जितेंद्र जाधव, बारामती, 07 फेब्रुवारी : मिस इंडियाचा मुकूट ठाणेदाराच्या कन्येला...विश्वास बसत नाहीना..पण हे शक्य करून दाखवलेय धनश्री गोडसे हिने...नुकताच तिने जयपूर येथे झालेल्या मिस इंडिया 2019 स्पर्धेत मिस इंडियाचा किताब तिने पटकावला आहे. या स्पर्धेत तलवारीपेक्षा सामर्थ्यवान काय आहे तर.. शिक्षण असे उत्तर तिने दिले आणि मिस इंडियाचा मुकूट तिच्या शिरपेचावर विराजमान झाला. बारामतीचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांची कन्या धनश्री हिने ही बाजी मारली. इंडियन फॅशन फियास्टाच्या वतीने जयपूर येथे अंतिम फेरीतील देशभरातील 27 सौंदर्यवती स्पर्धकांमधून मराठमोळ्या धनश्री हिने मिस इंडिया किताबाला गवसणी घातली. ही स्पर्धा 30 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान झाली. धनश्री गोडसे ही सांगली येथील भारती विद्यापीठाच्या वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षात शिकते. कथ्थक, कराटे, वक्तृत्व आणि चित्रकला स्पर्धांमधून तिने अनेक पारितोषिके मिळवली. ठाणेदाराच्या मुलीने मिस इंडियाचा मुकूट परिधान केल्याने सर्वत्र हिचे कौतुक होत आहे.