नवी दिल्ली, 30 ऑगस्ट : कोरोना काळात सायबर क्राईम (Cyber Crime), ऑनलाईन फ्रॉडच्या (Online Fraud) संख्येत वाढ झाली आहे. सायबर फ्रॉडची, बँकिंग फ्रॉडची अनेक प्रकरणं समोर आली असताना आता ई-कॉमर्स साईटवरुनही लाखोंच्या फसवणुकीची बाब उघड झाली आहे. Amazon च्या नावाचा वापर करुन एका महिलेला तब्बल अडीच लाखांचा गंडा घालण्यात आला आहे.
मुंबईतील बोरिवलीमध्ये हा फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. 37 वर्षीय गृहिणीला त्यांना टेलिग्रामवर एक मेसेज आला. घरी असणाऱ्या महिला घरातूनच काम करुन चांगली कमाई करू शकतात, असं त्या टेलिग्रामवर आलेल्या मेसेजमध्ये लिहिलं होतं. हा मेसेज पाहून त्या महिलेनेही हे काम करुन बघण्यास काय हरकत आहे, असा विचार केला.
16 ऑगस्ट रोजी महिलेने याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीला संपर्क केला. काम ठीक असल्यास करण्याचा निर्णय त्या महिलेने घेतला. समोरच्या व्यक्तीने हे काम घरातूनच करावं लागेल असं सांगितलं. काम अतिशय सोपं असून अॅमेझॉन प्रोडक्ट्स खरेदी करुन त्याचं रेटिंग वाढवणं, ज्यामुळे प्रोडक्ट्सची विक्री वाढेल. या कामासाठी चांगलं कमिशन मिळेल, असं सांगण्यात आलं.
महिलेने हे काम करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फ्रॉडस्टरने आपली पाउलं उचलण्यास सुरुवात केली. महिलेला एक पॉवर ऑफ अटॅर्नी लेटर पाठवण्यात आलं. त्यानंतर ई-वॉलेटमध्ये पैसे पाठवून अॅमेझॉनवरुन एक प्रोडक्ट खरेदी करुन, त्यानंतर 200 रुपये कमिशनसह प्रोडक्टची मूळ रक्कमही मिळेल असं सांगण्यात आलं. ऐकताना हा पर्याय चांगला वाटला.
काम करण्यास सहमती दिल्यानंतर महिलेने त्यांनी दिलेल्या वॉलेटमध्ये 5000 रुपये जमा केले. काही वेळातच त्यांना 200 रुपये कमिशन मिळालं आणि वॉलेटमध्ये जे 5000 रुपये जमा केले होते, तेदेखील मिळाले. म्हणजेच 5000 जमा केल्यानंतर महिलेला काही वेळातच 5200 मिळाले. लगेचच हा फायदा झाल्याने महिला आनंदात होती.
लगेच दुसऱ्याच दिवशी फसवणूक करणाऱ्याने महिलेला 17 ऑगस्ट रोजी सीनियर ऑफिसर त्यांच्याशी टेलिग्रामवर कॉन्टॅक्ट करतील आणि एक मोठं काम देतील असं सांगितलं.
सीनियर बोलत असल्याचं सांगत, फसवणूक करणाऱ्याने 9 वेगवेगळ्या वॉलेटमध्ये पैसे टाकण्यास सांगितले आणि त्याबदल्यात मोठ्या मोबदल्याचं लालचंही दिलं. महिलेनेही 9 वॉलेटमध्ये 2 लाख 33 हजार रुपये जमा केले. महिलेला 2 लाख 33 हजारांच्या बदल्यात 4 लाख येण्याची अपेक्षा होती.
महिलेने सांगितल्याप्रमाणे गोष्टी केल्या, परंतु तिला बदल्यात अधिक पैसे मिळाले नाहीत. दोन दिवस पैसे न आल्याने तिने फ्रॉडस्टरला कॉल केला. त्याने महिलेला आधी 80,700 रुपयांचा इन्कम टॅक्स भरण्याचं सांगितलं. पण महिलेने त्यांना तिने भरलेली रक्कम परत करण्याची मागणी केली. परंतु फ्रॉड करणाऱ्याने नकार देत आधी इन्कम टॅक भरण्याचं सांगितलं.
काही दिवसांत महिलेला तिच्यासोबत फ्रॉड झाल्याची शंका आली. 19 ऑगस्ट रोजी तिने पोलिसांत तक्रार दाखल करत FIR केली. सध्या पोलीस या प्रकरणात तपास करत आहेत.
सोशल मीडियावरील कोणत्याही मेसेजवर लगेच विश्वास न ठेवता त्याला प्रतिसाद न देण्याचं अनेकदा सरकारकडूनही सांगण्यात येतं. अनोळख्या व्यक्तीकडून आलेल्या कोणत्याही लिंकवरही क्लिक करू नका. अधिक पैसे कमावण्याच्या अशा फसवणुकीच्या गोष्टींपासून सावध राहा, असे अनेक मेसेज फ्रॉडसाठीच तयार करुन सर्वसामान्यांची मोठी फसवणूक केली जाते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amazon, Cyber crime, Online fraud