सुशीलकुमार शिंदे

Showing of 469 - 482 from 518 results
सीमाबांधव उपेक्षितच

बातम्याMay 1, 2010

सीमाबांधव उपेक्षितच

आशिष दीक्षित, नवी दिल्ली1 मेआज उभा महाराष्ट्र सुवर्ण जयंती साजरी करत आहे. पण सीमेपलिकडच्या मराठी बांधवांना मात्र अजूनही न्याय मिळाला नाहीये. राज्यात सांस्कृतिक कार्यक्रम होत असताना बेळगावातील 40 मराठी नगरसेवक मात्र दिल्लीच्या रखरखत्या उन्हात मंत्र्यांची दारे ठोठावत फिरत आहेत. पण त्यांना न्याय द्यायला मात्र कुणीच पुढे येत नाही.सकाळच्या सात वाजल्यापासून बेळगावमधले हे मराठी नगरसेवक मुख्यमंत्र्यांच्या भेटीची वाट पाहत होते. पण दिल्लीतील राजकीय भेटीगाठींमुळे मुख्यमंत्र्यांना यांच्यासाठी वेळच नव्हता. अखेरीस दुपारी 4 वाजता मुख्यमंत्र्यांनी बेळगावकरांसाठी वेळ काढला. महापौरपदाच्या निवडणुकीत आपल्यावर कसा अन्याय झाला याचे गार्‍हाणे मग, नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडले. आणि मुख्यमंत्र्यांनी करू.. बघू... असे नेहमीचेच आश्वासन दिले.त्यानंतर सीमावासियांच्या या शिष्टमंडळाने आपला मोर्चा दिल्लीतील वजनदार नेत्यांकडे वळवला. सीमाभागातील 25 लाख मराठी बांधवांवरचा अन्याय दूर करा, अशी मागणी करत त्यांनी शरद पवार आणि राहुल गांधींची भेट घेतली. पण पृथ्वीराज चव्हाण सुशीलकुमार शिंदे आणि भाजपच्या नेत्यांनी मात्र त्यांची भेट घेण्याचे टाळले.सगळ्यात शेवटी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचीही त्यांनी भेट घेतली. पण पदरी काहीच पडले नाही. राज्यात सुवर्ण महोत्सव साजरा होत असताना बेळगावातील या मराठी मंडळींना दिल्लीच्या रखरखीत उन्हात दाद मागत फिरावे लागत आहे.