पैसे Videos in Marathi

Showing of 300 - 307 from 307 results
सत्यमच्या घोटाळ्यामुळे गुंतवणुकदारांच्या विश्वासाला तडा गेलाय का ?

May 13, 2013

सत्यमच्या घोटाळ्यामुळे गुंतवणुकदारांच्या विश्वासाला तडा गेलाय का ?

सत्यम कॉम्प्युटरच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी गुंतवणुकदारांचा विश्वास आणि निधीचा गैरवापर केल्याचा आरोप कंपनीच्या चेअरमनवर केला गेला . भारतातील दुसर्‍या क्रमांकाच्या या आयटी कंपनीतील 8 हजार कोटींच्या या घोटाळ्याची सत्यमच्या चेअरमननी नी कबुली दिली . राजीनामाही दिला. कंपनीचे 10 हजारांचे भांडवली नुकसान झाले. कंपनीच्या 53 हजार कर्मचार्‍यांचे भविष्य धोक्यात आले. सत्यमच्या शेअरची किंमत 78 टक्क्यांनी घसरली.आधीच मंदीत असलेल्या शेअर मार्केटचा सेंसेक्सही कोसळला. गुंतवणुकदारांची दिशाहीन अवस्था सावरता येईल का यावरच होता आजचा सवाल - सत्यमच्या घोटाळ्यामुळे गुंतवणुकदारांच्या विश्वासाला तडा गेलाय का? या पश्नावर चर्चा करण्यासाठी माजी खासदारआणि इन्व्हेस्टर्स ग्रिव्हन्सेस फोरमचे अध्यक्ष किरिट सोमैय्या, अर्थतज्ज्ञ आणि चार्टर्ड अकाउंट मकरंद हेरवाडकर आणि फिक्कीच्या संचालिका वैजयंती पंडित.सत्यमच्या घोटाळ्याचं विश्लेषण करताना मकरंद हेरवाडकर म्हणाले "सत्यम ने जे पत्रक जाहीर केलंय, त्यानुसार साधारण 5 हजार रुपयांचे कॅश आणि बँक बॅलन्स, अ‍ॅक्रिव्‌ड इंटरेस्ट 376 कोटी, बोगस डेटर्स 490 कोटी असे बोगस अ‍ॅसेट आणि त्याशिवाय लायबलिटी म्हणून दाखवलेले 1230 कोटी रुपये असा घोटाळा आहे. याशिवाय सप्टेंबर 2008 च्या क्वार्टरली रिझल्ट्समध्ये 600 कोटींचा फ्रॉड रेव्हेन्यू दाखवला आहे. त्यांचे रिझर्व्ह आहे 8392 कोटी आण त्यातले या घोटाळ्यातले 7000 कोटी गेले तर जेमतेम 1000 कोटी त्यांच्याकडे आहेत. पण यामुळे संपूर्ण आयटी कंपन्यांच्या प्रतिमेला तडा गेला आहे, असं मला वाटत नाही."या विषयावर बोलताना किरिट सोमैय्या म्हणाले "बुल रन आणि बेअर रन चालूच असतो. पण प्रमोटर्स, म्युच्युअल फंड अधिकारी बुल रनमध्ये जर आकड्यांचे फुगे फुगवले गेले, तर त्यातून सत्यम सारखी प्रकरणं घडतात. मी असं सांगू इच्छितो की सत्यम ही सुरुवात आहे. उद्या असेच घोटाळे रिअल इंडस्ट्रीमध्ये झाले, तर मला आश्चर्य वाटणार नाही. 