#पुणे

Showing of 846 - 850 from 850 results
ग्रेट भेटमध्ये अशोक चव्हाण

May 13, 2013

ग्रेट भेटमध्ये अशोक चव्हाण

ग्रेट भेटच्या 13 डिसेंबरच्या भागात आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांनी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची मुलाखत घेतली. अशोक चव्हाण हे महाराष्ट्राच्या जनतेला फारसे परिचित नाहीत. याचं कारण म्हणजे ते पत्रकारांपासून कायमच लांब राहिले आहेत. ते मितभाषी आहेत आणि कोणत्याही वादात कधीच सापडले नाहीत. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांची अत्यंत कसोटीच्या काळात महाराषट्राच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाली आहे. ते या कसोटीचा सामना कसा करणार आहेत, यासंबंधी अशोक चव्हाण यांनी आपली मतं या मुलाखतीत व्यक्त केली.निखिल वागळे : मुख्यमंत्री होणं ही कोणत्याही राजकारणी व्यक्तीसाठी आनंदाची गोष्ट असते. आम्ही पण आज या कसोटीच्या वेळी तुमची झालेली नेमणूक ही तुम्हाला संधी वाटतेय की अग्निपरीक्षा ?अशोक चव्हाण: पहिल्यांदा मला असं स्पष्ट करायचय की ही नेमणूक नसून निवड आहे. महाराष्ट्राच्या सर्व आमदारांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना मुख्यमंत्री निवडीचे सर्वाधिकार दिले होते. तरीही आमच्या दोन्ही निरीक्षकांनी सगळ्या आमदारांची मतं समजून घेतली आणि ती सोनिया गांधीपर्यंत पोहचवली.निखिल वागळे : आम्ही असं ऐकलं की राहुल गांधी यांनी तुमच्या निवडीचा आग्रह धरला होता. पंतप्रधान मनमोहन सिंगही तुमच्या बाजुने होते. तुमचे पिताजी शंकरराव चव्हाण जेव्हा अर्थमंत्री होते, तेव्हा मनमोहन सिंग त्यांचे सचिव होते. तेव्हापासून तुमचा परिचय आहे. या दोघांच्या पाठिंब्यामुळे तुमची निवड झाली, असं म्हटलं तर ते योग्य ठरेल का ?अशोक चव्हाण: राहुल गांधींची आणि माझी यासंदर्भात कोणतेही चर्चा झालेली नाही. त्यांनी मला असा कोणताही निरोप दिलेला नाही. पण जे काही माझ्या कानावर आलंय, त्यानुसार राहुल गांधी माझ्या नावाला अनुकूल होते. त्याबद्दल मला त्यांचे आभार मानायचे आहेत. मुख्यमंत्रीपदाबद्दल बोलायचं तर 1986-87 मी लोकसभेवर निवडून गेलो. तेव्हापासून माझ्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. त्यानंतर विधानपरिषदेवर निवडून गेलो, मी विधानसभेत दोन वेळा निवडून आलो. यूथ काँग्रेससाठी काम केलं, खासदार म्हणून काम केलं, आमदार म्हणून वेगवेगळया खात्यांवर काम केलं. गेल्या 25-30 वर्षांची पावती म्हणून पक्षाध्यक्षा सोनिया गांधी, मुख्यमंत्री मनमोहन सिंग आणि अर्थातच तरुण नेतृत्व राहुल गांधी यांनी माझ्यावर या कसोटीच्या क्षणी विश्वास टाकला.निखिल वागळे : तुमचा जन्म 1958 चा आहे. तुम्ही महाराष्ट्राचे पहिले असे मुख्यमंत्री आहात, ज्यांचा जन्म महाराष्ट्राच्या निर्मितीच्या आगेमागे आहे. खर्‍या अर्थानं तुम्ही राजकारण्यांच्या दुसर्‍या पिढीचं प्रतिनिधित्व करता. या दृष्टीकोनातून तुमची भूमिका वेगळी होते ?अशोक चव्हाण: महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांना जवळून पहाण्याची संधी मिळाली. यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण इथपासून थेट सुधाकर नाईक, शरद पवारांपर्यंत मुख्यमंत्र्यांची कारकीर्द मी बघितली, त्यांचा सहवास मला लाभला. मला वाटतं की एकंदरीत सगळ्या जीवनशैली, कामाच्या परिस्थितीत आणि राजकीय परिस्थितीत अमूलाग्र बदल झाला आहे. