दहशतवादी हल्ला

Showing of 391 - 404 from 417 results
दहशतवादाचं राजकारण करण्याचा राजकीय पक्षांचा डाव फसलाय का ? (भाग : 2)

देशDec 10, 2008

दहशतवादाचं राजकारण करण्याचा राजकीय पक्षांचा डाव फसलाय का ? (भाग : 2)

मुंबईतल्या अतिरेकी हल्ल्यांनंतर म्हणजे 26 नोव्हेंबर नंतर भारतातल्या काही राज्यांत मतदान झालं होतं. उदाहरणार्थ दिल्लीत, राजस्थान या ठिकाणी मतदान झालं. तरीही कुठेही मतदानावर या दहशतवादाचं सावट आढळलं नाही. केंद्र सरकार काँग्रेसच्या नेतृत्वाखाली असल्यामुळे काँग्रेस पक्षावर निवडणुकी दरम्यान या दहशतवादी हल्ल्याचा परिणाम होईल, असं बोललं जात होतं. तसं दिल्लीत झालेलं काही दिसलं नाही. दिल्लीतल्या मतदानाच्या एक दिवस आधी भारतीय जनता पक्षाने मोठमोठ्या जाहिराती दिल्या होत्या. त्या जाहिरांतीत असं म्हटलं होतं की, काँग्रेस पक्ष या देशाचं संरक्षण करू शकत नाही. तरीसुद्धा दिल्लीकरांनी दिल्लीमध्ये परत एकदा काँग्रेसची सत्ता आणली आहे. या घटनेवर ' आजचा सवाल 'चा प्रश्न आधारित होता. दहशतवादाचं राजकारण करण्याचा राजकीय पक्षांचा डाव फसलाय का, असा प्रश्न ' आजचा सवाल 'मध्ये विचारण्यात आला होता. या प्रश्नावरच्या चर्चेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी बसवराज पाटील-नाग्रळकर, महाराष्ट्र भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे, पत्रकार चंद्रकांत वानखेडे, सामाजिक कार्यकर्ते जावेद आनंद यांचा सहभाग होता. दहशतवादाचं राजकरण करण्याचा राजकीय पक्षांचा डाव फसलाय का, यावर उत्तर देताना बसवराज पाटील-नाग्रळकर, म्हणाले - " भारतीय जनता पक्ष आणि इतर पक्षांनी देशाचं संरक्षणसारख्या महत्त्वाच्या मुद्यावरून राजकारण करण्याचा प्रयत्न होता तो त्यांच्या दुदैर्वानं फसला आहे. या आधी अतिरेक्यांनी जेव्हा संसदेवर हल्ला केला होता, त्यावेळी एकसंघपणाने सोनिया गांधी यांनी देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका घेत "आम्ही तुमच्याबरोबर आहोत. आपण सगळ्यांनी एक येऊन दहशतवादाचा मुकाबला करू, " असं त्या म्हणाल्या होत्या. पण भाजपने दिल्लीतल्या निवडणुकीचा वापर काँग्रेसविरुद्ध प्रचार करण्यासाठी वापर केला आहे. मात्र दहशतवादाला राजकीय मुद्दा करून राजकारण करण्याच्या मुद्द्याला लोकांनी नाकारलं आहे." " दहशतवादसारखे मुद्दे निवडणुकीच्या राजकारणाचे नाहीत, हे जनतेने राजकरण्यांना ठामपणे सांगितलं आहे. राजकारणाच्या बाहेर जाऊन असे मुद्दे सोडवण्याची गरज आहे. मुंबईवर जो दहशतवादी हल्ला झाला आहे ही जागतिक आपत्ती आहे ती कोणा पक्षावर आलेली आपत्ती नाहीये. कोणत्याही पक्षाने या पुढे अशा गंभीर मुद्द्यांवरून राजकारण करू नये असा सणसणीत इशारा इथल्या भारतीय जनतेने दिला आहे. मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला आहे, तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्रसिंग मोदी पंतप्रधान असल्यासारखे मुंबईत येतात आणि कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा करतात हा जो थिल्लरपणा होता यालाही या देशातल्या नागरिकांनी चपराक दिली आहे. राजकारणाच्या संदर्भात सगळ्या तथाकथित पक्षाच्या राजकारण्यांनी दहशतवाद, भ्रष्टाचार आणि नैतिकता यांना राजकारणाचा मुद्दा करू नये. कारण जगळेच राजकारणी कमीअधिक प्रमाणात यात बरबटलेले आहेत. हे राजकीय पक्ष निवडणुकीचा मुद्दा करून याचं राजकारण हे भारतातल्य लोकांना आवडत नाही, हा मुद्दा दहशतवादी हल्ल्यांनंतरच्या निवडणुकीतून सिद्ध झाला आहे, " असं विश्लेषण पत्रकार चंद्रकांत वानखेडे यांनी चर्चेत केलं. 