विदर्भ

Showing of 911 - 924 from 1016 results
धरण घोटाळ्यांमुळे घशाला कोरड ?

बातम्याMay 12, 2012

धरण घोटाळ्यांमुळे घशाला कोरड ?

13 मेआज महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. हंडाभर पाण्यासाठी चार-चार किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. मंत्रालयापासून ते दिल्लीपर्यंत दुष्काळनिधीचा दुष्काळ पडलाय. दुष्काळग्रस्तांच्या घशाला कोरड पडली आहे आणि याला कारणीभूत असलेल्या कारणांपैकी एक अतिशय महत्त्वाचं कारण म्हणजे राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून होत असलेला धरण घोटाळा. कोट्यवधींचा खर्च होऊनही अनेक मोठे सिंचन प्रकल्प अपूर्ण असल्यामुळेच आज महाराष्ट्र तहानलेला आहे. महाराष्ट्रात आज एकूण 7 हजार 366 सिंचन प्रकल्प अपूर्ण आहेत. आणि हे सगळे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी लागणार आहेत जवळपास 77 हजार कोटी रुपये. गेल्या दहा वर्षात तर जलसंपदा विभागावर 66 हजार 430 कोटी रुपये खर्च झालेत आणि राज्याची सिंचन क्षमता फक्त 0.1 टक्क्यांनी वाढली आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या सिंचन प्रकल्पात घोळच-घोळ !पश्चिम महाराष्ट्रासाठीच्या कृष्णा खोरे प्रकल्पातल्या 19 मोठ्या प्रकल्पांचा खर्च त्यांच्या नियोजित खर्चापेक्षा चौपटीने वाढला आहे. तर विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत सुरू असलेल्या अनेक प्रकल्पातल्या कामकाजात घोळ असल्याचं वडनेरे समितीनं म्हटलंय. एकीकडे विदर्भातला सगळ्यात मोठा गोसीखुर्द प्रकल्पसुद्धा अनेक कारणांमुळे रखडलेला आहे. तर कृष्णा खोरेमधला चासकमान प्रकल्प 40 वर्षं रखडला आहे. कृष्णा खोरे प्रकल्पांतर्गत पश्चिम महाराष्ट्रात 19 मोठे प्रकल्प, 23 मध्यम प्रकल्प, 97 लघु प्रकल्प, 5 उपसा सिंचन योजना, 4 कोल्हापूर बंधारे आणि 3 साठवण तलाव असे एकूण 155 प्रकल्प उभारण्यात येत आहे. यात सगळ्यात जास्त काळ रखडलेल्या आणि नियोजित किंमतीत भरमसाट वाढ झालेल्या 7 मोठ्या प्रकल्पांचं हे वास्तव.. - यातला सर्वाधिक काळ रखडलेला प्रकल्प आहे चासकमान...हा प्रकल्प सुरू झाला 1969 साली आणि पूर्ण होणार होता 1975 साली, पण आता हा प्रकल्प पूर्ण होणार आहे 2015 साली. एकूण 40 वर्ष रखडलेल्या या प्रकल्पाचा नियोजित खर्च होता 10 कोटी 65 लाख, पण आता हा खर्च वाढून झालाय 728 कोटी 49 लाख म्हणजे जवळपास 717 कोटींची वाढ झाली आहे.- भीमा (उजनी) हा प्रकल्प 1969 साली सुरू झाला आणि 2000 साली पूर्ण होणार होता. आता हा प्रकल्प 2016 साली पूर्ण होणार आहे. 1969 साली या प्रकल्पाचा खर्च होता 40 कोटी 51 लाख आणि आता तो पोहोचलाय 1456 कोटी 40 लाखांवर..म्हणजेच जवळपास 1415 कोटींची वाढ झाली आहे. - नीरा देवधर प्रकल्पाची सुद्धा तीच गत आहे. 1989 साली सुरू झालेला हा प्रकल्प 1998 साली पूर्ण होणार होता, पण आता तो 2015 मध्ये पूर्ण होईल, असं आश्वासन देण्यात आलंय. 17 वर्ष उशिराने पूर्ण होणार्‍या या प्रकल्पाचा सुरूवातीचा खर्च होता फक्त 61 कोटी 47 लाख तो आता पोहोचलाय 1334 कोटी 35 लाखावर म्हणजेच जवळपास 1273 कोटी रुपयांनी प्रकल्पाचा खर्च वाढला आहे. - टेंभू उपसा सिंचन योजना हा प्रकल्प 1996 साली सुरू झाला आणि 2000 साली तो पूर्ण होणार होता. पण आता तो 2013 साली पूर्ण होणार आहे. आणि 13 वर्ष रखडलेल्या या प्रकल्पाची किंमत 1416 कोटी 59 लाखांवरून वाढून आता 2105 कोटी 34 लाखांवर म्हणजे जवळपास 688 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.