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतरच्या अत्यंत कसोटीच्या काळात मला हे मुख्यमंत्रीपद मिळालं आहे. याला मी संधी मानतो. आता 26/11 नंतर राज्यकर्त्यांविषयी जनतेच्या मनात प्रचंड चीड आहे, संताप आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्रचं, मुंबईचं जनजीवन पूर्वपदावर आणणं, महाराष्ट्रासारख्या प्रगतिशील राज्याच्या विकासात अडथळे याणार नाही, याची काळजी घेणं, महाराष्ट्राला भक्कम प्रशासन देणं आणि नव्या पिढीला एक नेतृत्व देणं ही आजची गरज आहे आणि सगळ्यांच्या सहकार्यानं मला या कामात यश येईल, असं मला वाटतं.निखिल वागळे : तुम्ही नेमका मुद्दा उचललात. गेटवे ऑफ इंडियावर आपण बघितलं. बहुसंख्य तरुणांनी शासनाच्या विरोधात, राजकारण्याच्या विरोधात घोषणा दिल्या. या तरुणांना तुमच्याविषयी आपुलकी वाटावी म्हणून तुम्ही काय करणार आहात ?अशोक चव्हाण: लोकांसमोर आपण काय आदर्श निर्माण करतो, हे महत्त्वाचं आहे. प्रशासनाविषयी लोकांचा संताप मी समजू शकतो, पण माझ्या मते राजकारण्यांना असणारा विरोध योग्य नाही. आपल्या इथे लोकशाही आहे. आपणच लोकशाही मार्गानं निवडून दिलेलं हे सरकार आहे. आपण ज्या लोकांना निवडून दिलं आहे, त्यांच्या मार्फतच आपण आदर्श प्रशासन दिलं पाहिजे. ही आपली भूमिका हवी.निखिल वागळे : लोकांचा लोकशाहीला विरोध नाही. लोकांचा लोकशाहीच्या मार्गानं निवडून आलेल्या वाईट राजकारण्यांना विरोध आहे. सगळे पक्ष वाईट उमेदवार देतात, त्यामुळे आम्हाला इलाज नाही. यात तुम्ही मूलभूत फरक करणार आहाहत का ?अशोक चव्हाण: सगळी व्यवस्था अशी एकदम बदलता येत नाही. आपल्या अंगातलं रक्त दुषीत असेल तर ते एकदम काढून टाकता येत नाही. काही बदल हे टप्प्या टप्प्यानं करावे लागतात. अर्थात लोकांनी दाखवलेला विरोध आम्ही समजू शकतो. यातून बरंच शिकण्यासारखं आहे. लोकांच्या भावनेची कदर म्हणूनच, शासनातले हे बदल झाले. लोकभावनेचा कदर करत एक जबाबदार प्रशासन देण्याचा आमचा प्रयत्न आहे, त्या दृष्टीने काही ठोस संकेत आम्ही दिले आहेत.निखिल वागळे : लोकसभेत भाषण देण्याआधी चिदंबरम यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली होती. त्यात त्यांनी केंद्र सरकारच्या चुका मान्य केल्या. राज्यसरकारचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही त्या मान्य करणार आहात का ?अशोक चव्हाण: सगळंच चुकलं, असं मी म्हणणार नाही. सरकारच्यावतीनं जे काही करणं शक्य होतं, ते आम्ही केलं होतं. पण मी मान्य करतो की त्यात सुधारणेला बराच वाव आहे. मी शपथ घेतल्यापासून मी त्यावर काम करत आहे. गेल्या काही दिवसात बैठका घेऊन आम्ही एक कार्यक्रम निश्चित केलाय. वेगवेगळ्या यंत्रणांबरोबर बैठका घतल्या. वेस्टर्न नेव्हल कमांडबरोबर बैठक घेऊन सुरक्षेसंदर्भात त्यांच्या प्रश्नांवर आम्ही चर्चा केली, त्यांच्या सुधारणेसाठी टाईम बाउंड कार्यक्रम निश्चित केला. सुरक्षाविषयक प्रस्ताव तयार करण्यासाठी आम्ही मंत्र्यांचं कृतीदल तयार केलं. त्यांना प्रस्ताव मांडण्याचे अधिकार दिले. त्यावर येत्या 14 तारखेच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतले जातील. त्यासाठी आम्ही काही दीर्घकालीन आणि तत्काळ उपाययोजना अमलात आणणार आहोत. गस्त घालण्यासाठी जर स्पीड बोट्स