ठाणे, 20 फेब्रुवारी : अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर वन विभागानं ठाणे शहरात शिरलेल्या बिबट्याला जेरबंद केलं आहे. 'सत्कार' हॉटेलच्या बेसमेंटमधून या बिबट्याला पकडण्यात आलं. दाट लोकवस्ती असलेल्या ठाणे शहरात बिबट्या शिरल्याने परिसरात खळबळ उडाली होती. बिबट्या प्रसिद्ध 'कोरम' मॉलच्या पार्किंगमध्ये शिरला. त्यानंतर तो सत्कार हॉटेलच्या बेसमेंटमध्ये लपून बसला होता. सत्कार हॉटेलच्या बेसमेंटमध्ये असलेल्या बिबट्याला पकडणे हे वन अधिकाऱ्यांपुढे मोठे आव्हान होतो. त्यासाठी पिंजरे मागवण्यात आले. वन अधिकाऱ्यांनी भूल देत बिबट्याला अखेर जेरबंद केले आणि सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला. बिबट्याला पाहण्यासाठी ठाणेकरांनी सत्कार हॉटेल परिसरात मोठी गर्दी केली होती. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान अथवा येऊर परिसरातून हा बिबट्या ठाणे शहरात आला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय.