गडचिरोली

Showing of 677 - 690 from 713 results
वसा आरोग्यसेवेचा...

बातम्याApr 10, 2010

वसा आरोग्यसेवेचा...

प्रशांत कोरटकर, गडचिरोलीमहाराष्ट्रात समाजसेवेचे व्रत घेतलेले एक दाम्पत्य म्हणजे डॉक्टर. अभय आणि राणी बंग. आरोग्य क्षेत्र आणि समाजात बदल घडवण्याचे व्रत त्यांनी घेतलं आहे. आदिवासींच्या सेवेसाठी त्यांनी आपले आयुष्य अर्पण केलं आहे. गडचिरोली...नक्षलवाद्यांचा प्रभाव आणि कुपोषणाची भीषण समस्या अशा दुहेरी संकटांनी वेढलेला जिल्हा...समस्यांमुळे चर्चेत असला तरी विकासकामांबाबत हा प्रदेश कायम दुर्लक्षिला गेला आहे...जंगलानं वेढलेल्या याच गडचिरोलीत शोधग्राम उभं राहिलं आहे...आणि त्यानं वसा घेतला आहे, दुर्गम भागात राहणार्‍या आदिवासींच्या आरोग्याची सेवा करण्याचा.गडचिरोलीपासून 17 किलोमीटरवर असलेल्या चातगावजवळ डॉ.अभय आणि राणी बंग यांनी 1993 मध्ये सर्च म्हणजे सोसायटी फॉर एज्युकेशन,ऍक्शन रिसर्च इन कम्युनिटी हेल्थची सुरूवात केली...आरोग्यसेवा इथल्यापुरती मर्यादित न ठेवता, त्यांनी ती गावागावात पोहचवली. त्यातून आरोग्यदूत ही नवी संकल्पना समोर आणली. इथल्या आदिवासी स्त्रियांना आरोग्य शिक्षित बनवण्याचा वसाच बंग दाम्पत्यांनं घेतला. डॉक्टर बंग यांचं मार्गदर्शन घ्यायला विविध जिल्ह्यातले तरूण शोधग्राममध्ये येतात. लॅन्सेट या जगप्रसिद्ध मेडिकल जर्नलनेही त्यांच्या स्त्री आरोग्यावरील संशोधनाची दखल घेतली. शोधग्राममधल्या आरोग्य शिबिरांनाही आता चांगला प्रतिसाद मिळू लागलाय... लोकांमध्ये वाढत चाललेली आरोग्याबाबतची जागरूकता त्यामुळं दिसून येतेय. आदिवासींच्या दंतेश्वरी देवीचं नाव इथल्या दवाखान्याला देण्यात आलंय. महात्मा गांधी यांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचारही केला जातो. आरोग्य क्षेत्रातल्या बंग यांच्या या भरीव कामगिरीचा अनेक पुरस्कारांनी गौरवही झालाय. बालमृत्यूचं प्रमाण कमी करणारा अंकुरसारखा प्रकल्प असो किंवा व्यसनमुक्तीसाठी केलेले प्रयत्न...शोधग्राममध्ये समाजसेवेसाठी झटणारे फक्त हे दोघंच राहिले नसून, त्यांना आता अनेकांचं पाठबळ मिळालं आहे. सर्चद्वारे निर्माण केलेली आरोग्यदूतांची साखळी असो किंवा अंकुर प्रकल्प, व्यसनमुक्तीसाठीचे प्रयत्न...बंग दाम्पत्यांनं त्यांच्या परीनं महाष्ट्रासाठी खूप काही केलं...पण हे प्रश्नच मुळी इतके मोठे आहेत की असे शोधग्राम महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात निर्माण होण्याची गरज आहे.