#आप

Showing of 651 - 654 from 654 results
ग्रेटभेटमध्ये आशा भोसले

May 13, 2013

ग्रेटभेटमध्ये आशा भोसले

आशाताईंशी गप्पा मारायला मिळणं हे प्रत्येक माणसाच्या आयुष्यातलं भाग्य असतं. ते भाग्य जुळून आलं 'ग्रेटभेट'च्या निमित्ताने. आशा ताईंचं आयुष्य ही एक अदभूत कहाणी आहे. लाखो लोकांच्या आयुष्यात त्यांनी आपल्या गाण्यानं जादू पेरलीये. ग्रेटमधून प्रयत्न केला गेला तो जादूमागची 'जादू'चा शोध घेण्याचा - निखिल वागळे : तुमच्या या उत्साहाचं, सुंदरपणाचं रहस्य काय आहे ? आशाताई तुम्हाला पाहणा-या प्रत्येकाला हा प्रश्न पडल्यावाचून रहात नाही ? आशा भोसले : थँक्यू. तुम्ही सुंदर म्हटल्याबद्दल. पण मी उत्साही आहे ही तितकी खरी गोष्ट. काहीतरी नवं करत रहावं, हा माझा स्वभाव आहे. मला वाटतं लहानपणापासून एखाद्या माणसाचा स्वभाव असतो तो आनंदी राहण्याचा. माणूस जास्त दु:खाच्या गर्तेत जात नाही. दु:ख आलं तरी त्याला तो हसण्यावारी नेतो, त्यातली मी आहे. आणि दु:ख कुणाला नसतं ?.. प्रत्येकाची दु:ख आणि व्यथा या वेगवेगळ्या असतात. माझी दु:ख ही अगदी वेगळी आहेत. जसं समुद्राच्या मोठ्या लाटा याव्यात... नंतर त्या मागे जाव्यात... आणि त्या गेल्यावर त्या ठिकाणी खड्डा निर्माण व्हावा असं माझं आयुष्य असंख्य उतार चढावांनी भरलेलं आहे. सुरुवासुरुवातीला तर मला धक्का बसायचा. पुढे काय? असंच वाटायचं... मग असा विचार यायचा की ज्यानं जन्म दिलाय तो पुढे नेणारच ना ? त्याला काहीतरी मार्ग हा द्यावाच लागणार... तो कधी उपाशी मारणार नाही.. तर अशी भावना आणि देवावरचा विश्वास तसंच आईनं शिकवलेल्या चांगल्या गोष्टी यामुळे दु:ख सोसण्याचं बळ मिळत गेलं. ऐकून सोडून देणं असं बहुतेकांचं असतं. पण माझं असं नाहीये. तर गोष्टी ऐकून सोडून द्यायच्या नाहीत. त्यातलं चांगलं नेहमीच मी माझ्या आचारणात आणते. अगदी मला कुणी सांगितलं की, आशाताई तुम्ही गाताना आज थोड्याशा चुकलात. ' मला कधीच वाईट वाटत नाही. मला वाटतं की, हा खरा माणूस आहे. ज्याने मला माझी चूक दाखवली. चूक होणं मनुष्य स्वभाव आहे. त्यातून सुधारणं हे माझं कर्तव्य आहे. माझ्या चुका दाखवणारी माणसं मला विशेष आवडतात. लग्न झाल्यावर अतिगरिबी मी जवळून पाहिलीये... भोगलीये... म्हणून का कुणास ठाऊक पण जिओ और जिने दो हा माझ्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा मंत्र आहे. किंबहुना आयुष्याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोनच तसा झालाये. हसत राहा, सगळ्यांशी चांगले वागा, चांगली कामं करा. देव आहेच की आपल्या पाठीशी... निखिल वागळे :आशाताई लता मंगेशकरांची छोटी बहीण असणं हे खूपच कठीण आहे. तरीसुद्धा तुम्ही स्वत:ची ओळख निर्माण केलीत. तुम्ही स्वत:ची गायकी निर्माण केलीत... हे कसं झालं ? आशा भोसले : खरं बोललात तुम्ही... की कोणत्याही अतिथोर व्यक्तीचा लहान भाऊ, बहीण वा अपत्य असणं ही फार साधी गोष्ट नाहीये. ते फारच त्रासदायक असतं .