Elec-widget

#व्ही शांताराम

ग्रेट भेटमध्ये मधुर भांडारकर

May 13, 2013

ग्रेट भेटमध्ये मधुर भांडारकर

ग्रेट भेटच्या 22 नोव्हेंबरच्या भागात आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांनी प्रसिद्ध दिग्दर्शक मधुर भांडारकर यांची मुलाखत घेतली. मधुर भांडारकर यांनी नॅशनल अ‍ॅवॉर्ड्सची हॅट्रीक केली आहे. चांदनी बार, पेज थ्री, कॉर्पोरेट आणि नुकताच आलेला फॅशन अशा अनेक रियलिस्टिक सिनेमांचं दिग्दर्शन त्यांनी केलेलं आहे. ग्लॅमरस जगाचं वास्तव त्यानं जगापुढे आणलं. या मुलाखतीत मधूरमधल्या दिग्दर्शकाचा आणि त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा शोध घेण्यात आला.नुकताच मधुरचा फॅशन रिलीज झाला होता आणि अपेक्षेप्रमाणेच तो लोकप्रियही झाला. पण या चित्रपटावर बर्‍याच फॅशन डिझायनर्सनी टीका केली होती. त्याच्यावर वन सायडेड सिनेमा बनवल्याचा आरोप केला गेला. त्याविषयी बोलताना मधुर म्हणाला 'माझा प्रत्येक सिनेमा हा मायक्रोस्कोप घेऊन तपासला जातो. मी रिअलिस्टिक सिनेमे बनवतो, पण असे सिनेमे बनवणारे अनेक लोक आहेत. पण लोकांचं असं झालंय की मधुर फिल्म बनवतो तर तो ती इंडस्ट्री एक्पोज करतो. पण असा दावा मी कधीच केला नाही. माझे पिक्चर कधीच जजमेंटल नसतात. ते सोसायटीचं रिफ्लेक्शन असतं. प्रेक्षक माझ्या फिल्ममध्ये रिअल कॅरेक्टर शोधतात. ते चुकीचं आहे.' तीन आठवड्यात फॅशननं 33 कोटींचा बिझनेस केला. त्याचं कारण सांगताना मधुर म्हणाला 'मध्यमवर्गीय लोकांना फॅशन विषयी उत्सुकता आहेच. रॅम्पच्या मागे काय चालतं, याविषयी लोकांना प्रचंड इंटरेस्ट आहे. आणि पुन्हा मध्यमवर्गीय लोकांना मधुरचा पिक्चर म्हणून उत्सुकता होतीच'खर तर मधुर एका सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा. घरात फिल्म इंडस्ट्रीची बॅकग्राउंड नाही. पण तरीही लहानपणापासूनच त्याला सिनेमात प्रचंड इंटरेस्ट होता. थिएटरमध्ये जाऊन चित्रपट बघणं परवडत नसल्याने त्याने रस्त्यावर, मेळ्यांमध्ये, सार्वजनिक सत्यनारायणाच्या पूजेत असे साधारण 1500 चित्रपट त्यानं पाहिले.ज्या वयात मुलं अमर चित्रकथा, चांदोबा वाचायचे, त्या वयापासून तो स्टारडस्ट, फिल्म फेअर अशी मॅगेझीन्स वाचायचा. 'मला वाटायचं की प्रत्येक फिल्म म्हणजे एक स्टोरी आहे. त्यावेळेही मी लोकांच्या चित्रपटांचं विश्लेषण करायचो. तेव्हाही मी प्रत्येक फिल्मच्या कॅमेरामन, दिग्दर्शक, एडिटर अशी सगळी माहिती एकत्र करायचो. पहिल्यापासूनच मला डायरेक्टर बनायचं होतं. लोकांना वाटायचं की मी अ‍ॅक्टर बनेन. पण माझी ती इच्छाच नव्हती. मला फक्त फिल्ममेकर बनायचं होतं. आणि माझ्याकडे सिनेमाचं एवढं नॉलेज होतं की मी डायरेक्टर झालो