स्त्री

Showing of 469 - 482 from 491 results
समलिंगी संबंधांपासून जगाला वाचवण्याचं पोप यांचं आवाहन योग्य आहे का ?

May 13, 2013

समलिंगी संबंधांपासून जगाला वाचवण्याचं पोप यांचं आवाहन योग्य आहे का ?

" मानव समाजाला समलिंगी संबंधांपासून वाचवणं हे जगातली जंगलं वाचवण्याइतकंच महत्त्वाचं कामंआहे. चर्चनं मानवाची अधोगती रोखायला मदत करायला हवी. म्हणूनच समलिंगी संबंधांनाविरोध करायला हवा. समलिंगीत्त्व म्हणजे वेगळी वाट धरणं आहे. अनियमीत गोष्ट करणं आहे. तेव्हा समलिंगीत्त्व हे एखाद्या जखमेसारखं आहे. लोक आता सुखीजीवनासाठी लिंगबदल करू लागले आहेत - " असं भाषण पोप बेनेडिक सोळावे यांनी नववर्षाच्या निमित्तानं केलं आहे. पोपच्या या भाषणामुळे त्यांच्यावर जगभरातल्या समलिंगींकडून टीका होत आहे. पण पोप मात्र त्यांच्या भूमिकेशी ठाम आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की, समलिंगी संबंध हे नैसर्गिक संबंधांच्या विरोधातले आहेत. ईश्वरानं जी काही निसर्गरचना केलेली आहे, मानवी जीवनाची जी काही रचना केलेली आहे त्याच्या विरोधात आहेत. हे खरोखरंच असं आहे का, समलिंगी संबंध म्हणजे काय, समलिंगी संबंध आपण अजून का स्वीकारत नाहीत, समलिंगी संबंधांबाबतची कायदेशीर बाजू काय आहे या सगळ्या प्रश्नांची चर्चा 'आजचा सवाल 'मध्ये करण्यात आली. समलिंगी संबंधांपासून जगाला वाचवण्याचं पोप यांचं आवाहन योग्य आहे का ? असा ' आजचा सवाल ' होता. या चर्चेत वुड शेफर्ड चर्चचे फादर आणि ख्रिस्ती-मराठी साहित्य संमेलनलाचे अध्यक्ष मायकेल जी, समलिंगी संबधांचे अभ्यासक आणि सामाजिक कार्यकर्ते जमीर कांबळे, सोमया कॉलेजच्या मनोविकास विभागाच्या विभागप्रमुख डॉ. हेमांगी ढवळे यांचा समावेश होता.चर्चेत फादर मायकेल जी यांनी पोपच्या विधानांचं समर्थन केलं आहे. समलिंगी संबंध हे पूर्णपणे अनैसर्गिक आहेत, असे संबंध हे ईश्वराने घालून दिलेल्या नियमांच्या पूर्णत: विरूद्ध आहेत अस फादर मायकेल जी यांचं म्हणणं आहे. " पोप बेनेडिक सोळावे हे उत्तम शिक्षक आहेत. कोणताही शिक्षक हा एखादी शिकवण जगाला द्यायची असेल तर तो संधी सोडत नाही. तेच पोप बेनेडिक यांनी केलं आहे. जगाला नवीन वर्षांची चांगली शिकवण देण्यासाठी त्यांनी तसं म्हटलं आहे. चांगला हाडाचा शिक्षक या नात्यानं ते जगाला वाचवायचं असेल तर अधोगतीकडे जाणा-या गोष्टींबाबत सावध करायला पाहिजे, या हेतूनं ते असं म्हणाले आहेत. निसर्ग नियम हे मानवतेच्या प्रगतीसाठी आहेत. स्त्री-पुरुष एकत्र आल्यावर नवनिर्मितीला होते. तसंच ते दोघंही एकत्र आल्यावर नवनिर्मिती झालीच पाहिजे, असं काहीही नाहीये. मात्र पुरुष-पुरुष संबंध आणि स्त्री - स्त्री संबंध हे निसर्गाच्या विरूद्ध आहेत. याने नवनिर्मितीच्या प्रक्रियेला खिळ बसते. तेव्हा निसर्गानं घालून दिलेल्या नियामांच्या विरुद्ध जा तरी का ? म्हणून पोपनं मांडलेल्या विचाराचं मी समर्थन करत आहे. चर्चेतली फादर मायकेल आणि पोप यांची मतं जमीर कांबळे यांना मान्य नाहीत. " मी स्वत: समलिंगी असून मला त्याचा मला कोणताच त्रास होत नाही. समलिंगी संबंध अजिबातच अनैसर्गिक नाहीत. त्या संबंधांना धर्म आणि देव यांच्यात बांधू नका, असं समलिंगी संबधांचे अभ्यासक आणि सामाजिक कार्यकर्ते जमीर कांबळे म्हणाले. सोमया कॉलेजच्या मनोविकास विभागाच्या विभागप्रमुख डॉ. हेमांगी ढवळे यांनाही पोप यांची मतं शास्त्रीय दृष्टिकोनातून पटली नाहीेयेत. चर्चेत डॉ. हेमांगी ढवळे म्हणाल्या, " समलिंगी संबंधांना 1995 पूर्वी मानसिक आजार असल्याचं समजलं जायची. पण नंतर नाही. अशा संबंधांचा तिरस्कार करण्याचीही गरज नाहीये. त्यामुळे पोप करत असलेली विधानं मला मान्य नाहीत. प्रत्येकाचं आकर्षण वेगळं असतं. आणि ते स्वीकारलंच गेलं पाहिजे. " असं डॉ. हेमांगी ढवळे म्हणाल्या. समलिंगी संबंधांपासून जगाला वाचवण्याचं पोप यांचं आवाहन योग्य आहे का ? या ' आजचा सवाल 'वर 79 टक्के लोकांनी ' होय ' असं मत दिलं. यावरून आपला समाज हा समलिंगी संबंधांच्या विरुद्ध आहे, हे लक्षात आलं आहे. चर्चेचा शेवट करताना ' आयबीएन- लोकमत ' चे संपादक निखिल वागळे म्हणाले , " काळ बदलतोय. मानवी नाती बदलत आहेत. ही नाती आपण कशी तपासणार आहोत. आपल्या डबक्यातून आपण बाहेर येणार आहे की नाही? की धर्म आणि इतर गोष्टींच्या पारड्यात ही नाती मोजणार आहोत ? याचा विचार प्रत्येकानं करायला हवा. समलिंगी संबंध हा मुद्दा पूर्वीही वादग्रस्त होता आणि यापुढेही वादग्रस्त राहणार आहे. पण आपण एवढंच करू शकतो की ही माणसं आहेत. ही आपल्या समाजातली माणसं आहेत, आपल्या बरोबरची माणसं आहेत. आपले शत्रू नाहीत. त्यांना माणुसकीनं वागवण्याची, आपल्यातली माणसं म्हणून वागवण्याची गरज आहे हे पूर्ण समाजानं लक्षात घेतलं तरी बरं होईल. "