कारण इतक्या प्रकाशात असणा-या माणसाच्या आजूबाजूची इतर माणसं ही अंधारात असतात. आणि त्यांचं जगणं अतिशय कठीण होऊन जातं. पण माझ्या बंडखोरपणामुळे मी कधी अशी भावना माझ्या मनात येऊ दिली नाही. लहानपणी मी इंग्रजी सिनेमा पाहायचे. त्या सिनेमातल्या इंग्रजी गायकीप्रमाणे आवाजाला कंप देणं... निरनिराळ्या हरकती घ्यायला मी शिकले. आणि हे मी लहानपणी कोल्हापूरला गंमत म्हणून करायचे. त्यानंतर फिल्म लाईनमध्ये आल्यावर ' दीदीसारखं गायचं की काही वेगळी स्टाईल डेव्हलप करायचा हा प्रश्न पडला. कारण दीदीसारखं गाण्याचा प्रयत्न केला असता तर मला इंडस्ट्रीत कोणी गायला दिलं नसतं हेही तितकंच खरं होतं. ताजमहाल असताना दुसरा ताज बनवण्याचा भानगडीत पडणार तरी कोण ? त्यामुळे आपल्याला सगळ्या प्रकारचं गाता आलंच पाहिजे ही धारणा झाली होती. कारण मला लहान मुलं होती. त्यांचं शिक्षण तसंच घरीचीही जबाबदारी माझ्यावर होती. मुख्य म्हणजे मला त्यांना गरिबीत ठेवायचं नव्हतं. त्यामुळे ' गात रहा आशा ' हे उद्दिष्ट मी माझ्या डोळ्यांसमोर ठेवलं. त्यामुळे मला जी गाणी गायला मिळाली त्यांना सजवायचं कसं हे यावर जास्त भर दिला. त्यावेळी गाताना वेस्टर्न स्टाईल खूप कामी आली. निखिल वागळे : तुम्ही पहिल्यापासून वेस्टर्न गाणी ऐकता ? आशा भोसले : हो. मला वेस्टर्न गाण्याची स्टाईल आवडायची. कोण कसं गातं... गाणं गाणताना कोण कसा आवाज उचलतं याचं मी बाराकाईनं निरीक्षण करायचे. कॅथरीन व्हेलेंटीना सारख्या अमेरिकन, साऊथ अमेरिकन गायिकांची गाणी मी आवडीनं ऐकायचे. तसं गाण्याचा मी प्रयत्न करायचे. त्यामुळे माझं गाणं वेगळं व्हायचं. काही नवं ऐकलेलं आपल्या गाण्यात वापरायचं हा माझा स्वभावच आहे. निखिल वागळे : म्हणजे असं म्हटलं जातं की गायक किंवा गायिका हा ब्लॉटिंग पेपर असतो. संगीतकार जे काही सांगेल हे त्या ब्लॉटिंग पेपरने शोषून घेऊन तसं गाणं गायचं. पण आम्हाला माहितीये की तुम्ही हा असा ब्लॉटिंग पेपर नसून त्याही पलीकडच्याआहात. तुम्ही गाण्याला वेगळी ओळख दिलीये. गाण्यात जीव ओतून शब्दांना जिवंत केलंत. तर गाण्यात तुम्ही जान कशी ओतता ? आशा भोसले : माझ्यासमोर आलेल्या गाण्याला जर म्युझिक डायरेक्टर सांगतोय त्याप्रकारे न्याय दिला तर मी ते प्रेक्षकांना आवडणार नाही. कारण काही म्युझिक डायरेक्टर माझ्याकडून खूप चांगलं गाणं गाऊन घ्यायचे. काहींना लोकांना गाता येत नव्हतं. त्यामुळे मी माझा आवाज ठेवून त्यांच्या स्टाईलनं गाणं कसं गायचं हा प्रयोग केला. तसा प्रयोग मी प्रत्येक म्युझिक डायरेक्टरच्या बाबतीत केला. आणि हो तसा प्रयोग करताना मी आधी प्रत्येक म्युझिक डायरेक्टरला विचारून करायचे. तर ते म्हणायचे की हा करा. तर चांगलं वाटलं तर जरूर ते गाण्यात ठेवू. मग मी विचार करून ताना, आलप असं त्या गाण्यात ऍड करायचे. ज्यांना आवडलं ते ठेवायचे. निखिल वागळे : बहुतेक म्युझिक डायरेक्टर्सने तुमचे गाण्यातले प्रयोग कधीच नाकारले नाहीत. आशा भोसले : हो. इथे मला विशेषत: आरडी बर्मन विषयी सांगावंसं वाटतंय. कारण मला गाण्यात इन्होव्हेट करायचंय हे ते बरोब्बर ओळखायचे. पण गाताना काहीतरी चूक होईल म्हणून मी ते करायचे नाह. जसा आरडींना त्यांना हवा तसा टेक मिळाला की ते मला माझा प्रयोग करायला सांगायचे. मी गायचे. आणि ते आरडींना इतकं आवडायचं की ते मी गायलेलं गाण्यात ठेवून द्यायचे. माझ्या प्रयोगांना त्यांनी प्रोत्साहन दिलं. निखिल वागळे : हे असं प्रामुख्यानं कोणत्या गाण्यांच्या वेळेला झालं आहे ? आशा भोसले : हे असं बहुतेक गाण्यांच्या बाबतीत झालं आहे. प्रामुख्यानं नाव घ्यायचं झालं दम मारो दम गाणं. त्यामध्ये जो आलाप मी गायलेय ते म्युझिक होतं मी ते स्वर गायलेय. म्युझिक गायचं, म्युझिकवर आलाप घ्यायचा, मधनं कुणी गात असताना आलाप घेऊन जायचा असे प्रयोग मी अनेकदा केले आहेत. .