काँग्रेस

Showing of 8906 - 8919 from 10398 results
माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांचं निधन

बातम्याNov 30, 2012

माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांचं निधन

30 नोव्हेंबरदेशाचे माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांचं शुक्रवारी निधन झालं. ते 93 वर्षांचे होते. दिल्लीजवळच्या गुडगावमधल्या मेदांता हॉस्पिटलमध्ये 3 वाजून 25 मिनिटांनी त्यांचं निधन झालं. छातीत झालेल्या संसर्गमामुळे त्यांना 19 नोव्हेंबरला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना काही दिवस व्हेंटिलेटरवरही ठेवण्यात आलं होतं. इंद्रकुमार गुजराल देशाचे बारावे पंतप्रधान होते. 1997-98 काळात त्यांनी पंतप्रधानपद भूषवलं. त्यांच्या निधनामुळे लोकसभा आणि राज्यसभेचं काम सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं आहे. शेजारच्या देशांशी संबंध सुधारण्यासाठी गुजराल यांनी तयार केलेलं धोरण `गुजराल डॉक्टट्रीन` म्हणून प्रसिध्द आहे. केंद्रात अनेक खाती त्यांनी सांभाळली होती. उर्दू भाषेवर त्यांचं प्रभुत्व होतं. 1942 च्या स्वातंत्र्यलढ्यातही त्यांनी सहभाग घेतला होता. तसंच गुजराल यांचं भारत छोडोत योगदान दिलं होतं. गुजराल यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात दिल्ली महानगरपालिकेपासून झाली.१९५९ ते १९६४ या काळात त्यांनी महानगरपालिकेचे उपाध्यक्ष म्हणून काम बघितले. १९६४ मध्ये ते राज्यसभेवर काँग्रेसच्या तिकिटावर निवडून गेले. १९६७ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी त्यांना संसदीय कामकाज आणि दळणवळण या खात्यांचे राज्यमंत्री म्हणून नेमले. नंतरच्या काळात त्यांनी माहिती आणि प्रसारण, नगरविकास आणि दूरसंचार या खात्यांचे राज्यमंत्री म्हणून काम केले. नंतर त्यांचे खाते बदलून त्यांना नियोजन खात्याचे राज्यमंत्री करण्यात आले, असेही म्हटले जाते. १९७६ मध्ये सरकारने त्यांना भारताचे सोव्हियेट संघातील राजदूत म्हणून नेमले. ते त्या पदावर १९८०पर्यंत होते.१९८० च्या दशकाच्या मध्यात गुजराल यांनी काँग्रेस पक्ष सोडून जनता दलात प्रवेश केला. १९८९ च्या लोकसभा निवडणुकीत ते पंजाबमधील जालंधर लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले. १९८९ मधील निवडणुकीनंतर पंतप्रधान झालेल्या विश्वनाथ प्रताप सिंग यांनी त्यांना भारताचे परराष्ट्रमंत्री म्हणून नेमले. १९९० आँगस्ट मध्ये सद्दाम हुसेन यांच्या इराकने कुवैतवर आक्रमण करून तो देश काबीज केला. त्यानंतर भारताचे प्रतिनिधी म्हणून गुजराल यांनी स्वतः हुसेन यांची बगदादमध्ये भेट घेतली. त्या भेटीदरम्यान त्यांनी हुसेन यांना मारलेली औपचारिक मिठी वादग्रस्त ठरली.१९९२मध्ये गुजराल जनता दलाच्या तिकिटावर बिहारमधून राज्यसभेवर निवडून गेले. त्यानंतर त्यांची गणना जनता दलाच्या प्रमुख नेत्यांमध्ये होऊ लागली.१९९६ मधील निवडणुकीनंतर केंद्रात एच.डी.देवेगौडा यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त आघाडीचे सरकार बनले. पंतप्रधान देवेगौडा यांनी गुजराल यांना पुन्हा एकदा भारताचे परराष्ट्रमंत्री म्हणून नेमले. आपल्या परराष्ट्रमंत्रीपदाच्या दुसऱ्या कारकिर्दीदरम्यान त्यांनी शेजारी देशांशी संबंध सुधारण्यावर जोर दिला. परराष्ट्रमंत्री गुजराल आणि पंतप्रधान देवेगौडा यांच्या प्रयत्नांमुळे बांगलादेशबरोबर अनेक वर्षे अनिर्णिणीत राहिलेल्या गंगा पाणीवाटपाच्या प्रश्नावर दोन्ही बाजूंना मान्य असा तोडगा निघाला.