अहमदनगर, 14 जानेवारी : बिबट्यानं गाईची शिकार केल्याचं तुम्ही नेहमी ऐकलं-वाचलं असेल. पण 30 ते 35 गाईंनीच हल्ला करून बिबट्याला ठार मारल्याचा प्रकार अहमदनगरच्या संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर येथे घडला आहे. विशेष म्हणजे, या हल्ल्याप्रसंगी गोठ्याबाहेर उभ्या असलेल्या दुसऱ्या बिबट्यानं अक्षरशः धूम ठोकली. रात्रीच्या सुमारास बिबट्यानं उंबरकर यांच्या गोठ्यात मागच्या बाजूने प्रवेश केला. पण गाईंनी मोठ्यानं हंबरडा फोडत त्या बिबट्याचा प्रतिकार केला आणि पायांखाली तुडवत त्याला ठार मारलं. गाईंचा आवाज ऐकून उंबरकर कुटुंबीयांनी गोठ्याकडे धाव घेतली. यावेळी त्यांना दीड वर्षाचा एक बिबट्या गाईंच्या पायाखाली मृत झाल्याचं दिसून आलं.