्वाची बातमी; HSRP साठी असा करावा लागेल अर्ज)

  अशा उत्पादनांमुळे जीएम (GM) कंपनीने आपली पाळंमुळं भारतात रोवली. मात्र गेल्या काही वर्षांत भारतातल्या ऑटो इंडस्ट्रीचं चित्र बदलत चाललं. जपान (Japan) आणि कोरियातल्या (Korea) कार उत्पादक कंपन्यांनी भारतात शिरकाव केला. त्यामुळे स्पर्धात्मक बाजारपेठ निर्माण झाली. त्यात जनरल मोटर्स मागे पडत चालली. 2010 मध्ये जनरल मोटर्सचा भारतीय बाजारपेठेतला वाटा 4.7 टक्के होता. तो 2016 मध्ये अवघ्या एका टक्क्यावर आला. सहा वर्षांत झालेल्या एवढ्या मोठ्या परिणामामुळे कंपनीने भारतीय बाजारपेठेतून बाहेर पडण्याचा निर्णय 2017 मध्ये जाहीर केला. हलोल इथला प्लांट जीएम कंपनीने 2017 मध्ये चीनच्या SAIC कंपनीला विकला होता. सध्या तो प्लांट एमजी मॉरिस गराजेस कंपनीकडून वापरला जात आहे.

  (वाचा - Honda ने जगभरातून परत मागवल्या लाखो कार्स; जाणून घ्या काय आहे कारण)

  अर्थात, असं असलं तरीही जीएम कंपनीच्या तळेगाव फॅक्टरीत केवळ निर्यातीसाठीचं उत्पादन सुरू होतं. Beat कार्सची इथे निर्मिती करून मेक्सिकोला निर्यात केली जात होती. आता मात्र तेही थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जीएम कंपनीच्या असेम्ब्ली लाइनवरून (Assembly Line) निर्यातीसाठीची शेवटची कार 31 ऑक्टोबरला बाहेर पडली. त्यानंतर उत्पादन थांबवण्यात आलं आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. आता 24 डिसेंबर 2020 रोजी कारखान्यातलं सगळं काम थांबवण्यात येणार आहे. नियमित पगारावर काम करणारे, तसंच तास तत्त्वावर काम करणारे असे एकूण 1800 कर्मचारी जीएमच्या तळेगाव फॅक्टरीत कार्यरत होते. या कर्मचाऱ्यांना सेपरेशन पॅकेजेस दिली जाणार असून, नवी नोकरी मिळण्यासाठी आवश्यक आणि शक्य ती मदत केली जाणार आहे, असं कंपनीच्या प्रवक्त्यानं स्पष्ट केलं. शॉप फ्लोअर कर्मचाऱ्यांना 25 जानेवारीपर्यंतचं वेतन दिलं जाणार असून, प्रशासकीय (Administrative) आणि कायदे (Legal) विभागातील कर्मचारी मार्च 2021 पर्यंत कंपनीसोबत कार्यरत राहणार आहेत, असं वृत्त टाइम्स ऑफ इंडियानं दिलं आहे.

  (वाचा - कारच्या सेफ्टी फीचर्समधील Dual Airbag बद्दल सरकार घेणार मोठा निर्णय)

  दरम्यान, जीएम कंपनीने आपल्या तळेगाव युनिटच्या विक्रीसाठी चीनच्या ग्रेट वॉल मोटर्स (Great Wall Motors) कंपनीसोबत करार केला होता; मात्र वर्ष होऊनही त्यात पुढे काही झालं नाही. कारण दरम्यानच्या काळात चीन आणि भारत यांच्यातले राजकीय संबंध बिघडले. त्यामुळे भारताने शेजारी राष्ट्रांमधून होणाऱ्या गुंतवणुकीबद्दल अधिक कडक धोरण अवलंबलं आहे. त्यामुळे या प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले आहेत. सरकारकडून या प्रक्रियेला आवश्यक ती मंजुरी मिळावी, यासाठी दोन्ही कंपन्या आवश्यक त्या सर्व यंत्रणांशी संवाद साधत आहेत. त्यातूनच तो करार पूर्ण होऊ शकेल आणि त्यानंतर या जागेवर नव्याने निर्मितीप्रक्रिया सुरू होऊ शकेल, असं कंपनीच्या प्रवक्त्यानं सांगितलं.
  Published by:Karishma Bhurke
  First published:

  Tags: Car

  पुढील बातम्या