निखिल वागळे : जेव्हा लतादीदींनी आनंद घन या नावाने संगीत दिलं तेव्हा त्यांनी तुम्हालाही एक गाणं दिलं. पण ते गाणं तुम्ही तुमच्या पद्धतीनं गायलंत आणि दीदींनी ते गाणं स्वीकारलं... हे खरंय का ? ते गाणं कोणतं होतं ? आशा भोसले : हो. ते गाणं होतं रेशमाच्या रेघांनी... दीदीेनी आधी ते गाणं मला गाऊन दाखवलं होतं. तिने गायलेलं गाणं हे तिच्या स्वभावाप्रमाणे हलकं , हळुवार होतं. ते ऐकून मी तिला तू भजन गात आहेस का, असं विचारलं. तिने माझ्यावर रागवून मला हवं तसं गाणं म्हणण्याची परवानगी दिली. मग मी त्या गाण्याला लावणीसारखा ठसका दिला. प्रत्येक गाण्याच्या प्रकाराला स्वत:ची अशी स्टाईल असते. लावणी भजन किंवा अंगाई गीताप्रामाणे म्हणून चालणार नाही. तर कोणतं गाणं काणेत्या प्रकारात गायलं पाहिजे याची जाण गायकाला असालीच पाहिजे. तसंच प्रत्येक गाणं गाताना ऍक्टिंगही करता आली पाहिजे. आत जर ऍक्टिंग चालू नसेल तर गाणं नीट गाता येणारच नाही. माझं स्वत:चं असं मत आहे की गायकाने गाताना थोडीफार ऍक्टिंग केली पाहिजे. निखिल वागळे : तुम्हाला असं वाटतं की, तुमच्या तुमच्या आत एक ऍक्ट्रेस आहे ? आशा भोसले : हो. निखिल वागळे : ती कुठून आली ? आशा भोसले : वडिलांकडून. कारण वडील नाटक कंपनीचे मालक होते. ते उत्तम ऍक्टरपण होते आणि गाणारेही. तर त्यांच्या स्वभावाच्या बहुतेक गोष्टी माझ्यात फार आल्या आहेत. नाट्यगीत गाताना मी बाबांचा दम आणण्याचा प्रयत्न करते. तितका येणं शक्य नाही. कारण बाबांचं ओरिजनल ते ओरिजनल आहे. निखिल वागळे : तुम्ही शम्मी कपूरच्या सिनेमात गाणी गायचात. त्यावेळी शम्मी कपूरना एकदा कुणीतरी विचारलं होतं की तुमच्याकडे मोहम्मद रफींचा आवाज नसता तर तुम्ही काय केलं असतं? यावर त्यांनी मी आशा ताईंकडे गेलो असतो, असं उत्तर दिलं होतं. तर ते खरं आहे का ? आशा भोसले : हो. कारण तो रेकॉर्डिंगमध्ये येऊन बसला की मला खूप त्रास द्यायचा. भंडावून सोडायचा. शम्मी भाईला गायकीची चांगली जाण आहे. ते उत्तम गातातही. रेकॉर्डिंगच्या वेळी ते मला निरनिराळ्या ताना गाऊन दाखवायचे. त्या मी पटकन् उचलायचे. त्या ताना रफींना जमाव्यात असं त्यांना वाटायचं. निखिल वागळे : आशाताई तुमचं लहानपण खूप कष्टात गेलंय. तुम्ही घरात खूप मेहनतीची कामं करायचात. दिवसाला विहरीतून 14-14 बादल्या पाणी काढायचात. हृदयनाथजी तुमच्या पाठीवर असायचे... आशा भोसले : हो. बाळला जेव्हा पायाचा त्रास झाला तेव्हा मी आणि तो दोघंही लहान होतो. बाळ तेव्हा साडेचार-पाच वर्षांचा होता. मी त्याच्यापेक्षा चार वर्षाने मोठी. आईप्रमाणे बाळचं मी सगळं आहे. माझ्या मुलाचं हेमंतचं बालपण आठवताना जास्त बाळचा चेहराच सर्वात जास्त आठवतो. मला काम फार आवडायचं. त्यामुळे मी घरची स्वयंपाकाची कामं आवडीनं करायचे. बाबांच्या श्राद्धाला सात प्रकारच्या भाज्या, पाच प्रकारच्या चटण्या, पुरळपोळी असा साग्रसंगीत स्वयंपाक करावा लागायचा. तो मीनाताईच्या मदतीने अगदी सहज करायचे. कोल्हापूरला असताना बायका आवडीनं दळण-कांडण, चकल्या करायला बोलवायच्या. मी लोकांमध्ये मिळूनमिसळून रहायचे. निखिल वागळे : हिंदू - मुस्लिम दंग्याच्यावेळी मुंबईत 1945 ला गस्तपथक काढण्यात आलं होतं. तुम्ही नाना चौकात रहात असताना या गस्त पथकातही होतात... आशा भोसले : हो. त्यावेळी रात्रीला बरीच माणसं गस्त घालत बसायची. त्यांच्यात मीही होते. मी हातामध्ये एक दंडा घेऊन बाहेर फिरत बसायचे.