नवी दिल्ली, 9 डिसेंबर : भारतातील सर्वात मोठी कॅब सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनी ओला (ola) आता लवकरच इलेक्ट्रिक फोर व्हिलर आणि स्कूटर लाँच करणार आहे. ओलाने दिलेल्या माहितीनुसार, आगामी काळात कंपनी भारतात एक लाख इलेक्ट्रिक स्कूटर (ola electric scooter) लाँच करणार आहे. भविष्यातील काही गोष्टी लक्षात घेता, ओला आपल्या वाहनांच्या सेगमेंटमध्ये बदल करत असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. त्याशिवाय ओला इलेक्ट्रिक स्कूटरद्वारे, टू व्हिलर सेगमेंटमध्ये (two wheeler) प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहे.
इलेक्ट्रिक स्कूटर पुढील वर्षात जानेवारीमध्ये लाँच केली जाणार आहे, जी इलेक्ट्रिक मॉबिलिटीला प्रोत्साहन देईल आणि भारतीयांना स्वस्त आणि सुलभ वाहन उपलब्ध होईल, असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.
जानेवारीमध्ये लाँच होणार Ola Electric Scooter -
ओलाने नुकतीच नेदरलँड्सची कंपनी Etergo BV ताब्यात घेतली आहे. त्याद्वारे ओला इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमध्ये एन्ट्री करत आहे. ओला पुढच्या वर्षात जानेवारी महिन्यात, भारतात आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करणार आहे. ओलाची ही स्कूटर भारतातच मेक इन इंडिया प्रोजेक्ट अंतर्गत बनवली जाणार आहे. त्यासाठी कंपनी भारतात मॅन्युफॅक्चरिंग प्लांट लावणार आहे. ओला इलेक्ट्रिक स्कूटर एकदा चार्ज केल्यानंतर ती 240 किलोमीटरपर्यंत चालेल, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.
इलेक्ट्रिक फोर व्हिलर (ola electric four wheeler) -
ओला इलेक्ट्रिक फोर व्हिलरद्वारे भारतातील छोट्या शहरात आपली पकड मजबूत करू इच्छित आहे. ओलाची इलेक्ट्रिक फोर व्हिलर लाँच झाल्यानंतर, बजाजची आगामी Bajaj Qute electric, महिंद्राची Mahindra Atom electric तसंच टाटा आणि टीव्हीएस चारचाकी वाहनांना मोठी टक्कर देईल.
electric quadricycle बनवण्याची योजना -
ओलाचे फाउंडर आणि अध्यक्ष भावीस अग्रवाल यांनी सांगितलं की, येणाऱ्या काळात इलेक्ट्रिक मॉबिलिटीला प्रोत्साहन देत, छोट्या शहरांपर्यंत पोहचण्याचा आमचा मानस आहे. यात ओलाच्या फोर व्हिलर्स महत्त्वाची भूमिका बजावतील. त्यामुळे येणाऱ्या काळात इलेक्ट्रिक वाहनं बनवण्याकडे जोर दिला जाईल. ओला इलेक्ट्रिक पॅसेंजर कार electric quadricycle बनवण्याकडे लक्ष देत आहे. त्यामुळे आगामी काळात विविध इलेक्ट्रिक फोर व्हिलर पाहायला मिळणाची शक्यता वर्तवली जात आहे.