#मुंबई

Showing of 31227 - 31240 from 32404 results
ग्रेट भेट मध्ये छगन भुजबळ - भाग 2

May 13, 2013

ग्रेट भेट मध्ये छगन भुजबळ - भाग 2

ग्रेट भेटच्या 31 जानेवारीच्या भागात आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची मुलाखत घेतली. छगन भुजबळ यांचं संपूर्ण आयुष्य म्हणजे एका संघर्षाची कहाणी आहे. या संघर्षाचे विविध पैलू या मुलाखतीत उलगडले गेले.2008 मध्ये छगन भुजबळ पुन्हा उपमुख्यमंत्री झाले. त्या आधीची काही वर्ष भुजबळांची कसोटी पहाणारी ठरली. त्याबद्दल बोलताना ते म्हणाले "तो माझ्या आयुष्यातला सर्वात कठीण काळ होता. मी उपमुख्यमंत्री असताना माझ्या निर्णयांमुळे दुखावले गेलेले लोक एकत्र आले. त्यांना काही पोलीसही सामील झाले. आणि फक्त मलाच नाही तर प्रदीप सावंत सारख्या प्रामाणिक माणसाला सुद्धा मोक्कासारख्या कायद्याने कित्येक दिवस त्यांना तुरुंगात डांबलं गेलं. माझ्या सार्‍या कुटुंबाला हा त्रास भोगावा लागला. माझा काहीही दोष नसताना मला घराबाहेर पडणं अवघड झालं. कधीकधी तर वाटायचं की घरामागच्या समुद्रात मला आणि कुटंबाला संपवून टाकावं.माझ्याविरुद्ध हे खूप मोठं कारस्थान होतं. मीडिया ट्रायलला सामोरं जावं लागलं. टीव्ही तर मी बघतच नव्हतो, वर्तमानपत्रही वाचवत नव्हतं. वाटायचं की एवढं चांगलं काम करून काय मिळवलं ? दोषी असतो, तर फासावर जातानाही काही वाटलं नसतं, पण निर्दोष असताना हे सगळं सहन करावं लागलं. पण म्हणतात ना भगवान के घर देर हैं, अंधेर नही. अर्थात यातनं मी बरंच काही शिकलो. त्यातला सगळ्यात मोठा धडा होता की चांगल्या कामाबद्दल नेहमी शाबासकी मिळेलच असं नाही. अतीशय चांगल्या कामामुळे सुद्धा कधीकधी गर्तेत जावं लागतं. आज परत माझं पद परत मिळाल्यावर काही अंशी भरपाई झाली असं मला वाटतं. लोक म्हणतात की मलाउपमुख्यमंत्रीपद मिळालं, पण गृहमंत्री नाही. पण ते पद मी स्वत: नाकारलंय. पहिल्यांदा देखील मी डेव्हलपमेन्टची कामं करता येईल असं खातं मागून घेतलं. आत्ताही कोणीच हे पद स्वीकारायला तयार नव्हतं. जयंत पाटील यांनीही आधी नकार दिला होता. मला कायम भीती होती की मला जबरदस्ती हे पद स्वाकारावं लागेल." हे गृहमंत्रीपद न स्वीकारण्यामागेही भुजबळांची निश्चित भूमिका आहे. "गृहमंत्रीपदावर असताना अनेक कटू निर्णय घ्यावे लागतात. कोणाची पर्वा करून चालत नाही. यातूनच मला हे सगळं भोगावं लागलं, वाटलं पुन्हा ते नको. आणि खात्या खात्यातही फरक असतो. एक रस्ता केला की लोक 10 वर्ष लक्षात ठेवतात. कित्येक दिवस चागलं काम करूनही जरा काही झालं की गृहमंत्र्यांवर खापर फुटतं. मी गृहमंत्री असताना कमी कामं केली का ? जेव्हा माझ्या लक्षात आलं की कित्येक पोलीसअधिकार्‍यांचे पगारच झालेले नाहीत आणि त्याची चौकशी केल्यावर कळलं की 75000 पोलिसांना पर्मनन्टच केलेलं नाही. एका दिवसांत मी त्यांना पर्मनन्ट केलं. 