नसतो, तर मी जर्नलिस्ट झालो असतो.' अर्थात एवढ्या फिल्म्स बघितल्यावर शाळेत मधुर यथातथाच होता. शाळेत शेवटच्या बाकावर बसून मित्रांना फिल्म्सची स्टोरी ऐकवणं, हा त्याचा लाडका उद्योग होता. त्यामुळे कित्येक वेळा शिक्षकांनी त्याला वर्गाबाहेरही काढलंय. लहानपणापासूनच सिनेमा बघताना मधुर विचार करायचा की हा शॉट मी शूट केला असता तर कसा केला असता ? या उत्साहामुळे त्यानं अनेक सिनेमांचं शूटिंग अगदी रस्त्यावर उभा राहूनही बघितलंय. गुरुदत्त, विमलदा, श्याम बेनेगल, व्ही शांताराम हे मधुरचे आवडते दिग्दर्शक. पण त्यातही तो तो स्वत:ला मनमोहन देसाईंच्या अधिक जवळचा मानतो. 'मनमोहन देसाईंकडून घेतलेलं कॉमन मॅनला समजून घ्यायचं टेक्निक आणि इतर दिग्दर्शकांकडून घेतलेल्या सोशल कन्सेप्ट्सनी मधुर बनला आहे' असं त्यानं सांगितलं.मधुरवर पहिल्यापासूनच संस्कार होते सिनेमाचे. त्या काळात ते वेड इतकं वाढलं की घरच्यांचा नोकरीचा आग्रह झुगारून त्यानं स्वत:ची व्हिडिओ लायब्ररी सुरू केली. या काळात त्यानं घरोघरी व्हिडिओ कॅसेट्सची होम डिलिव्हरी दिली. 'या काळात मी असंख्य घरी फिरलो. मिथू चक्रवर्ती पण माझा गिर्‍हाइक होता. या काळात मी वेगवेगळ्या लोकांची मानसिकता समजून घेतली. त्याचा पुढे मला सिनेमे बनवताना खूप उपयोग झाला. लोक जेव्हा मला सांगतात की तुझ्या सिनेमात सोशल एलिमेंट असतो. पण त्याच वेळी तो उत्तम कमर्शियल सिनेमाही असतो. त्याचं क्रेडिट मी या अनुभवाला देईन' असं मधुरनं सांगितलं. पुढे हा बिझनेस बंद झाल्यावर तो नोकरीसाठी मस्कतलाही गेला. 'पण मला ते अजिबातच आवडलं नाही. मग मी इकडे परत आलो. अशोक गायकवाडांकडे इंटर्नशिप केली. नंतर रंगिला, रात, रेवती अशा चित्रपटांत राम गोपाल वर्मांना असिस्टही केलं.त्रिशक्ती हा मधुरचा पहिला सिनेमा. त्याच्या इतर सिनेमांपेक्षा हा पूर्णपणे वेगळा होता. त्याविषयी बोलताना तो म्हणाला 'माझ्या आयडियाज इंडस्ट्रीमध्ये कोणी अ‍ॅक्सेप्ट केल्या नाही. त्यात मला कोणी गॉडफादर नव्हता. मला लोकांनी सांगितलं की तू खूप गोविंद निहलानी किंवा श्याम बेनेगल टाईप विचार करतोस. ते इकडे चालणार नाहीत. खूप स्ट्रगलनंतर फायनली मला फिल्म डिरेक्ट करण्याची संधी मिळाली. पण त्यांना कमर्शियल फिल्म हवी होती. त्यात बर्‍याच अडचणी आल्या. प्रोड्युसर्सची भांडणं झाली. इतरही अनेक प्रॉब्लेम्स आले. कसाबसा मी तो पूर्ण केला. मी तो अनेकांना दाखवला, जे मला ओळखायचे त्यांनी खर काय ते ओळखलं. पण शेवटी ती फिल्म फ्लॉप झाली. मग मी ठरवलं की काही झालं तरी आता मी पुढची फिल्म मला हवी तशी बनवणार. या काळात मी खूप स्ट्रगल केला. खूप एम्बॅरेसिंग सिच्युएशन फेस केल्या.' पण अपयशाकडेही मधूर खूप सकारात्मक दृष्टीनं पहातो. 