मुंबई, 7 जुलै : असं म्हणतात की स्वप्न कायम मोठीच पाहावी. स्वप्न मोठी असतील तर ती पूर्ण करण्याची जिद्दही तितकीच असते. याचच एक उदाहरण ॲमेझॉनचे मालक जेफ बेझोस यांनी घालून दिलंय. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक जेफ बेझोस (Jeff Bezos) यांनी अगदी लहान असतानाच एक खूप मोठं स्वप्न पाहिलं होतं. आणि ते आज स्वतःचं स्वप्न पूर्ण होण्याच्या अगदी जवळ पोहोचले आहेत. काही दिवसांनी ॲमेझॉनचे (Amazon) मालक जेफ बेझोस त्यांची कंपनी ब्लू ओरिजिनच्या (Blue Origin) न्यू शेपर्ड (New Shepard) या कॅप्सूलमधून 11 मिनिटांच्या अंतराळ प्रवासासाठी जाणार आहेत. बेझोस यांनी हे स्वप्न त्या वयात पाहिलं होतं, जेव्हा किशोरवयीन मुलं मुली खेळण्यात-बागण्यात वेळ घालवत असतात. शाळा आणि महाविद्यालयीन दिवसांमध्ये बेझोस हुशार विद्यार्थी होते आणि त्यांची स्वप्नेही इतर मुलांपेक्षा पूर्णपणे वेगळी होती.
1982 पासून ते 2020 पर्यंत केला स्वप्नाचा पाठलाग
1982 मध्ये जेफ प्रिन्सटन विद्यापीठात (Princeton University) शिक्षण घेत होते. यावेळी त्यांनी त्यांच्या वर्गात प्रथम स्थान पटकावलं होतं. पदवीच्या भाषणादरम्यान ते त्यांच्या स्पेस ड्रीमबद्दल बोलले होते. जेफ 680 विद्यार्थ्यांमधून पहिले आले होते. त्यामुळे त्यांच्या बुद्धिमत्तेवर कोणालाही शंका नव्हती. मात्र, नक्कीच त्यावेळी कोणीही विचार केला नसेल, की जेफ अंतराळात हॉटेल आणि पार्क बनवण्याच्या प्रॉजेक्टच्या इतक्या जवळ जातील. त्या वेळी, किशोरवयीन बेझोस यांच्या या स्वप्नाने मियामी हेराल्डच्या (Miami Herald ) प्रमुख बातम्यामध्ये स्थान मिळवले होते. दरम्यान, अंतराळ पर्यटनाचं स्वप्न पाहण्यामागचा जेफ यांचा हेतू हा पृथ्वीला वाचवणं हा होता.
2000 पासून स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न
वयाच्या 18 व्या वर्षी पाहिलेल्या या स्वप्नाचा पाठलाग करत असताना जेफ बेझोस यांनी सन 2000 मध्ये ब्लू ओरिजीन (Blue Origin) नावाच्या एरोस्पेस कंपनीची सुरुवात केली. या कंपनीच्या माध्यमातून अंतराळात एक कॉलनी वसवण्याचं बेझोस यांचं स्वप्न आहे. ते 20 जुलै रोजी अंतराळ प्रवासावर जाणार आहेत. 11 मिनिटांच्या या प्रवासात त्यांचे भाऊ मार्क बेझोस देखील (Mark Bezos) त्यांच्या सोबत असतील. मी वयाच्या 5 व्या वर्षापासून अंतराळात जाण्याचं स्वप्न पाहत आलोय, असं बेझोस यांनी अनेकदा सांगितलंय. त्यांनी ग्लोबल वॉर्मिंगपासून पृथ्वीला वाचवण्यासाठी बेझोस अर्थ फंड (Bezos Earth Fund ) नावाची एक संस्था स्थापन केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.