#शाळा

Showing of 1067 - 1080 from 1112 results
ग्रेट भेटमध्ये विनोद कांबळी (भाग - 1 )

May 13, 2013

ग्रेट भेटमध्ये विनोद कांबळी (भाग - 1 )

ग्रेटभेटमध्ये गप्पा झाल्या बिनधास्त आणि बेधडक विनोद कांबळीशी. विनोद हल्ली क्रिकेटच्या मैदानापेक्षा टीव्हीच्या पडद्यावर जास्त दिसतो. पण् ज्यांनी त्याला क्रिकेटर म्हणून पाहिलं आहे, ते त्याला विसरू शकत नाहीत. इतका हा खेळाडू ग्रेट होता. त्यानं पदार्पणातचं सचिन तेंडुलकर पेक्षा अधिक चांगली कामगिरी केलीये. आणि हे अगदी जबाबदारीनं केलेलं विधान आहे. विनोदची खेळी ही सचिनपेक्षा अधिक आक्रमक आणि वरच्या दर्जाची आहे, असं क्रीडा रसिक म्हणायचे. शेर्न वॉर्नच्या एका शतकात 26 धाव फटकावणारा तो एकमेव भारतीय फलंदाज आहे. असा हा विनोद क्रिकेटच्या मैदानावर का फार काळ टिकला नाही, त्यानं आपल्याला का अधिक आनंद दिला नाही, तो क्रिकेटच्या पलीकडे जाऊन सिनेमा, टीव्ही आणि गाणी आणि रिऍलिटी शो का करतो, विनोद हा नेमक कोण आहे, तो बिनधास्त आहे, बेघडक आहे, मनातून सुखी आहे, दु:खी आहे, की अवलीया आहे हे ग्रेट भेटमधून शोधण्याचा प्रयत्न केला गेला. निखिल वागळे : ताज लॅन्डस् एन्डमध्ये भारतीय क्रिकेट संघाला नवीन गणवेश देण्याचा कार्यक्रम झाला. विनोद तूही त्या कार्यक्रमात भारतीय संघाबरोबर होतास. काय वाटलं तुला ? विनोद कांबळी : भारतीय संघाचा जुना पोषाख घालून रॅम्पवॉक करताना मला जुने दिवस आठवले. 2003 नंतर मी भारतीय संघाचा पोषाख घालण्याची पहिली वेळ होती. मला हर्षानं विचारलं की कसं वाटतंय तुला ? " 9 वेळा क्रिकेट संघात निवड होता होता राहिली. आता 10व्या वेळी तरी झाली असतीच असं असं हर्षाला उत्तर देऊन मोकळा झालो. म्हणजे माझ्या संघाबरोबर क्रिकेट खेळण्याची इतकी उत्कट इच्छा त्यावेळी माझ्यात निर्माण झाली होती. मी दहाव्यांदा कमबॅक करू शकतो, असं मला वाटू लागलं होतं. निखिल वागळे : पुन्हा एकदा भारतीय संघासाठी खेळण्याची तुझ्यात जिद्द आहे ? विनोद कांबळी : हो जिद्द तर आहे. पण माझी निवड होईल की नाही हे मला ठाऊक नाहीये. फक्त निवड झाली तर मला माझा फिटनेस मेन्टेन करावा लागेल. तेही मी करायला तयार आहे. मला कोणाला सिद्ध करायचं नाहीये. रिटारन्मेंट होण्याआधी मला एकदातरी भारतीय संघासाठी खेळायचं आहे. कारण सचिनला खेळताना पाहिलं की पुन्हा ते जुने दिवस आठवतात. अरे हा खेळू शकतो तर मी का नाही असा विचार मनात रेंगाळू लागतो. हा नाही सोडत तर मी का सोडू असं व्हायला लागतं. निखिल वागळे : म्हणजे सचिनबरोबर खेळायचं तुझं स्वप्न आहे तर... विनोद कांबळी : हो नक्की . मला रिटायर्ड