#नाट्यसंमेलन

Showing of 14 - 14 from 14 results
ग्रेट भेटमध्ये लालन सारंग

May 13, 2013

ग्रेट भेटमध्ये लालन सारंग

ग्रेट भेटच्या 16 नोव्हेंबरच्या भागात आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांनी प्रसिद्ध अभिनेत्री लालन सारंग यांची मुलाखत घेतली. भारतीय रंगभूमीवरील बंडखोर अभिनेत्री म्हणून त्यांची ओळख आहे. पण त्यांचं व्यक्तिमत्तव त्याहीपेक्षा बरच गहिरं आहे. बंडखोरपणा त्यांच्या आयुष्यातही आहेत. काळाच्या पुढे जाणार्‍या असंख्य भूमिका त्यांनी केल्या आणि त्यातून निर्माण होणारी वादळं अंगावर घेतली. या मुलाखतीत लालान सारंग यांच्या जीवनातल्या विविध भूमिका उलगडत गेल्या.लालन सारंग मूळच्या गोव्याच्या. पण त्यांचं जन्मापासूनचं आयुष्य मुंबईत गेलं. बंडखोरपणा माझ्या रक्तातच होता असं सांगत त्या म्हणाल्या ' आम्ही सात भावंड होतो. सारी भावंड शिकत असताना फक्त मलाच असं वाटलं की मी नोकरी करून माझं शिक्षण स्वत:च्या हिंमतीवर करावं. दहावी झाल्यानंतर मी एका वॉच कंपनीत काम केलं. तिथं मिळणारा 60 रुपयाचा पगार मी आईच्या हातात देत असे. मग कॉलेज शिक्षण, पुढे सरकारी नोकरी आणि मग टाटा सर्व्हिसेसमध्ये काम केलं. माझ्यावर नोकरीची कोणी सक्ती केली नाही, पण घरची परिस्थिती बघून मी स्वत:च हा निर्णय घेतला. म्हणजे मला असं वाटतं की ही बंडखोरी माझ्याकडे होतीच. ' ' पुढे घरात नाटक नसतानाही नाटकात येणं हे माझं भाग्य होतं. खर तर लहानपणापासून मी गॅदरिंग किंवा इतर कोणत्या कार्यक्रमात भाग घेतला नव्हता. आणि असंच एक दिवस ज्युनिअर बीए ला असताना मी असंच भारती विद्याभवनच्या नाटकांच्या स्पर्धेत भाग घेतला. मला नाटक कर म्हणून कोणी सुचवलं नाही, पण असंच मी एक दिवस उठले आणि स्पर्धेसाठी जे सिलेक्शन होतं त्याला उभी राहिले. मला अजूनही असं वाटतं की मुली कमी होत्या म्हणून मला घेतलं. त्यावेळेस कमलाकर सारंग यांनी आमच्या नाटकाची रिहर्सल बघितल्यावर तर अशी कॉमेंट केली होती की ही मुलगी एवढी बावळट असताना तिला नाटकात का घेतलं ? आणि खर सांगायचं त्यांची कॉमेन्ट खरी असावी, अशीच मी तेव्हा होते. पण माझ्यातली जिद्द इथे माझ्या उपयोगी पडली. मी स्वत:मध्ये सुधारणा घडवून आणली आणि मग पुढचा मार्ग गवसत गेला. 'पहिल्या वर्षी ' बावळट मुलगी ' म्हणून कमलाकर सारंग यांनी जिला हिणवलं त्याच लालन सारंग यांना कमलाकर सारंग यांनी पुढच्या वर्षी स्वत:च्या नाटकात रोल दिला. हे कसं झालं ? कमलाकर सारंग त्यांच्या प्रेमात पडले होते का ? या प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या ' त्यावेळेस तो माझा फक्त मित्र होता. पहिल्या नाटकानंतर आमची ओळख झाली, मग वेगवेगळ्या नाटकात काम करत असताना आमची ओळख वाढत गेली. कालांतरानं आम्ही एकाच संस्थेचं काम करू लागलो आणि आमची मैत्री झाली. त्यावेळेस प्रेमात वगैरे पडण्याचा संबंधच नव्हता कारण तो त्यावेळेस दुसर्‍या मुलीच्या प्रेमात होता. माझ्यासमोर तिच्याबरोबर फिरतही होता. पहिल्यापासूनच कमलाकरचं व्यक्तिमत्त्व जरासं वेगळं होतं. एक तर जनरल कोकणी माणसाप्रमाणे