भेट

Showing of 5136 - 5149 from 6385 results
'बाबां'च्या विरोधात घरच्यांनीच लावला सुरुंग

बातम्याJul 24, 2012

'बाबां'च्या विरोधात घरच्यांनीच लावला सुरुंग

24 जुलै राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधला वाद अजून मिटला नसतानाच.. काँग्रेसमध्ये नव्याच वादाला सुरुवात झाली. राष्ट्रवादीने मुख्यमंत्र्यांना टार्गेट केल्याचं पाहून.. मुख्यमंत्र्यांविरोधात काँग्रेसमध्येच हालचाली सुरू झाल्या आहेत. 42 आमदारांनी चव्हाणांविरोधात माणिकरावांकडे तक्रार केली. तिकडे राष्ट्रवादीने काँग्रेससमोर गुरुवारची डेडलाईन ठेवली.मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आता चांगलेच अडचणीत सापडलेत. कारण राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्यावर अंकुश ठेवण्याची मागणी केली असतानाच.. त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांनी उचल खाललीये. अशोक चव्हाण आणि नारायण राणेंच्या समर्थकांनी.. आणि इतर सहयोगी पक्षांनी.. त्यांच्याविरुद्ध नाराजी व्यक्त केलीये. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंना पत्र लिहून त्यांनी म्हटलंय. "नागरिकांच्या दृष्टिकोनातून अत्यंत ज्वलंत असणारे अत्यावश्यक प्रश्न अद्यापही सुटलेले नसल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. आमदारांना मतदारसंघात दौरे करीत असताना नागरिकांच्या तीव्र रोषाला सामोरं जावं लागतं. त्यामुळे आमदारांतसुद्धा प्रचंड नाराजी आहे. पक्षाला बळ देणार्‍या विभागातले प्रश्न तातडीने सोडवण्याच्या दृष्टीने वरिष्ठांच्या लक्षात आणून द्यावे. तसेच सदर प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने पक्षश्रेष्ठी आणि मा.ना.मुख्यमंत्री यांच्याबरोबर चर्चा करून बैठक लावून सदर बैठकीत आम्हाला सुद्धा बोलवण्यात यावे ही विनंती."राज्यात काँग्रेस आणि मित्रपक्षांचे मिळून एकूण 98 आमदार आहेत. त्यातल्या 42 आमदारांनी नाराजी व्यक्त केल्यामुळे मुख्यमंत्री चहू बाजूंनी घेरले गेलेत. ते बुधवारी दिल्लीत जाऊन हायकमांडची भेट घेणार आहेत. हायकमांडची त्यांच्यावर मर्जी असल्यामुळे.. माणिकरावही आमदारांच्या नाराजीबद्दल सावधपणे बोलत आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीने काँग्रेससमोर गुरुवारपर्यंतची डेडलाईन ठेवलीये. पण राष्ट्रवादीच्या मागण्यांना काँग्रेसकडून थंड प्रतिसाद मिळतोय. काँग्रेसने शुक्रवारपासून आमच्याशी कोणताही संवाद साधला नाहीये, असं राष्ट्रवादीच्या सूत्रांनी सांगितलंय. काँग्रेसनं बुधवारपर्यंत चर्चा केली तर गुरुवारच्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीला जायला तयार आहोत, अशी थोडी मवाळ भूमिका राष्ट्रवादीनं घेतलीये. राज्यातही समन्वय समितीची बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलवली, तर आम्ही हजर राहू अशी भूमिका राष्ट्रवादीने काँग्रेसला पत्र लिहून कळवली आहे. मंगळवारी संध्याकाळी सोनिया गांधींनी पंतप्रधांची भेट घेतली आणि राष्ट्रवादीच्या नाराजीबद्दल चर्चा केली. काँग्रेसमधली अंतर्गत दुफळी आणि राष्ट्रवादीची नरमाईची भूमिका यामुळे पवारांच्या नाराजीनाट्याला नवं वळण लागलंय.