वॉशिंग्टन, 14 डिसेंबर : अमेरिकेतल्या (USA)लहान मुलांमध्ये गेमची जबरदस्त क्रेझ असते. पण गेम खेळता खेळता लाखो रुपयांचा होणारा खर्च हैराण करणारा आहे. सहा वर्षांच्या एका मुलाने आपला आवडता व्हिडीओ गेम (Video Game) खेळता खेळता, त्यातली नवनवीन फीचर्स मिळावीत म्हणून तब्बल 11.80 लाख रुपये आपल्या आईच्या क्रेडिट कार्डवरून (Credit Card) खर्च केल्याची घटना घडली आहे.
अमेरिकेतील कनेक्टिकटमधल्या विल्टन (Wilton) येथे राहणाऱ्या जॉर्ज जॉन्सन, आपल्या आईच्या अॅपल आयपॅडवरून सॉनिक फोर्सेस (Sonic Forces) नावाचा गेम खेळायचा. गेममधली नवनवी कॅरेक्टर्स पाहायला मिळावीत, अधिक स्पीड मिळावा यासाठी आवश्यक ती अॅड-ऑन बूस्टर्स (Add On Boosters) त्याने अॅपल अॅप स्टोअरवरून (App Store) खरेदी केली.
1.99 डॉलरच्या रेड रिंग्जपासून 99.99 डॉलरच्या गोल्ड रिंग्जपर्यंत अशा विविध व्हर्च्युअल (Virtual) गोष्टींची खरेदी जॉर्जने केली आणि एका वेळी शेकडो डॉलर्सचा खर्च केल्याची माहिती द न्यूयॉर्क पोस्टने (The New York Post) आपल्या वृत्तात दिली आहे.
जुलै महिन्यात केली गेलेली ही खरेदी त्याच्या आईच्या आधी लक्षात आली नाही. 9 जुलैला त्यांच्या क्रेडिट कार्डवर 25 प्रकारचं शुल्क आकारलेलं जॉन्सन यांच्या लक्षात आलं. ते शुल्क 2500 हजार डॉलर्स म्हणजे सुमारे 1 लाख 80 हजार रुपये एवढं होतं. थोडा शोध घेतल्यावर त्यांच्या लक्षात आलं, की चेस बँकेच्या (Chase Bank) त्यांच्या अकाउंटमधून अॅपल (Apple) आणि PayPal या कंपन्यांच्या नावावर मोठी रक्कम जमा केली जात आहे. हा घोटाळा (Fraud) आहे असं त्यांना वाटलं आणि त्यांनी बँकेशी संपर्क साधला.
‘ज्या पद्धतीने हे शुल्क आकारण्यात आलं होतं, त्यावरून ते गेमसाठी आकारण्यात आलं आहे, हे ठरवणं जवळपास अशक्यच होतं,’ असं जॉन्सन यांनी ‘न्यू यॉर्क पोस्ट’ला सांगितलं. आपल्या मुलाकडून हा खर्च झाला आहे, हे माहिती नसल्याने जॉन्सन यांनी घोटाळ्याची तक्रार दाखल केली. कारण तोपर्यंत त्यांच्या कार्डवरून खर्च झालेल्या रकमेचा आकडा 16 हजार 293.10 डॉलर्स म्हणजे जवळपास 11.99 लाख रुपये एवढा झाला होता.
ऑक्टोबर महिन्यात त्यांना सांगण्यात आलं, की हा खर्च त्यांच्याच अकाउंटवरून झाला असून, त्या संदर्भात माहितीसाठी त्यांना अॅपलशी संपर्क साधावा लागेल. अॅपलशी संपर्क साधल्यावर त्यांना कळलं, की आयपॅड (iPad) गेम खेळता खेळता त्यांच्या मुलाकडूनच हा खर्च झालेला आहे. जॉन्सन यांनी सगळ्या बारीकसारीक, छुप्या शुल्काचा बारकाईने शोध घेतला.
‘कोणाचं तरी मार्गदर्शन असल्याशिवाय हे शोधणं अवघड आहे. अॅपलकडून या संदर्भात आम्हाला काही मदत मिळाली नाही. कारण शुल्क आकारल्यापासून साठ दिवसांच्या आत त्यांच्याशी संपर्क साधला गेला नाही. मी त्या वेळी त्यांच्याशी संपर्क साधला नाही, कारण हा घोटाळा असू शकतो, असं चेस बँकेकडून मला सांगण्यात आलं होतं,’असं त्या म्हणाल्या.
जॉन्सन यांनी हे कबूल केलं, की त्यांनी त्यांच्या अकाउंटवर काही प्रतिबंधात्मक सेटिंग्जचा (Preventive Settings) वापर केला नव्हता. त्याबद्दल त्यांना माहिती नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. ‘अर्थातच, मला त्या सेटिंग्जबद्दल माहिती असतं, तर माझ्या मुलाला व्हर्च्युअल गोल्ड-रिंग्जसाठी (Gold Rings) सुमारे दोन लाख डॉलर्स खर्च करायला दिलेच नसते,’असंही त्या म्हणाल्या.
या सगळ्यासाठी जेसिका जॉन्सन यांनी अॅपल आणि गेम डिझायनर्सना (Game Designers) जबाबदार धरलं आहे. ‘या गेम्सला बळी पडण्यासारख्या पद्धतीने ते तयार करण्यात आले आहेत आणि मुलांना त्यात खरेदीचा पर्याय दिला जातो. माझ्या मुलाला हे कळत नाहीये, की त्यात खर्च केले जाणारे पैसे खरे आहेत. अर्थात ते त्याला खरं वाटणार तरी कसं? कारण तो जे कार्टून गेम्स खेळतो, ते विश्व खरं नाही हे त्याला माहिती आहे. मग त्यात खर्च होणारे पैसे खरे आहेत, असं त्याला कसं वाटेल? ते कळण्यासाठी त्याची बौद्धिक क्षमता अजून वाढण्याची गरज आहे,’असंही त्यांनी म्हटलं आहे.