लखनऊ, 27 डिसेंबर : उत्तर प्रदेशातील राजकारण आणि सामाजिक व्यवस्थेमध्ये जातीय समिकरण अनेकदा पाहिलं जातं. याची झलक टू-व्हिलर, फोर-व्हिलर वाहनांवरही पाहायला मिळते. अनेक लोक आपल्या गाड्यांच्या नेमप्लेटवर जाट, यादव, गुर्जर, क्षत्रिय, राजपूत, पंडित, मौर्य अशी जातिसूचक नावं लिहिलेलं पाहायला मिळतं. पण आता असं करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. यूपी सरकार (UP Government) आता जातिसूचक स्टिकर लावणाऱ्यांच्या, गाड्या सीज करून कारवाई करणार आहे.
गाड्यांवर स्टिकरच्या माध्यमातून आपल्या जाती दर्शवणं आता महाग पडणार आहे. यूपी सरकार आता यावर लगाम लावण्याची तयारी करत आहे. याप्रकरणी उत्तर प्रदेशातील सर्व जिल्ह्यातील परिवहन अधिकाऱ्यांना यासंदर्भात निर्देश देण्यात आले आहेत. हे आदेश केंद्रीय परिवहन विभागाच्या निर्देशांनंतर देण्यात आले आहेत.
गाड्यांवर जातिसूचक स्टिकर लावण्याची पद्धत मोठ्या प्रमाणात असल्याच्या अनेक तक्रारी सातत्याने केंद्र सरकारकडे येत होत्या. एमेकांना कमी लेखण्यासाठी याचा प्रतिकात्मक वापर केला जात असल्याचं बोललं जात. परंतु चांगल्या, सुसंस्कृत समाजासाठी अशी प्रथा योग्य नाही. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान कार्यालयाने यूपी सरकारला पत्र लिहून, या प्रथेवर बंदी घालण्यासाठीचे निर्देश दिले. त्यानंतर योगी सरकाने राज्यातील सर्व जिल्ह्यातील परिवहन अधिकाऱ्यांना यासंदर्भात आदेश जारी केले आहेत.
दरम्यान, महाराष्ट्रातील एक शिक्षक हर्षल प्रभू यांनी पंतप्रधान मोदींना एक पत्र लिहिलं होतं. त्या पत्रात त्यांनी, उत्तर प्रदेशात चालणारी जातिवाद, जातिसूचक वाहनं समाजासाठी धोकादायक असल्याने ती बंद केली पाहिजेत असं म्हटलं होतं. पंतप्रधान कार्यालयाने ही तक्रार उत्तर प्रदेश सरकारला पाठवली. त्यानंतर या प्रकरणाची दखल घेऊन, परिवहन आयुक्तांनी हा आदेश दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीएमओच्या निर्देशांनंतर, सुरुवातीला यूपी सरकार लोकांना असे स्टिकर न लावण्यासाठी जागरुकता अभियान चालवणार आहे. त्यानंतरही लोकांनी यात बदल केले नाहीत, तर जातिसूचक स्टिकर लावून वाहन चालवणाऱ्यांचं चलान कापलं जाईल. तसंच वाहन सीज करण्याचीही कारवाई केली जाणार आहे.