#श्यामची आई

एका आईची पंच्याहत्तरी...!

May 13, 2013

एका आईची पंच्याहत्तरी...!

ज्या नात्यातला भाव व्यक्त करण्यासाठी कुठल्या उपमा-अलंकारांची गरज नसते. ज्या नात्याच्या केवळ उच्चारात सगळे शब्द पांगळे होतात. जे नातं थेट आपल्या जन्माच्या गर्भाशीच निगडीत असतं. त्या नात्याच्या गोष्टींची ही पंचाहत्तरी अर्थात शामच्या आईची पंचाहत्तरी. मातृप्रेमाचं महन्मंगल स्तोत्र अशा शब्दात आचार्य अत्रेंनी ज्या पुस्तकाचं वर्णन केलं त्या पुस्तकाची ही पंचाहत्तरी. या पुस्तकाच्या पहिल्याच परिच्छेदात सानेगुरूजी म्हणतात- माझ्या हृदयात मातेबद्दलच्या असणा-या प्रेम, भक्ती व कृतज्ञता यांच्या अपार भावना श्यामची आई वाचून जर वाचकांच्या हृदयातही उत्पन्न होतील तर हे पुस्तक कृतार्थ झाले असे म्हणता येईल. हे पुस्तक वाचून वाचकांचे डोळे वा वाचकांचे हृदय कोरडीच राहतील तर हे पु्स्तक त्याज्य, व्यर्थ व नीरस समजावे. आज या लिखाणाला पंचाहत्तर वर्ष झाली. इतक्या वर्षानंतर या पुस्तकाचा सुरसपणा टिकून आहे की ते त्याज्य, व्यर्थ झालंय हे शोधण्याचाच हा यथाशक्ती पण प्रामाणिक प्रयत्न...