मुंबई, 18 ऑगस्ट- आजचं युग तंत्रज्ञानाचं आहे. त्यामुळे कोणत्याही घटनेचे पुरावे तयार करणं, त्यांची नोंद ठेवणं या गोष्टी सहज-सोप्या झाल्या आहेत. याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे कॉल-रेकॉर्डिंग. फोनवरचं संभाषण रेकॉर्ड करून ठेवून नंतर त्याचा संदर्भासाठी वापर करण्याचे प्रकार सर्रास घडतात; मात्र अनेकदा या फीचरचा गैरवापर केला जातो. ब्लॅकमेलिंग करण्यासाठी किंवा कोणाला तरी अडचणीत आणण्यासाठी कॉल रेकॉर्डिंग केलं जातं. फोनवर बोलणाऱ्या समोरच्या व्यक्तीच्या परवानगीशिवाय कॉल रेकॉर्ड करणं अनेक देशांमध्ये अवैध आहे. या पार्श्वभूमीवर, गुगलने या वर्षी कॉल रेकॉर्डिंग अॅप्स बंद केली आहेत. तरीही फीचर फोन्समधून किंवा अन्य काही मार्गांनी कॉल रेकॉर्डिंग करणं शक्य आहे. आपला कॉल समोरची व्यक्ती रेकॉर्ड करत आहे का, याचा अंदाज आपल्याला बांधता येणं शक्य आहे. त्याबद्दलची थोडी माहिती घेऊ या. 'आज तक'ने याबद्दल माहिती देणारं वृत्त दिलं आहे.
पूर्वी गुगल डायलर वापरणाऱ्यांना कोणताही नंबर डायल करतानाच कॉल रेकॉर्डिंगचा एक पर्याय उपलब्ध व्हायचा; मात्र आता गुगल डायलरने तो पर्याय काढून टाकला आहे. त्यानंतर आणखीही काही कंपन्यांनी हे फीचर आपल्या प्लॅटफॉर्म्सवरून काढून टाकलं आहे. त्यात ट्रूकॉलर कंपनीचाही समावेश आहे. ज्या कंपन्यांच्या फोन्समध्ये गुगल डायलरचा वापर होतो, त्यात आता हे फीचर मिळत नाही. तरीही आणखी काही मार्गांनी कॉल रेकॉर्डिंग करणं शक्य होतं. आपला कॉल समोरची व्यक्ती रेकॉर्ड करत असल्याचा आडाखा बांधण्यासाठी आपल्याला काही संकेतांकडे बारकाईने लक्ष द्यावं लागतं. तसं केलं, तर आपल्याला ते ओळखता येऊ शकतं. अनेक जण त्याबद्दल फारसे दक्ष नसतात; पण थोडी दक्षता बाळगली तर ते आपल्याला सहज कळू शकतं.
समोरच्या व्यक्तीला कल्पना न देता कॉल रेकॉर्डिंग करणं अनेक देशांमध्ये अवैध आहे. म्हणून बहुतांश हँडसेट उत्पादक कॉल रेकॉर्डिंग सुरू झाल्यावर फोनमध्ये Beep असा आवाज येण्याची व्यवस्था करतात. कोणी कॉल रेकॉर्डिंग सुरू केलं, की बीप असा आवाज येतो आणि तो पलीकडच्या व्यक्तीलाही ऐकू येतो. अर्थात, संबंधित व्यक्तीचं लक्ष असेल, तर आपला कॉल रेकॉर्ड होत असल्याचं त्या व्यक्तीच्या लक्षात येऊ शकतं. अर्थात, काही फोन्समध्ये हे फीचर नसतं. त्यामुळे या तंत्रावर पूर्णपणे अवलंबून राहता येत नाही.
(हे वाचा:Wifi चा पासवर्ड विसरलात? या सोप्या टिप्स वापरा आणि झटपट मिळवा )
काही वेळा कॉल कनेक्ट होताच सिंगल बीप साउंड येतो. काही वेळा दीर्घ साउंडही ऐकू येतो. हा आवाज कॉल रेकॉर्डिंग सुरू झाल्याचं दर्शवतो. हा सिग्नल फीचर फोन्समध्ये उपलब्ध असतो. काही वेळा कॉल रेकॉर्डिंग सुरू झाल्यानंतर तशी सूचना देणारा आवाजही आपल्याला कॉलमध्ये ऐकू येऊ शकतो.तेव्हा कॉलवर बोलताना असे काही संदेश किंवा आवाज येतात का, यावर बारकाईने लक्ष ठेवण्याची गरज आहे. तसं काही ऐकू आलं, तर तुम्ही समोरच्या व्यक्तीला त्याबद्दल विचारू शकता किंवा काही संवेदनशील विषयांवर बोलणं टाळू शकता, जेणेकरून ते रेकॉर्ड होणार नाही, त्याचा काही गैरवापर होऊ शकणार नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Smartphones, Technology