'जर त्रिशक्ती हीट झाला असता, तर मला लोकांनी तसेच चित्रपट बनवायला भाग पाडलं असतं. मग तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा आजचा मधुर तुम्हला दिसला नसता. त्या काळात अनेक लोक माझ्याशी वाईटही वागले. पण आज मी ते सगळं विसरून त्यांना माफ केलंय त्यातल्या कित्येक लोकांबरोबर मी कामही केलंय' असं मधुरनं सांगितलं.चांदनी बार या चित्रपटानं मधुरला खरी ओळख मिळवून दिली. त्याविषयी बोलताना मधुर म्हणाला 'स्ट्रगलिंगच्या काळात माझा मित्र मला एका बारमध्ये घेऊन गेला. तो लेडिज बार होता. म्हणजे एकदम वेगळच वातावरण. शिफॉन साडीतल्या बायका, लाउड म्युझिक सगळं वातावरणच वेगळं होतं. मी मित्राला म्हटलं अरे कुठे घेऊन येतोस मला... लोक म्हणतील फिल्म फ्लॉप झाली म्हणून मधुर आता इकडे दिसायला लागला. मी लवकरात लवकर तिथून बाहेर पडलो. पण घरी आल्यावर मला जाणवलं की त्यातलं ते जे गाणं होतं मुंगळा मुंगळा ते गाणं माझ्या डोक्यात बसलं होतं. दुसर्‍या दिवशी मी मित्राला म्हटलं मला बारमध्ये जायचय. मग आम्ही तीन-चार बार फिरलो. शेवटी सायन-कोळीवाड्यातल्या एका जुनाट बारमध्ये मी निर्णय घेतला की आपण बारवर फिल्म बनवायची. मग मी त्यावर रिसर्च केला. 4-5 महिने मी वेगवेगळ्या बारमध्ये जाऊन बसायचो. कनेक्शन्स काढली. कॉन्टॅक्ट्स मिळवले आणि मग पिक्चर बनवला. त्यानंतर माझी त्रिशक्ती ही फिल्म बघून आर मोहन नावाच्या प्रोड्युसरनी मला सांगितलं होतं की तुझ्यात टॅलेंट आहे. पुढची फिल्म आपण एकत्र करू. पण त्यावेळेस त्याचीही परिस्थिती फारशी चांगली नव्हती. मी त्याला एक कोटीचं बजेट दिलं. त्या वेळी तेही अवघड होतं. माझ्या डोक्यात होतं तब्बूला घ्यायचं. पण ती खूप एस्टॅबिलश्‌ड होती. पण तिनं माझ्यावर विश्वास दाखवला आणि फिल्म झाली.'मधुरच्या सगळ्याच चित्रपटात आपल्याला मराठी चेहरे दिसतात. त्याविषयी बोलताना तो म्हणाला 'मराठी लोकांमध्ये प्रचंड टॅलेंट आहे. आणि त्याहीपेक्षा मराठी लोकांबरोबर काम करताना मी जास्त कम्फर्टेबल असतो म्हणजे चांदनी बारच्या वेळेस तर तब्बूला चिडवलं होतं की मधुर भांडारकर, सुहास पळशीकर, विनय आपटे... तू मराठी फिल्म करतेयस का!' फिल्म मेकिंगच्या आपल्या प्रोसेसविषयी सांगताना सांगताना मधुर म्हणाला 'माझी स्टाईल ही स्वतंत्र आहे. मी अ‍ॅक्टर्सना नरेशन देतो. कधीकधी स्क्रिप्ट पण देत नाही. पण फिल्म साधारण कशी आहे, याची आयडिया मी सगळ्या कलाकारांना देऊन ठेवतो. मी अ‍ॅक्टर्सबरोबर वर्कशॉप अजिबात करत नाही. पण फिल्म माझ्या डोक्यात तयार असते. पेज थ्री च्या वेळी तर कोंकणा सेनपासून कोणालाच कळत नव्हतं की मी नक्की काय