होण्याआधी एकतरी मॅच सचिनबरोबर खेळायची आहे. मग ती रणजी असो की आयपीएल असो. त्या क्षणाची मी वाट बघतोय. निखिल वागळे : हल्लीच तू एक पॉलिटिकल पार्टी जॉइन केलीस याचं कारण काय ? म्हणजे रिऍलिटी शो झाले, म्युझिक कॅसेटही बाजारात आणीयस. सिनेमा झाला आणि आता राजकीय पक्ष तर प्रकार नेमका काय आहे ? विनोद कांबळी : मी हे जे सगळं केलं ते ऑल राऊण्डरच्या हिशोबानं केलं. कारण क्रिकेटमध्येे मी ऑलराउण्डर नाहीये. मी बाकीचं जे काही केलं तर ते माझे छंद आहेत. मी जो लोकभारती नावचा पक्ष जॉइन केला आहे, त्यापक्षाच्या खेल भारती या विभागाचा मी प्रमुख आहे. निखिल वागळे : राजकीय पार्टीत जाऊन तुला निवडणूक लढवायची आहे ? आमदार, खासदार व्हायचंय ? विनोद कांबळी : त्या गोष्टीचा अजूनपर्यंत तरी मी विचार केलेला नाहीये. निखिल वागळे : तू आगामी निवडणुका लढवणार आहेस का ? विनोद कांबळी : मी खरंच सांगातोय, अजूनपर्यंत तरी त्या गोष्टीपर्यंत मी पोहोचलेला नाहीये. निखिल वागळे : तू स्पोर्टस् अकॅडमी काढू मागतोय... तिचं नाव तू खेल भारती ठेवलं आहेस, त्या अकादमीच्या माध्यमातून तू काय करणार आहेस ? तू देशाची सेवा करणार आहेस का ? विनोद कांबळी : हो बहुतेक. मलाही देशाची सेवा करायची आहे. सर तुम्हाला माहीत आहेच की मी कोणत्या बॅगराऊण्डमध्‌ून आलोय. त्यावेळी माझ्याकडे कोणत्या सवलती नव्हत्या. मला पाठबळ नव्हतं. मी कष्टातून पुढे आलेला आहे. माझ्याकडे कोणती साधनं नव्हती. क्रिकेट त्यावेळीही महाग होतं. आणि आजच्या घडीला तर ते पूर्वीपेक्षा महागडं झालं आहे. निखिल वागळे : म्हणजे तू गरीब मुलांमधून टॅलेन्ट शोधणार आहेत का ? विनोद कांबळी : हो. डेफिनेटली. मी त्या मुलांमधला टॅलेन्ट शोधण्याचं काम मनापासून करणार आहे. निखिल वागळे : तू त्यांना शिकवणार का ? विनोद कांबळी : होय. मी त्यांना फक्त क्रिकेटच शिकवणार नाही. तर त्या पलीकडे जाऊन मदत करणार आहे. निखिल वागळे : विनोद मी तुला आणि सचिनला गेल्या 25 वर्षांपासून पाहत आहे. तुझा आणि त्याचा तो लहानपणीचा फोटो आठवतो.. जो षट्कारमध्ये पहिल्यांदा छापून आला होता. तू मगाशी म्हणालास की तुझं लहानपण खूप कष्टाचं होतं. कसं होतं तुझं लहानपण ? काय होतं भेंडीबाजारात ? विनोद कांबळी : मी क्रिकेट खेळायला शिकलो ते माझ्याबाबांमुळे. माझे पप्पा गणपत कांबळींना खेळाची गोडी तिथेच लागली. पप्पा सर्वप्रकारचे खेळ चांगले खेळायचे. माधव मंत्रींपासून बापू नाडकर्णी , माधव आपटेंपासून पॉली उम्रीगर यांच्याबरोबर ते क्रिकेट खेळले आहेत. पप्पांना संधी मिळाली नाही. टीममध्ये फास्ट बोलरच्या जगेसाठी रमाकांत आचरेकर आणि