माझ्यातल्या उत्साहापोटी मी हे काम स्वीकारलं होतं. निखिल वागळे : लग्न झाल्यावरही तुमचे मागचे कष्ट काही सुटले नाहीत. तर ही वेदना गाण्यात कशी कामी आली ?आशा भोसले : मला असं वाटतं की प्रत्येक आर्टिस्टच्या आयुष्यात कष्टाचे अनुभव गाठीशी असल्याशिवाय काही चांगलं होत नाही. माझं गाणं हे तावून सुलाखून निघाल्या आयुष्याप्रमाणे होतं. पण ते दु:ख आहे म्हणून आपण गातोय असं काही माझ्या मनात नव्हतं. पण आपल्या आयुष्यात येणा-या अनुभवांचा मनावर कुठेतरीपरिणाम होत असतो... त्यातून आपल्याला दुनिया कळते, माणसं कळतात. त्यातून कलाकार त्याच्या कलेकडे सर्वात जास्त झुकतो. मी दु:ख विसरण्यासाठी जास्त चांगली गाणी गाण्याकडे आपसूकच ओढली गेले. तसंच जगाला आपल्या दु:खाचं काही पडलेलं नसतं. त्यामुळे कितीही दु:ख असलं तरी मी ते दाखवलं नाही. अशा जी आप स्टुडिओमें आती हो तो उजाला आता हैं असं लोक काही उगाच म्हणायचे नाहीत. निखिल वागळे : आशाताई गाणं हा तुमचा रिलीफ होता ? कारण घरातून मारहाण झाल्यावर तुम्ही स्टुडिओत अप्रतिम अशी गाणी गायली आहेत ? आशा भोसले : कारण माझं माहेर तुटलं होतं. सासर हे असं होतं. गाठीला मुलं होती. त्यांचं भवितव्य समोर होतं. त्यामुळे यातून उभ राहायचं असेल तर चांगलं गाणं गायलं पाहिजे, हा एकमेव पर्याय होता. मला मुलांना मोठं करायचं होतं. निखिल वागळे : गाणं गाताना वेदना आपोआप विसरल्या जायच्या की तुम्ही मागे टाकायचात ? आशा भोसले : गाताना मी वेदना मागे टाकायचे. निखिल वागळे : तुम्ही त्यावेळी काय विचार करायचात ? आशा भोसले : गाणं जर गायले नाहीत तर आपली मुलं भीक मागतील. आणि मला तसं करायचं नव्हतं. माझ्या मुलांच्या भवितव्याचा विचार सतत माझ्या मनात असायचा. त्यामुळंे गायिकांमध्ये माझा नंबर कितवा, हा विचारच माझ्या मनाला शिवला नाही. मला संसारासाठी गायचंय एवढंच ध्येय माझ्या डोळ्यांसमोर होतं. निखिल वागळे : 1947 ते 1957 पर्यंत तुम्ही वाट्याला येतील ती गाणी गायलीत. त्यानंतर तुमचा काळ सुरू झाला. तुम्हाला चांगले चांगले संगीतकार सन्मानाने बोलवायला लागले. मुख्य म्हणजे लतादीदींबरोबर तुमचं गाव मानाने घेतलं गेलं. मग एसडी बर्मन, आरडी बर्मन, ओपी नय्यर, मदन मोहन यांच्यातला तुमचा आवडता संगीतकार कोण आहे ? आशा भोसले : आर.डी. बर्मन. __PAGEBREAK__ निखिल वागळे : का ? आशा भोसले : कारण त्याच्या संगीतामध्ये नाविन्य होतं. त्यांच्या प्रत्येक गाण्यातली स्वरांची फेक ही आमच्या दृष्टीनं चॅलेंज होतं. चॅलेंज असंल की गायकाला प्रत्येक गोष्ट करायाला आवडते. मला तर आव्हानं स्वीकारण्याची आवड आहेच. मी त्याच्याशी प्रत्येक गाण्यावर चर्चा करायचे. निखिल वागळे : आर.