#कन्नड

Showing of 222 - 233 from 233 results
सीमा भागातील मराठी भाषिकांना महाराष्ट्रानं वा-यावर सोडलंय का?( भाग-3 )

महाराष्ट्रJan 17, 2009

सीमा भागातील मराठी भाषिकांना महाराष्ट्रानं वा-यावर सोडलंय का?( भाग-3 )

सीमा भागातील मराठी भाषिकांना महाराष्ट्रानं वा-यावर सोडलंय का?( भाग-3 )सीमा भागात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी बळाचा वापर करून मेळावा घेण्यास मज्जाव केला. तसंच महाराष्ट्र एकीकरण समितीचे ज्येष्ठ नेते प्रा.एन डी. पाटील यांच्यासह 220 कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. त्याचबरोबर अनेक कार्यकर्त्यांच्यावर लाठीचार्जही केला. नंतर त्यांची सुटका करण्यात आली. एवढंच नव्हे तर कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेवरचा भगवा ध्वज काढण्याचा प्रयत्न केला. तो पोलिसांनी प्रयत्न हाणून पाडून त्यांना अटक केली. बेळगावमध्ये महामेळावा घेण्याचे सर्व प्रयत्न हाणून पाडण्यासाठी कर्नाटक सरकारचे हे सगळे प्रयत्न चाललेले आहेत. यामुळे मराठी भाषिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. परंतु दिवसभरात इतक्या घटना होऊनही महाराष्ट्रातील नेते तेथे पोहचले नाहीत त्यामुळे सीमावर्ती भागातील मराठी माणसाला आपला लढा आपणचं लढावं असं वाटतंय यावरच आहे आजचा सवाल सीमा भागातील मराठी भाषिकांना महाराष्ट्रानं वा-यावर सोडलंय का? या चर्चेत ज्येष्ठ नेते प्रा.एन डी. पाटील, शिवसेना नेते दिवाकर रावते, पुण्यातले लोकमतचे संपादक अनंत दीक्षित, महाराष्ट्र एकीकरण समिती नेते ऍड. माधव चव्हाण यांचा समावेश होता.सघ्याच्या बेळगावातील परिस्थितीबद्दल जेष्ठ नेते एन डी पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले, इथली स्थिती अंत्यत दुदैर्वी आहे. इतकी वर्षे या आंदोलनाला झाली पण बेळगावात कर्नाटक सरकार अधिवेशन घेत नव्हतं.आता इथं अधिवेशन का घेतलं जातंय याचा जाब विचारला पाहिजे.संपूर्ण परिसराला लष्कराच्या छावणीचा अनुभव येतं आहे असं ते म्हणाले.शिवसेनेचे जेष्ठ नेते या आंदोलनात का हजर नव्हते या प्रश्नांवर दिवाकर रावते निरुत्तर होते. पण त्यांनी एकीकरण समितीला प्रतिप्रश्न केला की, महाराष्ट्र एकीकरण समितीत दुफळी का झाली आणि त्यामुळे बेळगांवमध्ये कन्नड भाषिक आमदार का निवडला गेला .या प्रश्नांला उत्तर देताना महाराष्ट्र एकीकरण समितीचे ऍड. माधव चव्हाण म्हणाले गेल्या निवडणुकीत शिवसेनेनंच समितीच्या विरोधात उमेदवार उभे केल्यामुळे अनेक उमेदवारांचा पराभव झाला. असं असलं तरी सीमावर्ती भागातल्या मराठी माणसांमध्ये मतभेद नाहीत. मतभेद असतील तर ते नेत्यांमध्ये आहेत. पुण्यातील लोकमतचे संपादक अनंत दीक्षित म्हणाले, बेळगावचा लढा हा सुद्धा संयुक्त महाराष्ट्राचा लढा आहे. लोकशाहीच्या मार्गाने चाललेल्या ह्या लढयात महाराष्ट्रातील सगळया पक्षातील नेत्यांनी आता तरी एकत्र आलं पाहिजे.सीमा भागातील मराठी भाषिकांना महाराष्ट्रानं वा-यावर सोडलंय का? ह्या सवालाला 88 टक्के लोकांनी होय असा कौल दिला. चर्चेचा शेवट करताना निखिल वागळे सर म्हणाले, महाराष्ट्रातील सर्वांनी एकजूटीने एकत्र येऊन सीमा भागातील मराठी भाषिकांच्या पाठिशी उभं राहायला हवं.आणि त्याच्यावरील मानवी हक्काचं होणार उल्लंघन थांबवाला हवं.