कल्याण, 30 जून: स्मार्ट सिटीचं स्वप्न पाहणाऱ्या कल्याणची अवस्था आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. ऐन पावसाळ्यात कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन सेवेची पोलखोल झाली आहे. केडीएमसीच्या चालकानं चक्क डोक्यावर छत्री धरुन केडीएमटी गळकी बस चालवली. हा व्हीडिओ चांगलाच व्हायरल झाला. धक्कादायक म्हणजे एका हातात छत्री त्याच हातात मोबाईल धरुन एका हाताने हे चालक बस चालवत होते. ही बस चालकाच्या जागीच नाही तर मागच्या बाजूलाही गळत होती. त्यामुळे प्रवाशांनाही छत्री डोक्यावर धरुन प्रवास करावा लागत होता. आता या व्हिडिओनंतर संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश परिवहन सभापतींनी दिले आहेत. परिवहन मंडळ गळक्या बस सुधारणार का हे पाहाणंही महत्त्वाचं आहे.