नसतील, तर आम्ही त्या तातडीनं भाड्यानं घेऊ. ज्या जागा भरायच्या आहेत, त्या जागी लवकरात लवकर नव्या कर्मचार्‍यांची नेमणूक करू, एमपीएससीच्या प्रक्रियेत त्याला चार महिने लागतात, पण आम्ही नियम शिथिल करून दोन महिन्यांच्या आत नवीन नेमणुका करू . इंटेलिजन्सला जी शस्त्र आणि सुविधा हव्यात, त्या पुरवल्या जातील. सुरक्षा कौन्सिल स्थापण्यासाठी आम्ही पावलं उचलली आहे. शस्त्रसज्ज आणि दक्ष पोलिसांचं आस्तित्व जाणवेल, याची आम्ही काळजी घेऊ. मला वाटतं की मंत्रीमंडळाच्या बैठकीत हे सगळे निर्णय फायनल होतील.निखिल वागळे : मागच्या एका मुलाखतीत महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक असं म्हणाले होते की आमचा पोलीस पांडू दिसतो. तो बॉबी दिसायला हवा. दोन महिन्यात आम्हाला बॉबी मिळणार का ? तुमच्या हातात तर जेमतेम 6 महिने आहेत. त्यानंतर निवडणुका येत आहेत...अशोक चव्हाण: मी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन काहीच करत नाहीये. पण मी नक्की सांगतो की स्मार्ट पोलीस आम्ही पोलिसांना देऊ. एनएसजीच्या धर्तीवर आम्हा स्टेट कमांडो दल उभारणार आहोत. त्यासाठी नेव्हीनं मदत करण्याची तयारी दाखवली आहे. त्याचे परिणाम लवकरत दिसतील.निखिल वागळे : महाराष्ट्रात अनेक उत्कृष्ट निवृत्त पोलीस आणि सनदी अधिकारी आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की आमची मदत सरकार घेत नाही. अशी मदत तुम्ही घेणार आहात का ? याशिवाय 1993 मध्ये स्थापन झालेल्या दक्षता समित्यांनी उत्तम काम केलं होतं. पोलीस स्टेशननं नीट काम केलं तर पोलीस यंत्रणा उत्तम काम करते. अशा समित्या तुम्ही परत स्थापणार का ?अशोक चव्हाण: नक्कीच घेऊ. मागे काय झालं त्यात मी जाणार नाही. पण जे जे अधिकारी मला उपयुक्त वाटतात, त्यांचा मी थिंक टॅक म्हणून वापर करणारच आहे. संबंधित पालक मंत्र्यांची मदत घेऊन आम्ही अशा समित्या स्थापन करायला सुरुवात केली आहे.निखिल वागळे : मागच्या मुख्यमंत्र्यांची अत्यंत अकार्यक्षम अशी प्रतिमा तयार झाली होती. ते कधी रस्त्यावर उतरले नाहीत, कधी आमच्या घरी येऊन आम्हाला काय हवं, हे कधी त्यांनी विचारलं नाही. ही प्रतिमा तुम्ही बदलणार का ?अशोक चव्हाण: मागे काय झालं, यावर मी बोलणार नाही. पण लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत, त्या मी पूर्ण करेन. मला रस्त्यावर उतरण्याची लाज नाही. माझ्या कारकिर्दीची सुरुवात मी तशीच केली. मी लोकांमध्ये राहून, एक कार्यकर्ता म्हणून मी काम केलं आहे. माझे वडील दोन वेळा मुख्यमंत्री होते, मी गेली 9 वर्ष वेगवेगळ्या खात्यांची जबाबदारी सांभाळली आहे. मी सत्ता अमुभवलीय, सत्तेच्या बाहेरही राहिलोय. त्यामुळे सत्ता डोक्यात जाण्याचा प्रश्नच नाही. लोकांना आपल्यातला वाटेल, असा मुख्यमंत्री बनण्याचा मी प्रयत्न करेन.निखिल वागळे : संरक्षण कोणत्या समस्या तुम्हाला महाराष्ट्रात महत्त्वाच्या वाटतायत ? त्यावर तुम्ही कसं काम करणार आहात ?अशोक चव्हाण: विजेचा प्रश्न अर्थातच गंभीर आहे. आपल्याला साधारण पाच हजार मेगावॅट विजेची कमतरता आहे. त्यामु... राज्याच्या प्रगतीला थोडा फार खीळ बसलेला आहे.