स्त्री Videos in Marathi

Showing of 53 - 58 from 58 results
ग्रेट भेटमध्ये अमोल पालेकर - भाग 2

May 13, 2013

ग्रेट भेटमध्ये अमोल पालेकर - भाग 2

ग्रेट भेटच्या 20 डिसेंबरच्या भागात आयबीएन-लोकमतचे संपादक यांनी प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते अमोल पालेकर यांची मुलाखत घेतली. अमोल पालेकरांचं व्यक्तिमत्व काहीसं वेगळं आहे. एका क्षणाला ते आपल्याला आपल्या घरातील एक वाटतात आणि दुसर्‍याच क्षणाला तो आपल्यापेक्षा खूप वेगळा, दूरचा वाटतो. कलाकार म्हणून त्यांनी आपल्या घरात स्थान मिळवलं आणि दिग्दर्शक म्हणून त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटवला आहे.अमोल पालेकर यांनी आपल्या वेबसाईटवर असं लिहिलं आहे की मी अपघातानं अ‍ॅक्टर झालो, नाईलाजानं प्रोड्युसर झालो आणि आवडीनं दिग्दर्शक झालो. याविषयी बोलताना ते म्हणाले "प्रत्येक जण कधी ना कधी स्वत:ला जाणून घ्यायचा प्रयत्न करतो. याशोधात मला कळलं की मला काही गोष्टी आवडतात, काही अजिबात कराव्याशा वाटत नाही आणि काही तळमळीनं कराव्याशा वाटतात. दुबेंनी मला अ‍ॅक्टर बनवलं. पण तेही माझं टॅलेन्ट ओळखून नाही, तर माझ्याकडे माझ्याकडे भरपूर वेळ होता म्हणून. पण मग मला जाणवलं की माझा कल अ‍ॅक्टिंगच्या पलीकडे जाणारा आहे. दुबेंनीच माझ्याकडे अनुभव नसताना मला दिग्दर्शनाची संधी दिली. पण दिग्दर्शन करत असताना माझ्या लक्षात आलं की पहिल्यापासूनच माझा कल हा अभिनयाबरोबरच नाटकाच्या इतर गोष्टींकडेही होता. म्हणूनच कदाचित दुबेंनी मला दिग्दर्शक बनवलं. माझ्यातला दिग्दर्शक कुठेतरी माझ्यातल्या चित्रकारात लपला होता. चित्रात रंग, रेषा, ब्रशनी मी कॅन्व्हासची स्पेस व्यापायचो, तेच मला रंगमंचावर मिळाला. जोडीला ह्यूमन बॉडी विथ साउंड मिळाल्या. चित्रकार म्हणून जो शोध आहे, तो खूप अंतर्मुख करणारा शोध आहे. त्याच्या बरोबर विरुद्ध दिशेला जाणारा रंगमंचावरचा प्रवास आहे, जो तुम्ही लोकांपर्यंत पोहचण्यासाठी करता. तो बहिर्गामी प्रवास आहे. आणि दोन्हीतली बलस्थानं शोधून मी हा प्रवास चांगला बनवण्याचा प्रयत्न केला. माझ्या सुदैवानं मला रंगमंचाच्या सुवर्णकाळात हे सगळे प्रवास करायची संधी मिळाली."सर्वसाधारणपणे असं म्हणलं जातं की अमोल पालेकरांनी भारतीय नाटकाला रंगमंचाच्या बाहेर काढलं. ही अमोल पालेकरांची देणगी मानली जाते. त्याविषयी बोलताना अमोल पालेकर म्हणाले "जेव्हा आधी कोणीही न सांगितलेलं मोलाचं सत्य मी दिलं, तर त्याला देणगी म्हणता येईल. मी तेवढा मोठा नाही. पण आधीच कोणालातरी गवसलेलं सत्य मी वेगळ्या, माझ्या मार्गाने शोधलं. त्याचे नवे पदर दाखवले. मी आधी म्हटलो तसं मी सुदैवी आहे. सत्यदेव दुबेंमुळे माझी ओळख विजय तेंडुलकर, बादल सरकार, गिरिश कर्नाड यांच्याबरोबर बसण्याची मला