डी बर्मन आणि तुमच्यातलं नातं काय ? त्यांचं तुमच्या आयुष्यातलं स्थान काय? तुमचे आणि त्यांचे बंध कसे जुळलेत ? आशा भोसले : माझं आणि आरडीचं मित्रत्त्वाचं नातं होतं. लग्न वगैरे बंधन फक्त समाजासाठी. पण आमची निखळ मैत्री होती. संगीतामुळे दोघांचे बंध जुळले. आरडी बर्मनचं रात्रभर गाणी ऐकणं, गाडीत बसून फिरायला जाताना गाणी ऐकणं असं अखंड गाणी ऐकत राहणं आणि माझं गाण्यावरचं असंच प्रेम हा आमच्यातला समान धागा होता. आर.डी. बर्मन एक विचित्र प्रवृत्ती होती. कोणत्याही बंधनाला न जुमानणारा माणूस होता. तो एक असामान्य आर्टिस्ट होता. निखिल वागळे : विचित्र माणूस होता म्हणजे नेमकं काय ? आशा भोसले : आर.डी.बर्मन म्हणजे एक स्वच्छंद उडणारा पक्षी, अगदी सामान्य माणसाच्या चाकोरीत न बसणारा असा. गाणं करायला बसला की ते अवघ्या 10 - 15 मिनिटातच तयार करून उठायचा. त्याचं आयुष्य वेगळं होतं. त्यामनाने माझ्या जीवनशैलीत खूपच फरक होता. माझं गाणं आणि माझी पथ्यं मी पाळली. त्याच्यामुळे लॅटिन अमेरिकन संगीत मी ऐकलं. त्याला फॉरेन आर्टिस्ट खूप आवडायचे. संताना हा त्याचा आवडता फॉरेन आर्टिस्ट. जरा काही वेगळं ऐकलं की त्या संगीताला धरून स्वत: आवाज काढून दाखवायचा. सतत नवनवीन प्रयोग करायचा. एकदम छान माणूस होता. निखिल वागळे : किशोर कुमारचा काय अनुभव आला ? आशा भोसले : तो फार वेगळ्या स्वभावाचा, अन् मुडी माणूस होता. त्याचा मूड केव्हा असायचा आणि कधी नसायचा हे मी बरोबर ओळखायचे. तो माझी खूप चेष्टा कारयचा. मी गाणं गायला लागल्यावर तो माझ्या मागे उभा राहून मला खूप नर्व्हस करायचा. नंतर त्याला समजलं कि मी चांगली गाते आणि तो बदलला. माझ्याशी चांगलं वागायला लागला.निखिल वागळे : को-सिंगर म्हणून किशोर आणि इतरांबरोबर काम करताना काय वाटलं ? आशा भोसले : किशोर फार वात्रट को-सिंगर होता. काही तरी विचित्र पण नवीन करत रहायचा. त्याच्यामुळे त्याच्याबरोबर गायला चुरस असायची. रफींचं तसं नव्हतं. त्यांनी जे शिकवलं तेच गावं लागायचं. जरा काही वेगळं गायले की ते चमकून जायचे. पण गाण्यात चढाओढ असली की मजा येते. ती किशोरबरोबरच गाताना यायची. किशोर, आर.डी आणि मी असलो की गाण्यात एक वेगळीच मजा यायची. निखिल वागळे : मराठी गाण्यांमध्ये अशी हिंदीसारखी मजा आली का ? आशा भोसले : मराठीमध्ये गायक आणि संगीतकार अनेक आहेत. आजवर वसंत पवार, वसंत प्रभू, वसंत देसाई, रामदास कदम अशा अनेक संगीतकारांबरोबर मी गायले. ते सगळेच चांगले आहेत. बाबूंजींबरोबर गायले. पण त्यांची गाणी अवघड असायची. आणि त्यांना हवी तशीच ती गायली गेली पाहिजेत... असा आग्रह असायचा. त्यामुळे गाताना खूप त्रास व्हायचा. कारण त्यांना गाणं गाताना विलक्षण परफेक्शन लागायचं. गाण्याची जी मजा मी आर.डी. कडे अनुभवली ती मराठीमध्ये हृदयनाथांकडे गाताना मिळाली. ' जीवलगा 'सारखं सात मिनिटाचं गाणं एकही रिटेक न घेता हृदयनाथांनी माझ्याकडुन गाऊन घेतलं. त्यात फक्त मी आलापी केली. बाकी रिदम अजिबातच नव्हता आणि हा चॅलेजिंग जॉब होता. हे केवळ त्याच्यासारख्या चॅलेंजिंग संगीतकारामुळे शक्य झालं. ' चांदणे शिपिंत जाशी '... हे त्यांनीच मला दिलेलं पहिलं चॅलेंजिंग गाणं आहे. तर ' तरुण आहे रात्र ' ... सारखं वरचा आणि खालचा पंचम असणारं गाणं स्किलफुली गाऊन घेण्यात बाळचंच कौशल्य आहे. या दोघांकडेही काहीतरी