गेल्या काही वर्षांत तो सोडवण्याचा प्रयत्न केला गेला, पण त्याचा म्हणावा तसा परिणाम दिसला नाही. काही खासगी वीजप्रकल्प आहेत, राज्याचे वीजप्रकल्प आहेत. त्यांना पुरेपूर मदत देण्याचा आमचा प्रयत्न आहे. शेतकर्‍यांच्या आत्महत्येचा प्रश्न आहे. त्यावर नामवंत अर्थतज्ज्ञ आणि पुणे विद्यापिठाचे उपकुलगुरू नरेंद्र जाधव यांनी त्यासंदर्भात एक चांगला रिपोर्ट केला आहे. तो स्वीकारून त्यावर कारवाई करण्याचा माझा विचार आहे. बर्‍याच शेतकर्‍यांनी आपण कर्जमुक्ती दिलेली आहे, पण काही घटक त्यातून वगळले गेलेत. त्यांना फायदा होईलअशी भूमिका आम्हाला घ्यायची आहे. राज्यातले उद्योग मागास भागत कसे जातील, आणि तेथे रोगारनिर्मिती होईल, याची आम्ही काळजी घेऊ. शिक्षणासंदर्भातले प्रश्न सोडवणे ही देखील आमची प्राथमिकता आहे. विदर्भ- मराठवाड्याचा अनुशेष भरून काढण्याचा आमचा प्रयत्न असेल. त्यासंदर्भातल्या पालक आणि शिक्षकांच्या तक्रारी दूर करण्याचा, त्यातल्या चुका सुधारण्याचा आमचा प्रयत्न राहील.निखिल वागळे : तुमचे वडील शंकरराव चव्हाण हे कडक शिस्तीचे मुख्यमंत्री म्हणून ओळखले जात. मंत्रालयात सरकार बदललं तरी दलाल कायम असतात. भ्रष्टाचारानं व्यवस्था पोखरून टाकली आहे. तुमच्या वडिलांना या सगळ्याला बर्‍याच प्रमाणात आळा घातला होता. तुम्ही देखील या दृष्टीने काही प्रयत्न करणार आहात का ?अशोक चव्हाण: जगातली कोणतीही यंत्रणा 100 टक्के स्वच्छ नसतात. पण त्यातल्या गैरप्रकारांना आपण किती आळा घातू शकतो आणि आपला आदर्श घालू देऊन या गोष्टींवर वचक कसा बसवता येईल, याचा विचार करणं आवश्यक आहे. जर वरच्या माणसांनी कडक भूमिका घेतली, तर खालच्या स्तरापर्यंत त्या पाळल्या जातात. राज्याचा सीईओ म्हणून चुकीच्या गोष्टींवर तातडीनं निर्बंध आणणं, ही माझी भूमिका असेल. आरटीआय सारख्या चांगल्या कायद्यांमुळे चुकीच्या गोष्टी करताना लोक विचार करतायत.निखिल वागळे : तुम्ही मुख्यमंत्री झाल्या झाल्या एक चांगली गोष्ट केली. तुम्ही तुमचा इ-मेल आयडी लोकांसाठी खुला केला...अशोक चव्हाण: पण त्यावर टीका झाली... शासनाची वेबसाईट आहेच, पण मी इ-मेल आयडी लोकांना दिला, कारण तो मी नेहमी वापरू शकतो. त्यावर पहिल्याच दिवशी हजारपेक्षा जास्त इ-मेल आलेत. त्यांची दखल घेऊन मी कारवाई करेन.निखिल वागळे : अमेरिकेत बराक ओबामांनी आपला मोबाईल नंबर खुला केला आणि नंतर सुरक्षेचे बरेच प्रश्न निर्माण झाले. पण अशा प्रकारे तुमचा मोबाईल नंबर आणि इ-मेल आयडी खरोखरच शेवटच्या माणसासाठी उपल्ब्ध आहे का ?अशोक चव्हाण: नक्कीच. मी मुख्यमंत्री झाल्यापासन माझा फोन सतत वाजतोय. आता मी 24 तास तर फोनवर राहू शकत नाही. मी माझ्या पीए ला सांगितलं की निरोप माझ्यापर्यंत पोचव. इ-मेल वरती मी निश्चित कारवाई करणार आहे. मी लोकांनी विनंती केलीय की वैयक्तिक विनंत्या या मेलवर करू नका. पण चांगल्या सूचना मी नक्की स्वीकारेन आणि त्यावर कामही करेन.निखिल वागळे : सगळ्या समस्या एकदम सुटणार नाहीत, हे लोकांनाही मान्य आहे. पण निदान सरकारनं आमचं ऐकून तरी घ्यावं. पण लाकांची अशी समजूत झालीय की जनता दरबार असेल, लोकशाही दिन असेल, हे सगळं थोतांड आहे. तिथे अर्ज स्वीकारले जातात, पुढे काहीच होत नाही. हे बदलण्यासाठी तुम्ही पुढाकार घ्याल का ?