करतोय. माझा एडिटर हैराण झाला होता. पण फिल्म एकदा एडिट टेबलवर गेली की मला माहीत असतं की कुठे काय असतं'चांदनी बारचा विषय तसा भडक होता. किंबहुना मधुरच्या जवळपास सर्वच चित्रपटांचे विषय तसे भडकच होतं. पण त्याचे चित्रपट कधीच लाउड वाटले नाहीत. त्याविषयी बोलताना तो म्हणाला 'मला माझ्या सिनेमातून लोकांवर इंपोज करायचं नसतं. मी तो निर्णय प्रेक्षकांवर सोपवतो. शुटिंगच्या वेळेस तब्बूलाही वाटलं होतं की मी अंडरप्ले करतोय. पण चित्रपट बघितल्यावर तिनं मला सांगितलं की 99 टक्के दिग्दर्शकांनी हा सीन लाउड केला असता. तू राहिलेल्या 1 टक्क्यांमध्ये येतोस. तू हे का केलं माहित नाही, पण केलंस ते खूप चांगलं केलस. या चित्रपटानं मला खूप यश दिलं. राष्ट्रीय पुरस्कार दिला. पण त्याहीपेक्षा त्रिशक्तीमध्ये हरवलेला माझ्यातला दिग्दर्शक मला सापडला.' यश-अपयशाचा विचार न करता आपण काम करत रहावं. पैसे, यश आपोआप मिळत जातं असा फॉर्म्युला या वेळेस मधुरनं सांगितला. 'मी एक्स्पिरिमेंटल फिल्म-मेकर आहे. पण माझे चित्रपट कमर्शियली यशस्वी होतात. त्याचं कारण म्हणजे माझे बरेचसे चित्रपट लो बजेट असतात. दिलेल्या बजेटमध्ये उत्कृष्ट फिल्म बनवणं हे मला जमतं.'चांदनी बारनंतर मधुरचा पुढचा सिनेमा म्हणजे सत्ता. चांदनी बारपेक्षा पूर्णपणे वेगळा चित्रपट बनवायचं ठरवून मधुरनं सत्ता बनवला. हा चित्रपट जब्बार पटेल यांच्या सिंहासनपासून इन्स्पायर्ड असल्याचं मधूरनं सांगितलं. 'या फिल्मला चांदनी बार इतकं यश मिळालं नाही. पण पर्सनली बोलायचं झालं तर माझ्या मते हा माझा सर्वोत्कृष्ट चित्रपट होता. प्रमोद महाजन यांनी हा चित्रपट बघून मला विचारलं होतं की पॉलिटिक्सची एवढी माहिती तू कुठून काढलीस ? बहुतेक आपल्या समाजात राजकारण्यांना फारशी सिंपथी मिळत नाही. त्याचा फटका या चित्रपटाला बसला असावा' असं तो म्हणाला. मधुरचे बहुतेक चित्रपट हे नायिकाप्रधान आहेत. त्याविषयी तो म्हणाला 'आपल्या इथे महिलांशी संबंधित खूप प्रश्न आहेत. ते तितकेसे हाताळले गेले नाहीत. ते मी घ्यायला सुरुवात केली आहे.'पेज थ्री हा मधुरचा आणखी एक सुपर हीट सिनेमा. सामान्य प्रेक्षक आणि समीक्षकांनी त्याचं खूप कौतुक केलं. त्याविषयी बोलताना मधूर म्हणाला 'त्रिशक्तीनंतर माझा जेव्हा स्ट्रगल चालू होता, तेव्हा मला पार्टीजला वगैरे कोणी बोलवत नव्हतं. पण चांदनी बारनंतर हे चित्र बदललं. मी अचानक हाय प्रोफाईल पर्सनॅलिटी बनलो. खूप मोठ मोठ्या माणसांना भेटण्याची मला संधी मिळाली. माझे फोटो पेपरमध्ये यायला लागले. त्या वेळेस मी विचार केला की कॉर्पोरेट हाँचोज, फिल्म स्टार्स, प्रोड्युसर्स अंडर वन रूफ कसे एकत्र येतात ? आणि मग मला लोक सांगायला