खास गायला मिळणार हे ठरलेलं असायचं. आणि ती माझी परीक्षाही असायची. निखिल वागळे : रेहमानबद्दल तुमचा अनुभव काय ? त्याच्या गायकीचं विश्लेषण कसं कराल ? आशा भोसले : रेहमान खूप हुशार संगितकार आहे. तो उत्तम म्युझिक प्रोड्युसर आहे. तो गाणं उत्तम सजवतो आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापरही गाण्यात उत्तम करतो. त्याचं रंग दे रंग दे, छैय्या छैय्या, दीदीचं दिया जले ही त्यांने संगीत दिलेली माझी आवडती गाणी आहेत. त्याला मिळालेल्या ऑस्करमुळे हिंदुस्थानचंच नाव झालं आहे. तो छान गाणी करतो.निखिल वागळे : सध्याच्या गाण्यात टेक्नॉलॉजीचा वापर तुम्हाला पचतो आणि पटतो का ? आशा भोसले : खरी परीक्षा ही गाणं सुरू झाल्यापासून असते. तिस-या अंत-यापर्यंत आलात की गाण्याचा क्लायमॅक्स होतो. हीच खरी गाण्याची ताकद आहे, असं मला वाटतं. एकसंध आणि एकसलग गाणं ही पूर्वीच्या गाण्यातली खासियत होती. तरीही मी मॉडर्न आहे. सध्याची गाणं गाऊन घ्यायची पद्धत बदलली आहे. आता गाणी सुरात आणि लयीत करता येतात. त्याचे वेगवेगळे ट्रॅक्सही ठरवलेले असतात. खूप सुधारणा झालीये. परंतु खरी मजा पूर्वीच्या गाण्यातच येते. निखिल वागळे : तुम्हाला दोनदा ग्रॅमी ऍवॉर्डसाठी नामांकन मिळालं आहे. त्याबद्दल सांगा ? आशा भोसले : उस्ताद अकबरअली खाँसारख्या ज्येष्ठ आणि पट्ठीच्या गायकाबरोबर कसं गायचं याची भीड मनात होतीच. त्यांच्यासारख्या उत्कुष्ट गायकाबरोबर शास्त्रीय संंगितातल्या चीजा गाणं हे आव्हानच होतं. मी आधी नाही म्हटलं. पण तरीही त्यांना माझ्याकडूनच गाऊन घ्यायचं होतं, हे ऐकून मी खल्लास झाले. हे कळल्यावर मी त्यांच्याकडे गेले. गणपतीसमोर बसवून त्यांनी मला त्यांची कन्या करवून घेतलं. गंडा बांधला. आणि त्यांची अवघड गाणी मी फक्त पंधरा दिवसांत गायले. त्यावेळी त्यांच्यात एका अमेरिकन शिष्यने एक बॉलिवुडची गायिका शास्त्रीय संगीतातल्या चिजा काय म्हणणार, असं हिणवलं होतं. पण उस्तादजींनी हिच गाऊ शकते अजून कोणीही नाही, असं म्हणून माझ्यावरचा विश्वासच व्यक्त केला. उस्तादजींबरोबर सॅन फ्रॅन्सिस्कोला गाणं एक अनोखा अनुभव होता. निखिल वागळे : 1990 नंतर आपल्याकडे रिमिक्स आलं. सगळ्यांना त्याला नावं ठेवली. पण तुम्ही त्याहीपुढे जाऊन रिइन्व्हेन्शन केलं. नव्या पिढीला जोडून घेतलंत. हे कसं काय जमलं ? आशा भोसले : माझा मुलगा म्यझिकमध्ये आहे. त्याने आर.डी. बर्मनच्या चुरालियाचं रिमिक्स केलं होतं. पण आर.डी. बर्मनने त्याला नावं ठेवली होती. लोकांनाही ते पसंत नव्हतं. त्यानंतर आपणच आणखीन गाणी करून ती नव्या त-हेने नवीन पिढीसाठी द्यावी, असा विचार केला. आणि कामाला लागले. राहुल एन्ड आय हा माझ्या मुलासोबत केलेला त्यातलाच एक प्रयोग. तो लोकांनी डोक्यावर घेतला. त्यानंतर त्याच पद्धतीने काम करत गेले. निखिल वागळे : जुनी गाणी नव्या पिढीसाठी नव्या पद्धतीने केली तर ती त्यांना आवडली का ? आशा भोसले : हो. नक्कीच आवडतात. कोनोस क्वार्टेटसारख्या अमेरिकन ऑर्थोडॉक्स अमेरिक म्युझिशियनबरोबर सहा-सात गाणी केली. त्यात मेरा कुच्छ सामान... ' . ' दम मारो दम.... ' , ' पियाँ तू... ', ' छैय्या रे छैय्या तारोंेकी छैय्या... ' सारखी आपली गाणी आणि एक बंगाली गाणं केलं. ते