2007 आणि 2008 च्या सुरुवातील हा फुगा फुगवला गेला. खोटे हिशेब दाखवले गेले. याला जबाबदार आहेत म्युच्युअल फंडाचे मॅनेजर्स, कंपनी मॅनेजमेन्ट, ऑडिटर्स आहेत आणि हे सगळं उघड्या डोळ्यांनी बघणारं शासनही याला जबाबदार आहेत. आज 2 दिवस झाले, पण सत्यमवर कारवाई का नाही ? अशा आणखीही कंपनीज आहेत. रिअल इस्टेटमध्ये वाईट कंपन्यांना मोठं केलं गेलं. सिस्टर कन्सर्न काढल्या. चार रुपयाच्या शेअरची किंमत 40 च्या जागी 400 रुपये दाखवली गेली. पब्लिक इश्यूज काढले गेले. आणि स्वत:च्या प्रमोटर्सच्या शेअरवर मोठी कर्ज घतलं आहे."या घटनेनं कॉर्पोरेट जगाला हादरवून टाकलं. राहुल बजाज यांनी इकॉनॉमिक टाईम्समध्ये लेख लिहिला. त्याता कॉर्पोरेट जगतातला भूकंप या शब्दात त्यांनी सत्यम घोटाळ्याचं वर्णन केलं आहे. त्यावर वैजयंती पंडित म्हणाल्या "सत्यमचा घोटाळा मान्य आहे. पण म्हणून सगळ्या कॉर्पोरेट जगताला किंवा आयटी कंपन्यांना बदनाम करणं योग्य नाही. आता असे बरेच फ्रॉड्स उघडकीला येतील, असं म्हणणं अपेक्षित आहे."सत्यम घोटाळ्यातल्या ऑडिटर्सच्या भूमिकेविषयी मकरंद हेरवाडकर म्हणाले "जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही, तोपर्यंत असं म्हणता येत नाही, पण प्रथम दर्शनी तरी असं दिसतंय की ऑडिटर्स दोषी आहेत. ऑडिटर्सच्या बर्‍याच जबाबदार्‍या आहेत, त्या पार पाडल्या की नाही, हे बघावं लागेल. कर्मचार्‍यांच्या फ्रॉडपेक्षा मॅनेजमेन्टचा फ्रॉड शोधणं अवघड आहे. पण मॅनेजमेन्ट असे फ्रॉड करू शकतात, हे लक्षात घेऊन काम करणं गरजेचं आहे, असं ऑडिटिंग स्टॅन्डर्डमध्ये म्हटलं आहे. या स्टॅन्डर्डचा वापर कितपत केला गेला, का त्याकडे दुर्लक्ष झालं, हे चौकशीत बाहेर पडेल."किरिट सोमैय्यांनी या घोटळ्याप्रकरणी ऑडिटर्सना मोकळं सोडतं कामा नये, असं मत व्यक्त केलं. ते म्हणाले "मी स्वत: सीए आहे. मी सीए असोसिएशनच्या अध्यक्षांना सांगितलं होतं की असे प्रकार झाले, तर आपल्या विश्वासार्हतेला तडा जातो. याआधीही मटास, म्हणजे राजू यांच्या मुलाची कंपनी, ती पण अनलिस्टेड त्यांच्या शेअर्सची किंमत वाढवून आणि सत्यमच्या शेअर्सची किंमत कमी करून ती सत्यमला विकण्याची तयारी केली गेली. त्यावेळी रेग्युलेटरी बॉडीज कुठे गेल्या होत्या ? हे ऑडिटर्स म्हणजे प्राईस वॉटर हाउस कुपर ही काय कंपनी आहे ? ग्लोबल ट्रस्ट बँकेचं दिवाळं निघालं तेव्हा त्यांचे ऑडिटर्स हेच होते. मग त्यांना इथे कामच कसं करता आलं ?" कंपनीचा ऑडिट रिपोर्टच किरिट सोमैय्यांनी दाखवला. त्यावर सर्व काही सुरळीत सुरू आहे, या शेर्‍यावर सीए ची सही पण दाखवली. या प्रकरणाला कंपनी मॅनेजमेन्ट, प्रमोटर्स, ऑडिटर्स आणि सासन सगळेच जबाबदार असल्याचं सांगत "आम्ही सेबी, कंपनी मॅनेजमेन्ट, चार्टर्ड अकाउंटन्ट इन्स्टिट्यूट अशा सगळ्यांनाच नोटीस पाठवल्या आहेत" असं किरिट सोमैय्या यांनी स्पष्ट केलं.