वजन Videos in Marathi

Showing of 40 - 40 from 40 results
ओझ्याखालचं जिणं (भाग- 2 आणि 3)

May 13, 2013

ओझ्याखालचं जिणं (भाग- 2 आणि 3)

ओझ्याखालचं जिणं (भाग- 2 आणि 3)महाराष्ट्रातल्या सातारा, सांगली, कोल्हापूर आणि नगर या भागातले लोक पोटा पाण्यासाठी मुंबईकडे येत होते. तो काळ होता 1960 चा. अनेकजण सातारा जिल्ह्यातल्या कोयना धरणाने स्थलांतर झालेले. अनेक युवक मुंबईत पोहोचले पण नोकरी मिळेना.शेवटी मुंबईच्या मार्केटमध्ये, बंदरात माल वाहण्याचं काम करू लागले. काम माथ्यानं ओझी वाहण्याचं त्यामुळे त्यांचं नाव पडलं माथाडी.अशा लोकांची संख्या हळूहळू लाखाच्या घरात पोहोचली. त्यांना आण्णासाहेब पाटील या कामगारांच्या रूपानं एक आशेचा किरण सापडला. जो त्यांचा काही भार हलका करेल अशी अपेक्षा निर्माण झाली. अन् शेवटी त्यांच्यामागे मोठ्या ताकदीनं उभं राहण्याचं माथाडींनी ठरवलं. आणि मग 1966 साली आपल्या मागण्यासाठी मंत्रालयावर एक मोर्चा काढला. ज्यामुळे त्यांची कर्म कहानी यशवंतराव चव्हाण यांच्या सारख्या दृष्ट्या नेत्यांपर्यंत पोहोचली. या मोर्चानंतर यशवंतरावंनी या माथाडींना कायद्याचं काही संरक्षण देता येईल काय ? याचा अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमली. त्या समितीच्या अहवालाच्या आधारे 1969 चा महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजिवी कामगार कायदा तयार झाला. याचं कायद्याच्या आधारानं माथाडी बोर्ड अस्तित्वात आली. या बोर्डात ग्रोसरी बोर्ड, लोखंड , ट्रान्सपोर्ट, भाजीपाला बोर्ड, कापड बाजार बोर्ड अशी माथाडी बोर्ड तयार झाली. या बोर्डामध्ये संबंधीत मालकांना रजिस्टर करणं कायद्यानं बंधनकारक आहे. तसंच त्यांच्याकडे काम करणा-या कामगारांचीही नोंदणी करणं बंधनकारक आहे. या मंडळात सरकारचा कामगार आयुक्त दर्जाचा अधिकारी अध्यक्ष असतो. तर संचालक मंडळावर कामगार आणि व्यापा-यांचे प्रतिनिधी असतात.माथाडींचा कायदा जरी अस्तित्वात आला तरी अनेक व्यापारी पूर्वीचे कंत्राटदार यांचे यात हितसंबंध असल्यानं अनेकांनी या मंडळात रजिस्टर करून घेण्यास टाळाटाळ केली. त्यासाठी मग आंदोलनाचं हत्यार कामगाराना उगारावं लागलं.माथाडी कामगार नेते आण्णासाहेबांना अटक केल्यानंतर माथाडी कामगारांची खरी ताकद सरकरारला समजली. त्यानंतर सरकारनं त्यांच्यावरचे खटलेही मागे घेतले. त्यामुळेच माथाडीची व्याख्या बनवता आली. कायद्याच्या भाषेत सांगायचं तर वेगवेगळ्या व्यापा-यांच्या गोडाऊनमध्ये येणारा माल उतरवणं, तयार माल गाडीत चढवणं, गोदामात मालाची थप्पी लावणं, तो माल मोजणं,भरणं, त्याचं वजन करणं.अशा प्रकारची काम करणारा तो माथाडी. किराणा मालाची बाजार पेठ, दुकानं, कृषी उत्पन्न बाजार समिती यांचाही यात समावेश होतो.माथाडी कामगारांची संघटीत ताकद मग त्याकाळात राजकीय पक्षांच्या सभांनाही उपयोगाची ठरू लागली. त्याच्या आठवणी आजही जुन्या जाणत्या कामगारांच्या मनात ताज्या आहेत.