संधी मिळाली. मी खूपच लहान असताना, त्यांच्यासमोर लिंबू-टिंबू असताना मला हे भाग्य लाभलं. आणि हे मी विनयानं म्हणत नाही. पण माझ्या भाग्यानं तो काळच इतका छान होता... म्हणजे गिरिश कर्नाडांचं नाटक विजय तेंडुलकर सहज भाषांतरीत करायचे. म्हणजे एक दिग्गज दुसर्‍या दिग्गजाचं नाटक भाषांतरीत करतोय, हे सगळं मी बघितलं. म्हणजे भारतीय रंगभूमीवर काय चालू आहे, दुसर्‍या भाषेत काय चालू आहे, हे मी उघड्या डोळ्यानं बघत होतो. त्यामुळे मी नक्की कुठे आहे, याचं मला भान होतं. मग माझ्या मराठी रसिकापर्यंत ते पोहचवण्याचा प्रयत्न केला. आणि मुख्य म्हणजे आम्हा सगळ्या प्रायोगिक नाटकवाल्यांची खूप चांगली मैत्री होती. आजही स्वत:ची वेगळी वाट धुंडाळणारे कलाकार आहेत, त्यांच्याविशषयी मला प्रचंड आपुलकी वाटते. पण ते एकमेकांचं काही बघत नाहीत, एकमेकांना मदत करत नाहीत. हे चित्‌र बदललं तर कदाचित पुन्हा एक नवी चळवळ उभी राहू शकते. " पालेकरांच्या मते टीव्हीचा जेव्हा उदय झाला तेव्हा ते एकदम वेगळं मीडियम होतं, त्या काळात हे सगळे बदल झाले असावेत.अमोल पालेकर व्यावसायिक रंगभूमीवर फारसे रमले नाहीत. त्याविषयी बोलताना ते म्हणाले "ती व्यावसायिक नाही, तर धंदेवाईक रंगभूमी म्हणावी लागेल. आणि धंदेवाईक म्हणजे काही खूप वाईट वगैरे नाही. पण फक्त धंदा हेच त्यांचं अंतिम ध्येय असेल, तर माझा मार्ग वेगळा आहे. धंदेवाईक रंगभूमीवरही व्यावसायिक काम करावं असं मला वाटतं. म्हणजे नाटकाची संहिता चोख, जशीच्या तशी 500 व्या प्रयोगालाही असावी, ही मला व्यावसायिकता वाटते.कारण जयवंत दळवींची संहिता, माडणी, शब्द हे विजय तेंडुलकरांपेक्षा वेगळं असतं. त्यांची ताकद वेगळी असते, अनुभव वेगळे असतात. पण त्या सगळ्याची गोळाबेरीज करून 'त्या अर्थाचं' काही तरी बोलणं मला मान्य नाही. मी व्यावसायिक रंगभूमीवर फार कमी नाटकं केली. आपलं बुवा असं आहे आणि मुखवटे. त्याआधी मी राव जगदेव मार्तंड हे नाटक केलं होतं. आपलं बुवा असं आहे भरपूर चाललं. मुखवटे सुद्धा खूप चाललं. 'मुखवटे' मागची माझी भूमिका स्पष्ट होती. म्हणजे प्रायोगिक नाटक हे साधारण 10 वर्षांनी प्रेक्षकांना मान्य होतं, तरच आपली वाटचाल सुरू आहे असं मानावं. आणि मी तो विश्वास सार्थ ठरवला. दामू केंकरेंबरोबर काम करावं आणि अनिकेत या नाट्यसंस्थेला झालेली कर्ज फेडण्यासाठी मी आपलं बुवा असं आहे, हे करू शकलो. आणि मी अभिमानानं सांगतो की ते नाटक एवढं चाललं की त्यातून आम्ही राशोमान हे नाटक बनवलं आणि त्याहीपुढे बादल सरकार महोत्सव भरवला." नाटक हे अमोल पालेकरांचं खरं प्रेम. "बादल सरकारनंतर मी विजय तेंडुलकर महोत्सव भरवला, मणीपूरचा आंतरराष्ट्रीय कीर्तीचा दिग्दर्शक रतन थियाम यांना बोलवलं, कन्नडच्या बी जयश्रीला बोलावून मराठी संगीत रंगभूमी आणि कन्नड