हेमंत करकरे

Showing of 144 - 157 from 163 results
ग्रेट भेटमध्ये अरविंद इनामदार

May 13, 2013

ग्रेट भेटमध्ये अरविंद इनामदार

ग्रेट भेटच्या 6 डिसेंबरच्या भागात आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांनी राज्याचे माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांची मुलाखत घेतली. 26 नोव्हेंबरला एखाद्या तुफानासारखे दहशतवादी आले आणि आपल्याला हरवून गेले. या काळात कोणाचा तरी आधार लागतो आणि अरविंद इनामदार हे असाच एक आधार आहेत. ते कायम सत्य बोलले आणि सत्तेपुढे कधी झुकले नाहीत. अत्यंत इमानदार आणि प्रामाणिक अधिकरी म्हणून त्यांची ओळख आहे. 26/11 च्या हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण करून या मुलाखतीची सुरुवात झाली.निखिल वागळे - आमच्या सारख्या सर्वसामान्यांचं रक्षण कोण करणार ? अरविंद इनामदार - खरं सांगायचं तर हाच प्रश्न मलाही पडलाय. मी मुंबईत फिरत असतो, महाराष्ट्रात, भारतात सगळीकडे असतो. हाच प्रश्न मला अनेकांनी विचारला. माझ्या नेहमीच्या हॉटेलमधल्या वेटरनंही मला विचारलं उद्या जर कोणी इथे येऊन गोळीबार केला तर काय करायचं ? लोक घाबरलेत. एक प्रकारचं वैफल्य आल्यासारखं झालंय. खर तर प्रजेचं रक्षण करणं, हे राजाचं काम आहे. प्रजा ही राजाला मुलासारखी असते. आणि याच कामासाठी राजेशाही आली. पण आजची परिस्थिती आपण पाहिली तर 1993 ते 2008 पर्यंत 17 ते 18 मोठे स्फोट झाले. त्यात 1300 ते 1400 लोकांना आपले प्राण गमावले. कोणी अक्षरधामला दर्शनाला गेले असतील, कोणी समझोता एक्प्रेसमध्ये असतील, कोणी मुंबईत स्टॉक एक्स्चेंजमध्ये गेले असतील, कोणी ताजमध्ये गेले असतील किंवा कोणी लिओपोल्डमध्ये गेले असतील. या सगळ्यांची खुलेआम कत्तल झाली. ही अतिशय वाईट गोष्ट आहे. ही गोष्ट राज्यकर्त्यांनी ओळखली पाहिजे. संस्कृतमध्ये फार छान सांगितलं आहे. शत्रू माहिती असूनसुद्धा आपण शांत असतो, तेव्हा कुशीमध्ये विस्तव घेऊन आपण वार्‍याला उभे रहातो. ही परिस्थिती आपल्याला खर्‍या अर्थानं बदलायची असेल तर सगळ्या देशातल्या नागरिकांनी उठाव करायला पाहिजे.निखिल वागळे - 1993 साली मुंबईत पहिल्यांदा बॉम्बस्फोट झाला. तोपर्यंत शहरानं बॉम्बस्फोट पाहिला नव्हता. या वेळेस तर अतिरेक्यांनी बंदुका घेऊन सीएसटी स्टेशनवर अंदाधुंद गोळीबार केला. दोन हॉटेलमध्ये लोकांना ओलीस ठेवलं. तुम्ही 50 वर्षं पोलीस दलात होता. या दहशतवादी हल्ल्याचं विश्लेषण तुम्ही कसं कराल ?