22000 पोलिसांना बढत्या दिल्या. कायद्याप3माणे फक्त 2 नाही तर 3 प्रमोशन्स दिली. सायबर क्राईमचे एक्स्पर्ट आणलं, आपल्या माणसांना लंडनला पाठवलं. रॅपीड ऍक्शन फोर्स, क्विक ऍक्शन टीम, मी सुरू केली. पण असं असतानाही सगळं एका क्षणात धुळीला मिळवलं" पण त्याचं क्रेडिट मिळालंच नाही, असं नाही. 26/11 च्या हल्ल्यानंतर शरद पवारांनी फोन करून आर. आर. पाटलांना भुजबळांचा सल्ला घ्यायला सांगितला. आजही जयंत पाटील कित्येक बाबतीत भुजबळांचा सल्ला घेतात.पहिल्यापासूनच छगन भुजबळ ओळखले जातात ते त्यांच्या जिद्दीसाठी. ही जिद्द, समोरच्याला थेट भिडण्याची हिंमत, बळ भुजबळांना कुठून मिळाली ? या प्रश्नाचं उत्तर देताना भुजबळ म्हणाले "माझं बालपण अतिशय हलाखीत गेलं. मी 4 वर्षांचा असताना माझे आई-वडील गेले. माझ्या आईच्या मावशीनं मला आणि माझ्या भावंडांना सांभाळलं. माझगावला पत्रा चाळीत मी वाढलो. चारी बाजूने पत्रे. भायखळा भाजी बाजारात आमचं एक दुकान होतं. पण ते कोणीतरी गिळंकृत केलं होतं. मग स्थानिक नेत्यांच्या मदतीनं आम्ही दिवसाला दोन रुपये भाडं मिळवायला सुरुवात केली. मग रोज ते 2 रुपये घ्यायचे आणि त्यातून जमेल तशी भाजी गोळा करूनफूटपाथवर आम्ही विकायला बसायचो. मग जसा मोठा झालो तसा भायखळ्याच्या भाजीबाजारातून आम्ही सकाळी 3 वाजता भाजी आणायचो. सकाळी 2-3 मैल चालायचं हे त्या वयात खूप अवघड असतं. तेव्हा मग सकाळी रिकाम्या टांग्यात मागे बसायचो आणि रस्त्यात कोणी ओरडलं की टांग्यात कोणी बसलंय की टांगेवाले उलटा चाबूक मारायचे." पण भुजबळ डगमगले नाहीत. अशा कठीण परिस्थितीत भुजबळांनी जिद्द सोडली नाही. कठीण परिस्थितीत ते शिकून मेकॅनिकल इंजिनिअर झाले. त्याबद्दल बोलताना भुजबळ म्हणाले "माझ्याकडे कपडे नव्हते, पुस्तकं घ्यायला पैसे नव्हते. आमच्या येथ महापालिकेच्या शाळेत एक शिक्षिका होत्या. त्यांनी मला मांडीवर घेऊन शिकवलं. मला भाषण करायला शिकवलं. सातवी पास झाल्यावर त्यांच्याच सल्ल्याने एल्फिन्स्टन टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये गेलो आणि पुढे व्हीजेटीआयला गेलो. पण त्याही वेळेला मी नेव्हल एनसीसीत कॅडेट होतो, मी त्या काळात अनेक बोटींवर गेलोय. मी पोवाडे, भाषणं करायचो. नाटकात भाग घ्यायचो. त्या काळात मार्मिक छापून यायचं, जे वाचून आम्हाला प्रेरणा मिळाली. शिवसेनेच्या स्थापनेची बातमी जेव्हा मार्मिकमध्ये आली तेव्हा, सगळ्यांना घेऊन मी शिवाजी पार्कला गेलो, शिवसेनेचा सदस्य झालो. त्यावेळी मी डोंगरीपासून भायखळा-लालबागपर्यंत शाखेचा शाखाप्रमुख झालो. तेथून राजकारणाला सुरुवात झाली. त्याही आधी मी दास ऍन्ड कंपनीत मी मॅनेजर म्हणून काम केलं. पहिल्या निवडणुकीत मी पडलो आणि मी ज्या लोकांना पकडून आणलं, ते निवडून आले. 1978 मध्ये मला पहिल्यांदा शिवसेनेचं नेतेपद दिलं, पुढे जनता पक्षाचं सरकार आलं तेव्हा शिवसेनेचं गटनेतेपद दिलं. पुढे 1984-85 च्या दरम्यान मी आमदार झालो. 2 महिन्यात पुन्हा महानगरपालिकेच्या निवडणुकीत साहेबांच्या इच्छेने मी उभा राहिलो, पुढे महापौरही झालो. बॉम्बेचं नामकरण मुंबई केलं ते मी महापौर असताना. ऑफिशियल निर्णय व्हायच्या आधीच मी गेटवेवर मराठी आणि इंग्रजीमधून मुंबई नावाच बोर्ड लावला होता. हुतात्मा स्मारकाचं सुशोभिकरणही माझ्याच कारकीर्दीत झालं. मी महापौर असताना बरंच काम केलं."भुजबळांकडे जे काही पद आलं, त्याचं त्यांनी चीज केलं. एकटे आमदार असताना ते लढले. जे 288 लोक करू शकत नाही, ते भुजबळांनी करून दाखवलं. त्याबद्दल बोलताना भुजबळ म्हणाले "माझं तत्त्वच होतं की विरोध म्हटलं की पूर्ण विरोध. मग आपल्या कामांसाठीही सत्ताधार्‍यांकडे जायचं नाही. मग आपला पक्ष कसा वाढेल या दृष्टीने मी काम केलं. मी महापौरपद सोडलं आणि दाढी लाऊन बेळगावला सीमाप्रश्नी लढण्यासाठी गेलो. आधी पवारसाहेब विरोधी पक्षनेते होते, ते गेले. पण शिवसेनेचा म्हटल्यावर मला सोडणार नाहीत, हे स्पष्ट होतं. पण मी निर्धार केला आणि पांडे नावाचा पत्रकार बनून मी गेलो. त्याच्याआधीची गंमत म्हणजे मी बाळासाहेबांना भेटायला गेलो, तेव्हा मला कोणी आत सोडायला तयार नाही. शेवटी मी माझी ओळख कानात सांगितली. खुद्द बाळासाहेबांनीही मला ओळखलं नाही. मी प्रथम गोव्याला गेलो. तिथून पुन्हा वेशांतर करून थ्री पीस सुट, हातात पाईप घेऊन मी शेख बनून बेळगावला गेलो. आणि मग फेटा वगैरे बांधून मी प्रकट झालो. भाषणाला प्रचंड गर्दी झाली होती. आणि एवढा बंदोबस्त करूनही भुजबळ आले म्हटल्यावर पोलीस चिडले. प्रचंड लाठीचार्ज झाला, शिवसैनिकांची डोकी फुटली. तेवढ्या कोणत्या तरी पोलिसाला काही तरी झालं, मग पोलिसांनी गोळीबार केला. याच प्रश्नावरून पुढे कोल्हापूर सांगली भागात शिवसेना वाढली." भुजबळांनी काही चित्रपटात कामही केलंय. त्यांनी काही चित्रपटही बनवले आहेत. त्याबद्दल ते म्हणाले "आता राजकारणात तर रोजचाच चित्रपट... मग तोच सुरू आहे."25 वर्ष भुजबळ शिवसेनेत होते. 25 वर्षांनी पक्ष सोडण्याची वेळ भुजबळांवर का आली ? या प्रश्नाचं उत्तर देताना भुजबळ म्हणाले "मी 25 वर्ष शिवसेनेत काढली. पक्षानं मला मोठं केलं, पक्षाच्या वाढीसाठी मी काम केलं. 1990 मध्ये तर मी पदरचे पैसे खर्च करून, कर्ज काढून मी प्रचार केला. शिवसेनेचे इतर उमेदवारही सायकलवरून फिरायचे. पण परिस्थितीच अशी होती की कोणाकडेच पैसे नव्हते. पण जेव्हा विरोधी पक्षनेता करायची वेळ आली तेव्हा बाळासाहेबांनी मनोहर जोशींना पुढे केलं. खरं तर मी सीनियर होतो, मी शिवसेनेसाठी खेडोपाडी फिरलो होतो, त्यामुळे हे पद मलाच मिळायला हवं होतं. त्याचं मला वाईट वाटलं, पण तो मुख्य मुद्दा नव्हता. व्ही. पी. सिंग यांनी मंडल आयोग आणला तेव्हा बाळासाहेबांनी आरक्षणाला विरोध केला. एकदा तर बाळासाहेब नाशकात आरक्षणाविरोधात प्रेस कॉन्फरन्स घेत होते आणि दुसरीकडे मी आरक्षणाला समर्थन देणार्‍या मोर्चाचं नेतृत्व करत होतो. मग मी बाहेर पडलो. आणि फुले, शाहू महाराजांच्या विचारांचं मी पहिल्यापासूनच समर्थन केलंय, हा अचानक झालेला बदल नाही."शिवसेनेतून बाहेर पडलेल्या प्रत्येक नेत्यावर हल्लाच होणार, तो उभाच राहू शकणार नाही, असा समज होता. पण भुजबळांना कोणी हातही लाऊ शकलं नाही. त्याबद्दल बोलताना भुजबळ म्हणले "आरक्षणावरून जेव्हा माझे मतभेद झाले, तेव्हा शरद यादव, मृणाल गोरे वगैरे मंडळी मला भेटले होते. त्यांनी मला व्ही. पी. सिंग यांचा निरोप दिला की तुम्ही दिल्लीत या, पण मी नकार दिला. पण झालं असं की आरक्षणाच्या मुद्द्यावरून शिवसेनेतून 35-40 लोक बाहेर पडणार होते. त्यांनी बाळासाहेबांकडे मला विरोधी पक्षनेता करण्याची मागणी केली. पण त्यांना धुडकावून लावलं गेलं. मग ते चिडले आणि बाहेर पडले. त्या वेळेस माझाही विचार होता आणि आमची गाठ पडली. मी निर्णय घेतला तेव्हा 18 लोकांनी पत्रावर सह्या केल्या. नंतर आणखी 18 लोक बाहेर पडले. आणि आम्हाला प्रटेक्शन द्यायचं काम तत्कालीन काँग्रेस सरकारनं केलं."छगन भुजबळ यांचं मातोश्री बंगल्यावर आणखी एक जिव्हाळ्याचं नातं म्हणजे मीनाताई ठाकरेंबरोबरचं नातं. हे अगदी आई-मुलासारखं नातं होतं. त्याबद्दल बोलताना भुजबळांना आजपर्यंत न सांगितलेला एक प्रसंग सांगितला. "माझा शिवसेना सोडण्याचा निर्णय नक्की झाला होता, त्यासुमारास दसरा मेळाव्यानंतर मनोहर जोशींच्या कोहिनूर या हॉटेलचं उद्घाटन होतं. त्यावेळेस आम्ही सगळे गेले होतो.बाळासाहेबांचं खाली भाषण चालू होतं आणि मी, मीना वहिनी आणि त्यांची बहीण म्हणजे राज ठाकरेंच्या मातोश्री असे टेरेसवर फिरत होतो. त्यावेळेस काही तरी झालं आणि त्या पडल्या. आणि काय झालं माहीत नाही, पण त्यांचा हात खूप सुजला. मी घाबरलो. मी ताबडतोब आमच्या डॉक्टरला फोन केला. त्यांनी आम्हाला हिंदुजाला बोलावलं. मी ताबडतोब, बाळासाहेबांना न कळवताच त्यांना हॉस्पिटलला घेऊन गेलो. दुसरं कोण असतं तर म्हणालं असतं की काहीही झालं तरी आधी साहेबांना कळवा. पण आमचं नातं इतकं जिव्हाळ्याचं होतं की मला त्याचीही गरज वाटली नाही. कार्यक्रम संपल्यावर हे बाळासाहेबांना सांगण्यात आलं. बाहेर पडल्यावर बरेच वर्ष आम्ही बोललो नाही. मी शिवसेनेतून बाहेर पडल्यावर त्यांना पहिला फोन केला ते श्रीकांत ठाकरेंचं निधन झाल्यावर. पण आता संबंध बरेच सुधारले आहेत. दोघांच्याही मनातली कटुता निवळली आहे. परवाही मी वाढदिवसाला साहेबांना फोन केला होता. त्यांचेही माझ्यावर उपकार आहेतच. छगन भुजबळ काँग्रेसमध्ये आला ते नेता म्हणून. पण हा नेता घडवला तो बालासाहेबांनी. अर्थातच पवार साहेबांनीही मला बरंच काही दिलं. 1995 मध्ये काँग्रेस सरकार पडलं, मी पण पडलो. तेव्हा पवार साहेबांनी मला नाशकातून बोलावून घेतलं. मला विरोधी पक्षनेता बनवलं."पहिली 25 वर्ष भुजबळ बाळासाहेब ठाकरेंसोबत होते आणि गेली जवळजवळ 19 वर्ष शरद पवारांसोबत आहेत. या दोन नेत्यांबद्दल बोलताना भुजबळ म्हणाले "दोघेही निर्विविवादपणे महाराष्ट्राचे नेते आहेत. बाळासाहेब हे स्पष्ट बोलणारे, न घाबरणारे, विषयाला हात घालून परिणामांची चिंता न करता बोलणारे नेते आहेत. पवार साहेब हे कन्सट्रक्टिव्ह काम करणारे, बेस्ट ऍडमिनिस्ट्रेटर आहेत. मी बाळासाहेबांकडून आक्रमकता घेतली आणि पवार साहेबांकडून प्रशासकीय कौशल्य घेतली. वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था त्यांनी उभारल्या. त्यांनी भव्य शैक्षणिक संस्था उभारल्या, इंडस्ट्रीज आणल्या. आजही ते चांगलं काम करणार्‍या माणसांना मदत देतात. मी बाळासाहेबठाकरे किंवा शरद पवारांइतका मोठा होणं शक्य नाही, पण दोघांनाही अभिमान वाटेल, इतकं चांगलं काम मी करून दाखवीन. मी जे काही करतो, तिथे तडजोडी न करता बेस्टच करून दाखवतो. मुंबईत एमईटीमध्ये जागा कमी आहे पण नाशकात भुजबळ नॉलेज सिटी आहे ती कोणत्याही बाबतीत परदेशी इन्स्टिट्यूपेक्षा कमी नाही."राष्ट्रीय पातळीवर म्हणजे दिल्ली, राजस्थान, बिहारमध्ये भुजबळांनी लाख-दीड लाखाचे मेळावे घेतले. महाराष्ट्राच्या कोणत्याही नेत्याला हे जमलं नाही. त्याबद्दल बोलताना छगन भुजबळ म्हणाले "माझ्या समता परिषदेतल्या कामामुळे हे जमलं. ओबीसींच्या प्रश्नांबाबत देशभरातले समता परिषदेचे कार्यकर्ते जागृती करतात. त्यांच्या मदतीने मी दिल्लीतल्या रामलीला मैदानावर, पाटण्यात भव्य मेळावे घेतले."छगन भुजबळ हे आज उपमुख्यमंत्री आहेत, म्हणजे नंबर दोन आहेत. ते मुख्यमंत्री होणार का ? या प्रश्नाचं उत्तर देताना छगन भुजबळ म्हणाले "मी नक्कीच बनू शकतो. आणि ते फार अवघड नाही. दोन महिन्यांपूर्वी अशोक चव्हाण मुख्यमंत्री होतील, यावर कोणी विश्वास ठेवला असता का ? आणि प्रगती करण्याची प्रत्येकाचीच इच्छा असते. मी नगरसेवक झालो, तेव्हा वाटलं महापौर व्हावं. आमदार झालो, तेव्हा वाटलं मुख्यमंत्री व्हावं. आणि प्रगतीची इच्छा असेल, तर माणूस जनतेसाठी काम करतो आणि मग ते पक्षाला दाखवून मुख्यमंत्रीपदाची मागणी करतो."मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेशी समझौता करणार का ? या प्रश्नाचं उत्तर देताना भुजबळ म्हणाले "मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक नेता आहे. आणि आम्ही काँग्रेसबरोबर निवडणूक लढवत आहोत. त्यामुळे हा प्रश्नच उद्भावत नाही. आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीला बहुमत मिळालं तर मला शिवसेनेकडे जायची गरजच काय ? पण जर राष्ट्रवादीला जास्त जागा मिळाल्या आणि राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होणारअसेल तर माझी मुख्यमंत्री व्हायची इच्छा आहे. म्हणजे मी त्यासाठी भांडणार नाही. पण माझं म्हणणं मी पक्षप्रमुखांसमोर नक्कीच मांडेन. तोपर्यंत त्यादृष्टीनं चांगलं काम करणं एवढंच माझ्या हातात आहे आणि ते मी करेन. स्वप्न पहात पुढे जाण्यासाठी प्रयत्न करायला हवेत नाहीतर व्यक्ती तेथेच थांबते."या मुलाखतीचा सेवट करताना निखिल वागळे म्हणाले "छगन भुजबळ एक फायटर आहेत त्यांनी आजपर्यंत जे काही ठरवलं, ते प्रतिकुल परिस्थितीवर मात करूनही मिळवलं आहे. राजकारणाची गणितं योग्य ठरली तर ते महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री नक्कीच आहेत."