तो कुजकट बोलायचा. पण साहित्य नाटक याचं त्याला प्रचंड नॉलेज होतं. एक प्रकारचं औदार्य त्याच्या व्यक्तिमत्त्वात होतं. त्यामुळे मला तो आवडायला लागला, पण त्याला तसं काही विचारायचं धाडस मी कधीच केलं नाही. पुढे त्याच्या चार्टर बँकेच्या नाटकात जेव्हा मी केलं तेव्हा आमचं संभाषण जास्त वाढत गेलं. तोपर्यंत त्याचं पहिलं प्रेमप्रकरण संपलं होतं. मग त्यानं मला लग्नासाठी विचारलं आणि मी हो म्हटलं. गंमत म्हणजे मला असं वाटायचं की आपलं लग्न श्रीमंत कुटुंबात व्हावं. म्हणजे जे माज्या आईने भोगलं, ते मला भोगावं लागू नये. पण कमलाकरशी लग्न केल्यावर मला आगीतून फुफाट्यात पडल्यासारखं झालं. ' कमलाकर सारंगांविषयी बोलताना त्या म्हणाल्या. ' नवरा वगैरेपेक्षा कमलाकर माझा चांगला मित्र होता. त्यानं उठसूठ माझी स्तुती केली नाही, पण तो एवढंच म्हणायचा की लालन जी भूमिका करते, त्याच्यासारखीच ती दिसते. त्याच्या आयुष्याला स्थैर्य कदाचित माझ्यामुळे मिळालं असेल, पण त्याच्याबरोबर माझी वाढ होत गेली. 'सखाराम बाईंडरच्या आधीही लालन सारंग यांनी सहा व्यावसायिक नाटकं केली होती. पण लालन सारंग यांच्या आयुष्यातला माइल स्टोन रोल म्हणजे सखाराम बाईंडरमधली ' चंपा. ' या भूमिकेनं त्यांना नवी ओळख मिळवून दिली. कमलाकर सारंग यांच्या आग्रहामुळे त्यांना ही भूमिका मिळाली का ? या प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या, ' सखाराम बाईंडर हे तेंडुलकरांनी लिहिल्यापासूनच चर्चेत होतं. अनेक दिग्गजांना नाकारून तेंडुलकरांनी हे नाटक कमलाकर सारंगांना दिलं होतं. त्यावेळेस तो या भूमिकेला योग्य अशा अभिनेत्रीच्या शोधात होता. पण तेंडुलकारांच्या मर्जीशिवाय चंपा ठरणार नव्हती. माझं नाव डॉ. कुमुद मेहतांनी सुचवलं. सुरुवातीला तेंडुलकर सरळ नाही म्हणाले होते. पण मग जेव्हा कुमुद मेहतांनी खूपच आग्रह केला तेव्हा तेंडुलकरांनी मी काम करत असलेली डॉ. सत्यदेव दुबेंच्या स्टील फ्रेम या नाटकातली भूमिका पाहिली आणि माझी निवड केली. ' सखाराम बाईंडरमधल्या चंपासारखं कोणतही कॅरेक्टर मराठी रंगभूमीवर आलं नव्हतं. मग या भूमिकेसाठी केलेल्या तयारीविषयी बोलताना लालन सारंग म्हणाल्या, ' खर तर कर म्हटल्यावर ते माझ्या अंगावर आलं. मी स्क्रिप्ट आधीच वाचलं होतं. मला चॉइस दिला असता तर मी लक्ष्मी केली असती. पण चंपाचं कॅरेक्टर कथेत जेवढं स्ट्राँग दाखवलय, तेवढं ते साकार करता यायला हवं, या दृष्टीने मला बरीच तयारी करावी लागली. म्हणजे या बाईमुळे सखारामचं जीवन बदललं हा फील प्रेक्षकांना द्यायचा असेल तर काय करायचं, याची मी बरीच चर्चा केली. गेटअप कसा असावा, आवाजाचा बेस कसा असावा, आकर्षक दिसण्यासाठी काय करावं या सगळ्यवर मी आणि सारंगनी बरीच मेहनत घेतली. तिचं चालणं दिसणं हा प्रकार मी लहानपणी गिरगावात दिसणार्‍या डबेवाल्या बायकांकडून शिकले. त्यांची साडी नेसण्याच्या पद्धतीमुळे चालीत आपोआप एक रांगडेपणा दिसतो. पण खर सांगायचं तर हे कॅरेक्टर इतिहास घडवू शकेल, असं मला अजिबात वाटलं नव्हतं. फक्त बाईंडरलाच नाही तर प्रेक्षकांनाही खलास करणारं एक व्यक्तिमत्त्व माझ्याकडे आहे, ही जाणीव मला चंपानं दिली. 