अशोक चव्हाण: मंत्रालयात अशी अनेक माणसं असतात की खालच्या लेव्हलवर त्यांची कामं न झाल्यानं ते मंत्रालयात येतात. पण स्वत:च्या वैयक्तिक कामांसाठी मंत्रालयात फिरणारी माणसं पण खूप आहेत. येणारा माणूस म्हणतो की मी तुमच्या जिल्ह्यातला आहे. तुम्ही माझं एवढंही काम करू शकत नाही ? ही धारणा चुकीची आहे. म्हणून आपली राजकीय व्यवस्था बदलण्याची गरज आहे. पण आपल्या इथं आपण कायद्यानं समोरच्या माणसाला काय मदत करू शकतो, आणि जर ते काम मेरीटवर होत असतील, तर इथपर्यंत यायची त्यांना गरज नाही. छोट्या छोट्या कामांसाठी लोकांनी मुंबईला येणं मला मान्य नाही. जर कलेक्टर त्याचं काम करू शकत असेल, तर त्यानं इथपर्यंत का यावं ? जिल्हा पातळावरची यंत्रणा सक्षम केली, तर मुंबईची गर्दी नक्की कमी होईल.निखिल वागळे : या सगळ्या दहशतवादी हल्ल्याच्या आधी राज ठाकरे यांनी छेडलेल्या मराठी-अमराठी वादानं विलासरावांच्या सरकारची बदनामी झाली होती. या मुद्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेला तडा जातोय, असं तुम्हला वाटतंय का ?अशोक चव्हाण: वृत्तपत्रांनी हा मुद्दा सेन्सेशनल केलाय. बराक ओबामा तिकडे राष्ट्राध्यक्ष बनू शकतो, आणि आम्ही कोणत्या शुल्लक गोष्टीत अडकलोय ? मी जिथे जिथे बोललोय, तिथे तिथे मी हेच सांगितलं की आम्ही राज्य कधीही धर्म, राज्य, भाषा, जात यावर चालवणार नाही. हे राज्य देशाच्या घटनेवर चालेल, त्यात जे काही लिहिलं गेलंय, त्याचं इथे पालन केलं जाईल. मराठी माणसाला संरक्षण देणं वेगळं आणि भाषिक आधारावर फूट पाडणं वेगळं. 1972 पासून आमची ही भूमिका आहे, तेव्हापासून आम्ही हे जीआर काढलेत की महाराष्ट्रात 15 वर्षांपेक्षा जास्त काळ रहाणार्‍या माणसाला, महाराष्ट्रातल्या डोमीसाईल असणार्‍या माणसाला महाराष्ट्रात रहाण्याचा, नोकरी मागण्याचा पूर्ण अधिकार आहे, हीच आमची भूमिका राहील.निखिल वागळे : पण भाषेच्या प्रश्नावर रस्त्यावर उचलून जो धुडगूस घातला गेला, त्याला आळा घालण्यात विलासरावांचं सरकार अपयशी ठरलं असं म्हटलं जातं...अशोक चव्हाण: असं म्हणणं बरोबर नाही. विलासरावांनी अशा लोकांवर खटले दाखल केलेत ना... त्यावर कोर्टात सुनावणी चालू आहे. जे काही करायचं ते कायद्याच्या चौकटीत राहूनच करावं लागेल ना ? कायद्यामध्ये जे जे काही बसतं, ते सगळं काही केलं गेलं. दोषींना अटक केलं गेलं, केसेस दाखल झाल्या, प्रिव्हेंटिव मेजर्स घेतली गेली. निवडणुका आल्या की लोकांना मराठी माणूस आठवतो, सत्तेवर आलो की तो विसरला जातो. काही तरुण पोरांना हाताशी धरून हा मुद्दा उचलला गेलाय. पण माझ्या मते तरुणांना योग्य मार्गदर्शन केलं गेलं पाहीजे. मराठी मुलांना उद्योग धंद्यात उतरवण्यासाठी मदत केली गेली पाहिजे. आपली मुलं सुशिक्षित आहेत, त्यांच्या अंगात धमक आहे.निखिल वागळे : तुम्ही या मुद्द्यावर ठाम आहात तुमची बायको पंजाबी आहे. राष्ट्रीय एकात्मता तुमच्या घरात आहेत्यामुळे हा बदल घडलाय का ?अशोक चव्हाण: अजिबात नाही. हा विषय अगदी वेगळा आहे.निखिल वागळे : शंकरारव चव्हाणांचे सुपुत्र म्हणून तुमची ओळख आहे. ते ज्या काळात मुख्यमंत्री होते, तो काळ आणीबाणीचा होता. आजचा काळही कसोटीचा आहे, म्हणून मी ही तुलनी करतोय. पण तरीही तुम्ही त्यांच्यापेक्षा वेगळे आहात. तुमच्यात नेमकं साम्य काय आणि फरक काय ?अशोक चव्हाण: शंकरराव चव्हाण अतिशय शिस्तबद्ध होते. आम्ही नवीन पिढीचे प्रतिनिधी. ते अतिशय स्पष्टवक्ते होते. नाही पटलं तर ते तोंडावर सांगायचे. आजचा काळ जरा वेगळा आहे. पटलं नाही तरी पहातो, असं म्हणावं लागतं. मुख्यमंत्री त्यावेळी भेटतच नाही, हा त्यांच्यावर मोठा होता. अहो जर सगळ्यांना भेटायचं तर दिलेली कामं कधी करायची ? शंकरराव चव्हाणांचे वैचारिक मतभेद खूप होते, वैय्यक्तिक नाही. आणि तेही ते तोंडावर बोलायचे. आता लोकांना वाटतं मुख्यमंत्री इझिली अक्सेसिबल असावेत, काळ बदलालय, तसा आमच्या कामाच्या स्वरुपातही मिळाला.