अरविंद इनामदार - 1993 पासून दहशतवादाचं आंतरराष्ट्रीय स्वरूप आपल्यासमोर आलं. बाबरी मशिदीवरचा हल्ला आणि त्यानंतर मुंबईत 13 ठिकाणी स्फोट झाले. अर्ध्या पाऊण तासाच्या अंतरानं स्फोट झाले. नंतर दिल्लीत स्फोट झाले. हैदराबाद, दिल्ली, कोईम्बतूर, मुंबईतल्या लोकल गाड्यांमध्ये स्फोट झाले. पण यावेळचा हल्ला विलक्षण क्रूर, पाशवी होता. एकदम हे 15-20 दहशतवादी येतात काय आणि लिओपोल्ड हॉटेलपासून ते नरिमन हाऊस, सीएसटी, कामा हॉस्पिटलनंतर मेट्रोच्या परिसरात बेधुंद फायरिंग काय करतात... त्यांना मुंबईची संपूर्ण माहिती आहे. ते टॅक्सीनं फिरतात. एवढंच काय पोलिसांना मारून नंतर त्यांचीच गाडी घेऊन पळून काय जातात... जीवावर उदार होऊन, जिहादी हल्ल्यानं पेटलेले हे अतिरेकी होते. त्यांना माहीत होतं, आपण मरणार आहोत, पण त्यालाही त्यांची तयारी होती. आणि जीवावर उदार झालेले अतिरेकी हे सगळ्यात धोकादायक असतात.निखिल वागळे - तुम्ही जर आत्ता डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस असता, तर काय केलं असतं ?अरविंद इनामदार - मी याच्याअगोदर काय केलं असतं किंवा करायला पाहिजे, ते सांगतो. 1989 च्या सुमारासचं उदाहरण घ्या. त्यावेळेस दहशतवादी हल्ले कमी होते, पण त्यावेळेसही पंजाबमध्ये दहशतवादाचं थैमान चालू होतं. मुंबईतही आमचा एक सब इन्सपेक्टर मारला गेला होता. मुंबईत गँगवॉर उफाळून आलं होतं. ते लोक रस्त्यावर येऊन धडाधड गोळीबार करत होते. म्हणजे पोलीस नाही पण रस्त्यावरचे निरपराध लोक मरत होते. त्यावेळेस आम्ही एस.ओ. एस. ची स्थापना केली होती. त्यात पहिल्यांदा 35 ते 40 अधिकारी आणि कॉन्स्टेबल होते. त्यांच्यासाठी आम्ही त्याकाळी बुलेटप्रुफ गाड्या आणि जॅकेट मागवली होती. त्यासाठी सरकारच्या मागेच लागलो होतो. आम्ही सरकाला सांगितलं की, जर या गँगस्टर्सचा सामना करायचा असेल तर त्यांच्यापेक्षा चांगली शस्त्र आमच्याकडे पाहिजेत. त्यांच्यापेक्षा आमच्या शिपायांचं मोटीव्हेशन चांगलं पाहिजे. माझ्या माणसांचे पगार मी दीडपट केले. आणि तुम्हाला सांगतो मरीन लाईन्सच्या ओव्हरब्रीजपाशी आमच्या एका अधिकार्‍यानं तीस फूटावरून उडी घेऊन एका स्मगलरला पकडलं होतं. स्मगलर टॅक्सीत होता, आमच्या अधिकार्‍याला त्यानं उडवायचा प्रयत्न केला, पण तो घाबरला नाही. आमच्या कमांडोला 27 टाके पडले, पण त्यानं स्मगलरला सोडलं नाही. दाऊद गँग असेल, गवळी असेल, आमची एसओएसचा मंडळी तयारच होती.निखिल वागळे - आताच्या एटीएसची कल्पना कदाचित तुमच्या एसओएसवरूनच निघाली असेल. आत्ता शहीद झालेले अधिकारी तुमचेच विद्यार्थी होते. ही सगळी जिगरबाज माणसं आपण दहशतवादी हल्ल्यात गमावली. असं का झालं ?