#पैसे

Showing of 274 - 287 from 306 results
मंत्रालयाचं स्वगत

बातम्याJun 28, 2012

मंत्रालयाचं स्वगत

अजय कौटीकवार, मुंबई28 जूनआग लागल्यामुळे मंत्रालय हा गेले काही दिवस सर्वांच्या चर्चेचा विषय ठरलाय. पण 57 वर्षांपूर्वी हे मंत्रालय कुणी बांधलं ? का बांधलं ? गुरुवारी झालेल्या घटनेबद्दल त्याला काय वाटत असेल. 21 जून 2012... माझ्या आयुष्यातला काळाकुट्ट दिवस. कारण मी महाराष्ट्रातलं सर्वात शक्तिशाली केंद्र असल्याचा मला अभिमान त्या दिवशी गळून पडला. महाराष्ट्राच्या अनेक सुवर्णक्षणांचा मी साक्षीदार.. माझ्याच आदेशांवर सर्व राज्य चालते. हा अंहकार गुरूवारच्या आगीत जळून खाक झाला. साठीच्या उंबरठ्यावर हा दिवस पाहताना. मला माझ्या लहानपणीचा सुवर्णकाळ आठवला. मुंबई प्रांताच्या कामाचा पसारा 1950च्या दशकात वाढू लागला आणि त्यातूनच माझा जन्म झाला. पूर्ण बांधकामाला लागली 5 वर्ष.. 24 एप्रिल 1955 ला तत्कालीन राज्यपाल हरेकृष्ण महेताव यांच्या हस्ते माझं औपचारिक उद्घाटन झालं. त्यावेळी मुख्यमंत्री होते कडक शिस्तीचे मोरारजी देसाई. पुढे संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन झालं. आणि 1 मे 1960 च्या दिवशी महाराष्ट्राचा मंगल कलश घेऊन यशवंतराव चव्हाण आले. तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा क्षण होता. गुरूवारच्या आगीत तो कलशही आगीच्या तडाख्यातून सुटला नाही. महाराष्ट्राची निर्मिती झाल्यावर.. माझ्या नावावरून वाद झाला. 'सचिवालय' या नावाला काही जणांनी विरोध केल्यावर.. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींनी मंत्रालय हे नाव देऊन माझं बारसं केलं.गेल्या 57 वर्षांत मी अनेक राजवटी पाहिल्या.. खूप बदल अनुभवले. कर्तबगार मुख्यमंत्री पाहिले...त्यांच्या कामाचा झपाटा पाहिला. आधुनिक महाराष्ट्राच्या निर्मितीच्या चर्चा, दूरदृष्टीचे निर्णय माझ्याच इथे घेतले गेले. सुरुवातीची दशकं झपाटल्यासारखी होती. राज्याच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्य होतं. हळूहळू राजकारणाचा स्तर खालावला. स्वार्थी नेत्यांची बजबजपुरी झाली. विधायक चर्चेची सवय झालेल्या माझ्या कानांना 'टक्केवारी' हा शब्द परवलीचा झाला. दलालांचा वावर वाढला. हल्ली पैसे दिल्याशिवाय फाईल पुढं सरकतच नाही. सजावटीच्या नावाखाली अनेक मंत्र्यांनी आणि अधिकार्‍यांनी लाकूड प्लायवूडचा बेसुमार वापर केला आणि मला आगीच्या तोंडी ढकलून दिलं. आता चौकशीचा सोपस्कार पूर्ण होईल. अहवाल येतील. असे कित्येक 'आदर्श' अहवाल माझ्या दप्तरी वर्षानुवर्ष पडून आहेत. न्यायाच्या प्रतिक्षेत. असो. अजूनही माझा पाया तसा मजबूत आहे.. आणि आता नव्या जोमानं कामाला सुरवातही करायची आहे.