किरिट सोमैय्यांनी कॉर्पोरेट गव्हर्नन्सवर केलेले आरोप वैजयंती पंडित यांनी नाकारले. "असे घोटाळे जगभर होतात. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी रेग्युलरिटरीज बॉडीज प्रयत्न करत आहेत. पण सत्यम हे अपवादात्मक उदाहरण आहे. आपण रेग्युलरिटरी बॉडीज" पण सोमैय्या यांनी पंडित यांना मध्येच थांबवलं आणि गुंतवणूकदादारांची कैफियत मांडली. "लोकांनी म्युच्युअल फंडमध्ये टाकलेले पैसे अर्ध्यावर आलेत. म्युच्युअल फंडमध्ये 1 लाख 50 हजार कोटी आज बुडालेत. युलिपची किंमत 50 टक्क्यांपेक्षा कमी झालीय. 2008 मध्ये 42 पब्लिक इश्यू आले. त्यापैकी 38 इश्यूज आज 20 टक्क्यांपेक्षा कमी भावात आहे. इंडिपेन्डन्ट डायरेक्टर हे कंपनी मॅनेजमेन्टच्या हातातील बाहुले झाले आहेत. सत्यमचे इंडिपेन्डन्ट डायरेक्टर काय करत होते ?" यावर वैजयंती पंडित म्हणाल्या "अशा घोटाळ्यात बरेच लोक सहभागी असतात. पण त्यांना शिक्षा करायला कायदे आहेत, प्रोसिजर आह. जसे पुरावे मिळतील, तशी कायदेशीर कारवाई केली जाईल."हर्षद मेहता, केतन पारेख आणि आता सत्यम. आपले रेग्युलेटर्स अपयशी ठरलेत का ? या प्रश्नाचं उत्तर देताना मकरंद हेरवाडकर म्हणाले "तसं बघायला गेलं तर अमेरिकेत सगळ्यात चांगले रेग्युलेटरी कंट्रोल्स आहेत. पण तिथेही एन्रॉन आणि वर्ल्ड कॉम झालंच ना... अगदी आत्ताच्या काळातही सिमेन्स सारख्या जर्मनीतल्या नावाजलेल्या कंपनीला लाच दिल्याबद्दल शिक्षा झाली. मग लगेच ते सगळ्या सिस्टिमचं अपयश नसतं. पण आज 48 तास होऊनही सत्यमचे ऑडिट आणि फायनान्शियल पेपर्स ताब्यात घेण्यात आले नाहीत, अजूनही उपाययोजना नाही. हे गंभीर आहे." हाच मुद्दा सोमैय्यांनी उचलून धरला "मग आता तरी रेग्युलेटरी बॉडीजनी समोर यावं. त्यांचं म्हणणं मान्य आहे, की सगळेच वाईट नसतात. पण सत्यम तर बोगस आहे ना ? मग इन्स्टिट्यूट का पुढे येत नाही. आणि त्यातही दुदैर्व म्हणजे सत्यमची मॅनेजमेन्ट अजूनही काम करतेय. तोच चार्टर्ड अकाउन्टंट अजूनही इतर कंपन्यांची ऑडिट करतोय. चार्टर्ड अकाउन्टंट इन्स्टिट्यूटनं त्याला अजून सस्पेन्ड का नाही केलं ? कंपनी मॅनेजमेन्टला अजून काम करण्याची परवानगी कशी मिळू शकते. पहिले राजू यांचा पासपोर्ट ताब्यात घ्या. त्याच्या आणि त्याच्या मुलांच्या मालमत्तेवर टाच आणा. जर गुंतवणूकदारांचा विश्वास टिकवायचा असेल, तर ही पावलं त्वरित उचलायला पाहिजेत."