निखिल वागळे : राजकारणाचा पहिला धडा तुम्हाला घरातच मिळाला असणार. तो कधी आणि कसा मिळाला ?अशोक चव्हाण: माझा जन्म आणि शिक्षण मुंबईतच झाला. त्यामुळे मला कोणत्याही भाषेचा प्रश्न कधी आला नाही. तरुण वयापासूनच युथ काँग्रेसच्या कामात मी सहभागी होतो. वडिलांच्या मतदारसंघात जाणं येणं राहिलं. प्रदेश काँग्रेसमध्ये मी पदाधिकारी म्हणून काम केलं. वडिलांच्या नेटवर्कचा मला खूप फायदा झाला. आपण आता पहातो की नवी पिढी आणि जुनी पिढी यात खूप अंतर असतो. गाठीभेटी होत नाहीत. पण मी जुन्या पिढीबरोबर खूप राहिलो, आमचे संबंध खूप चांगले होते. मी संसदेत दिल्लीपासून सुरुवात केली, त्यामुळे तिथेही चांगले संबंध प्रस्थापित झाले. मग महाराष्ट्रात येऊन इथल्या तरुण पिढीबरोबर काम केलं. शिवाय वडिलांच्या तयार नेटवर्कचा मला खूप फायदा झाला.निखिल वागळे : तुम्ही एमबीए आहात. नव्या पिढीचे राजकारणी म्हणून तुम्हाला वाटतं की आजचा मुख्यमंत्री टेक्नो सॅव्ही हवेत. त्यांना राजकारणाशिवाय प्रशासकीय मॅनेजमेंटचाही अनुभव हवा ?अशोक चव्हाण: निश्चितपणे. या सगळ्या गोष्टांना नियोजन लागतं. नुसती भाषणं देऊन काही होत नाही. मला त्यासाठी मॅनेजमेंटचा नक्कीच उपयोग होईल. मला रिझल्ट्स द्यावे लागती, नियोजन करावं लागेल.अर्थात फक्त मॅनेजमेंटवर सगळं भागत नाही. अनुभव लागेल, ज्येष्ठांचा सल्लाही उपयोगी पडतो. हे एक टीम वर्क आहे.निखिल वागळे : तुम्ही 1987 साली पहिल्यांदा खासदार झालात. नंतर 1989 ची निवडणूक हरलात. मग तुम्ही विधानसभेची निवडणू लढलात. हा असा उलटा प्रवास कसा घडला ?अशोक चव्हाण: त्याला एक घटनाच अशी घडली. शंकरराव चव्हाण त्यावेळेस गृहमंत्री होते. मात्र त्यांना त्यावेळेस मुख्यमंत्री म्हणून इथे पाठवण्यात आलं. ती जी लोकसभेची जागा खाली झाली, ती मला मिळावी अशी मी राजीव गांधींकडे मागणी केली. मी त्यावेळेस यूथ काँग्रेसचं काम करत होतो, माझा इथे संपर्क चांगला होता. त्यांनी मला परवानगी दिली आणि ती निवडणूक मी जिंकलो. 1989 मध्ये मी परत लोकसभेची जागा लढवली, पण त्यावेळेस बाबरी मशीद वगैरे प्रकरण चांगलंच तापलं होतं. नंतर मला तिकीट मिळालं नाही. मग सुधाकरराव नाईकांनी मला विधानपरिषदेवर जायची संधी दिली. मग 1992 मध्ये मी विधानसभा निवडणूक लढवली आणि पुढेही लढवत राहिलो निखिल वागळे : मी असं ऐकलंय की राजीव गांधींबरोबरही तुमचे खूप चांगले संबंध होते...अशोक चव्हाण : त्यावेळेस खासदार म्हणून काही कमिटीवर काम करावं लागतं. माझी डिपार्टमेंट ऑफ पर्सनलमध्ये नेमणूक केली. त्याचे अध्यक्ष स्वत: राजीव गांधी होते. त्यावेळेस राजीव गांधींनी अनेक तरुण नेत्यांना खासदार व्हायची संधी दिली होती. गुरुदास कामत होते, मुरलीधर माने होते, विलास मुत्तेमवार होते. त्यावेळेस राजीव गांधींबरोबर काम करण्याची संधी मिळाली, त्यांच्याबरोबर खूप चांगला रॅपो जमला होता. निखिल वागळे : 1992 पासून तुम्ही विधानसभेचे सदस्य आहात. तेव्हापासून तुम्ही अनेक खाती सांभाळलीत. तुम्ही महसूलमंत्री होतात, गृहराज्यमंत्री होतात. नुकतंच तुम्ही उद्योग खातं साभाळत होतात. या सार्‍या अनुभवाचा तुम्हाला कसा फायदा होईल ?