अरविंद इनामदार - पहिल्यांदा मला त्यांची थोडी माहिती सांगू देत. 1982 साली हेमंत करकरे मला पहिल्यांदा नाशिकच्या पोलीस ट्रेनिंग कॉलेजमध्ये भेटले. मी त्यावेळेस कॉलेजचा प्राचार्य होतो. त्यावेळेस आम्ही तिथे सुमारे 15 हजार झाडं लावली. पहिला खड्डा मी खणला, सब इन्स्पेक्टर खड्डे खणतच होते. पण त्यावेळेस अशी कुजबुज सुरू होती की, आमचे अधिकारी आयपीएस विद्यार्थ्यांना हे खड्डे खणायला सांगतील का ? त्यावेळेस सगळ्यात पहिले हेमंत करकरे पुढे आले. त्यांनी खड्डा खणला आणि मला म्हणाले की, साहेब अगदी मनासारखा खड्डा जमलाय. अतिशय नम्र, मितभाषी विद्यार्थी होते. काय सांगू तुम्हाला, 15 दिवसांपूर्वीच मला भेटले होते.आमचा एक हिरा गेला हो... कामटे म्हणजे आमचे डेअरडेव्हील ऑफिसर. सोलापूरला रवी पाटील म्हणून एक गुंड होता, आता ते आमदार असतील, पण त्यावेळी ते गुंडच होते. त्यांचा नक्शा कामटेंनी उतरवला होता. साळसकर म्हटलं की माझ्या डोळ्यापुढे झाडाला पाणी घालणारा माझा सालस विद्यार्थीच येतो. नंतर त्यांनी गँगस्टर्सलाही पाणी पाजलं. यांची आठवण आली की मला कायम असं वाटतं की पुन्हा एकदा ते पीटीसीचे दिवस यावेत आणि हे सगळे विद्यार्थी मला पुन्हा भेटावेत.निखिल वागळे - तुम्ही म्हणालात 15 दिवसांपूर्वी तुम्हाला करकरे भेटले. त्यावेळेस करकरे साध्वी प्रकरणाचा तपास करत होते. राजकारण्यांनी त्यांची धिंड काढण्याची भाषा वापरली होती. काय अवस्था होती त्यांची त्या वेळेस ? ते निराश झाले होते का ? अरविंद इनामदार - ते थोडेसे निराश झाले होतेच. पण मी त्यांना सांगितलं, पोलीस खात्यात हे होतंच. या खात्यात जेव्हा तुम्ही उत्कृष्ट काम करत असता तेव्हा दुसरीकडे तुमच्या वस्त्रहरणाचीही तयारी सुरू असते. पोलीस एकीकडे जिहादींशी सामना करतायत आणि त्याचवेळेस हिंदू दहशतवाद्यांचा बुरखा फाडतायत तेव्हा त्यांची कामगिरी तुम्ही समजू शकता. मी त्यांना सांगितलं, तुम्ही तुमचं काम करत रहा, कोणाला घाबरू नका. राजकारणी तुम्हाला छळणारच. त्यांचं कामच आहे ते. आणि करकरे खूप मोटिव्हेट होऊन बाहेर पडले होते.निखिल वागळे - करकरे गेले तेव्हा तुम्हाला नेमकं काय वाटलं ?अरविंद इनामदार - त्यावेळी मी मुंबईत नव्हतोच. पण बातमी ऐकून मी अक्षरश: हादरून गेलो होतो. करकरे चंद्रपूरला असताना मी नागपूरला कमिशनर होतो, ते कायम मला फोन करायचे आणि सल्ला विचारायचे आणि करकरेंची वैचारिक पातळी एवढी वरची होती की त्यांचा आम्हाला कायम अभिमान आहे. निखिलवागळे - राजकारण्यांनी त्यांचं खच्चीकरण केलं होतं का ?अरविंद इनामदार - हे राजकारण्यांचं कामच आहे. आपल्या देशाची परिस्थिती अशी आहे की, इथे चांगल्याची किंमत नाही. आज इथे प्रत्येक जण तुम्हाला हेच सांगेल की भ्रष्टाचाराला पर्याय नाही. खरं तर कशाला हवा भ्रष्टाचार ? अरे तुम्हाला चांगला पगार मिळतो, भत्ते मिळतात, नंतर चांगलं पेन्शन मिळतं, काय गरज आहे भ्रष्टाचाराची ? पण आम्ही आमची सिस्टीमच अशी केलीय की आम्ही सत्तेच्या मागे लागलोय. मग हा कायदा हवा, तो नको, जातीचं राजकारण असे गैरप्रकार सुरू आहेत.