३० मार्च १९९७ रोजी संयुक्त आघाडी सरकारला बाहेरून पाठिंबा येणाऱ्या काँग्रेस पक्षाने पाठिंबा काढून घेतला. ११ एप्रिल१९९७ रोजी देवेगौडा सरकार कोसळले. पण त्यानंतर काँग्रेस पक्ष आणि काही विरोधी पक्षांची संयुक्त आघाडी यांच्यादरम्यान तडजोड झाली. संयुक्त आघाडीने इंद्रकुमार गुजराल यांना नेतेपदी नेमले आणि २१ एप्रिल १९९७ रोजी त्यांचा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथविधी झाला. गुजराल पंतप्रधानपदी सुमारे ११ महिने राहिले. त्यापैकी ३ महिने ते काळजीवाहू पंतप्रधान होते. या थोडया काळात पाकिस्तानबरोबर संबंध सुधारण्याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला. २१ ऑक्टोबर १९९७ रोजी उत्तर प्रदेशातील कल्याण सिंग सरकारने सादर केलेल्या विश्वासदर्शक ठरावादरम्यान विधानसभेत अभूतपूर्व गोंधळ आणि हिंसाचार झाला. त्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करायची शिफारस राष्ट्रपती के. आर. नारायणन यांना करायचा त्यांच्या सरकारचा निर्णय त्यांच्या कारिकिर्दीतील सर्वात विवादास्पद निर्णय ठरला. पण राष्ट्रपती नारायणन यांनी त्या शिफारसीला मान्यता द्यायला नकार दिला आणि ती शिफारस केंद्रीय मंत्रीमंडळाकडे पुनर्विचारार्थ परत पाठवली. सरकारने त्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू न करायचा निर्णय घेतला.नोव्हेंबर १९९७ मध्ये राजीव गांधी हत्याकांडाच्या कटाची चौकशी करणारया जैन आयोगाचा अंतरिम अहवाल इंडिया टुडे या नियतकालिकाने फोडला. राजीव गांधींची हत्या करणाऱ्या एल.टी.टी.ई. या तामीळ अतिरेकी संघटनेला हातपाय पसरायला छुपी मदत केल्याबद्दल आयोगाने तमिळनाडू मधील राजकीय पक्ष द्रविड मुनेत्र कळघम विरुद्ध ताशेरे ओढले आहेत, असे इंडिया टुडेने जाहीर केले. द्रविड मुनेत्र कळघम हा संयुक्त आघाडीचा घटकपक्ष होता आणि त्या पक्षाचे तीन मंत्री गुजराल सरकारमध्ये होते. काँग्रेस पक्षाने आयोगाचा अंतरिम अहवाल संसदेत सादर करण्याची मागणी केली. सरकारने अहवाल नोव्हेंबर १९, १९९७ रोजी सादर केला. इंडिया टुडेने जाहीर केल्याप्रमाणे जैन आयोगाने खरोखरच द्रविड मुनेत्र कळघम विरूद्ध ताशेरे ओढले असल्याचे समजताच त्या पक्षाच्या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढायची मागणी काँग्रेस पक्षाने केली. तसे न केल्यास पाठिंबा काढून घ्यायची धमकी काँग्रेस पक्षाने दिली. काँग्रेस अध्यक्ष सीताराम केसरी आणि पंतप्रधान गुजराल यांच्यादरम्यान यासंदर्भात आठवडाभर पत्रव्यवहार झाला. मात्र गुजराल यांनी काँग्रेस पक्षाची मागणी अमान्य केली. नोव्हेंबर २३, १९९७ रोजी कलकत्त्यातील एका समारंभात बोलताना गुजराल यांनी मध्यावधी निवडणुका लवकरच होतील असे विधान करून भविष्यात काय घडणार आहे याची कल्पना देशवासीयांना दिली. शेवटी नोव्हेंबर २८, १९९७ रोजी काँग्रेस पक्षाने गुजराल सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेतला. त्यानंतर लगेचच पंतप्रधान गुजराल यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. कोणतेही पर्यायी सरकार स्थापन न झाल्यामुळे राष्ट्रपती नारायणन यांनी डिसेंबर ४, १९९७ रोजी अकरावी लोकसभा बरखास्त केली आणि गुजराल यांनी सांगितल्याप्रमाणे मध्यावधी निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला.१२व्या लोकसभेसाठी मध्यावधी निवडणुका फेब्रुवारी-मार्च १९९८ मध्ये झाल्या. गुजराल यांनी अकाली दलाच्या पाठिंब्याने पंजाबातील जालंधर मतदारसंघातून परत निवडणूक लढवली. त्यांनी काँग्रेसच्या उमराव सिंग यांचा सुमारे १,३१,००० मतांनी पराभव केला. १२व्या लोकसभेत गुजराल यांनी भाजप आघाडीच्या सरकारला सातत्याने विरोध केला. २९ मे १९९८ रोजी पोखरण येथील अणुचाचण्यांवर लोकसभेत झालेल्या चर्चेत त्यांनी सरकारच्या धोरणातील काही चुका दाखवून दिल्या. पण विरोधासाठी विरोध हे त्यांचे धोरण कधीच नव्हते. फेब्रुवारी १९९९ मध्ये पंतप्रधान वाजपेयींनी लाहोरला भेट देऊन पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याबरोबर ऐतिहासिक लाहोर जाहीरनाम्यावर सही केली तेव्हा त्यांनी वाजपेयींच्या धोरणाचे जोरदार समर्थन केले. मात्र १९९९ रोजी अण्णा द्रमुकने पाठिंबा काढून घेतल्यावर पंतप्रधान वाजपेयींनी लोकसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला, तेव्हा त्यांनी सरकारविरोधी मतदान केले. वाजपेयी सरकार कोसळल्यानंतर झालेली लोकसभेची मध्यावधी निवडणूक त्यांनी लढवली नाही. आणि त्यानंतर इंद्रकुमार गुजराल सक्रिय राजकारणातून निवृत्त झाले.