सुनिल दवंगे, शिर्डी : वाढत्या इंधन दर वाढीमुळे मोठ मोठ्या कंपन्या आता इलेक्ट्रीक टेक्नॉलॉजीकडे वळाल्या आहेत. अशातच अहमदनगर जिल्ह्यातील मॅकेनिकलच्या अंतिम वर्गात शिकणारा शेतकरी कुटुंबातील युवराज पवार या युवकानंदेखील आता या क्षेत्रात उडी घेतली आहे. अगदी कमी खर्चात बॅटरीवर चालणारी इलेक्ट्रिक विंटेज कार त्यानं विकसित केली आहे. परराज्यातून त्याला कारसाठी ग्राहक मिळत असून सोशल माध्यामांचा वापर करत तो आता आपलं नशीब आजमावत आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील निंभारी या खेडेगावात राहणारा युवराज पवार हा युवक मॅकेनिकलच्या तिस-या वर्षात शिक्षण घेत आहे. देशात कोराना संकट, त्यात नोक-यांना बसत चाललेली खिळ लक्षात घेवून त्यानं स्वतःच उद्योजक होण्याचा निर्धार केला आहे. आपल्या वडिलांच्या लहानशा वर्कशॉपमध्ये लहानपणापासून युवराज जुगाड करत असे. नवनवीन अत्याधुनिक शेती अवजारे तयार केल्याने वडिलांनी देखील त्याला पाठबळ दिले.
लॉकडाऊनच्या मागील दोन वर्षात त्यानं सुरुवातीला पेट्रोलवर चालणा-या दोन विंटेज कारची निर्मिती केली. या कारला त्याला भरभरुन प्रतिसाद मिळाल्यानंतर आता तो इलेक्ट्रिक टेक्नॉलॉजीकडे वळाला आहे. साधारण दोन महिने परिश्रम घेत त्याने 'पवार ब्रदर्स हिस्टोरिकल मोटार' या नावाने 'युवराज 3.0' ही इलेक्ट्रिक विंटेज कार तयार केली आहे.
रस्त्यावर धावताना लक्झरी कारमधील व्यक्तीच्या देखील माना आपोआप मागे वळतात. प्रथमदर्शनी अगदी मनात भरणारी, अशी या कारची डिझाइन आहे. लो स्पीड आणि हाय स्पीड अशा दोन वेगात ती धावू शकते. एकाच वेळी चार व्यक्ती अगदी आरामात या कारमध्ये बसून प्रवास करु शकतात. हेडलाईट, पार्किंग, वळण्यासाठी इंडिकेटर, स्टॉप इंडिकेटर अशा सुविधा यात देण्यात आल्या आहेत. महत्वाचे म्हणजे बॅटरी बचत व्हावी म्हणून एलईडी लाइट्स यात वापरण्यात आले आहे. करमणूकीसाठी साऊंड सिस्टम देखील यात आहे. जमीनीपासून 222 सेमीचे अंतर असल्याने कुठल्याही रस्त्यावर धावण्यासाठी परिपूर्ण आहे. कारची डिझाईन इंग्रजाच्या काळातील वाहनांसारखी आहे. तर या कारचे पेटेंट त्याने नोंदवले आहे.
सर्वसामान्यांसाठी राजा-महाराजांचा फिलजवळपास शंभर वर्षापूर्वी राजा महाराज तसेच गर्भ श्रीमंत व्यक्तींकडे अशा कार दिसत असे. देशात अगदी तुरळक व्यक्तींकडे कार असल्याने एक वेगळी छाप होती. सध्याच्या काळात काही शौकीन व्यक्तींकडे विंटेज कार दिसून देतात. यात बड्या असामींनी आपल्या कारच्या संग्रहात विंटेज कार ठेवल्या आहेत. मात्र आता युवराजच्या या कार निर्मितीमुळे हे फिल सर्वसामान्य व्यक्तीला देखील मिळू शकणार आहे. अत्यंत कमी किमतीत आणि सर्व सामान्य व्यक्तींना परवडेल अशी या कारची किंमत असून दैनदिन वापरता सुध्दा तीचा वापर करणं सहज शक्य आहे.
युवराज पवार आपल्या कार विषयी माहीती देतांना सांगतो की, मी साधारण दोन महिन्यात एक कार करतो. सुरुवातील पेट्रोल इंजिनवर धावणा-या विटेंज कार तयार केल्या. मात्र अलीकडे पेट्रोल-डिझेलचे वाढते दर यामुळे सध्या इलेक्ट्रिक टेक्नॉलॉजीकडे वळतो आहे. एक कार तयार करताना साधारण दोन ते अडीच लाख रुपये खर्च येतो. सुरुवातीला हौस आणि छंद म्हणून करत होतो. मात्र आता कार विकत घेण्यासाठी ग्राहक उपलब्ध होवू लागले आहे. तेव्हा मी अशा कार तयार करत आहे. सध्या युवराज 3.0 ही मध्यप्रदेश मधील ग्राहकाने खरेदी केली आहे. यात लिथियम बॅटरी असून चार युनिटमध्ये तीन तासात फुल चार्ज होते. ज्यात 110 किमी पर्यंत चालते. स्लो स्पीडमध्ये वेग 25 तर हाय स्पीडमध्ये 70 च्या वेगाने कार रस्त्यावर धावते.
युवराजची आई गितांजली पवार या देखील ही कार अगदी सहज चालवतात. इतर कोणतेही वाहन त्यांना चालवता येत नाही. शिक्षण कमी असल्याने आणि त्यातच ग्रामीण भाग त्यामुळे कारच्या ड्राईव्हिंग सीटवर बसण्याची संधी त्यांना मिळाली नाही. मात्र मुलाचे कत्वृत्व पाहून त्यांनी ही कार चालवली. आपल्या मुलाचा अभिमान असल्याचे त्या यावेळी सांगतात.
लवकरच चालत्या कारमध्ये बॅटरी रिचार्ज होण्याची टेक्नॉलाॉजी विकसित करणार असल्याचा दावा युवराजने केला आहे. युवराज या प्रयत्नात यशस्वी झाला तर हा प्रयोग आमूलाग्र अन क्रांतिकारी ठरणार आहे. या प्रयोगामुळे निश्चित ई-कारकडे ग्राहकांचे आकर्षण आणखी वाढेल. तर त्यातून वेळ, पैशाची बचत आणि प्रदूषण कमी होण्यास नक्कीच मदत होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.