महानगरपालिकेत

Showing of 79 - 92 from 137 results
कलमाडींची पालिकेत 'एंट्री'

बातम्याJun 11, 2012

कलमाडींची पालिकेत 'एंट्री'

11 जूनकॉमनवेल्थ घोटाळ्यातील प्रमुख आरोपी पुण्याचे खासदार सुरेश कलमाडी यांनी आज पुणे महानगरपालिकेत 'एंट्री' केल्यामुळे मोठा राडा झाला. कलमाडींच्या प्रवेशाला निषेध करत भाजप आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शन केली. यावेळी काँग्रेस आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली. या सगळ्यांना बाजूला करून कार्यकर्त्यांच्या गराड्यात कलमाडींनी पुणे महापालिकेत दाखल झालेच आणि क्रीडा समितीचे उद्घाटन केलं. कलमाडींच्या एंट्रीला खुद्द काँग्रेसच्या नेत्यांनी विरोध करत नाराजी व्यक्त केली आहे. कॉमनवेल्थ घोटाळ्याप्रकरणी नऊ महिने तिहारची हवा खावून आलेल्या सुरेश कलमाडी पुण्यात मुक्कामाला आले. पुणे महानगरपालिकेतील क्रीडा समितीच्या कार्यालयाचं उद्घाटन कलमाडींच्या हस्ते करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याची माहिती कळताच भाजप आणि मनसेचे नगरसेवक,पदाधिकारी यांनी कलमाडींच्या विरोधात शहरभर धुळ उडवली. आज दुपारी 1 च्या सुमारास काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कलमाडींच्या स्वागतासाठी भव्य तयारी केली. भाजप आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी सुरेश कलमाडी क्रीडा समितीच्या कार्यालयाचं उद्घाटन कसं काय करु शकतात असा आक्षेप घेत भाजप आणि मनसेच्या कार्याकर्त्यांनी कडाडून विरोध केला. पालिकेच्या आवारात निषेधाचे बॅनर्स घेऊन कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवला. कलमाडींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ढोलताशांच्या गजरात कलमाडींचे स्वागत केले.यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि भाजप-मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली. एवढं होऊन सुध्दा कलमाडींची एंट्री झालीच. कलमाडी यांची गाडी कार्यकर्त्यांच्या गराड्यात दाखल झाली. यावेळी विरोधी पक्षांनी गाडीवर काळे झेंडे फेकले. तरीसुध्दा कलमाडी गाडीच्या बाहेर उतरले ते प्रसन्न मुद्रेनं...जणू काही हे सगळे जण स्वागतासाठी आले. कार्यकर्त्याच्या गराड्यात कलमाडींनी औपचारीकरित्या क्रीडा समितीचं उद्घाटन केलं. मला विरोधकांनी विरोध का केला, हे माहीत नाही, असा उलटा सवाल कलमाडींनी विचारला. मीच पुण्याचा विकास केला, असा दावाही त्यांनी केला. विशेष म्हणजे कलमाडी यांना सध्या काँग्रेसमधून निलंबित करण्यात आले आहे. पुणे पालिकेच्या निवडणुकीतही काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते अनंत गाडगीळ यांनी कलमाडींच्या प्रवेशावर काँग्रेसला घरचा आहेर दिला. असल्या प्रकारामुळे पक्षाची उरली सुरली अब्रू जाईल. अगोदरच पुण्यात काँग्रेसचा मोठा पराभव झाला पण अजून सुध्दा पक्षश्रेष्ठी कोणतेच पाऊल उचलत नाही. कलमाडी यांच्या सोबत स्थानिक काँग्रेसचा कोणताच नेता नव्हता. जे होते ते त्यांचेच समर्थक होते असा खुलासाही गाडगीळ यांनी आयबीएन लोकमतकडे केला.