तिथेही सगळ्यांना आवडलं. पोर्तुगालमध्ये तर आपल्याकडच्या गाणं आणि नाचण्याचं चिक्कार वेड आहे. माझ्यामुळे आपल्याकडचं संगीत तिथे गेलं आहे, याचा मला खूप अभिमान वाटतोय. आजवर रॉबी विल्यम्स, बॉय जॉर्ज, कोनोस क्वार्टेटपासून ब्रेट ली, संजय दत्त, उर्मिला मातोंडकरपर्यंत मी सर्वांबरोबर गायले आहे. तरुणांबरोबर गायला जास्त आनंद वाटतो. निखिल वागळे : आजपर्यंत तुम्ही स्वत:ला नेहमीच तरुणांबरोबर जोडून घेतलंत. ते कसं काय ? आशा भोसले : प्रत्येक पिढीत आपापली एक वेळ असते. तो -िहदम पकडता आला पाहिजे. त्यांच्याबरोबर पाय जमवून चालायला पाहिजे. नाहीतर मागे पडू आणि मला मागे पडायला आवडत नाही. निखिल वागळे : तुमची मेडोनासारखी ' दिवा ' ही इमेज आहे. त्याबद्दल काय सांगाल ? आशा भोसले : मला मेडोना इन सारी म्हणतात. गाणं पेश करणं आणि त्यातल्या लकबी हेरणं मला आवडतं. मी ते सतत शोधत असते. निखिल वागळे : ही तुमची गायकीची शैली आणि गाणं पेश करण्याची पद्धत पाहून एमटीव्हीने स्टाईल पर्सन ऑफ द इयरचा पुरस्कार दिला होता. तुमची ही स्टाईल आधीपासूनच होती. ती लोकांना आत्ताच का भावली ? आशा भोसले : त्याची एक वेळ असते. आपण जेव्हा दमाने काम करतो तेव्हा मेहनत असते. ती आजही आहे. पण आत्ता अपार प्रेम मिळतंय. लोकं आदराने आणि आपुलकीने पाहतात. ही कुठली प्रशंसा आणि आत्ताच का ? याचं कोडं अजून मलाही उलगडलेलं नाही. पण देवाने जे दु:ख मला दिलं तसंच त्यावर लावायला मलमही दिलं. खूप समाधान मिळालं. निखिल वागळे : गायिकेमध्ये उत्तम गृहिणी दडली आहे. या मागचं रहस्य काय ? ते कौशल्य कसं काय साध्य केलंत ? आशा भोसले : माणसान करायचं ठरवलं तर तो प्रत्येक काम करू शकतो. असं मला वाटतं. मीही तसंच करत आले. सकाळी लवकर उठून मुलांची जेवणं आटपून स्टुडिओत गायला जायचं. पुन्हा दुपारी येऊन त्यांची काळजी घेणं, आजारपण काढणं, हे सगळं केलं. त्यात कर्तव्य भावनेपेक्षा आनंद जास्त होता. तसा तो मिळवत गेले. निखिल वागळे : तुमचं दुबईला रेस्तराँ आहे. स्वत:च चालवताय का ? काय वाटतं ? आशा भोसले : आमची दुबई , लंडनमध्ये बर्मिंग हॅम, दोहा कतार, बहारीन अबुधाबी, कुवैट मध्ये अशी रेस्तराँची चेन आहे. तिथे आपल्याकडचं माझ्या हातच्या चवीचं भरलं वांगं, पालकाची भाजी, मटन-मासे हे पदार्थ आहेत. तिथे शेफचा कोट घालून हे पदार्थ मी स्वत: शिकवले आहे. निखिल वागळे : मंगेशकर घराणं आणि तुम्ही याबद्दल काय वाटतं ? आशा भोसले : मंगेशकर घराण्याशी माझं छान नातं आहे. आमच्यात मतभेद असले तरी ते शुल्लक आहेत. रक्ताचं नातं आहेच. पण वेळ आली तर पाचही भावंड एकत्र येतो. मी स्वभावानं वेगळी असले तरी त्यांच्यातलीच आहे. आम्ही सगळे अजूनही एकच आहोत. निखिल वागळे : तुमचं स्वत:चं कुटुंब.. तुमची तीन मुलं आनंद, हेमंत आणि वर्षा यांच्याशी काय नातं आहे तुमचं. आशा भोसले : वर्षाने गाणं सोडलं आणि ती लेखिका झाली. मोठ्या मुलगा संगितात होता, त्यांनेही ते सोडलं. पण लहान मुलगा माझा मॅनेजरही आहे. त्यामुळे तो याच क्षेत्रात आहे. निखिल वागळे : मी तुम्हाला सुरुवातीला प्रश्न विचारला होता, लतादिदिंची छोटी बहिण असणं कठीण आहे का तसं या तिनही मुलांना आशा भोसलेंची मुलं होणं कठीण गेलं का?