नवी दिल्ली, 19 डिसेंबर : ब्रॉडब्रँड इंडिया फोरमचे अध्यक्ष टीवी रामचंद्रन यांनी PM WANI योजनेंतर्गत देशात 2 कोटी रोजगार निर्माण होण्याची माहिती दिली आहे. त्याशिवाय देशात इंटरनेटची कनेक्टिव्हिटीही वाढेल. येणाऱ्या काळात मोबाईल डेटा 30 ते 40 टक्क्यांनी महाग होऊ शकतो. त्यामुळे सामान्य जनतेला PM WANI योजनेंतर्गत स्वस्त वाय-फायची सुविधा मिळेल.
काय आहे PM WANI योजना?
देशात वाय-फाय क्रांतीसाठी (Wi-fi revolution) पीएम मोदींच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेटने पीएम पब्लिक वाय-फाय एक्सिस नेटवर्क इंटरफेस योजनेला (PM-WANI - Prime Minister Wi-Fi Access Network Interface) मंजुरी दिली. ही योजना लागू झाल्यानंतर सामान्यांना इंटरनेटसाठी कोणत्याही बड्या कंपनीच्या प्लानची आवश्यकता असणार नाही. वाय-फाय क्रांतीमुळे देशातील दूरच्या भागातही फास्ट स्पीड इंटरनेट उपलब्ध होईल. सरकार या योजनेवर तीन स्तरावर काम करेल. ज्यात पब्लिक डेटा ऑफिस, पब्लिक डेटा एग्रीगेटर आणि ऍप प्रोव्हाडरचा समावेश असेल.
काय आहे पब्लिक डेटा ऑफिस?
अनेकांनी पीसीओ बूथ पाहिले असतील, जे एखाद्या चहाच्या टपरीजवळ, नाश्ताच्या दुकानाजवळ, रस्त्यालगत एखाद्या कोपऱ्यात असायचे. त्याप्रमाणे, देशभरात सरकार, पब्लिक डेटा ऑफिस बनवण्याच्या तयारीत आहे. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, पब्लिक डेटा ऑफिससाठी लायसन्स, रजिस्ट्रेशन किंवा कोणतीही फी देण्याची आवश्यकता नाही. पब्लिक डेटा ऑफिस मोबाईल फोनमध्ये इंटरनेटचा वापर करण्यासाठी वाय-फाय सेवा पुरवण्याचं काम करेल.
पीडीओ अर्थात पब्लिक डेटा ऑफिस कोणतीही व्यक्ती सुरू करू शकते. आणि ते चालवण्यासाठी इंटरनेट सर्व्हिस पुरवणाऱ्या कंपनीकडून सुविधा घेऊ शकते.
केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोणतीही कंपनी, सोसायटी, दुकानदार पब्लिक वाय-फाय ऍक्सेस पॉईंट बनवू शकतात. ज्याद्वारे लाखो लोकांपर्यंत वाय-फाय, हॉटस्पॉटची सुविधा पोहचवली जाईल.
शिक्षण, आरोग्य, व्यवसायासह अनेक गोष्टींमध्ये इंटरनेटचा वापर वेगाने वाढतो आहे. अशा परिस्थितीत देशातील वाय-फाय क्रांतीमुळे माहितीची देवाण-घेवाण वेगवान होईल. त्याशिवाय देशातील दुर्गम भागात रोजगाराच्या संधींमध्ये वाढ होईल, असंही सांगण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Internet