#ब

Showing of 183 - 188 from 188 results
अ‍ॅनिमेशनमधला बाप माणूस - अ‍ॅनिमेशन गुरू वसंत सामंत

मुंबईNov 10, 2008

अ‍ॅनिमेशनमधला बाप माणूस - अ‍ॅनिमेशन गुरू वसंत सामंत

1962 साली भारत-चीन युद्ध झालं. त्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारित राष्ट्रीय सद्भावना या विषयाला वाहिलेली एक अ‍ॅनिमेटेड फिल्म बनवण्यात आली होती. त्या फिल्ममध्ये आजचे भारतातले आघाडीचे अ‍ॅनिमेटर वसंत सामंत होते. त्याकाळात अ‍ॅनिमेशन हे नावच काय पण अ‍ॅनिमेशन हा प्रकार फारसा कुणाच्या गावीही नव्हता. अशा कालखंडात आजचे आघाडीचे अ‍ॅनिमेटर वसंत सामंत यांनी स्वत:च्या करिअरला सुरुवात केली.सामंत सर या क्षेत्राकडे अपघाताने वळले. ते सांगतात - इंजिनिअर बनण्यासाठी मी मुंबईला आलो होतो. मुंबईत जरा उशीरानेच आल्यामुळे इंजिनिअर होता आलं नाही. मी फाईन आर्टकडे वळलो. फाईन आर्ट ग्रॅज्युएट झालो. मी आर्ट मास्टर झालो होतो. पुढे काय करायचं हा सगळ्या चित्रकारांना पडणारा प्रश्न त्यावेळी मलाही पडला होता. म्हणून सुदैवानं मला भारत सरकारच्या प्रसिद्धी खात्यामध्ये मला कार्टुनिस्टची नोकरी मिळाली होती. त्या ठिकाणी मी माझी कला वृद्धिंगत केली. कोणाला माहीत नसलेल्या नवख्या क्षेत्राकडे तुम्ही वळलात तरी कसे या प्रश्नाचं उत्तर देताना सामंत सरांनी मार्मिक असा दाखला दिला - मी दुसरी तिसरीत असतानाची गोष्ट. प्रत्येक शनिवारी माझी अर्धा दिवस शाळा असायची. शाळा सुटल्यावर काका मला घेऊन काजू वेचायला जायचे. एकदिवस काकांबरोबर काजू काढायला गेलो असताना तहानेने माझा जीव कासावीस झाला होता. त्यावेळेला आजच्यासारखे बिसलेरीचे दिवस नव्हते. आसपास कुठे पाणी पिण्यासाठी तळं किंवा विहिरही नव्हती. मी काकांना सारखा सांगत होतो की, मला तहान लागलीये म्हणून. पण काकांजवळ काही पर्यायही नव्हता. त्यांनी मला कसंबसं थारूवूृन धरलं. मी बापडा ताहनेनं व्याकुळ आपला काकांच्या मागून काट्याकुट्यांतून जात होतो. ब-याचवेळांनी एका झाडापाशी येऊन मी थांबलो. त्या झाडांवरचे मधुर, रसाळ बोंडू खाऊन माझी तृषा शमली. काकांना मी विचारलं की, इकडच्या एवढ्या मधुर बोंडूंच्या फळांकडे कसं कुणाचं लक्ष गेलं नाही. त्यावर काका म्हणाले की, बाळा आता तुझ्या पावलांच्या खुणांनी इथे पाऊलवाट तयार झाली आहे. त्यावाटेवरून भुकेलेले, व्याकुळलेले लोक या झाडापाशी येतील नि आपली तहान -भूक शमवतील. काकांनी अप्रत्यक्षरित्या मला जो वेगळ्या वाटा चोखाळण्याचा धडा दिला आहे तो माझ्या अ‍ॅनिमेशन क्षेत्रालाही लागू पडतो. माझ्यावेळेला अ‍ॅनिमेशनबाबत फारसं कुणाल माहीत नव्हतं पण आता अ‍ॅनिमेशन ही आधुनिक युगाची गरज बनत आहे. 'हनुमान' या भारतातल्या पहिल्या अ‍ॅनिमेशन चित्रपटाचे निर्माते वसंत सामंत आहेत. 'हनुमान'साठी त्यांनी 2 लाख 80 हजार स्केचेस तयार केली होती. 180 कलाकार 2 वर्षं काम करत होते. त्यांना त्यांच्या अ‍ॅनिमेशन मधल्या कामासाठी तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. अ‍ॅनिमेशनच्या प्रसारासाठी, प्रचारासाठी त्यांनी भारतभर वर्कशॉप घेतले आहेत आणि घेतातही. त्यांची स्वत:ची अ‍ॅनिमेशनचं प्रशिक्षण देणारी संस्था आहे. शिवाय त्यांची स्वत:ची प्रॉडक्शन फर्म आहे.