- सीना-माढा उपसा सिंचन योजना हा प्रकल्पसुद्धा 13 वर्ष रखडलाय. 1995 साली सुरू झालेला हा प्रकल्प 2000 साली पूर्ण होणार होता, पण आता तो 2013 साली पूर्ण होणारेय आणि त्याचा खर्च 54 कोटी 49 लाखावरून 300 कोटींवर गेला आहे. म्हणजे खर्चात एकूण246 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. - कृष्णा खोर्‍यातले माण आणि खटाव या सारख्या दुष्काळी तालुक्यांसाठी अतिशय महत्वाचे दोन प्रकल्प म्हणजे उरमोडी आणि जिहे कठापूर उपसा सिंचन योजना... 1996-97 साली सुरू झालेले हे प्रकल्प 2007 साली पूर्ण होणं अपेक्षित होतं. आता ते 2015 ला पूर्ण होणार आहेत. दोन्ही प्रकल्पांचा सुरूवातीचा खर्च होता 481 कोटी 7 लाख रुपये पण आता हा खर्च वाढून 1821 कोटी 88 लाखांवर गेलाय. म्हणजे एकूण 1341 कोटी रुपयांची वाढ झाली. - कृष्णा खोर्‍यातल्या फक्त 19 मोठ्या प्रकल्पांचा खर्च जर पाहिला तर एकूण 3 हजार 333 कोटी 68 लाख या सुरूवातीच्या खर्चावरून तो 14 हजार 463 कोटी 13 लाखांवर पोहोचलाय. म्हणजे तो जवळपास चौपटीने वाढलाय.विदर्भात 337 सिंचन प्रकल्प अपूर्णच ! विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत येणारे 18 मोठे प्रकल्प, 60 मध्यम प्रकल्प, 259 लघु प्रकल्प असे एकूण 337 प्रकल्प अपूर्ण आहेत. धक्कादायक बाब म्हणजे यातल्या 79 मध्यम आणि लघु प्रकल्पांची कामं अजून सुरूच झालेली नाहीत. - विदर्भातला सगळ्यात मोठा आणि ज्याला राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा आहे, असा प्रकल्प म्हणजे गोसीखुर्द. हा प्रकल्प सुरू झाला 1983 मध्ये आणि 1987 मध्ये म्हणजे अवघ्या 4 वर्षात तो पूर्ण होणं अपेक्षित होतं. पण आता हा प्रकल्प पूर्ण होणार आहे 2014 साली. एकूण 27 वर्ष रखडलेल्या या प्रकल्पाचा सुरुवातीचा खर्च होता 372 कोटी 22 लाख आणि आता हा खर्च वाढून झालाय 7 हजार 777 कोटी 85 लाख.. हा खर्च अजूनही वाढण्याची शक्यता आहे.- निम्न वर्धा प्रकल्प हा सुद्धा असाच रखडला आहे. 1981 साली सुरू झालेला हा प्रकल्प 1994 मध्ये पुर्ण होण अपेक्षित होतं. पण हा प्रकल्प 21 वर्ष रखडला. आता हा प्रकल्प 2014 साली पुर्ण होणार आहे. सुरूवातीला 48 कोटी 8 लाखावरून हा प्रकल्प आता 2 हजार 356 कोटी 57 लाखांवर गेला आहे. - उर्ध्व वर्धा प्रकल्प 1978 साली सुरू झालेला हा प्रकल्प 2014 मध्ये पूर्ण होणार आहे. त्याची किंमतही आता 13 कोटी 4 लाखांवरून 1376 कोटी 33 लाखांवर गेली आहे.- 1994 साली सुरू झालेला आणि 2000 साली पूर्ण होणारा खडकपूर्णा हा प्रकल्प 13 वर्ष रखडला आहे. आता हा प्रकल्प 2013 साली पूर्ण होणार आहे. त्याची किंमत 79 कोटी 55 लाखावरून 1095 कोटी 92 लाखांवर गेली आहे.- जिगाव प्रकल्प आता 698 कोटी 50 लाख या त्याच्या मुळ किमतीवरून 4044 कोटी 14 लाखांवर पोहोचला. 2008 साली सुरू झालेला हा प्रकल्प 2013 साली पूर्ण होणं अपेक्षित आहे. पण कामाचा वेग पाहता हे काम 2015 किंवा 2016 पर्यंत लांबण्याची शक्यता आहे. - तर 2009 साली सुरू होणारा निम्न पैनगंगा हा प्रकल्प अजून सुरूच झाला नाही. पण त्याची किंमत 1402 कोटी 42 लाखांवरून 10 हजार 429 कोटी 39 लाखांवर पोहोचला आहे. विदर्भातल्या विविध प्रकल्पांच्या कामात अनेक त्रुटी आढळल्या, अनेक तक्रारी आल्या त्यामुळे विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या कामकाजाची तपासणी करण्यासाठी वडनेरे समितीची स्थापना 2010 साली करण्यात आली. या समितीनेही निम्न वर्धा, बावनथडी, बेंबळा, खडकपुर्णा, जीगांव, तसंच पैनगंगा यासारख्या 11 मोठ्या प्रकल्पाच्या कामात आणि प्रक्रीयेत घोळ असल्याचा अहवाल दिला आहे.