अशोक चव्हाण : विविध खात्यांमध्ये काय चालतं, कसं काम होतं, याची मला माहिती आहे. लोकाभिमूख निर्णय घेताना मी जी वेगवेगळी खाती सांभाळली, त्यातल्या अनुभवाचा मला नक्कीच फायदा होतोय. त्या त्या खात्यातल्या प्रश्नांची, चांगल्या बाजूंची मला जाणीव आहे. सगळ्या खात्यांबरोबर एकत्र काम करत असताना समन्वयासाठी मला त्याचा खूप फायदा होतोय. निखिल वागळे : दर वेळेस राजकारणी टीकेचं लक्ष्य होतात आणि अधिकारी बाजूला रहातात. यांना जबाबदार कसं धरता येईल ? अशोक चव्हाण : मी अधिकार्‍यांना दोष देणार नाही. महाराष्ट्रातले अधिकारी कायमच प्रमाणिक होते. आपण त्यांच्याकडून काम कसं करून घेतो, यावर बरच काही अवलंबून असतं...निखिल वागळे : पण अधिकार्‍यांचं असं म्हणणं आहे की मंत्री फार ढवळाढवळ करतात...अशोक चव्हाण : आपली काही तरी गल्लत होतेय. दिशा ठरवणं, हे मंत्र्यांचं काम असतं. त्याची कायद्याच्या चौकटीत राहून अंमलबजावणी करणं हे अधिकार्‍यांचं काम असतं. आणि जर लोकांच्या भल्यासाठी कायदे बदलण्याची गरज असेल, तर ते बदलणं, हे लोकप्रतिनिधींचं काम आहे. पण लोक आमच्याकडे येतात, लोकांच्या मागण्या असतात. कायदे, वशिलेबाजी, या गोष्टींसाठी पण कायदे आहेत. कायद्याच्या चौकटीत राहून जमेल तितकं काम करावं, ही आमची भूमिका आहे. निखिल वागळे : गुरू-ता-गद्दीसाठी तुम्ही नांदेडचा कायापालट केला. तसा कायापालट महाराष्ट्राच्या वाट्याला कधी आणि कसा येणार ? फक्त 6 महिने तुम्हाला मिळाले आहेत...अशोक चव्हाण : चौकार आणि षटकार मारून काम पूर्ण करू. वन डे मॅच मी म्हणणार नाही, पण फार थोड्या ओव्हर्स राहिल्या आहेत. पण ते माझं स्वप्न आहे आणि मी त्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करेन.निखिल वागळे : आता थोडासा कटू प्रश्न विचारतो. हे खरच तुमचं मंत्रीमंडळ आहे का ? म्हणजे तुमच्या सल्ल्यानं निवडलं गेलेलं ? कारण राजीनामा दिल्यावर शक्यतो मुख्यमंत्री सीनमध्ये दिसत नाहीत. पण विलासराव पहिल्या दिवसापासून दिसतायत...अशोक चव्हाण : हे काही माझं वैय्यक्तिक मंत्रीमंडळ नाही. सर्वांशी चर्चा करून हे मंत्रीमंडळ निवडलं गेलंय. सर्वांना बरोबर घेऊन जाणं, हे माझं उद्दिष्ट आहे. मी विलासरावांना भेटलो. मुळात काँग्रेसमध्ये हा प्रश्न येतच नाही. विलासराव असतील, प्रभा राव असतील, सुशीलकुमार असतील, हे सगळे काँग्रेसचे नेते आहेत. या सगळ्यांना बरोबर घेऊनच मी काम करणार...निखिल वागळे : पण तुम्ही विलासरावांना जवळ केल्यामुळे राणे तुमच्यावर चिडले...अशोक चव्हाण : ही सगळी मुख्यमंत्री निवडीची प्रक्रिया सुरू होती तेव्हा राणे माझ्या बाजूला बसले होते. त्यावेळेस मी त्यांना म्हटलो की राणेसाहेब तुम्ही मुख्यमंत्रीपदाची इच्छा व्यक्त केली, ते ठीक आहे. पण आपल्यात कोणतीही वैय्यक्तिक कटुता नको. निर्णय होईपर्यंत राणे असोत, मी असेन किंवा पतंगराव असतील, होईल तो निर्णय मान्य करायला हवा. हे काही अशोक चव्हाणांच्या वैयक्तिक मालकीचं सरकार नाही. आपण एक टीम म्हणून काम करायला हवं.निखिल वागळे : पण राणेंना ते पटलं नाही...अशोक चव्हाण : तो त्यांचा प्रश्न आहे. त्यावर मी प्रतिक्रिया देणारच नाही. राणेंनी माझ्यावर टीका केली तो त्यांच्या स्वभावाचा भाग आहे. निखिल वागळे : राणेंनी निर्णय घेतलेल्या फाईल्स् थांबवण्याचा निर्णय तुम्ही घेतला असं बोललं जातंय...