निखिल वागळे - आता करकरे कामटे आणि अधिकारी गेल्यानंतर पोलिसांचा आत्मविश्वास हरवल्यासारखा दिसतोय. काय झालंय नक्की पोलिसांना ?अरविंद इनामदार - आत्मविश्वास हरवलाय, असं मी म्हणणार नाही. अजुनही अधिकारी मला फोन करून सांगतात की, आम्ही काम करायला तयार आहोत आणि जिथे माणसे अशी जिद्दीनं उभी रहातात, त्यांचं मनोबल खच्ची झालंय, असं आपण कसं म्हणू शकतो ? मला कमीत कमी 10 अधिकार्‍यांचे फोन आलेत, जे झाल्या प्रकारानं चिडलेत. गेल्या साठ वर्षांत पोलीस अधिकार्‍यांवर प्रचंड अन्याय झालाय. तुम्हाला कल्पना नसेल पण गेल्या 60 वर्षांत आर्मीपेक्षा आमची चौपट माणसं शहीद झालीयत. मी ज्या वेळेस आमच्या माणसांच्या पगारवाढीसाठी लढत होतो तेव्हा उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एका फायनान्स सेक्रेटरीनंअसं विचारलं होतं की, काय गरज आहे तुम्हाला पगारवाढीची ? आमचा लिफ्टमन पोलिसांचं काम करेल. त्यावेळी मी त्यांना म्हटलं की, तुमच्या लिफ्टमनला एकदा दहशतवाद्यांशी सामना करू द्यात, मुंबईच्या प्रदूषणात 12-14 तास रस्त्यात उभं राहू द्यात, बंदुका असताना मोर्चात बंदोबस्ताला जाऊ द्यात, दररोजचे 14 ते 16 तास काम करू द्यात, मग मी मानतो. त्यावर मला असं ऐकवलं गेलं की तुम्ही एखाद्या युनियनलीडरसारखं बोलताय का ? पोलिसांनी इतक्या कमी पैशांत काम करावं, अशी अपेक्षा केली जाते ? आम्ही साधी मागणी केली की तुम्ही रेव्हेन्यू डिपार्टमेंटला जे स्केल देताय, ते स्केल आमच्या अधिकार्‍यांना द्या. बरंच भांडलो आम्ही, तीन वेळा स्केल रिव्हाईज केलं तेव्हा आम्हाला आत्ता क्लर्कच्या जरा वरचं स्केल दिलं. राजकारणी आणि नोकरशाही आमच्याप्रश्नी संवेदनशील नाही. म्हणून मी आता मागणी केली की जर बी अँड सीचा सेक्रेटरी त्यांचा अधिकारी असू शकतो, लॉ चा सेक्रेटरी हा लॉ चा माणूस असतो, तर गृहसचिव पोलीस अधिकारीच हवा. तुम्हाला सांगतो, पोलीस महासंचालक म्हणून माझा आर्थिक अधिकार होता फक्त 150 रुपये. कलेक्टरला तुम्ही कोट्यवधी रुपये खर्च करण्याचे अधिकार देता, आणि 1 लाख 70 हजार पोलिसांचा प्रमुख असलेल्या पोलीस दलाच्या प्रमुखाला एवढा कमी अधिकार. तुम्ही बॉम्बे पोलीस अ‍ॅक्ट काढून पहा, आम्ही गृहसचिवांच्या हाताखाली काम करतो. आर्मीचा प्रमुख कधी डिफेन्स सेक्रेटरी असू शकतो का ? 25 वर्षं पोलीस कॉन्स्टेबलला प्रमोशन नाही. याकाळात आर्मीला 4 ते 5 प्रमोशन्स मिळतात, सचिवालयात तेवढीच मिळतात, मग आम्हाला का नाही ? निखिल वागळे - पोलीस दलाला अत्याधुनिक शस्त्र नाहीत. काय कारण असावं याचं ? सरकारकडे पैसे नाहीत का ?