'सखाराम बाईंडरमधले लालन सारंग यांचे सहकलाकार म्हणजे निळू फुले. निळू फुलेंविषयी बोलताना त्या म्हणाल्या, ' निळू फुले हे सहकलाकार म्हणून फार चांगले आहेत. ते कुठेही ओव्हरपॉवर करायला जात नाहीत ते खूप साधे होते. सहकलाकार म्हणून त्यांचा कोणताही त्रास झाला नाही. अर्थात आपल्या समोरच्या माणसाच्या बोलण्याची पद्धत किंवा अभिनयाची तर्‍हा याचा समोरच्या माणसावर फरक पडतोच. आमची केमिस्ट्री एवढी छान जमली होती की कोणत्याही कॅरेक्टरनं दुसर्‍याला ओव्हरपावर केलं नाही. 'सखाराम बाईंडर म्हणजे लालन ताईंच्या जीवनातलं एक वादळी पर्व. महाराष्ट्राच्या इतिहासात दुसर्‍या कोणत्याही नाटकावरून इतके वाद झाले नाहीत. दुसर्‍या कोणत्याही नाटकासाठी इतकी मोठी लढाई झाली नाही. त्या अनुभवाविषयी बोलताना लालन सारंग म्हणाल्या, ' तेव्हा हे सगळे खूप दु:खद आणि घाबरवणारं होतं. माझ्या वैयक्तिक आयुष्य त्यामुळे खूप ढवळून निगालं. पण आम्ही ते झेललं. आता विचार केला तर कळतं की आम्ही ते खूप चांगल्या पद्धतीनं झेललं. याचं कारण म्हणजे मला सारंगची खूप चांगली साथ होती. म्हणजे कोणी काही बोललं तर त्या क्षणापुरता त्रास झाला, पण मी ते सहन करू शकले. समजा दुसरा कोणता दिग्दर्शक असता तर खूप फरक पडला असता. 'एवढं वादळ झाल्यावरही कमलाकर सारंग यांनी दिग्दर्शक म्हणून किंवा लालन सारंग यांनी अभिनेत्री म्हणून हे नाटक बंद पडू दिलं नाही. आपल्या या जिद्दीविषयी त्या म्हणाल्या, ' मला कधी भीती वाटली नाही. कारण प्रेक्षक योऊन सांगायचे की आमचा विरोध तुम्हाला नाही, तर तेंडुलकरांना आहे. माझ्या विरोधकांनीदेखील माझ्या अभिनयाचं बरच कौतुक केलं. प्रेक्षक तर राहूच द्या पण माझ्या सहकलाकाराने देखील जाहीर सभेत माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले. पण आम्ही सगळ्यांना पुरून उरलो. खर तर हा आमच्या आयुष्यातला सगळ्यात खडतर काळ होता. कारण एक तर लग्न झाल्यानंतर 9 वर्ष आम्हाला स्वत:ची जागा नव्हती. बाईंडर नाटकाच्या वादामुळे कमलाकर सारंग यांना नोकरी सोडावी लागली. त्यामुळे घरात पैशाची चणचण. तोपर्यंत मला मुलगाही झाला होता. त्याला नाटकामुळे मी सांभाळू शकत नव्हते. त्याला माझी आई सांभाळत होती. एवढे सगळे खर्च आणि सारंगना लहा महिने पगार मिळाला नाही. पण आम्ही हे सगळं निभावून नेलं. 'सखाराम बाईंडरवरून झालेल्या वादाचा त्रास लालन सारंग यांच्या सगळ्या कुटुंबियांना भोगावा लागला. त्याविषयी बोलताना त्या म्हणाल्या ' माझा मुलगा तर माझ्या आईकडे होता. त्यामुळे त्याला तुलनेनं कमी त्रास झाला. माझ्या आई वडिलांनी कधी असं काही बोलून दाखवलं नाही. सारंगच्या आई वडिलांची नाराजी असण्याची शक्यता आहे. पण त्याही कधी बोलल्या नाहीत. कारण त्यांना माहीत होतं, की त्यांचा मुलगाच यात केंद्रस्थानी होता. पण जरा वेगळा विचार करायचा झाला तर आमच्या लढ्याचे संस्कार आमच्या मुलावरही झाले. तो आज आमच्यापेक्षाही पुढे गेला कारण हे सगळं त्यानं लहानपणापासून बघितलं होतं. तो लहानपणापासून