नवी दिल्ली, 16 जून : मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटरनंतर (Twitter) आता फोटो-व्हिडीओ नेटवर्किंग साईट इन्स्टाग्रामदेखील (Instagram) चौकशीच्या घेऱ्यात आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल पथकाने मोठी कारवाई करत इन्स्टाग्रामवर गुन्हा दाखल केला आहे. गेल्या काही काळापासून इन्स्टाग्रामवर धार्मिक उन्माद आणि जातीय वातावरण खराब करण्याचा आरोप करण्यात आला आहे. स्पेशल सेलच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एफआयआरमध्ये नोंदवण्यात आलेल्या आरोपांमध्ये कोणत्याही व्यक्तीचं नाव देण्यात आलेलं नाही.
FIR मंगळवारी दाखल करण्यात आली. यात 153-A अर्थात धार्मिक समूहाविरोधात एकमेकांमध्ये द्वेष, शत्रुत्व निर्माण करण्याचाही उल्लेख आहे. एफआयआर दाखल करण्यात आल्यानंतर स्पेशल सेल टीम लवकरच चौकशीसाठी नोटिस पाठवून इन्स्टाग्राम अकाउंटशी संबंधित अधिकाऱ्यांचं विधान नोंदवेल, त्यानंतर या प्रकरणात योग्य ती कारवाई केली जाईल.
अलीकडेच केंद्र सरकारने सोशल मीडिया ट्विटरवर मोठी कारवाई करत त्यांचा इंटरमीडियरीचा दर्ज संपुष्टात आणला होता. म्हणजेच कायदेशीर संरक्षणाची त्यांची भूमिका संपुष्टात आली. आता आक्षेपार्ह पोस्टसाठी संबंधित व्यक्तीबरोबरच ट्विटरही त्या वादग्रस्त विषयाला जबाबदार असेल.
सोशल मीडियावर देशविरोधी कारवाया, धार्मिक उन्माद पसरवणं, जातीय तणाव, समाजात तणावपूर्ण वातावरण निर्माण करणं असे अनेक गंभीर आरोप सोशल मीडियावर लावले जात आहेत. त्यामुळे या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता राजधानी दिल्ली, यूपीसह अनेक राज्यात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर गुन्हे दाखल आहेत. विशेषत: ट्विटरशी संबंधित मुद्द्यावर या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता 18 जून रोजी एक महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे.
संसदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत ट्विटरशी संबंधित प्रकरणं, इंटरमीडियरी आणि कायदेशीर संरक्षणाबाबत चर्चा केली जाईल. सोशल मीडियाचा दुरुपयोग आणि देशातील नागरिकांच्या हक्कांच्या संरक्षणासंदर्भात चर्चा होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Instagram, Instagram post, Tech news