अरविंद इनामदार - सरकारकडे पैसे नाहीत, असं आम्ही का मानावं ? त्यांच्याकडे विमानं घ्यायला पैसे आहेत, मंत्र्यांच्या गाड्या घ्यायला पैसे आहेत, मग आमच्यासाठी पैसे का नाहीत ? हे जे दहशतवादी आले होते त्यांच्याकडे एके- 47 होत्या, ग्रेनेडस् होते, गे्रनेड लाँचर्स होते, प्रत्येकाकडे 300 ते 400 गोळ्या होत्या आणि आमच्या शशांक शिंदेंकडे काय होतं ? थ्री-नॉट-थ्री! त्यातून एक गोळी मारून ती परत लोड करण्यासाठी जेवढा वेळ लागतो, त्या वेळात त्यांच्या 200 ते 300 गोळ्या सुटणार. आमच्या एका पोलीस स्टेशनकडे फक्त एक एके- 47. या देशाला फक्त नेत्यांची काळजी पडलीय, आमची नाही. काहीच धड नाही. मला वाटतं की हे राजकीय अपयश आहे आणि आमच्या वरिष्ठ अधिकार्‍यांचं अपयश आहे.निखिल वागळे - मी थेट प्रश्न विचारतो. करकरे, साळस्कर आणि कामटेंच्या मृत्यूला ही सगळी मंडळी जबाबदार आहेत का ?अरविंद इनामदार - मी असं म्हणणार नाही. कारण सगळीकडे हलगर्जी चालली आहे. एखादं सावत्र मूल रडत रहावं आणि त्याच्याकडे कोणी लक्ष देऊ नये, अशी परिस्थिती आहे. करायचं ते केलं गेलं नाही, आणि आतात शहरभर या हुतात्म्यांना वंदन करणारी होर्डिंग्ज लागलीयत. या प्रकारानं माझं रक्त खवळून उठतं. पण मी सांगतो की वेळ अजुनही गेलेली नाही. सगळ्यात महत्त्वाचं काही असेल तर पोलिसांना उत्तम प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे. जे एनएसजीला शिक्षण दिलं जातं, ते पोलिसांना का दिलं जात नाही ? महाराष्ट्रात एनएसजी सारखं दल उभारणं इतकं अवघड आहे का ? महाराष्ट्राची परिस्थिती इतकी वाईट आहे का ?निखिल वागळे - संपूर्ण महाराष्ट्रातल्या पोलीस दलाला सज्ज करण्यासाठी साधारण किती खर्च येईल ?अरविंद इनामदार - साधारण दोन-अडीच हजार कोटी. पण हे पैसे सोडा, मी पोलीस स्टेशनचा रोजचा खर्च भागवण्यासाठी 5000 रुपयांची मागणी केली, ती अजून मंजूर झाली नाही. हे सगळं जर सुधारायचं असेल तर आता जनतेनं रस्त्यावर उतरलं पाहिजे. आपण जर सेझ नको म्हणून मोर्चे काढतो, हे धरण हवं म्हणून मोर्चे काढतो, तसंच आम्हाला चांगलं पोलीस दल हवं, म्हणून मागणी झाली पाहिजे. सामान्य नागरिक जर डोळे असतील, तर पोलीस म्हणजे चष्मा आहे. ताजसमोर जेव्हा एनएसजीची कारवाई चालू होती, तेव्हा आमच्या एका शिपायानं मला विचारलं की साहेब हे ट्रेनिंग आम्हाला का दिलं जात नाही ? आमच्या माणसांकडे हिम्मत आहे, जिगर आहे. तो कोणाला घाबरत नाही. कमी धैर्याची नाही, शौर्याची नाही, पण त्याचं कधी कौतुक होत नाही आणि यंत्रणेतली ढिलाई म्हणजे तुम्हाला सांगतो, माझा एक मित्र अमेरिकेत आहे. तो सांगतो, माझा पासपोर्ट 10 वेळा चेक केला गेला. आणि इथे साडे तीन चार कोटी बांग्लादेशी माणसं आहेत, त्यांचे पासपोर्ट का नाही चेक करत कोण ? साधं आयडेंटीटी कार्ड आम्ही आमच्या माणसांना देऊ शकत नाही, म्हणजे किती हलगर्जी आहे त्याचा विचार करा. आपण सज्ज असायला हवं. दर वेळेस अतिरेकी येतीलच असं नाही, पण आलेच तर आपल्या बंदुका सज्ज हव्यात. कडक कायदा हवा.निखिल वागळे - 1993 साली शिखाडीतून आरडीएक्स आलं. त्यांना मी भेटलो, तेव्हा ते म्हटले की आम्ही पैसे घेऊन सोन्याची बिस्किटं सोडायचो. एक दिवस अचानक त्याच्या जागी आरडीएक्स आलं. आजही हे लोक सागरी मार्गानेच आले. मला एक सांगा असे अधिकारी असतील तर दुसरं काय होणार ?अरविंद इनामदार - पण या भ्रष्टाचाराला संरक्षण कोण देतं. कित्येक अधिकार्‍यांची पोलीस दलाला काही गरज नाही. मी स्वत: दोन आयपीएस अधिकार्‍यांना सस्पेंड केलं होतं, पण पुढे त्यांना प्रमोशन दिलं गेलं. यांच्या पाठीवरून हात फिरवणारे राजकारणी आहेत. आमचे अधिकारी नालायक आहेतच, पण त्यांना संरक्षण देणारी मंडळी देखील तितकीच जबाबदार आहे. शेवटी जर युद्ध जिंकल्याचं श्रेय सेनापतीचं असेल, तर हरल्याचा कलंकही त्यानंच स्वीकारायला हवा.निखिल वागळे - आपण नेहमी पोलीस, राजकारण्यांच्या भ्रष्टाचाराबद्दल बोलतो. पण मला सांगा आयबीनं नेव्हीला, कोस्ट गार्डला कळवूनही उपयोग झाला नाही. नेव्ही किंवा कोस्ट गार्डला आम्ही दोषी धरणार नाही का ?अरविंद इनामदार - यांना रोखायची जबाबदारी पहिल्यांदा नेव्हीची, मग कोस्ट गार्डची आणि मग पोलिसांची होती. पण जी माहिती त्यांच्यापर्यंत येते, ती कशा स्वरुपाची असते, हे आपण पहायला हवं. दुसरी गोष्ट अशी की हा किनारा इतका मोठा आहे, अहो तुम्ही बघा गेट वेच्या जरा पुढे दोन ते तीन हजार बोटी दिसतील. या किनार्‍यात खूप छिद्र आहेत, ज्यातून ही माणसं येऊ शकतात. इंटेलिजंट्सचं फेल्युअर तर आहेच, पण इंटेलिजन्सचं 100 टक्के फेल्युअर आहे, असं म्हणणं चुकीचं आहे. कारण अमेरिकेत एवढी कडक सुरक्षाव्यवस्था असूनही त्यांच्यावरचा हल्ला चुकला नाहीच ना...निखिल वागळे - आपण कायम ऐकतो की इंटेलिजन्सचं अपयश, पण म्हणजे नेमकं काय ?अरविंद इनामदार - पहिल्यांदा प्रत्येक पोलीस स्टेशनला डीबी नावाचं छोटं पथक असतं. यांचं काम काय ? तर कुठे संप होणारे, कुठे बंद होणार आहेत, अशा स्थानिक गोष्टींची माहिती जमवणं. यानंतर एसपीच्या लेव्हलवर जिल्ह्यात डिस्ट्रीक ब्रँच असते. त्याचं कामच हे आहे की राजकीय पक्षांची माहिती, कम्युनल पक्षांची माहिती, विद्यार्थी संघटनांची माहिती, अशी सगळी माहिती जमा करणं. पण आता होतंय असं की राष्ट्रीय पातळीवर 'आयबी 'आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर ' रॉ' यावरच बोललं जातं. स्थानिक इंटेलिजन्सचं अपयश वाढत चाललंय. कारण पोलिसांवरचा विश्वास उडत चाललाय. कारण पोलीस स्टेशनला आलं की त्याचा बकरा करण्याच्या मागे लागतात. मी एक रिटायर्ड डीजी असूनही पोलीस स्टेशनला मला फोन करावासा वाटत नाही. हे सुधारायचं असेल तर पोलिसांना चांगल्या सुविधा पुरवल्या पाहिजेत, तर ते प्रेरित होऊन काम करू शकतील. पण याच वेळी मी हे ही सांगेन की भ्रष्ट अधिकार्‍यांना हाकलून द्या. निखिल वागळे - तुम्हाला असं वाटतंय का, की देशभक्तीची भावना संपल्यामुळे ही अवस्था आहे ?अरविंद इनामदार - नक्कीच. तिरंग्याचा अभिमान कमी होत चाललाय. देशभक्तीची भावना कमी होतेय सगळा समाजच याला जबाबदार आहे. साधी गोष्ट आहे, कुठे बंद असेल, संप झाला, जास्त पाऊस असला की टॅक्सीवाला तुमच्याकडून जास्त पैसे मागेल, दोन बॅगांचे हमाल 50 रुपये मागेल. जिथे संधी मिळेल, तिथे समोरच्याला लुटणं हा स्वभाव झालाय. मग तो पोलीस असेल, सरकारी अधिकारी किंवा साधा टॅक्सीवाला.निखिल वागळे - असं म्हणता येईल का, की अतिरेक्यांची एवढे हल्ले करण्याची हिम्मत झाली कारण त्यांना माहीत आहे की आपण दुबळे आहोत...अरविंद इनामदार - नक्कीच. त्यांना माहितीय की ही ढिसाळ देश आहे. एखादं हत्तीचं कलेवर अस्ताव्यस्त पडलं असावं आणि त्याला कोणीही टोचे मारावेत, असं झालंय. पण एक चांगलं नेतृत्व ही परिस्थिती बदलू शकतं. वल्लभभाईंचं नेतृत्व होतं म्हणून हैदराबाद परत मिळवलं. एक इंदिरा गांधींचं नेतृत्व होतं म्हणून 1971 मध्ये पाकिस्तानचा आपण तुकडा पाडला. एक शिवाजी महाराजांचं नेतृत्व होतं तर औरंगजेबाला महाराष्ट्रात येऊन मरावं लागलं. योग्य नेतृत्व मिळणं हे अतिशय गरजेचं आहे. एक ना एक दिवस सामान्य माणसातूनच हे नेतृत्व होईल. मला तर असं वाटतं की हे नेतृत्व तरुणांनी आपल्या हातात घेतलं पाहिजे. नाही मिळालं तर बंड करून हातात घेतलं पाहिजे. आमच्या पुढच्या पिढीतही करकरेंसारखी माणसे होतीच ना ? ' वेडात दौडले वीर मराठे सात ' सारखी ही मंडळी गोळ्यांच्या फैरी झडत असताना आत घुसलेच ना... नेतृत्व नाही असं समजू नका. नेतृत्व आहे, पण ते पुढे यायला हवं.निखिल वागळे - असं नेतृत्व प्रत्येक क्षेत्रात आहे. पण मला असं विचारायचंय की सरकार चालवण्यासाठी असं नेतृत्व कुठे मिळणार ?अरविंद इनामदार - पण हा झटकाच बसला ना. हा हल्ला केवळ मुंबईवर नव्हता, तर देशआच्या अर्थव्यवस्थेवर हा हल्ला आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागलाच ना... इथली जनता आता गप्प बसणार नाही. तीन तारखेला गेटवे ऑफ इंडियावर एक लाख जमले होते. आणि ती सगळी तरुण मंडळी होती. याची दखल घ्यावीच लागणार आहे. राजकारण्यांनी दखल नाही घेतली, तर काळ त्याची दखल घेईल.निखिल वागळे - तुम्ही असे पोलीस संचालक होते की ज्यांनी गृहमंत्र्यांना देखील सुनावलं. तुम्ही राजकारणात का नाही येत ?अरविंद इनामदार - अहो पैसे कुठनं आणायचे ? त्याहीपेक्षा मी तुम्हाला सांगतो. राजकारणात पडल्यानंतर आपल्या तत्वांना तिलांजली देता कामा नये. आज मी इतकं ठामपणे बोलू शकतो कारण मी कोणाशी बांधील नाही. मी बांधला गेलोय ते या देशाशी, संविधानाशी. मला देणं आहे ते इथल्या जनतेशी. पण उद्या मी एखाद्या पक्षात गेलो तर एवढं ठामपणे बोलू शकेन आणि याला लोकही जबाबदार आहेत. चांगली माणसं निवडून येत नाहीत. तुम्ही कल्पना करा, ज्या ज्या वेळी राजकीय मेळावे होता, त्यांना 100-150 रुपये दिले जातात. त्यांची जेवणाची सोय केली जाते. एवढे मोठे बॅनर लागतात. खरं तर हे हताश होण्यासारखं वातावरण आहे. पण माझी खात्री आहे की हे वातावरण बदलणार. काळरात्र होता होता उष:काल होणार आहे. ही परिस्थिती बदलणार. माणसं पुढे येणार. आता खरी परिस्थिती अशी आहे की, ऑपरेशनसाठी पेशंटला आत घेऊन गेले आहे आणि हे ऑपरेशन जनताच करणार आहे. आता 'लीडरलेस मास' आहे. योग्य नेतृत्व मिळालं की हे सगळं बदलेल.निखिल वागळे - हे सगळं बोलणं ऐकून या दहशतवादी हल्ल्यानंतर काहीतरी बदल होईल, अशी आशा वाटतेय. शेवटी तुम्ही लोकांना काय सांगाल ? अरविंद इनामदार - माझं परत परत लक्ष जातंय ते आमचे वीर जवान आणि मुंबईमध्ये शहीद झालेल्या जनतेकडे. दहशतवाद आम्हाला नवीन नाही. नागालँडमध्ये 1956 साली सुरू झाला, तेलंगणामध्ये नक्षलवाद्यांचा झाला, नंतर पंजाबमध्ये शिखांचा होता. गेली साठ वर्षं आम्ही झगडतोय, पण आम्ही एक सिस्टीम तयार करू शकलो नाही, कायदे तयार करू शकलो नाही, एक मानसिकता तयार करू शकलो नाही, कार्यक्षम पोलीस दल तयार करू शकलो नाही, ही खरी शोकांतिका आहे. पण माझं मन परत जातं ते या हुतात्म्यांकडे. त्यांचीच आठवण, जिथे म्हणून त्यांचं रक्त सांडलंय, त्या जागा आम्हाला स्फुर्ती देणार आहे. त्यांची उणीव आम्हाला सतत भासणार आणि ती उणीव आम्हाला स्फुर्ती देईल. आम्ही ज्या ज्या वेळेस सन्मान मिळणार आणि पोलीस दलाला कधी ना कधी योग्य स्थान मिळणारच आहे. जेव्हा जेव्हा आम्हाला सन्मान मिळेल, गोड धोड खाल्लं जाईल, तेव्हा तेव्हा त्यांच्यासाठी दोन घास आमच्या घशात अडकतील. शेवटी मला तात्यासाहेब शिरवाडकरांची एक कविता ऐकवावीशी वाटतेय. ' कशास आई भिजविशी डोळे, उजळ तुझे भाळ , रात्राीच्या गर्भात उद्याचा असेल उष:काल, एकच तारा नभी अन पायतळी अंगार, गर्जा जयजयकार या देशाचा, गर्जा जयजयकार.'