माझे बाबा यांच्यात कुणाची निवड करावी असा प्रश्न पडलेला होता. माधव मंत्रींनी त्यांना गिलख्रिस्टही नाव दिलं होतं. एवढे चांगले ते ऑलराऊण्डर होते. पण त्यांना संधी मिळाली नाही. पप्पा कधी निराश झाले नाहीत. त्यांनी त्यांच्या आवडीचे संस्कार माझ्यावर केलेत. भेंडीबाजारतल्या 150 - 200 स्क्वेअर फीटच्या खोलीत कांबळी कुटुंबातले 24 जण रहायचे. जॉइन्ट फॅमिली होती आमची. त्यात परिस्थिती बेताची . तशा परिस्थितीत पप्पांनी मला शिकवलं. आमच्या कुटुंबात सकाळी लवकर उठणारा मी दुसरा होतो. कितीही त्रास पडला तरी सकाळची शाळा आणि नेट सराव मी कधीच सोडलेला नाही. पहिली ते पाचवी मरिन लाईन्सच्या अवर लेडी ऑफ डोलर्स या शाळेत मी होतो. नंतर सहावीपासून शारदाश्रममध्ये यायला लागलो. निखिल वागळे : भेंडीबाजार ते मरिन लाईन्स आणि मरिन लाइन्स ते शारदाश्रमचा काळ तू ओझरता सांगितलास. दीडशे - दोनशे स्क्वेअर फीटच्या खोलीत 24 जण राहयचे, खूप गरिबी असयाची ? विनोद कांबळी : हो निखिल वागळे : त्या तशा परिस्थितीत तुझे काय हाल व्हायचे ? विनोद कांबळी : घरची परिस्थिती हलाकीची म्हणजे एकदमच हलाकीची होती. त्यामुळे आमचे एकदमच हाल व्हायचे. पप्पा एकटेच कमावणारे होते. आम्ही चार भाऊ होतो. मला मोठी बहीण होती. आई - बाबांचा तिच्यावर खूप जीव. ती स्पेशल चाईल्ड होती. बाबांनाच फक्त ओळखायची. ती वयाच्या 11 व्या वर्षी गेल्यामुळे आई - बाबांनी तिचा खूपच धसका घेतला. त्यामुळे माझ्याकडे त्यांचं दुर्लक्ष झालं. निखिल वागळे : या हलाकीच्या परिस्थितीत क्रिकेटचं साहित्य मिळवणं तुला कठीणच गेलं का ? विनोद कांबळी : हो तर... खूपच कठीण गेलं. भेंडीबाजारात मी टेनिसनं क्रिकेट खेळायचो. कारण बॅट आणि बॉल घेण्यासाठी पैसे नसायचे. कुणाच्या घरी बॉल गेला तर ते त्या बॉलचे दोन तुडके करून द्यायचे. बॅट आणि बॉलसाठी मी लोखंडाची चोरी केलेली आहे. ते विकून मी बॅट आणि बॉल विकत घेतला. ती माझ्या आयुष्यातली पहिली आणि शेवटची चोरी आहे. फक्त क्रिकेटसाठी मी ती केली. निखिल वागळे : पैसे नसायचे. परिस्थिती जेततेम होती. घर छोटं होतं. नंतर ते विकून कांजूरमार्गला बाबांनी घर घेतलं. मग या वातावरणावचा क्रिकेटवर परिणाम झाला का ? हे क्रिकेट खेळताना हे टेन्शन तुझ्या मनावर होतं का ? विनोद कांबळी : नसायचं. कारण माझ्या आईनं मला ते घेऊच दिलं नाही. माझे बाबा तर एकदमच सर्किट होते. त्यांना भेंडीबाजारातले भले भले दादा घाबरायचे. गणपत कांबळी दिसले की ते एकदम गुल व्हायचे. माझ्या पप्पांचा या लोकांना आदरयुक्त दरारा होता. एकतर ते स्पोर्टस्‌मन होते. त्यामुळे त्यांचं शरीर मस्त