26/11च्या मुंबई हल्ल्याच्या दुस-या दिवशी दिल्लीतल्या वर्तमानपत्रांतून भाजपनं जाहिरातबाजी केली होती. तरीसुद्धा भाजपला दिल्लीत तग धरता आलं नाहीये. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपवर कडाडून टीका होत आहे. दहशतवादाचा फायदा घेण्याचा भाजपने प्रयत्न केला असल्याचा अरोप भाजपवर आहे... या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे बोलतात, " 26 / 11 च्या मुंबई हल्ल्याचा इशू केला यापेक्षा या हल्ल्याचे लॅप्सेस काय होते, याचे लोकांसमोर मुद्दे मांडले पाहिजेत. नाहीतर मग शिवराज पाटील, विलाराव देशमुख, आर. आर. पाटील यांचे राजीनामे स्वीकारण्याची गरज तरी काय होती. राष्ट्रवादी काँग्रेसला, काँग्रेसला जनतेसमोर सेफ यायचं होतं, हे या राजीनाम्यामागचं महत्त्वाचं कारण आहे. दिल्लीची निवडणूक ही मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्याच्या दुस-या दिवशी झाली आणि त्याच्यानंतर राजस्थानमधली विधानसभा निवडणुक झाली. राजस्थानच्या निवडणुकीच्या निकालावरून तरी लोकांनी काय समजायचं ते समजावं. सगळ्या राजकीय पक्षांनी एकत्र येऊन मुंबईच्या नव्हे तर देशाच्या सुरक्षेच्या मुद्द्याचा विचार करायला पाहिजे, अशी आपल्या देशातल्या नागरिकांची भूमिका आहे. त्या भूमिकेशी सहमत आहे. पण लोकशाहीमध्ये निवडणुकीच्या राजकारणामध्ये विरोधीपक्ष नेत्यांनी जर अशाप्रकारचे मुद्दे मांडले तर ते यश की अपयश यावर गेल्या 4 दिवसांच्या घटनांवरून विश्लेषण करणं ही मला घाई वाटेल. "दहशतवादाचं राजकारण करण्याची आपल्या राजकीय पक्षांची जी सवय आहे, ते पुढे चालणार की नाही यावर सामाजिक कार्यकर्ते जावेद आनंद सांगतात, " राजकारणी लोकांनी कुठल्याही मुद्याचं राजकारण केलं आम्ही ते चालवून घेणार नाही, आम्ही अशा राजकारणाला बळी पडणार नाही हे लोकांनी मतदानातून सांगितलं आहे. जो नेता वा ज्या पक्षाचा नेता नागरिकांच्या मूलभूत गरजा भागवतो अशा नेत्याला जनतेने निवडून दिलं आहे. 26/11ची घटना घडेपर्यंत एटीएस प्रमुख हेमंत करकरे हे हिंदुत्त्ववादी पक्षांचे दुश्मन होते. 26/11च्या घटनेनंतर हिंदुत्त्वावदी संघटना त्यांच्या नावाचा उदोउदो करायला लागली होती. माझी सर्व नेत्यांना रिक्वेस्ट अशी आहे की निदान आता तरी भानावर या. देशाच्या संरक्षणासाठी तरी एक व्हा." " सर्व राजकीय पक्षांना जनता असं सांगत आहे की, दहशतवाद ही अतिशय गंभीर बाब आहे. तिचं राजकारण करू नका. दिल्लीतल्या आणि राजस्थानातल्या मतदारांनी त्यांचा डाव उधळून लावला आहे, तसा डाव संपूर्ण भारतातल्या जनतेने उधळला तर राजकारण्यांना धडा मिळेल, " असं मत निखिल वागळे यांनी चर्चेचा शेवट करताना व्यक्त केलं. दहशतवादाचं राजकारण करण्याचा राजकीय पक्षांचा डाव फसलाय का ? या प्रश्नावर 58 टक्के लोकांचं नाही असं म्हणणं आहे, तर 42 टक्के लोकांचं होय असं म्हणणं आहे. " याचाच अर्थ असा की, आगामी निवडणुकांच्या काळात राजकीय पक्ष दहशतवादाचं राजकारण करणार असल्याचं लोकांचं म्हणणं आहे. पण जनता सार्वभौम आहे, राजकारण्यांचा डाव आपण उधळू शकतो. दहशतवादाच्या राक्षसाला धमे, जात, पंथ यांच्या सीमा विसरून रोखाला पाहिजे," असंही निखिल वागळे चर्चेचा शेवट करताना म्हणाले.