आशा भोसले : मला नाही वाटत तसं त्यांना काही कठीण गेलं असेल. माझं असं काही नव्हतं कि त्यांनी गाणंच निवडावं. मला असं वाटत होतं कि ते गाण्याच्या क्षेत्रात आले कि माझ्या किंवा दीदीच्या नावात अडकून जातील. त्यांनी अडकता कामा नये म्हणून त्यांना बाहेरच ठेवायचं. आजकाल काय होतं हिरोची मुलं हिरोच होतात. तो हिरो खूप सुंदर असतो त्यामानाने त्याची मुलं इतकी सुंदर नसतात. मग तो कॉम्प्लेक्स कायमच रहातो कि आपण बापासारखे नाही. त्यापेक्षा त्यांनी आणखी काही कामं केली तर बरं असं मला वाटतं. जेव्हा मी पिक्चर बघते तेव्हा मला प्रश्न पडतो का यांना काम करण्याची गरज आहे. माझ्या मुलांनीही मी गाते म्हणून गावं असं मला वाटत नाही. आता माझी सात वर्षांची नात छान गाते पुढे तिला शिकवायचं आपलं काम. पण तू आशा भोसले बन फिल्मसाठी गा असं मी तिला सांगत नाही. आता ती जितेंद्र अभिषेकींच्या शिष्यांकडे गाण शिकतेय. निखिल वागळे : लतादीदींनी तुम्हाला चांगलं गातेस असं म्हटलं नाही. आणि म्हणूनच तुम्ही जिद्दीने पेटून गायलातआशा भोसले : असं नाही म्हणता येणार. तिनं ज्या दिवशी म्हटलं कि छान गायलीस तर बरं वाटतं. तोंडावर स्तुती करणं हे मंगेशकर कुटुंबाकडे नाही. तिने पेपरमधून केलेली स्तुती वाचायला मिळते. दाद घ्यावी तर चांगल्या माणसाकडून. एका गायकाकडून किंवा गायिकेकडून. दाद तर सगळेच देतात. पण तिची दाद महत्वाची असते. निखिल वागळे : तुम्ही आत्मचरित्र लिहिताय खरं आहे का? आणि ते कधी येणार आहे ?आशा भोसले : खूप लिहून ठेवलंय. वह्या खूप तयार झाल्यायत. त्याला चांगली मांडणी मिळाली तर छान होईल. निखिल वागळे : मराठीतून लिहिताय?आशा भोसले : मराठीतूनही लिहिते पण हिंदीतून जास्त लिहीता येतं. मी एकदा तेंडुलकरांना भेटले होते. त्यावेळी त्यांना माझं हिंदी आणि मराठी दोन्ही लिखाण वाचून दाखवलं होतं. मी हिंदीतून चांगलं लिखाण करु शकते हे त्यांनीच सांगितलं. त्यांनी असंही विचारलं तुला लिहायचंच आहे का? मी म्हटलं हो, कधी पासून लिहायचं होतं. त्यावर ते म्हणाले- लिहिताना एकच लक्षात ठेवा ज्या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत त्या दुसर्‍यांना माहिती नाहीत.निखिल वागळे : गेली साठ वर्ष तुम्ही आम्हाला भरभरुन दिलं आहे.. आता पुढची पन्नास वर्ष तुम्ही काय करणार आहात ? आशा भोसले : मी जोपर्यंत गाते तोपर्यंत गात राहणार. माझ्याकडून लोकांना काय देता येईल ते पाहीन. प्लेबॅकसिंगींगबद्दल लोेकांना द्यायला आवडेल. टिव्ही शोजवर आपण पहातो कि गाणारी मुलं शोज संपला पास झाली कि जातात कुठे. त्यांना कोणीही सांगत नाही कि हा सूर बरोबर नाही. सूर सरळ केला तर चांगलं गाशील आणि ते तुला जन्मभर पुरेल. पण इथे तर बेसुर गाणं म्हटलं गेलं तरी कौतुक होतं. एकदा का तुम्हाला माईक मिळाला, स्टेज मिळालं कि तुम्ही चुकीचं गायलेलं तेच गात राहणार. मला हेच पटत नाही. मी जर तिथे असेन तर त्यांना सरळ करण्याचा प्रयत्न करीन.निखिल वागळे : शेवटी तुम्ही आम्हाला काय सांगाल ? आशा भोसले : दु:ख सगळ्यांना असतं. दु:खाला बाजूला करायचं, हसण्याच्या ज्या काय वस्तू असतात त्या शोधायच्या आणि हसत रहायचं. त्यामुळे तुम्हीही सुखी रहाल आणि दुसर्‍यांनाही सुखी ठेवाल. तुम्हाला मित्र भरपूर मिळतील आणि तुम्ही आनंदात राहू शकता.