पीळदार होतं. परिणामी बाबांच्या वार्तेलाच कोणी जायचं नाही. निखिल वागळे : तू बाबांना घाबरायचास का ? विनोद कांबळी : हो. निखिल वागळे : त्यांच्या मार खाल्ला आहेस का ? विनोद कांबळी : हो. मी भरपूर मार खाल्ला आहे. फटके खाऊन खाऊन मी दगड झालो आहे. सकाळी मी चार - साडेचार मी उठायचो. आई चपाती-भाजी करून द्यायची. आंघोळ वगैरे सगळं आटपून शाळेची बॅग, क्रिकेटची कीट बॅग, घेऊन मी सकाळची सहाची ट्रेन मी पकडायचो. मराणची गर्दी असायची. मी भेदरल्यासारखा डब्यात त्या लोकांच्या गर्दीत उभा रहायचो. पण आतले डब्ब्यातले प्रवासी मला सांभाळून घ्यायचे. दादर येईपर्यंत आमचा हा खेळ असाच चालू रहायचा. निखिल वागळे : आचरेकरसरांनी तुला काय शिकवलं ? विनोद कांबळी : सरांचा एक डायलॉग माझ्या चांगलाच लक्षात आहे आणि तो म्हणजे सचिन दगड आहे आणि मी धोंडा. निखिल वागळे : बरं मग मला सांगा हा धोंडा आचरेकर सरांकडे काय शिकला ? विनोद कांबळी : जसं पप्पांकडून मार खाललाये, तसा मी सरांकडून मार खाललाये. सर मला स्टम्पनं मारायचे. बॅटिंग करताना मी मध्येच जाऊन पतंगही उडवली आहे. निखिल वागळे : हो. मीही तो किस्सा ऐकून आहे. जरा आमच्या प्रेक्षकांना सांगा ना ? विनोद कांबळी : तो तर किस्सा धमलाच होता. मी बॅटिंगच्या पोझमध्ये उभा होतो. समोर सचिन नॉनस्ट्रायकरला एन्डला उभा होता. बोलर समोरून रनअप घेऊन येत होता. तेवढ्यात माझ्या पुढ्यात पतंग आला. तो बाजूला काढण्यासाठी म्हणून हातातली बॅट बाजूला ठेवून मांजा हातात घेतला. तर मांजा इतका मोठा होता की समोरच्याला मी पतंग उडवतोय, असंच वाटत होतं. प्रत्यक्षात मी तो पतंग बाजूला काढत होतो. बोलर थांबला. नॉनस्ट्रायकरला एन्डला उभा असलेला सचिन पोट धरून हसायला लागला. आणि हे सगळं आचरेकर सरांनी पाहिलं. आपली मुलं मैदानवर कशी खेळतात, कशी वागतात, त्यांचा ऍटीट्युड कसा असतो, ते स्वत:ला मैदानात कसे सादर करतात, याकडे सरांचं बारीक लक्ष असायचं. आणि हे कुठेतरी लपून ते पहायचे. एका वहीत ते सगळं टीपून नेट संपल्यावर प्रत्येक मुलाले वाचून दाखवायचे. त्यादिवशी माझ्या नावापुढं विनोद फ्लाइंग काईट असं लिहिलं होतं. ते वाचताना सरांनी जी काय खणकन कानाखाली लगावली ती अजून लक्षात आहे. तो आवाजमाझ्या कानाखाली अजूनही घुमत आहे.