रंगभूमीतलं नातं तपासण्याचा आम्ही प्रयत्न केला" एकीकडे आपण म्हणतो की मराठी प्रेक्षकाची अभिरुची घसरलीय. पण पालेकरांनी भरवलेल्या महोत्सवांना कायम गर्दी असते. त्याविषयी बोलताना ते म्हणाले "मराठी प्रेक्षकानं चांगल्या आणि वेगळ्या प्रयोगांना नेहमीच दाद दिली आहे. पण जर आपण काही वेगळं दिलं नाही, पठडीतले विनोद दिले, तर लोकांच्या नावानं ओरडण्यात काय अर्थ आहे ?" मराठीत जर चांगली संहिता मिळाली तर पुन्हा मराठी नाटक करायला नक्की आवडेल, असं पालेकरांनी आवर्जून सांगितलं. शब्दांपलीकडची रंगभूमी शोधण्याचा प्रयत्न करणारा महोत्सव ते आता भरवत आहेत.अमोल पालेकरांचे चित्रपट प्रचंड यशस्वी ठरले. एकीकडे अमिताभ बच्चन-मनमोहन देसाई आणि दुसरीकडे ऋषीकेश मुखर्जी-अमोल पालेकर या जोड्या हीट ठरल्या. त्याविषयी बोलताना ते म्हणाले "त्या वेळेस वेगळ्या वाटेवरचे चित्रपट बनवण्याचे जे प्रयत्न चालू होते, नव्या वाटा शोधायचे जे प्रयत्न चालू होते, ज्यावर नंतर समांतर सिनेमा म्हणून स्टॅम्प मारला गेला. त्यावेळचे गोविंद निहलानी, बासू चॅटर्जी, श्याम बेनेगल हे सगळे माझ्या रंगभूमीवरच्या प्रवासाचे साक्षीदार होते. बासू चॅटर्जींनी मला मन्नू भंडारींची एक छोठीशी, खूप साधी पण प्रभावी गोष्ट होती. तिच्या साधेपणाचा मोह पडावा इतकी ती साधी गोष्ट होती. त्यानं मला सांगितलं आपण इतक्याच साधेपणानं फिल्म बनवायची. तो विकायला बासू चॅटर्जी चित्रपटाचे डबे घेऊन दारोदार फिरत होता. आणि मग तो चित्रपट- 'रजनीगंधा' प्रचंड यशस्वी झाला. तो नायक इतका साधा होता की तो प्रेक्षकांना आपल्यातला एक वाटला. अमोल पालेकर आपल्यातला आणि स्वप्नातला नायक म्हणजे अमिताभ बच्चन होता. पण त्या काळी आपण प्रेक्षकांवर शिक्के मारले नव्हते. तू अमिताभ निवड किंवा अमोल पालेकर निवड असा आग्रह आपण केला नाही. करण जोहरसारखे जे लोक म्हणतात की सिनेमा हा लार्जर दॅन लाईफ असला पाहिजे. ठीक आहे, पण तो फक्त लार्जर दॅन लाईफ असावा, हे मला मान्य नाही. प्रेक्षक वेगवेगळे चॉईस स्वीकारायला तयार असतात. पण जी मुख्य धारा असते त्यांना भीती वाटते की, जर वेगळं काही लोकांना आवडलं तर आपली गणितं चुकतील. 1985 ते 200 च्या काळात, जेव्हा असं म्हणलं जातं की चित्रपटसृष्टीत चाकोरीबद्ध प्रयत्न झालं. पण त्यातही वेगळे प्रयत्न झाले. ते विसरता कामा नये" पण याला मीडिया जबाबदार आहेत का ? या प्रश्नाचं उत्तर देताना अमोल पालेकर म्हणाले "मी माध्यमावर नाराज नाही, पण त्यांचही भान कधीकधी सुटतं. राहुल द्रविड यावर एकदा म्हणाला होता, क्रिकेटची स्टोरी कधीकधी फ्रंट पेज स्टोरी का असते ? हे कधीकधी मलाच कळत नाही. म्हणजे टीम वर्ल्ड कप जिंकून आली तर ठीक आहे, पण इतर वेळी नाही. पण हे सामाजिक भान कधीकधी मीडियाला रहात नाही. ते भान जर निसटत असेल तर टप्पल मारायला हवी, आणि कधीकधी ते काम मी करतो."