माथाडी कामगारांचे मुकादम बाबूराव कदम सांगतात, आण्णा पत्र काढायचे आम्ही सेवादल म्हणून तिथं जायचो.जनतेची सेवा करायचो. रांगा लावायचो. सभेला दोन्ही बाजूनं रांगा लावण्याचे काम करायचो.माथाडी कामगारांना कायद्याचं संरक्षण मिळाल्यानं देशभरातल्या इतर राज्यातलेही माथाडी कामगार मुंबईत आले अन इथलेच झाले. त्यांच्यापैकीच पंजाबमधून आलेले अजित सिंग याचं आयुष्य गोडाऊनमध्ये गेलंय.आता अजितसिंगांचे इतरही नातेवाईक आले आहेत.त्यामुळे ओझी वाहण्यापेक्षा ते मुकादमाचं काम करत आहेत. इतर राज्यातल्या कामगारांमध्ये आणि त्यांच्यात चांगला संवाद आहे. अजितसिंग त्याच्या सारखेच 8 वर्षापूर्वी जम्मूतनं आलेला किशनकुमारही तिकडे डोंगराळ प्रदेश, उत्पादनाचं साधन नसल्यानं इथं स्थिरावला आहे.विनयकुमार शर्मा, जम्मूहून आलेला माथाडी या कायद्याचा आधार अनेक राज्यातल्या लोकांना मिळाला आहे. पण ख-या अर्थानं महाराष्ट्रातल्या डोंगराळ भागात पोटापाण्यासाठी येणा-यांची संख्या मोठी आहे. सातारा जिल्ह्यातल्या जावली तालुक्यातलं हातगेघर नावाचं गाव. इथल्या प्रत्येक घराची नाळ माथाडी म्हणून मुंबईशी जोडलेली आहे. रामचंद्र शिंदे गावात आपलं निवृत्तीचं जीवन जगत आहेत. पण आता सोबत आहे ती आजारपणाची. सेवेला मुलगी आहे. आणि घरगाडा चालतो शिलाईचं काम करून.माथाडी कामगार रामचंद्र शिंदे यांची मुलगी मंगल गोळे-शिंदे सांगतात,या गावाला आधार आहे- माथाडीच्या कमाईचा. माथाडीचं जगणं सुखकर व्हावं, यासाठी लढलेल्या आण्णासाहेबांची आठवण म्हणून गावानं आण्णासाहेबांचा पुतळाही उभारला आहे.निवृत्ती माथाडी कामगार रामचंद्र गोळे सांगतात,निवृत्तीनंतर लग्न कार्याला काढलेलं कर्ज भागवून जे काम होईल त्यावर माथाडी दिवस ढकलत आहेत. अंगमेहनतीमुळे जडलेल्या दुखण्याची सोबत घेऊन.त्यांच्या सारखे निवृत्त माथाडी कामगार महादेव गोळे सांगतात,अनेक माथाडींची म्हातारपणातली अवस्था बिकट आहे. एन उमेदीच्या काळात कष्टाची कामं करायची. त्याचे शारीरिक भोग म्हातारपणी भोगायचे. शेतातल्या तुटपुंज्या कमाईवर जगायचं.भाग-3माथाडी कामगारांना कायद्याचा आधार असल्यानं, त्यांचं जगणं सुखकर होत असलेतरी हा कायदा न पाळण्याकडे अनेक व्यापा-यांचा दृष्टीकोन दिसतो.माथाडी कामगारांना काम दिल्यास ज्यादा पैसे द्यावे लागतात म्हणून कोल्ड स्टोरेजमध्ये माल उतरवून परस्पर दुस-या कामगारंाकडून काम करवून घेण्याची प्रवृत्ती वाढतेय. माथाडी युनियनलाही आता कायद्यात थोडे बदल करण्यासाठी संघर्ष करायचा आहे. कारण माथाडी कायदा मोडल्यास व्यापा-यांना त्यासंदर्भातला दंड खूप कमी आहे. त्यामुळे कायद्याचा धाकही कमी राहिला आहे.त्यासाठी शिक्षेच्या तरतुदीत बदल करायची मागणी वाढत आहे.