सांगायचा मुद्दा हा की सरांनी नेटमध्ये एवढी मेहनत आमच्याकडून करून घेतली. आम्ही संपूर्ण वर्षभर क्रिकेट खेळायचो. पावसाळ्यातही सर आम्हाला खेळायला बोलवायचे. आम्ही रबरी बॉलनं प्रॅक्टीस केली आहे. त्याचा आम्हाला खरोखर खूप फायदा झाला. आम्ही क्रिकेट एन्जॉय केलं. सचिन जो आता खेळत आहे ते त्याचं खेळणं नसून क्रिकेट एन्जॉय करणं आहे. निखिल वागळे : मला सांग तू सकाळी साडेचारला उठायचास. पण घरी कधी जायचास ? विनोद कांबळी : आधी मी शाळेत जायचो. शाळेतून मग प्रॅक्टीसला. कधी कधी शाळेत जायला उशीर व्हायचा. कारण दादर स्टेशनपासून शाळेत मी पायी चालत जायचो. बसच्या प्रवासाला पैसे नसायचे. ट्रेनचा पास मला माझ्या क्लास टीचर विशाखा राऊतांनी काढून दिला. ज्या मुंबईच्या एक्स मेयर होत्या. शाळा झाल्यावर मग नेट करायचो. नेटमधला सराव संपल्यावर शेवटच्या ट्रेननं मी घरी जायचो. घरी जायाला रात्रीचा एक वाजायचानिखिल वागळे : म्हणजे तू फक्त तीनच तास झोपायचा ? विनोद कांबळी : होय. मी फक्त तीनच तास झोपायचो. जर ती शेवटची ट्रेन सुटली तर माझे खूपच प्रॉब्लेम व्हायचे. कारण ट्रेनला गर्दी एवढी असायची की ट्रेनमध्ये चढणं मुश्किल व्हायचं. त्यात मी प्रॅक्टीस करून इतका दमलेला असायचो की स्टेशनवर चालवायचं नाही. सचिन शिवाजीपार्कला रहायचा. सचिनला शिवाजी पार्कला सोडून मी जायचो. आई बरोब्बर एक वाजता कांजूरमार्ग स्टेशनवर मला घ्यायला यायची. मी दीडवाजेपर्यंत तिथे पोहोचायचो. बरं एवढ्या थकलेल्या अवस्थेत रीक्षानं जाण्याचा खूप मोह व्हायचा. पण परिस्थितीमुळं ते शक्य नसायचं. स्टेशनवरून घराकडे माझ्या पायी प्रवासाला सुरुवात व्हायची. निखिल वागळे : आपली जर आर्थिक परिस्थिती चांगली असती तर मी अधिक पुढे गेलो असतो... असं तुला मागे वळून बघताना जाणवलं का ? विनोद कांबळी : कधीच नाही. कारण प्रत्येक गोष्ट ही नशिबावर अवलंबून असते. निखिल वागळे : या आचरेकर सरांच्या नेटमध्ये तुझी आणि सचिनची दोस्त झाली. ही कशी होती ही दोस्ती ? तुम्ही काय काय मजा केलीत ? तुम्ही एकत्र काय काय तुमच्या आयुष्यातले क्षण अनुभवलेत ? सचिन सभ्य होता का ? विनोद कांबळी : दिसतं तसं नसतं सर... सचिन बराच, शांत आणि लो प्रोफाईल आहे. पण ज्या वेळेला तो माझ्याबरोबर असतो तेव्हा तुमच्यात वावरणारा सचिन नसतो. तर तो माझा मित्र सचिन असतो. सचिन माझा बेस्ट फेन्ड आहे. त्याच्यासारखा मित्र मला कधीच लाभणार नाही. निखिल वागळे : हॅरीस शिल्डच्या रेकॉर्डमुळं तुम्ही दोघंही लाइम लाइटमध्ये आलात. त्यावेळी क्रिकेटला सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी हे दोन तारे गवसले. त्या रेकॉर्डच्यावेळी तुम्हाला आचरेकर सरांचा तुम्हाला ओरडा बसला होता. तो किस्सा काय होता ? विनोद कांबळी : हॅरीस शिल्डचा तो सेंट झेविअर्सबरोबरसोबतचा तो सामना होता. समोर साईराज बहुतुले होता. त्यावेळी आमचे काहीतरी 170, 190 धावा झाल्या होत्या. चव्हाण सर आचरेकर सरांचा निरोप घेऊन