#सातारा

Showing of 196 - 196 from 196 results
लाल मातीतली कला - भाग 3

May 13, 2013

लाल मातीतली कला - भाग 3

विनायक गायकवाड आज कुस्ती बदलतेय. महाराष्ट्रात इतर खेळांना जे महत्व होतं ते आता कुस्तीलाही मिळू लागलंय. तरुण पिढीतही कुस्तीचं आकर्षण वाढू लागलंय. त्यामुळेच हा खेळ फक्त कोल्हापूर पुरताच मर्यादित राहिलेला नाही. महाराष्ट्रात इतर ठिकाणी आपला जम बसवू लागलाय. कोल्हापुरातून ही कुस्ती आता सातारा, सांगली, सोलापूर अशा शहरांकडे वळू लागलीय. याशिवाय अगदी मुंबई-पुण्यासारख्या शहरांतही कुस्तीने जम बसवलाय. पण मुंबईतल्या गिरणगावात आपलं स्थान निर्माण करणारी कुस्ती, मॉल कल्चरमुळे हळूहळू शहरांतून नामशेष होऊ लागलीय. कोल्हापुरात काही काळ हा खेळ लोकाश्रयावर टिकला,पण राजाश्रयाच्या अभावामुळे आपल्या मातीतला खेळ पुन्हा एका मातीतंच हरवला. "कोल्हापूरचं वातावरण हे कुस्तीसाठी सर्वात पोषक आहे. फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात कुस्तीसाठी हे एक सर्वोत्तम वातावरण आहे. पण कोल्हापुरातील कुस्ती ही महाराष्ट्राच्या इतर भागात पसरण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे कुस्ती संघटनांतील गटबाजी आणि राजकारण. पुणे, सांगली, सातारा या ठिकाणी त्यांनी नको त्या पद्धती अवलंबल्या नाहीत. त्यामुळे कुस्ती आता हळूहळू महाराष्ट्रात इतर भागात पसरलीय." असं हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांनी सांगितलं. कोल्हापूरनंतर आता पुण्यात कुस्तीनं आपला तळ ठोकलाय. पुण्यातील गोकुळ वस्ताद तालीम आपला हा मराठमोळा खेळ पुढे नेण्यासाठी काम करतेय. याच पुण्याच्या राहुल आवारेनं राष्ट्रीय स्पर्धेत मोठी कामगिरी केली. तब्बल 33 वर्षांनंतर महाराष्ट्राला कुस्तीत गोल्ड मेडल मिळवून दिलं. पण अशी कामगीरी सातत्याने घडताना दिसत नाही. "त्याचं काय आहे की आता कुस्ती प्रमाणे मल्लही बदललेत. आता पूर्वीसारखे मल्ल राहीलेले नाहीत. आता त्यांना पैसा हवा. आणि मॅटच्या कुस्तीत कसा लवकर पैसा मिळतो. त्यामुळे जास्तीत जास्त लोक आता तिकडे वळतायत. पण कुस्तीला मदत मिळाली तर सगळ काही पूर्वीसारखं होईल." असं हिंदकेसरी गणपतराव अर्नाळकर यांनी सांगितलं.आज भारतात आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रिकेटला जितका प्रतिसाद मिळतो, तितकाच प्रतिसाद स्थानिक पातळीवर असूनही कुस्तीलाही मिळतोय. पण परदेशातील मातीतला हा खेळ आज भारताचा नंबर वन खेळ बनलाय तर आपल्या मातीतला खेळ चक्क मातीतचं मिसळलाय. "भारताला खाशाबांनंतर मेडल का नाही मिळालं ? यात सर्वात मोठी चूक ही शासनाची आहे. कुस्तीला हवं तसं नेमक ट्रेनिंग आपल्याकडे नाही. कोणत्याही स्पर्धेसाठी निवड झाली की आपण कॅम्प घेतो. पण परदेशात देतात तसं प्रशिक्षण आपण देत नाही. परदेशातील पद्धती आणि आपल्याकडील पद्धती यात खूप मोठा फरक आहे. आणि जर तशा पद्धती आपणही अवलंबल्या तर नक्कीच आपल्यालाही अनेक पदकं अगदी सहज मिळतील" असा विश्वास हिंदकेसरी गणपतराव अर्नाळकर यांना वाटतो.आज कुस्तीला भारतात स्थान नाही पण परदेशात मात्र नक्की आहे. कुस्तीचं एक ऍडव्हान्स व्हर्जन म्हणजे W.W.E. पण कुस्तीपेक्षा या खोट्या आणि बनवलेल्या स्टंटबाजीला बघणार्‍यांची संख्या आपल्या देशातही प्रचंड आहे. आज खलीनं W.W.E. मध्ये भारताचं नाव उज्वल केलंय. प्रत्येक लहानग्याच्या तोंडात आज त्याचचं नाव आहे. पण भारताला ऑलिम्पिक च्या इतिहासात पहिलं वैयक्तिक मेडल मिळवून देणार्‍या खाशाबांची आठवण किती जणांना आहे ? हा मात्र संशोधनाचा विषय आहे. पण कुस्तीची इतकी उपेक्षा होण्यामागे फक्त सरकार आणि संघटनाचं जबाबदार नाही. तर त्याला एकाअर्थी आपणही तितकच जबाबदार आहोत. पण बदलत्या काळानुसार एकचं आशा आहे की ज्याप्रमाणे 2008 हे वर्ष कुस्तीतलं सुवर्णवर्ष ठरलंय, तसंच येत्या वर्षातही या राजेशाही खेळाला तिचं राजवैभव तसंच परत मिळेल.