अशोक चव्हाण : फक्त राणेंच्याच नाही, तर जिथे जिथे मला वाटतंय की चुकीचे निर्णय घेतले गेलेत, त्या सगळ्या फाईल्स् थांबवण्याचा निर्णय मी घेतला आहे. चुकीच्या निर्णयाच्या सगळ्या फाईल्स मी थांबवणार.निखिल वागळे : ज्या वाटेवरून राणे चाललेत, त्यावरून येत्या निवडणुकीत ते काँग्रेसला आव्हान देऊ शकतील असं वाटतंय का ?अशोक चव्हाण : राजकारणात आव्हान-प्रतिआव्हान ही प्रक्रिया चालूच असते. असते बरोबर तर चांगलं झालं असतं. पण आज ते कुठे दगडफेक करतायत, कुठे मारामारी होतेय, हे किरकोळ प्रकार चालू आहेत. अशी राज्याची संस्कृती नाही. तुम्ही आपलं मत मांडा, व्यक्त करा, पण हिंसक आंदोलन करून काही होत नाही.निखिल वागळे : राणे शिवसेना संस्कृतीतून बाहेर पडले नाहीत, असं तुम्हला वाटतं का ?अशोक चव्हाण : राणेंच्या संस्कृतीविषयी मला काही वाटत नाहीये. तो त्यांचा निर्णय आहे.निखिल वागळे : तुमच्या मंत्रीमंडळावर अशी टीका होते, की त्यावर राषट्रवादीचा वरचष्मा आहे. तुमचे मंत्री ज्युनियर आहेत, त्यातील काहींवर गुन्हेगारी स्वरुपाचे आरोप आहेत...अशोक चव्हाण : जर आरोप सिद्ध झाले, तर आम्ही जरूर कारवाई करू. पण लोकशाहीत असे आरोप-प्रत्यारोप होत रहातात. पण त्यात किती तथ्य आहे ? त्याची सत्यता काय ? कोर्टाच्या बाहेर होणार्‍या आरोपांना काही अर्थ नाही.निखिल वागळे : राष्ट्रवादीचं आव्हान तुम्ही कसं पेलणार आहात ?अशोक चव्हाण : राष्ट्रवादीचं आव्हान मला वाटत नाही. तो आमचा एक सहकारी पक्ष आहे. फक्त काँग्रेसकडे जे मतदारसंघ आहेत, त्यातील आमच्या उमेदवारांना मदत करण्यासाठी, जिंकून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. आपापसात स्पर्धा करण्यात मला रस नाही.निखिल वागळे : नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीत जनतेनं दाखवून दिलंय की काम करणार्‍या मुख्यमंत्र्यांना सत्ता मिळतेय. शीला दीक्षित जिंकल्या, शिवराजसिंग चौहान यांनी सत्ता राखली, डॉ. रमण सिंग परत निवडून आले. या कसोटीवर महाराष्ट्र सरकार अपयशी ठरलंय. ही प्रतिमा तुम्ही कशी बदलाणार आहात. लोकांचा गमावलेला विश्वास तुम्ही कसा परत मिळवणार आहात ?अशोक चव्हाण : सरकार अपयशी ठरलंय, हे मला मान्य नाही. गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात खूप चांगलं काम झालंय. एक घटना घडली, म्हणून सरकारचं फेल्युअर आपण मानू शकत नाही. सुधारणेला वाव आहे. रिझल्ट ओरिएंटेड सरकार असलं पाहिजे आणि त्यासाठी मी जरूर काम करेन. निखिल वागळे : पण चार वर्षात जे झालं नाही, ते सहा महिन्यात कसं होईल ?अशोक चव्हाण : गेल्या चार वर्षात बरच काही झालं आणि येत्या सहा महिन्यातही बरंच करायचंय.निखिल वागळे : पण विरोधकांना ते मान्य नाही...अशोक चव्हाण : हे विरोधकांचं कामच आहे. ते नाही केलं, तर त्यांना विरोधक कसं म्हणणार ?या मुलाखतीचा शेवट करताना आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे असं म्हणाले की अशोक चव्हाण यांनी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. ठामपणा दाखवला आहे. पुढच्या सहा महिन्यात त्यांना एक लिमिटेड ओव्हर्सची मॅच खेळायची आह. त्या आव्हानाला ते कसं सामोरे जातात आणि काँग्रेस पक्ष आणि सरकारला कसे उभे करतात, हे आपल्याला लवकरच दिसेल.

Live TV

News18 Lokmat
close