नाट्यवाचनाला यायचा. सुचना द्यायचा, ते प्रोफेशनली चालेल का, यावर मत द्यायचा. या सगळ्या प्रक्रियेचा त्याला नक्कीच उपयोग झाला. ' बाईंडरच्या लढा कमलाकर आणि लालन सारंग एकाकी लढले, तेंडुलकरांनीही त्यांना साथ दिली, या आरोपाचा लालन सारंग यांनी स्पष्ट शब्दात इन्कार केला. ' ते परदेशात होते म्हणून या लढ्यात प्रत्यक्ष सहभागी होऊ शकले नाहीत, पण त्यांचा आम्हाला नेहमीच आधार होता ' , असं लालन सारंग यांनी सांगितलं.लालन सारंग या तेंडुलकरांच्या नायिका म्हणून ओळखल्या जातात. सखाराम बाईंडर, घरटे आमचे छान, बेबी, कमला अशा तेंडुलकारांच्या नाटकांनी लालन सारंग यांना बरच काही मिळवून दिलं. त्याविषयी बोलताना लालन सारंग म्हणाल्या, ' या भूमिका साकारताना माझीही वैचारिक वाढ होत गेली. बाईंडरमधल्या चंपा पेक्षाही माझ्या मते बेबी साकारणं जास्त अवघड होतं. मी आज जेव्हा विचार करते तेव्हा, मी हा रोल कसा केला, याचं मलाच आश्चर्य वाटतं. बेबीनं मला धाडस दिलं, बिनधास्तपणा दिला. सरितानं मला खासगी आयुष्यात बरच काही दिलं. मला असं वाटतं की सरिता ही प्रत्येक स्रीचं प्रतिनिधित्व करते. मला यानिमित्तानं एक वेगळा विचार असा दिला की स्त्री दबली जाते यामध्ये स्त्रीला ते कुठेतरी आवडतं. हा संसार माझा आहे, माझा मुलगा, माझा नवरा हे जे सगळं आहे, ते कुठेतरी तिला आवडतं त्यामुळे पुरुषापेक्षा दुय्यम स्थान ती स्वत:च स्वीकारते, असं मला जाणवलं. 'श्री. ना पेंडसेच्या रथचक्रतील भूमिकेविषयी बोलताना लालन सारंग म्हणाल्या ' या भूमिकेनं खर तर स्त्री म्हणून मला दुबळं केलं. कारण या नाटकात आई म्हणून मी जो काही त्रास भोगत होते, त्याचं माझ्या पर्सनल आयुष्याबरोबर तुलना व्हायला लागली. म्हणजे नाटकात ज्या मुलांच्या भविष्यासाठी मी धडपडत होते, त्या वयाचा मुलगा माझ्या घरात होता. पण या करिअरमुळे माझ्या मुलाकडे माझं दुर्लक्ष होतंय. का असं मला सतत वाटत राहिलं. त्या नाटकातली भूमिका साकारताना मला सतत माझ्या आईची आठवण येत राहिली. तसेच कष्ट माझ्या आईने केलेत, ते मला सतत आठवत राहिलं. ' नाटक आणि वैयक्तिक आयुष्य वेगवेगळं ठेवायला हवं, हे लालन सारंग यांनी मान्य केलं. पण ही डिटॅचमेंट दर वेळेस जमतेच असं नाही, हे ही त्यांनी सांगितलं. ' माझ्या वैयक्तिक आयुष्यात मला हे जमलं नाही ' असं त्या म्हणाल्या. ही डिटॅचमेंट सिनेमात जमते, पण नाटकात हे अवघड आहे, असं त्यांनी सांगितलं. गुजराती, मराठी आणि हिंदी या तिन्ही रंगभूमीवर काम केल्यावरही मराठी रंगभूमी ही लालन सारंग याची सर्वात आवडती रंगभूमी आहे.नाटकाइतकं सिनेमात का रमल्या नाहीत, या प्रश्नाचं उत्तर देताना लालन सारंग म्हणाल्या ' जितेंद्र किंवा धर्मेंद्रची आई बनण्यात मला रस नव्हता. पैशांसाठी मी कधीच काम केलं नाही. तितक्या चांगल्या भूमिका मला सिनेमात मिळाल्या नाहीत. मालिकांच्या बाबतीत बोलायचं तर दूरदर्शनचे दिवस होते, तेव्हा मला ते पटलं. पण आताच्या मालिका बघून तिकडे वळण्याची इच्छा होत नाही. ' नाटक हे लालनताईंचं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहे.सध्याच्या नाट्यव्यवसायाविषयी लालनताई फारशा समाधानी दिसल्या नाहीत. चांगली नाटकं येतच नाहीत, असं मत त्यांनी व्यक्त केलं. समांतर आणि बालरंगभूमीला द्यायला हवं तितकं महत्त्व दिलं जात नाही, म्हणूनच त्याविषयी नाट्यसंमेलनाध्यक्ष असताना आवाज उठवला असं सांगत त्या म्हणाल्या, ' चांगले नाटककार नाहीत, असं मला अजिबातच वाटत नाही. पण टिव्ही आणि इतर गोष्टींचं प्रस्थ इतकं वाढलंय की त्यात चांगल्या लोकांना नाटकासाठी वेळ मिळत नसावा. ' नवीन कलाकारांची रंगभूमीविषयीची ओढ आणि आपुलकी कमी झाली आहे. सवंग लोकप्रियतेच्या मागे नवीन कलाकार धावत असल्याचं त्या म्हणाल्या.लालन सारंग या मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षाही होत्या. इतिहासात मोजक्याच महिलांना हा मान मिळाला आहे. त्या अनुभवाविषयी बोलताना त्या म्हणाल्या ' नाट्यसंमेलन मालवणमध्ये होणार होतं. कमलाकर सारंगांचं शिक्षण तिथे झालं होतं. त्यांनी पहिलं नाटक तिथे केलं. त्यांची आठवण जपावी, म्हणून मी हे पद स्वीकारलं. पण मला ते पद द्यायचं नाही, म्हणून बरच राजकारण झालं. पण मी त्या कशात पडले नाही ' अनुदान संस्कृतीविषयी आपली परखड मतं व्यक्त करताना त्या म्हणाल्या ' अनुदान द्यायचं असेल तर गुणवत्तेवर द्यावं. ते नाटक आधी बघावं, आणि त्याचे आणखी प्रयोग व्हावेत, असं जर वाटलं, तर अनुदान द्यावं. ' नारायण राणे यांनी मालवणात कमलाकर सारंग अकादमी स्थापन करण्याची घोषणा केली होती. ' त्यांना वाटत असेल तर त्यांनी करावं, पण त्यासाठी मी नारायण राणेंच्या मागे लागणार नाही ' असं लालन सारंग यांनी स्पष्ट केलं.अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध असणार्‍या लालन सारंग या उत्तम गृहिणीही आहेत. त्या उत्तम स्वयंपाक करतात. पाककलांवर त्यांनी पुस्तकं लिहिली आहेत. मधल्या काळात त्यांनी बुटिकही काढलं. त्या उत्तम वाचक आहेत आणि शिवाय त्यांचं लेखनही चालू आहे. ' माझ्यात बंडखोर स्त्री आणि गृहिणी यांचं कॉम्बिनेशन आहे. मी चांगली कलाकार आहे की नाही, ते लोकांनी ठरवावं, मात्र मी एक चांगली गृहिणी नक्कीच आहे ' असं त्या म्हणाल्या.आपल्या आताच्या आयुष्याविषयी बोलताना त्या म्हणाल्या ' कमलाकर सारंग आजारी असताना त्यांच्यासाठी म्हणून मी पुण्याला आले. पण दुदैर्वानं पुण्याला आल्यावर दोन वर्षात त्यांचं निधन झालं. नंतर काही वर्ष मी पुण्याहून शुटिंगसाठी मुंबईलाही येत होते. मधल्या काळात माझी नात माझ्याबरोबर होती. आता लोकांना वाटतं मी एकटी आहे. पण माझं एक तत्वज्ञान आहे. कित्येकदा माणसांच्या गर्दीतही आपण एकटेच असतो. त्यापेक्षा आहे ते एकटेपण हसत खेळत आनंदानं स्वीकारावं. दु:ख अनेक असतात. पण त्यामुळे रडत बसण्यापेक्षा एक छान आयुष्य जगून दाखवावं. माझा सध्या हाच प्रयत्न सुरू आहे 'या मुलाखतीचा शेवट करताना आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे म्हणाले ' ही मुलाखत म्हणजे कहाणी आहे एका समृद्ध आयुष्याची. या आयुष्याकडून बरच काही शिकण्यासारखं आहे. लालन सारंग एकट्या नाहीत, तर आपण सगळे त्यांच्याबरोबर आहोत. '