आले होते. " दोघांपैकी कोणीतरी एक आऊट झाला तरी दुस-यानं 375 धावांचा संजीव जाधव रेकॉर्ड मोडायचा, " चव्हाण सर निरोप देऊन गेले. सचिननं मला चव्हाण सरांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नको म्हणून सांगितलं. आम्ही खेळतच सुटलो. सचिन 359 आणि मी 358 वर खेळत होतो. थांबण्याचं नावच घेत नव्हतो. आणि चव्हाणसर सामना जाहीर जाहीर करा, असं मैदानभर ओरडत हिंडत होते. शेवटी लंच टाइममध्ये चव्हाणसरांनी आचरेकरांना फोन लावला. त्यांच्याशी आम्ही दोघंही बोललो. सर 800 रन्स झालेयत. नको ना डिक्लर करूया, " असं सरांना सांगितलं. पण सर काही ऐकायला तयार नव्हते. सरांनी आम्हाला थांबायला सांगितलं नसतं तर आम्ही दोघांनी 500 - 500 धावा करून हजार धावांचा विक्रम केला असता. निखिल वागळे : या सामन्यानंतर सचिनची पाकिस्तान टेस्टसाठी निवड झाली होती. त्यावेळी तुला कुठेतरी मनात वाईट नाही वाटलं का ? एक माणूस म्हणून सांग. विनोद कांबळी : अजिबात वाईट वाटलं नाही. वाटेल तरी का. कारण तो माझा चांगला मित्र होता आणि आहे. माझी त्यावेळी मुंबई टीम साठी निवड झाली. नंतर एक वर्षांनं माझीही भारतासाठी निवड झाली. क्रिकेट खेळता खेळता खेळाबरोबर आमची मैत्री घट्ट झाली होती. निखिल वागळे : तुझ्या मैत्रीत कोणी काडी लावण्याचा प्रयत्न केला का ? विनोद कांबळी : हो खूप जणांनी अनेक वेळा केला पण आम्ही त्याकडे फारसं लक्षं दिलं नाही. तर क्रिकेटच जास्त खेळलो. निखिल वागळे : सचिननंतर तीन वर्षांनी तू टेस्ट डेब्यू केलास. त्या आधी तू वन्डे खेळालास. तुझ्या टेस्ट मॅचच्या सुरुवातीला तू दोन सेंच्युरी आणि दोन डबल सेंच्युरी केल्यास. कसं वाटलं तुला ? म्हणजे एवढा चांगला डेब्यु सचिनचाही चांगला डेब्यू झाला नव्हता ? विनोद कांबळी : हो. पण मी संधीचं सोनं केलं. गावसकर सरांचा रेकॉर्ड तोडायचं माझ्या मनात होतं. पण ते शक्य झालं नाही. पहिला डबल सेंच्युरीला गावसकर सरांनी मला हातातलं घड्याळ भेट म्हणून दिलं. तर दुस-या डबल सेंच्युरीला वेल प्लेड असं म्हणत गॉगल भेट दिला. त्यावेळी आम्ही ती टेस्ट 3 - 0 अशी जिंकली होती. श्रीलंकेतल्या वन्डेतही आमची चांगली कामगिरी झाली होती. प्रेस रिपोटर्स आले होते. गावसकरांच्या एवढ्या जवळ असून तू त्यांचा रेकॉर्ड का तोडत नाहीस. " खुद्द विश्वविक्रम करणा-याकडून जर बक्षीस मिळत असेल तर रेकॉर्डच्या मागे का धावावं, " असं उत्तर देऊन मी मोकळा झालो. निखिल वागळे : भेंडीबारातला मुलगा इंटर नॅशनल क्रिकेट खेळला. हा फरक कसा वाटला तुला ? विनोद कांबळी : हा फरक खूपच मोठा होता. फाईव्ह स्टार हॉटेलमध्येतर अवघडल्यासारखं व्हायचं. 