असा समज आहे की एवढी लोकप्रियता मिळूनही अमोल पालेकर स्वत:च्या अभिनयाविषयी बोलत नाहीत. त्यांनी हिंदी फिल्म कॉमेडीला एक वेगळा लहेजा दिला. त्याविषयी सांगताना अमोल पालेकर म्हणाले "माझ्यातल्या दिग्दर्शकाचं ते यश होतं. मला नेहमी असं वाटतं की त्या फिल्म्स माझ्या नाही. ते ऋषीकेश मुखर्जींचे आहे, बासू चॅटर्जींचे आहेत. हे सिनेमे माझे म्हणून त्यांच्यावर अन्याय होतो. नट म्हणून मला कॉमेडीनं प्रचंड लोकप्रियता दिली हे जितकं खरं, तितकच माझ्या वेगवेगळ्या भूमिका पाहिल्याशिवाय नट म्हणून माझी खरी ताकद कळत नाही. श्याम बेनेगलांच्या भूमिका मधला अमोल पालेकर, माझ्या आक्रीतमधला अमोल पालेकर, विधू विनोद चोप्राच्या खामोशमधला अमोल पालेकर बघितलं की माझ्या अभिनयाची खरी ताकद कळते. प्रवाहाविरुद्द जाण्याचा माझा सतत प्रयत्न होता म्हणून मी एका कॉमेडीच्या प्रतिमेत अडकलो नाही. आणि या सगळ्यात लोकांनी मला साथ दिली, म्हणून मी एवढं करू शकलो." स्वत: पुरुष असून अमोल पालेकर स्त्रियांच्या प्रश्नांकडे, भावनांकडे जास्त प्रगल्भतेने पहातो. हे मान्य करत स्रीयांकडे पहायचा माझा दृष्टीकोन जास्त सहृदय आहे. आंतरारष्ट्रीय पातळीवर अमोल पालेकरांच्या फिल्म्सला भरभरून दाद मिळते. त्याविषयी ते म्हणाले "प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो. म्हणजे माझा थांग हा जो सिनेमा आहे, तो इथल्या प्रेक्षकांनाही आवडला. त्यात मी स्त्री पुरुष संबंधांकडे पहाताना समलैंगिक संबंधाकडे पहाण्याचा जो प्रयत्न आहे, इतका चांगला प्रयत्न मराठी तर सोडाच, पण भारतीय चित्रपटाच्या दृष्टीने हे मोलाचं पाऊल आहे. तेव्हा मला बाहेर विचारलं की हे स्वीकारण्याइतका भारतीय समाज प्रगत आहे का ? पण मला असं वाटतं की हा प्रयत्न बाहेर जितका यशस्वी ठरला, तितकाच तो भारतातही यशस्वी ठरला. भारतीय प्रेक्षक हे सगळं स्वीकारायला कुठेही कमी पडला नाही. माझ्या नाटकाच्या प्रवासापासून अनाहतपर्यंत भारतीय प्रेक्षक कुठेही कमी पडला नाही. पण मी पहिल्यांदा सांगितलं, तसं मुख्य प्रवाह अशा धाडसी प्रयोगांना बाहेर ठेवण्याचा प्रयत्न करतात. पण म्हणून हे प्रयोग थांबत नाहीत. किंबहुना बंद होता कामा नये, या उद्देशानं मी हे करत राहिलो."छोट्या पडद्यावरही अमोल पालेकर प्रचंड यशस्वी ठरले. त्यांच्या 'कच्ची धूप' किंवा 'नकाब' सारख्या मालिका प्रेक्षकांना अजूनही आवडतात. मग आत्ता अमोल पालेकर त्यातून बाहेर का पडले ? याविषयी बोलताना ते म्हणाले "ही जी काही टीआरपीचा गणितं आहेत, मग त्यातून होणार्‍या ब्रेकिंग न्यूज, स्टोरीज, या खेळात मला रस नाही. त्यात हीच माणसं वाहून चालली आहेत. आपण कुठेतरी मार्केट फोर्स आणि मला जे काही विकायचंय, त्याच्या खूप मागे लागतोय. पण हे प्रेक्षकांनी कधीच सांगितलं नाही. मी जेव्हा 'पाउलखुणा' सारखी मालिका बनवत होतो, तेव्हाही पॉप्युलर मालिकांपेक्षा त्याची मांडणी वेगळीच होती. पण हे भान जर आपण ठेवलं, तर बरच काही चांगलं बनू शकतं. आणि प्रेक्षकांना आपण पर्याय दिले, तर वेगळं काहीतरी स्वीकारायची त्यांची तयारी आहे. किंबहुना प्रेक्षकांची ढाल पुढे करून आपण आपला कमकुवतपणा झाकायचा प्रयत्न करतो."