नारायण राणे

Showing of 1314 - 1327 from 1329 results
मुख्यमंत्रीपदासाठी चढाओढ सुरू

बातम्याDec 4, 2008

मुख्यमंत्रीपदासाठी चढाओढ सुरू

4 डिसेंबरविलासरावांचा राजीनामा स्वाकारला गेल्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी चढाओढ सुरू झाली आहे. या पदासाठी अनेक इच्छुक नेते देव पाण्यात घालून बसले आहेत तसंच अनेक नेत्यांनी या पदासाठी फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. आता पक्षश्रेष्टींची मेहेरनजर कोणावर होते आणि मुख्यमंत्रीपदाची माळ नेमक्या कोणाच्या गळ्यात पडते, हा उत्सुकतेचा विषय आहे.मुख्यमंत्रीपदाच्या निवडीसाठी गुरुवारी दुपारी तीन वाजता काँग्रेस आमदारांची बैठक होतेय. ही बैठक विधान भवनातल्या काँग्रेस विधीमंडळ पक्षाच्या कार्यालयात होतेय. काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदासाठी सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि नारायण राणे शर्यतीत आहेत. या सर्वात केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांचं नाव आघाडीवर आहे. शिंदे यापूर्वी 2003-2004 सालात मुख्यमंत्री राहिलेत. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसनं 2004 ची निवडणूक जिंकली होती. दलितांची मतं काँग्रेसकडं वळवण्यात शिंदेंनी यश मिळवलं होतं. तोच फॉर्म्युला यावेळी वापरण्यासाठी शिंदे उपयोगी पडू शकतात.प्रशासकीय कामाचा मोठा अनुभव असलेल्या शिंदेंवर काँग्रेस पक्षश्रेष्ठी पुन्हा महाराष्ट्राची जबाबदारी सोपवण्याच्या विचारात आहेत. 2003 मध्ये विलासराव देशमुखांच्या कारभारावर टीका होऊ लागली तशी अस्वस्थ झालेल्या कॉंग्रेसमधल्या ज्येष्ठांनी सुशीलकुमारामकडंच महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद सोपवलं होतं. पुन्हा हा भार स्वीकारायला सुशीलकुमार इच्छुक नव्हते, असंही समजतंय. मात्र पक्षश्रेष्ठी घेतील तो निर्णय मान्य, अशीही सुशीलकुमारांची भूमिका आहे.उद्योगमंत्री अशोक चव्हाण यांच्या मागे त्यांचे वडील शंकरराव चव्हाण यांची पुण्याई आहे. शंकररावांच्या मदतीनं अशोक चव्हाण यांनी दिल्लीत आपला एक गोतावळा तयार केलाय. नांदेड जिल्ह्यात गुरू-ता-गद्दी या शिख धर्मियांच्या सोहळ्याचं उत्तम आयोजन त्यांनी केलं होतं. तसंच, सोनियांच्या सभेस मोठ्या प्रमाणावर लोकही जमवले होते. कधीकाळी विलासरावांच्या जवळ असणारे अशोक चव्हाण सध्या देशमुखविरोधी गटात आहेत. मात्र शरद पवारांचा विरोध त्यांना भोवू शकतो. कराडमधले पृथ्वीराज चव्हाण पंतप्रधान कार्यालयातले राज्यमंत्री आहेत. ते पश्चिम महाराष्ट्रातले आहेत. पण त्यांना मासबेस नाही. शरद पवारांचे विरोधक म्हणून ते ओळखले जातात. दिल्लीतलं राजकारण हेच त्यांच्या राजकारणाचं केंद्र राहिलंय. सोनिया गांधीचे विश्वासू म्हणून ते ओळखले जातात. शिवसेनेत आठ महिने मुख्यमंत्री राहिलेले नारायण राणे हेही मुख्यमंत्र्याच्या शर्यतीत आहेत.शिंदेंच्या सोबत पवारांनी राणेंच्या नावाला अनुकुलता दर्शवलीय. त्यामुळे राणेंचा भाव वधारलाय. राणे कुशल प्रशासक म्हणून ओळखले जातात. मुख्यमंत्रीपदाचा अनुभव आणि पवारांची अनुकुलता हे भांडवल राणेंकडं आहे. पैसा ही त्यांची आणखी एक ताकद आहे. मात्र राणेंनी खुलेआम केलेली पक्षश्रेष्ठींवरची टीका, तसच त्यांनी काँग्रेस संस्कृतीचे अनेक वेळा तोडलेले अलिखित नियम , या त्यांच्या कमकुवत बाजू ठरण्याची शक्यता आहे. तरीही सध्याची परिस्थिती आणि राणेंचा मुख्यमंत्रिपदाचा अनुभव पाहता, राणेंचं नावही ऐनवेळी पुढं येऊ शकतं.य नवीन नेत्याचा निर्णय हा सर्वस्वी ज्या त्या पक्षाचा निर्णय असल्याचं काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते म्हणत असले, तरी आघाडी सरकार चालवताना सर्वमान्य नेता निवडण्याशिवाय दोन्ही पक्षांकडे पर्याय नाही. अर्थात नवा मुख्यमंत्री निवडण्यात राष्ट्रवादी काँग्रेसदेखील महत्त्वाची भूमिका पार पाडणार असल्याचं मानलं जात आहे.