नवी दिल्ली, 27 जानेवारी : तुमच्या घराचं बांधकाम सुरू आहे आणि तुम्ही टॉयलेट खरेदी करायला गेला आहात, आणि त्या शोरूममधल्या एक्झिक्युटिव्हनी भारतीय टॉयलेट्स सोडून अंधारात चमकणारे जपानी टॉयलेट्स दाखवल्यास आश्चर्य मानू नका. ही टॉयलेट आपोआप स्वच्छ होतात, आणि त्यावर बसून आवडत्या संगीताची मजाही घेता येते. जपानमध्ये असे टॉयलेट्स आहेत आणि ते जगभरात विकलेही जातात.
लिओनार्डो डी-कॅपरिओ, विल स्मिथ, कार्दाशियन अशा आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी त्यांच्या मुलाखतींमध्ये बोलताना कुटुंबातील सगळे या टॉयलेटचा वापर करत असून अनेकदा अशा हाय-टेक टॉयलेटबद्दल त्यांनी सांगितलंही आहे.
आपल्या हातातला फोन, घरातला टीव्ही, किचन, बेडरूम हायटेक म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर करून अद्ययावत झाल्या आहेत. घर असो, थिएटर, मॉल किंवा रेस्टॉरंट, पंचतारांकित हॉटेलही असो सर्वच ठिकाणी टॉयलेट असतात. मग हे टॉयलेट हायटेक करावं असं जपानी लोकांनी ठरवलं आणि टॉयलेट हायटेक केलंही.
काय आहेत या टॉयलेटची वैशिष्ट्य?
जपानी संशोधकांनी सुरुवातीला भाताचा कूकर, कॅसेट प्लेअर आणि बुलेट ट्रेन असे माणसाचं आयुष्य बदलून टाकणारे शोध लावले. तसंच त्यांनी हायटेक टॉयलेट तयार करतानाही खूप बारकाईने विचार केला आहे. पहिली गोष्ट म्हणजे टॉयलेटमधील दिवा काम करत नसेल किंवा रात्री वीज गेली असेल तर वीज येण्याची वाट बघत बसायची गरज नाही. कारण जपानी टॉयलेटमध्ये एलईडी दिवे बसवले आहेत. त्यामुळे ती अंधारात चमकतात. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे टॉयलेटमधील फ्लश ऑटोमॅटिक आहे. त्यामुळे घरातील ज्येष्ठ किंवा लहान मुलांनी फ्लश केलं नाही, तरीही चिंता करण्याची गरज नाही. तिसरं वैशिष्ट्य म्हणजे थंडीच्या दिवसात टॉयलेट सीट गार पडत असल्यास, टॉयलेटमध्ये वापरलेल्या हायटेक इलेक्ट्रॉनिक यंत्रणेमुळे टॉयलेट सीट गरमही करता येते. तसंच, स्मार्ट टॉयलेटच्या कनसोलवर दिलेलं बटण दाबलं, तर हवं असलेलं संगीत वाय-फायच्या माध्यमातून ऐकताही येऊ शकतं.
काय आहे किंमत?
इतक्या सोयी-सुविधांनी युक्त असलेल्या टॉयलेटची किंमत तरी किती आहे? या हायटेक पण बेसिक मॉडेलची किंमती हजारोंमध्ये आहेत. तर संपूर्ण वैशिष्ट्यांसह या टॉयलेटची किंमत लाखोंच्या घरात आहे. भारतातही काही आउटलेट्समध्ये हे टॉयलेट लाँच झाले आहेत.