चांगला सिनेमा हा चांगल्या साहित्यकृतीतूनच जन्माला येतो का ? यावर बोलताना पालेकर म्हणाले "चांगल्या फिल्मसाठी चांगल्या संहितेची गरज असते. भारतात वेगवेगळ्या भाषांमध्ये इतकं उदंड आणि दर्जेदार साहित्य आहे की हॉलिवुडमधली एखादी कॉपी घ्याची, त्यातून वाईट फिल्म बनवायची आणि त्याचं आणखी वाईट व्हर्जन मराठी सिनेमात दिसतं. पण आपल्याकडे समर्थ संहिता असताना याची गरज काय ? मराठी सिनेमाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली होती, मात्र अनाहतपासून मराठी चित्रपटाकडे प्रेक्षक परत फिरले. मराठी सिनेमासाठी मल्टीप्लेक्सची दारं उघडली. त्यापाठोपाठ श्वास आला आणि मग चित्र बदलत चाललं आहे"पहेलीविषयी बोलताना बोलताना अमोल पालेकर म्हणाले "शाहरुखकडे आम्ही जेव्हा स्क्रिप्ट घेऊन गेलो, तेव्हा त्यानं मला विचारलं की मी हा सिनेमा प्रोड्युस करू का ? मग शाहरुख आल्यावर सगळी गणितं बदलली. त्यामुळे तो मल्टीस्टार बनला. हा चित्रपट जसा आम्हाला बनवायचा होता, तसाच तचो बनला. पहिल्या भेटीत जेव्हा मी शाहरुखला त्याच्या भूमिकेविषयी जे सांगितलं ते त्यानं शेवटपर्यंत तंतोतंत खरा ठरवला. शाहरुखच्या अभिनयाची खरी ताकद पहेलीमध्ये कळली. त्याच्या नेहमीच्या स्टाईल्स बदलून तो पहेलीमध्ये वावरला आणि ते सगळं यशस्वी ठरलं. माझ्याकडे खूप सारे अशा सेटअपचे विषय आहेत आणि त्यात जर मला वाटलं तर मी शाहरुख किंवा आमीरसारख्या लोकप्रिय कलाकरांकडे नक्कीच जाईन."'समांतर' हा अमोल पालेकर यांचा आगामी चित्रपट. त्याविषयी बोलताना ते म्हणाले "याविषयी आता बोलणं जरा लवकर होईल. पण या सिनेमात स्त्री पुरुष संबंधांचे विविधांगी पदर उलगडून दाखवायचा मी प्रयत्न केला आहे. तो भावनिक दृष्ट्या मला जितका आवडेल, तितकाच तो लोकांना विचार करायलाही प्रवृत्त करेल. माझ्या एका स्त्री प्रेक्षकानं मला अशी दाद दिली होती की तुमचा सिनेमा मी ऑडिटोरियममध्ये सोडून जाऊ शकत नाही. तो मी घरी घेऊन येते. माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग तुमचा सिनेमा बनतो. म्हणून मला तो अपील होतो."या मुलाखतीचा शेवट करताना आयबीएन-लोकमतचे संपादक निखिल वागळे म्हणाले "अमोल पालेकर हे एक वेगळच रसायन आहे. त्यांची वाट वेगळी आहे. त्यांचा हा वेगळेपणा काय आहे ? हे या मुलाखतीतून उलगडत गेले.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading