#मायावती

Showing of 300 - 310 from 310 results
वारसा बाबासाहेबांचा भाग 1

बातम्याDec 7, 2008

वारसा बाबासाहेबांचा भाग 1

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर. वर्षानुवर्ष सर्वणांच्या गुलामगिरीत खितपत पडलेल्या आपल्या दलित बांधवाना माणूस म्हणून जगण्याचा हक्क दिला. भारताच्या लोकशाहीचा पाया ठरलेली राज्यघटना डॉ.बाबासाहेबांनी लिहिली. बाबासाहेबांची जयंती असो की महापरिनिर्वाण दिन महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या कानाकोपर्‍यातून बहुजन समाज आपल्या नेत्याला अभिवादन करण्यासाठी लाखोच्या संख्येनं ठिकठिकाणी एकत्र येतो. आयबीएन-लोकमत नं ' वारसा बाबासाहेबांचा ' या विशेष कार्यक्रमांतर्गत आंबेडकरी चळवळ, रिपब्लिकन पक्षातील गटतट, बसपची आगेकूच, महाराष्ट्रात सोशल इंजिनियरिंगचा प्रयोग यासह अनेक मुद्यांवर चर्चा करण्यात आली. या चर्चेत बेस्टचे व्यवस्थापक उत्तम खोब्रागडे, कवयित्री प्रज्ञा पवार, राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे भिकुजी इदाते, साने गुरुजी स्मारकाचे पदाधिकारी अर्जुन डांगळे, सामाजिक कार्यकर्त्या रुपा कुलकर्णी आणि संशोधिका गेल ऑम्वेट सहभागी झाले होते. चर्चेची सुरुवात आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांनी डॉ. बाबासाहेबांचं नाव घेण्याचा नैतिक अधिकार आपल्याला आहे का ? या प्रश्नापासून केली. यावर उत्तम खोब्रागडे म्हणाले की गेल्या 10- 15 वर्षांत समाज बाबासाहेबांच्या विचारांपासून दूर चाललाय. पण अद्याप वेळ गेलेली नाही. प्रज्ञा पवार म्हणाल्या, पन्नास वर्षांनंतर परिस्थिती बदलली आहे. क्रांतीचा वारसा आणि वसा दिसत नाही. अद्याप काम पूर्ण झालेलं नाही तर रुपा कुलकर्णी म्हणाल्या, डॉ.आंबेडकरांपासून प्रेरणा घेऊन चळवळीत प्रामाणिकपणे काम करणार्‍या समाजातल्या सर्व शोषित पीडितांना तो अधिकार आहे. चर्चेत सहभागी झालेल्या प्रेक्षकांमधून एक जण म्हणाले, डॉ.बाबासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार नव्हे तर पात्रता आहे का, हे पाहिलं पाहिजे. पात्रता आता निश्चित नाही. पण ती पात्रता अंगीकारली पाहिजे'. आंबेडकरांना सर्वण समाजानं स्वीकारलंय का ? हा प्रश्न ही चर्चेत आला. सर्वण समाजाचं प्रबोधन करण्याची गरज आहे. प्रत्येकापर्यंत आंबेडकर पोहचले पाहिजे, असं मत प्रेक्षकांंमधून व्यक्त केलं गेलं. यावर बोलताना उत्तम खोब्रागडे म्हणाले, ' प्रस्थापितांना सामाजिक समता नकोय. ती आली तर त्यांचं वर्चस्व संपेल. त्यांनी आंबेडकरांना मुद्दामहून स्वीकारलेलं नाही. बाबासाहेबांच्या समकालीन नेत्यांच्या तुलेनत त्यांची विचाराची प्रखरता व्यापक होती. प्रस्थापितांना गरिबांचं शोषण करणारी समाजव्यवस्था टिकावयाची आहे '. चर्चेत सामाजिक कार्यकर्त्या रुपा कुलकर्णी यांनी समाजावर मनूवादाचा पगडा अद्याप असून त्यातूनच खैरलांजी सारखी प्रकरणं घडत आहे.रिपब्लिकन नेत्यांनी बाबासाहेबांशी दगाबाजी केलीय का, हा मुद्दा ही चर्चेत आला. यावेळी आंबेडकरी चळवळीतील बुजूर्ग कार्यकर्ते लक्ष्मण पंडित म्हणाले, 1960 नंतर जन्माला आलेले आम्हाला बाबासाहेब समजावून सांगत आहेत. आरपीआय नेत्यांविषयी तिरस्काराची भावना का आहे ? या प्रश्नावर अर्जुन डांगळे म्हणाले, आरपीआय नेत्यांना वेठीस धरुन आंबेडकरी चळवळीची समीक्षा होणार नाही. मध्यमवर्गीयांचं काय ? जे मोठमोठ्या खुर्चीत बसलेत पण समाजासाठी त्यांनी काय केलंय. रिपब्लिकनांमध्ये गटतट असले तरी ती चळवळ जिंवत आहे. पुढार्‍यांना दोषी धरू नका '. आंबेडकरी चळवळ दलितांपुरतीतच का रहावी, या प्रश्नावर उत्तर देताना खरा आंबेडकरी कोण याची व्याख्या स्पष्ट केली. ' आंबेडकरांची वैचारिक चळवळ, समतेचे तत्व, धर्मनिरपेक्षतता आणि शोषणविरहित समाज ज्यांना मान्य, ते सर्व आंबेडकरी ', असं खोब्रागडे म्हणाले. आरपीआय अपयशी का ठरला, या प्रश्नावर बोलताना गेल ऑम्वेट म्हणाल्या, आरपीआय पक्ष स्थापन करताना बाबासाहेबांची वेगळी उद्दिष्टं होती पण त्याची ओळख आता फक्त दलितांचा पक्ष म्हणून ओळखला जातोय. बाबासाहेबांचा वारसदार म्हणाल तर मायावतींचा पक्ष आहे '. यावरुन चर्चेत थोडे वादविवाद झाले. ' बाबासाहेबांचं नाव घेऊन वाट्टेल त्या तडजोडी मायावतींनी केल्या आहेत. बाबासाहेबांच्या विचारांचा हा पराभव आहे ', असं रुपा कुलकर्णी म्हणाल्या तर अर्जुन डांगळे म्हणाले, कांशीराम आणि मायावतींच्या बसपमध्ये खूप अंतर आहे.प्रेक्षकांमधून एक म्हणाले, मायावती आणि कांशीराम हे खरे वारसदार आहेत. त्यांनी संधीसाधू राजकारण केलेलं नाही. ब्राम्हणांना बहुजन समाजाची गरज आहे. यावर मत व्यक्त करताना प्रज्ञा पवार म्हणाल्या, बाबासाहेबांनी म्हटलं होतं, शासनकर्ती जमात बना, त्याचा सोयीस्कर अर्थ घेण्यात आला आहे. उत्तर प्रदेशाप्रमाणे महाराष्ट्रात सोशल इंजियिरिंग यशस्वी होईल का, यावर चर्चेचा पुढील रोख होता. ' तिकडे झालं तसं इथेही होईल. मागे शिवसेना-भाजपने रामदास आठवलेंना उपमुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती. पण आम्ही आंबेडकरी विचारधारेशी कधी गद्दारी करणार नाही ', असं डांगळे म्हणाले. याबाबत खोब्रागडे म्हणाले, सोशल इंजिनियरिंग व्हायला पाहिजे पण राज्य घटनेच्या मूळ तत्त्वांशी तडजोड होता कामा नये '. डॉ.बाबासाहेब आंबेडकर काळाच्या पुढे होते. भविष्यात उद्भवणारे प्रश्नांबद्दल त्यांनी किती तरी वर्ष आधीच लिहून ठेवलं आहे. ' बाबासाहेब घटनेचे शिल्पकार नव्हते तर ते आधुनिक भारताचे शिल्पकार होते', असं पुणे विद्यापीठातील प्रा. सुनील कदम यांनी उदाहरणासह पटवून दिलं.शेवटच्या सत्रात जागतिकीकरण आणि डॉ.बाबासाहेबांची विचारधारा यावर चर्चा करण्यात आली.' जागतिकीकरणाची सांगड आंबेडकरी विचारांशी झाल्यावरच ते यशस्वी होईल. या देशात अब्जोधीश आणि दारिद्रय रेषेखाली राहणारे आहेत. संपत्तीचं विकेंद्रीकरण आणि शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाला जागतिकीकरणाची जोड दिली तरच ते यशस्वी होईल ', असं खोब्रागडे म्हणाले. इतर मान्यवरांनी ही त्यांची मतं व्यक्त केली. चर्चेच्या शेवटी सध्याच्या काळाशी बाबासाहेबांच्या विचारांशी जोडणारी कविता सादर करण्याचा आग्रह प्रज्ञा पवार यांना निखिल वागळे यांनी केला. ' चैत्यभूमीच्या ओंसडत्या काळोखात, मेणबत्तीतून सांडणार्‍या लख्ख प्रकाशात, माझं बोट बापाच्या मुठीत बंद होतं, मला आठवतं बाबासाहेब, तेव्हापासून तुझं नाव काळजावर कोरल होतं.' ही कविता पवार यांनी सादर केली. चर्चेचा शेवट करताना निखिल वागळे म्हणाले की बाबासाहेबांचं नाव पुढच्या काळात ही कोरलेलं असणार आहे. फक्त आजच्या ग्लोबलयाझेशनच्या काळातही बाबासाहेबांना आपल्या हद्‌यात जपलं पाहिजे.