माथाडी कामगार नेते शशिकांत शिंदे या कायद्याची अमंलबजावणी करण्यासाठी जलदगती न्यायालय स्वतःचं माथाडींचं असावं. त्याचबरोबर कायदे जे तोडतात त्यांना तुरूंगवास व्हायला हवा.हाच अनुभव माथाडी कामगार भाजी मार्केटमध्ये घेतात.इथल्या माथाडी कामगारांचे मुकादम चंद्राकांत निंबाळे सांगतात,जवळ जवळ 100 टक्के माथाडींचं काम पुरूष करतात. पण धान्यबाजारात धान्य सफाई तसंच गोणी शिलाईचं काम महिला करतात. या बायका 40 वर्षाहून अधिक हे काम करत आहेत. पूर्वी या बायकांना उंदीर पकडणा-या बायका म्हणून ओळखलं जायचं. आता मालक मात्र नव्यानं महिलांना माथाडी बोर्डात काम मिळत नाही. महिलांसाठीचं जे काम आहे ते रोजंदारीवर करून घेतात, त्यामुळे रोजगार तर मिळतो पण कायद्याचं संरक्षण मात्र त्यांना मिळत नाही. त्यासाठी ना युनियन काही बोलतात ना माथाडी बोर्ड पुढाकार घेतं.रेल्वेयार्डात सिमेंटच्या गोण्या उतरवण्याचं काम करणा-या माथाडींचं दुखणं वेगळचं आहे. सिमेंटच्या धुळीत काम करून श्वसनाचे आजार होतात. रेल्वे यार्डाचे मुलुंड मुकादम बारकू वाघोले सांगतात, इथं माणसं भरण्यासाठी बोर्ड आणि युनियनची परस्पर काम सूरू आहे. त्यामुळे भविष्यात पुढा-यांपासून बोर्ड युनियनपासून आमच्या लोकांना धोका आहे.परस्पर भ्रष्टाचार करून त्यांच्या मर्जीतली माणसं भरती करतात अन् पैसे खातात. माथाडी कामगार गणपत नाईकवडे सांगतात, माल उतरवायला ज्यादा वेळ जर थांबावं लागलं तर त्याचे पैसे देत नाहीत. तसंच वाढीव दरही मिळत नाही. पण अशा अनेक गोष्टीमुळे माथाडी कामगार नाडला जात असला तरी काही सकारात्मक गोष्टीही घडत आहेत.एका बाजूला घाम गाऴून माथाडी आपली रोजी रोटी कमवत आहेत. तर दुसरीकडे युनियनही ग्राहक सोसायटी, पतसंस्थाआणि हॉस्पिटलच्या माध्यमातनं कल्याणकारी योजना राबवून त्यांचं जगणं अधिक सुखकर करण्याचा प्रयत्न करत आहेत.माथाडी कामगार माथ्यानं काम करतो.अनेकदा काम करताना गोडाऊनमध्ये धान्याची पोती अंगावर पडतात तर कधी लोखंड मार्केटमध्ये अपघात होतात. याशिवाय ओझं उचलण्यानं मणके, सांधे यांचं दुखणं आहेच. याचाच विचार करून आण्णासाहेब पाटलांनी 50 पैसे एवढ्या नाममात्र पैशातून वैद्यकीय उपचाराची व्यवस्था केली. त्याचाच विस्तार करत माथाडी कामगारांच्या उपचारासाठी ट्रस्ट स्थापन करून मोठं वैद्यकीय रुग्णालय सूरू केलंय. या रुग्णालयाच्या 14 शाखांमधून रोज 2000 माथाडी उपचारासाठी येतात.प्रामुख्यानं त्यांची दुखणी कामामुळे होणारी असतात.माथाडी हॉस्पिटल सीईओ डॉ. श्रीधर नाईक सांगतात, या कामगारंाना ओझं उचलावं लागतं. त्यामुळे त्यांना सांध्याचे, स्नायूचे आजार खूप होतात. जितकी जास्त वर्षे काम हे लोक करतात तेवढा अधिक त्रास यांना होतो. 2 टक्के वैद्यकीय लेव्ही कापून बोर्डाकडून घेतली जाते. तसंच कामगारांकडून 50 रुपये महिन्याला घेतो. त्यात त्याला सर्व उपचार मोफत दिले जातात. तसंच औषधंही दिली जातात.