1985 ला जर मी भेंडीबाजार सोडला नसता तर माझी भाषा क्या भिडू कैसा है रे तू, किदर को जा रहा है, इसको उठाव, उसको उठाव अशी झाली असती. कांजूरमार्गला गेल्यामुळं मी सुधारलो. निखिल वागळे : मला तुझ्या आणखी एका रेकॉर्डबद्दल तुला विचारायचं आहे. तो म्हणजे शेर्न वॉर्नच्या एका ओव्हरमध्ये तू 26 धावा फटकावल्यास. काय म्हणाला तुला शेर्न वॉर्न नंतर ? विनोद कांबळी : ऍटक इज बेस्ट डिफेन्स, असं आमच्या सरांनी सांगितलं आहे. त्याप्रमाणं मी खेळायला सुरुवात केली. त्यावेळी मी त्याचा पहिला बॉल अडवला होता. मला त्यानं एफ' च्या भाषेतल्या शिव्या दिल्या होत्या. त्याला प्रत्युत्तर म्हणून मी त्याच्या एका ओव्हरमध्ये 26 धावा फटकावल्या. निखिल वागळे : पण त्यावेळी तुला दडपण नाही आलं. की हा शेर्न वॉर्न आहे. तो बॉल सॉलेड वळवायचा...तू त्याला किल करून टाकलंस का ? विनोद कांबळी : अजिबात आलं नाही. कारण शेन वॉर्नकडे बॉल होता. माझ्याकडे बॅट होती. मी त्याच्या ' एफ 'च्या भाषेला चांगलंच बॅटनं चांगलंच उत्तर दिलं आहे. त्या मॅचमध्ये सिद्धूनंही चांगले रन केले होते. पण शेर्न वॉर्न ला फटकावल्यामुळे मॅन ऑफ द मॅचचा बहुमाना मला मिळाला. कसं असतं अनेकदा बोलर आणि फिल्डर बॅटस्‌मनला प्रेशराईज्ड करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे बॅटस्‌मनला आपसुकच टेन्शन येतं. अशाच एका सामन्याच्यावेळी मी भरपूर अपसेट झालो होतो. ते गावसकर सरांनी पाहिलं. त्यांनी मला बाजूला नेलं म्हणाले, " डेझी (कारण मी डेझमन्ट हिंडस् सारखा दिसायचो.) त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस. खेळ. पण त्यांची पाळी असेल तेव्हा त्यांना सोडू नकोस. 1992 आणि 1996 च्या वर्ल्डकपमध्ये आम्ही पाकिस्तानची खूप वाईट अवस्था केली होती. ते आमच्या त्या बोलण्यानं हरले होते. यालाच म्हणतात किलर इंस्टिंक्ट. निखिल वागळे : तुझ्या संघात रवी शास्त्री आणि संजय मांजरेकर होते. त्यांच्याकडून तू काय शिकलास ?विनोद कांबळी : त्यांना फक्त आम्ही टीव्हीवर बघायचो. 1987 च्या रिलायन्स वर्ल्डकपमध्ये मी आणि सचिननं बॉल बॉइज म्हणून काम करत असताना त्यांना जवळून पाहिलं आहे. आमचं नशीब बघा 1992 आणि 1996 च्या वर्ल्डकपमध्ये आम्ही दोघं एकत्र वर्ल्डकप खेळलो आहोत. विनोद कांबळीशी ग्रेट भेटच्या पुढचे भाग ऐकण्यासाठी खालील व्हिडिओवर क्लिक करा. ग्रेट भेटमध्ये विनोद कांबळी (भाग - 2 ) ग्रेट भेटमध्ये विनोद कांबळी (भाग - 3 ) ग्रेट भेटमध्ये विनोद कांबळी (भाग - 4 ) ग्रेट भेटमध्ये विनोद कांबळी (भाग - 5 ) ग्रेट भेटमध्ये विनोद कांबळी (भाग - 6 )