लागले पेज थ्री मध्ये तुझे फोटो येतायत वगैरे वगैरे... तोपर्यंत मला हा काय प्रकार होता, हे तोपर्यंत माहितच नव्हतं. मग मी ठरवलं की या विषयावर फिल्म बनवायची. पण मग रिसर्च केल्यावर मला नेमकं कळेना की ही फिल्म नक्की कोणत्या अँगलनी दाखवाची. कॉर्पोरेटवर फोकस ठेवायचा का फिल्म स्टार्सवर? का आणखी कोणाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं घ्यायचं. मग मला लक्षात आलं की जर्नलिस्टचा वावर सगळीकडे असतो. त्यांच्या दृष्टीनं फिल्म बनवली तर सगळं कव्हर होईल. पुढे रिसर्चमध्ये मला शी माणसं भेटली की जे इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझममध्ये होते आणि दुसरे पेज थ्री जर्नलिझममध्ये. त्यांच्यातला संघर्ष मला रिसर्चमध्ये जाणवला आणि मग मी तो फिल्ममध्ये मांडला.'कॉर्पेरेट हा श्याम बेनेगलांच्या कलियुगपासून इन्स्पायर्ड आहे. पण त्यात आत्ताच्या काळातले संदर्भ त्यात आहे. त्याबाबत बोलताना तो म्हणाला 'पेज थ्रीनंतर असं झालं की लोकांनी माझ्याशी बोलणं बंद केलं. म्हणजे त्याच्याशी जे बोलाल, ते तो फिल्ममध्ये दाखवतो. कॉर्पोरेट बनवताना मला रिसर्चवर खूप कष्ट घ्यावे लागले. आणि कॉर्पोरेटनंतर मला या विषयावर लेक्चर द्यायला आयआयएम अहमदाबादमध्ये बोलवण्यात आलं.'मधुरचा पुढचा सिनेमा अंडर ट्रायल इन्व्हेस्टिगेशनवर आधारित आहे. कसा एक सामान्य माणूस जेलमध्ये येतो आणि त्याला काय भोगावं लागतं यावर त्याचा आगामी सिनेमा आहे.मधुरवर कास्टिंग काइचचे गंभीर आरोप झाले होते. त्याविषयी बोलताना तो म्हणाला 'ते सगळे आरोप खोटे होते. फक्त सहा महिन्यांपूर्वी माझं लग्न झालं होतं. पण माझं कुटुंब, माझे मित्र आणि इंडस्ट्रीमधून मला खूप सपोर्ट मिळाला. स्त्री कलाकारांनी पण मला फोन करून, मेसेज करून खूप धीर दिला. 'मधुरचा देवावर खूप विश्वास आहे. गेली वर्ष तो ज्यावेळेस मुंबईला असतो तेव्हा दादपहून चालत सिद्धिविनायकला जातो. 'मी आज जो कोणी आहे, मला जे काही मिळालं ते सगलं सिद्धिविनायकामुळे मिळालं. एका व्हिडियो लायब्ररी चालवणार्‍या मुलाला राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, ते सगळं मला देवाचे आशिर्वाद असल्यामुळे मिळाले.' येत्या काळात मल्टिप्लेक्स मेंटॅलिटीचे प्रेक्षक वाढणार आहेत. प्रेक्षकांना काहीतरी वेगळं हवय आणि ते देण्याचा मी प्रयत्न करीन असं मत त्यानं व्यक्त केलं.या मुलाखतीचा शेवट करताना आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे म्हणाले 'मधुरला सामान्या माणसांचा दिग्दर्शक का म्हणतात, हे त्याच्या बोलण्यावरून लक्षात येतं. तो सामान्य माणसातून आलाय आणि त्याची नाळ आजही सामान्य माणसाशी जोडलेली आहे.'