माथाडी कामगारांना वैद्यकीय उपचाराबरोबरचं त्यांना लग्न कार्याच्या निमित्तानं मदत व्हावी, यासाठी ग्राहक सोसायट्याही स्थापन केल्या गेल्या आहेत.माथाडी कामगार माधव पाटील सांगतात, आमच्याकडे पैसे नसले तरी या सोसायटीमुळे आम्हाला इथं कुठलाही माल खरेदी करता येतो.याशिवाय वेळप्रसंगी आर्थिक मदतीसाठी पतपेढ्याच्या स्थापना केल्यात त्यांच्या वर्षाला उलाढाली कोटयावधीच्या आहेत.आता मुंबईतला बाजार मोठ्या प्रमाणात जेएनपीटी बंदरात वळलाय. त्यामुळे मोठा धंदा तिकडे शिफ्ट झाला आहे. त्यामुळे माथाडी कामगारांचं काम कमी झालं आहे. तसंच भूमीपूत्रांना काम हवं या मुद्दयावरून माथाडी आणि गावक-यांचा संघर्ष निर्माण होत आहेत. त्याला खरंतर काही हितसंबधी कारणीभूत असल्याचा आरोप होतोय.माथाडी कामगार जगन्नाथ नलावडे सांगतात, काही स्थानिक लोक हा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. ते माथाडींचं काम करण्याच्या मनःस्थितीत नाहीत.पण त्यांच्या नावावर कंत्राट मिळवण्याचा प्रयत्न होतो आहे. याशिवाय शहरांमध्ये मॉल संस्कृती मोठ्या प्रमाणात वाढतेय त्याचाही फटका माथाडींना बसतोय. याशिवाय शेतक-यांना शेती माल थेट बाजारात विकता यावा यासाठीही कायद्यात बदल झालेत, तसंच मोठ्या प्रमाणात व्यवसायातही बदल होत आहेत. अनेक व्यापारी आपला माल कंटेनरने रेल्वे, बोटीतून मागवतात आणि ज्या ठिकाणी वितरित करायचा तो त्या ठिकाणी थेट केला जातोय.माथाडी कामगार नेते शशिकांत शिंदे सांगतात, कंटेनरमुळे एका गाडीचा माल एकाच कंटेनरमध्ये स्टफ व्हायला लागलाय. त्याच्यामुळे उद्योगधंद्यावर, ट्रान्सपोर्ट आणि रेल्वेच्या कामगारांवर परिणाम झाला आहे.आता माथाडी कामगारांच्या संघटनांमध्ये ही फूट पडून 8ते 9 संघटना झाल्यात त्याचा परिणाम माथाडींच्या मागण्यंासाठी आक्रमकता कमी पडतेय.तरीही येथून पुढच्या काळात हातगाडीवाले तसंच इतर लाखभर कामगार माथाडी कायद्याच्या कक्षेबाहेर आहेत. त्यांच्यासाठी लढण्याचा निर्धार आता होऊ लागला आहे.माथाडी कामगार नेते बाबूराव रामिष्टे सांगतात, माथाडी कायद्यात बारदाण कामगार तसंच इतर जणांचा आजही अंतर्भाव झाला नाही. तसंच हातगाडी ओढणा-याना कसलंच कायद्याचं संरक्षण नाही. त्यांनाही या कायदयात समाविष्ट करून घ्यायला हवं. कायदा मोडणा-या व्यापा-यांना जी दंडाची रक्कम किरकोळ रक्कम असल्याने कायद्याचा धाक नाही. या विरोधात आवाज उठवण्याचा माथाडींचा हक्कही कायदा आणि सुव्यवस्थेच्या नावाखाली डावलला गेला आहे. आज युनियन मधल्या फाटाफुटीमुळे त्यांच्या संघटीत होण्यातही खूप अडचणी आहेत. माथ्यानं भार वाहणा-यांच्या जिवावरच मार्केटचा वेग अवलंबून असतो. पण आज तो माथाडीही नव्या बाजारपेठांच्या व्यवस्थेत बाहेर फेकला जातोय. त्यामुळे नव्या बाजारव्यवस्थेत त्यांचे हक्क कसे जपले जातील आणि जे माथाडी कायद्यापासून वंचित आहेत. त्यांना संरक्षण कसं मिळेल याकडे नेतृत्वाला लक्ष द्यावं लागेल.