आजचा सवालच्या तिसर्‍या सेगमेन्टमध्ये गुंतवणूकदारांच्या सुरक्षिततेच्या मुद्द्याची प्रामुख्यानं चर्चा झाली. सत्यमचं बोर्ड ऑफ डायरेक्टर बरखास्त करावं करणार का ? या प्रश्नाचं उत्तर देताना वैजयंती पंडित म्हणाल्या "ज्या दिवशी हा घोटाळा उघड झाला, तेव्हाच आम्ही या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी करणारं पत्रक फिक्कीचे प्रसिडेन्ट राजीव चंद्रशेखर यांनी काढलं आहे." गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळणार का ? या प्रश्नाचं उत्तर देताना मकरंज हेरवाडकर म्हणाले "अमेरिकेत क्लास अ‍ॅक्शची केस फाईल केली आहे. पण एडीआरमधल्या गुंतवणूकदारांनाच याचा फायदा आहे. पण आपल्याकडे हा कायदा आहे का ? याची मला कल्पना नाही. पण जर असेल, तर गुंतवणूकदारांचं नुकसान भरून काढण्यासाठी ऑडिटर, कंपनी आणि कंपनी मॅनेजमेन्ट वर दावा ठोकू शकतात. यात वकीलही मिळणार्‍या रकमेच्या टक्केवारीत फी घेतात. म्हणजे वकिलांचा अतिरिक्त खर्च वाचतो. यामुळे कंपनीचं दिवळंही निघू शकतं. एलएनटीसारख्या नावाजलेल्या कंपनीनं सत्यममध्ये गुंतवणूक केली आहे. एलएनटीच्या गुंतवणूकदारांनाही याचा फटका बसू शकतो. अशा वेळी कंपनीचे तुकडे करून अशी छोटी युनिट्स इतर कंपन्यांनी टोकओव्हर करणं हा एक पर्याय मला चांगला वाटतोय."किरिट सोमैय्या यांनीही गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळू शकतील, असं सांगितलं. "आम्ही असे पैसे एकदा परत मिळवून दिसे आहे. 2007 मध्ये आयपीओ डीमॅट स्कॅम प्रकरणी दोषींची अ‍ॅसेट्स जप्त करून गुंतवणूकदारांना पैसे परत देण्यात आले होते. तसंच या प्रकरणी करता येऊ शकेल. आम्ही यासंदर्भात हायकोर्टात याचिका दाखल करत आहोत." नागरिकांनीही हाय कोर्टाच्या न्यायाधिशाच्या नावाने असं पत्र पाठवण्याचं आवाहनही किरिट सोमैय्या यांनी केलं. याचवेळी मकरंद हेरवाडकर म्हणाले "ऑडिटर्स कंपन्यांनी इंडेमनिटी इन्शुरन्स घेतला असतो. त्यातूनही गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळू शकतील."सत्यमच्या घोटाळ्यामुळे गुंतवणुकदारांच्या विश्वासाला तडा गेलाय का ? या प्रश्नाचं उत्तर 91 टक्के लोकांनी होय, असं उत्तर दिलं. या चर्चेचा शेवट करताना आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे म्हणाले "सत्यमचा महाघोटाळा आहे, हे सर्वांनी मान्य केलं आहे. या घोटाळ्याला जबाबदार असणार्‍या रामलिंगम राजू यांच्यासहित सर्वांना शिक्षा व्हायला पाहिजे.गुन्हेगारी कारवाया करणार्‍या लोकांइतकेच हे व्हाईट कॉलर गुन्हागारही अतिशय भयानक आहेत. आणि गुंतवणूकदारांचा पैसा परत मिळाला तरच गुंतवणूकदारांचा विश्वास परत मिळवता येऊ शकतो."

ताज्या बातम्या