Home » Tag » Bigg Boss Marathi » news

bigg boss marathi बातम्या - Bigg Boss Marathi News

  बिग बॉस हा छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो आहे. हा शो त्याच्या कॉन्ट्रोव्हर्सीसाठी ओळखला जातो. सुरुवातीला फक्त हिंदीत सुरू झालेला हा शो आता मराठी, तमीळ, तेलुगू अशा अनेक भाषांमध्येही होतो. मराठी बिग बॉसचे (Bigg Boss Marathi) आतापर्यंत तीन सीझन्स झाले असून, लवकरच चौथा सीझन सुरू होणार आहे. महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) हे या शोचे होस्ट आहेत. पहिल्या सीझनपासून तेच हा शो होस्ट करत आहेत. शोच्या मराठीतल्या पहिल्या सीझनचं प्रसारण कलर्स मराठी वाहिनीवर 15 एप्रिल 2018 रोजी सुरू झालं होतं. मेघा धाडे (Megha Dhade) हिने पहिल्या सीझनची विजेती होण्याचा मान पटकावला होता. पहिल्या सीझनमध्ये मेघा धाडे, पुष्कर जोग, राजेश श्रुंगारपुरे, रेशम टिपणीस, सई लोकुर, स्मिता गोंदकर, ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी, शर्मिष्ठा राऊत, जुई गडकरी, आस्ताद काळे आणि त्यागराज खाडिलकर हे लोकप्रिय चेहरे सहभागी झाले होते. 

   

  पहिल्या सीझनला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर 26 मे 2019 रोजी बिग बॉस मराठीचा दुसरे सीझन सुरू करण्यात आला होता. शिव ठाकरे हा दुसऱ्या सीझनचा विजेता ठरला होता. दुसऱ्या सीझनमध्ये ज्येष्ठ अभिनेत्री किशोरी शहाणे, अभिनेता आरोह वेलणकर, अभिजित केळकर, नेहा शितोळे, मैथिली जावकर, वीणा जगताप, विद्याधर जोशी, शिवानी सुर्वे, रूपाली भोसले, वैशाली माडे, पराग कान्हेरे, अभिजित बिचुकले, हीना पांचाळ, लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर आणि शिव ठाकरे (Shiv Thakre) सहभागी झाले होते. दुसऱ्या सीझनची उपविजेती नेहा शितोळे ठरली होती. 

   

  19 सप्टेंबर 2021 रोजी बिग बॉस मराठीचा तिसरा सीझन सुरू झाला होता. त्याचे होस्टदेखील महेश मांजरेकर होते. विशाल निकम (Vishal Nikam) याने तिसऱ्या सीझनचा विजेता होण्याचा मान पटकावला होता. या सीझनमध्ये विशालसह सुरेखा कुडची, अक्षय वाघमारे, आदिश वैद्य, आविष्कार दारव्हेकर, स्नेहा वाघ, गायत्री दातार, मीरा जगन्नाथ, उत्कर्ष शिंदे, सोनाली पाटील, जय दुधाणे, तृप्ती देसाई व कीर्तनकार शिवलीला पाटील सहभागी झाले होते. स्नेहा आणि आविष्कार या माजी जोडप्यामुळे या सीझनची खूप चर्चा झाली होती.

   

  बिग बॉस मराठी हा कार्यक्रम कलर्स मराठी वाहिनीवरून प्रसारित होतो. एंडेमॉल शाइन इंडिया हे या शोचे निर्माते आहेत. या शोमधल्या स्पर्धकांना 100 दिवस बिग बॉसच्या घरात राहावं लागतं. यादरम्यान, त्यांचा बाहेरच्या जगाशी कोणताही संपर्क नसतो. स्पर्धक कोणत्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा परवानगीशिवाय उपयोग करू शकत नाहीत. त्यांना दिवसा झोपण्याची परवानगी नसते. त्यांना नेहमीच माइक घालणं आणि मराठी भाषेत बोलणं बंधनकारक असतं. प्रत्येक स्पर्धकाला आठवड्याच्या सुरुवातीला अन्य दोन प्रतिस्पर्ध्यांचं नामांकन घरातून बाहेर काढण्यासाठी करावं लागतं. त्यानंतर प्रेक्षक त्यांच्या आवडत्या स्पर्धकाला व्होट्स देतात. यातून ज्यांना कमी मतं पडतात, ते बाहेर पडत जातात. स्पर्धक घरात असताना कोणाबरोबरही नामांकन प्रक्रियेवर चर्चा करू शकत नाहीत. काही जणांना काही टास्क पूर्ण केल्याबद्दल बक्षीस म्हणून इम्युनिटी दिली जाते. त्यांचं नाव त्या आठवड्याच्या बाहेर पडण्याच्या यादीत येत नाही. प्रत्येक आठवड्याचा वेगळा कॅप्टन असतो. कॅप्टनला इम्युनिटी असते. कॅप्टन थेट बिग बॉसद्वारे काही टास्कमधून निवडला जातो किंवा स्पर्धकही निवड करतात. सर्व टास्क्सवर नजर ठेवणं, घराचे नियम पाळले जात आहेत की नाही, यावर लक्ष ठेवणं या कॅप्टनच्या प्रमुख जबाबदाऱ्या असतात. गंभीर नियमभंग झाल्यास स्पर्धकाला थेटही बाहेर काढलं जाऊ शकतं.

   

  टीव्हीवर दररोज दाखवल्या जाणाऱ्या एपिसोड्समध्ये आदल्या दिवशी घरात घडलेल्या मुख्य घटना दाखवल्या जातात. प्रत्येक शनिवार व रविवारचा भाग मुख्यतः काढून टाकलेल्या स्पर्धकांच्या होस्टद्वारे घेतलेल्या मुलाखतींवर आधारित असतो.

   

  2 ऑक्टोबर 2022 रोजी बिग बॉस मराठीचा चौथा सीझन सुरू होणार आहे. बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनचा टीझर समोर येताच आता या सीझनमध्ये बिग बॉसच्या घरात नेमकं कोण-कोण दिसणार याची चर्चा सुरू झाली. चौथ्या सीझनमधल्या काही संभाव्य स्पर्धकांची यादी व्हायरल झाली होती. बिग बॉस खबरी नावाच्या इन्स्टाग्राम पेजवरून ही संभाव्य स्पर्धकांची यादी शेअर करण्यात आली होती. त्यात अभिनेता हार्दिक जोशीचं नाव टॉपमध्ये आहे. यादीत दुसरं संभाव्य नाव आहे किरण माने यांचं. किरण माने यांच्यावरून एका मालिकेत वाद झाला आणि त्या मालिकेतून त्यांना काढून टाकण्यात आलं होतं. तसंच सोशल मीडियावर त्यांना मोठं फॅन फॉलोइंग आहे. आपल्या बेधडक आणि स्पष्ट मतांसाठी प्रसिद्ध असलेले किरण माने चौथ्या सीझनमध्ये असू शकतात, असं म्हटलं जातंय. याशिवाय अभिनेत्री अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड, ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी गोखले, नेहा खान, अभिनेत्री अलका कुबल,  सोनल पवार, रुचिरा जाधव, ओमप्रकाश शिंदे, शर्वरी लोहकरे,  दीप्ती लेले, अनिकेत विश्वासराव, निखिल चव्हाण, यशोमन आपटे आणि ज्येष्ठ अभिनेते माधव अभ्यंकर यांच्या नावांचीसुद्धा कार्यक्रमासाठी जोरदार चर्चा होताना दिसत आहे.