आठवले Videos in Marathi

Showing of 209 - 210 from 210 results
ग्रेट भेटमध्ये डॉ. भालचंद्र मुणगेकर - भाग 5

देशJan 25, 2009

ग्रेट भेटमध्ये डॉ. भालचंद्र मुणगेकर - भाग 5

ग्रेट भेटच्या 25 जानेवारीच्या भागात आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांनी मुंबई युनिव्हरसिटीचे माजी कुलगुरू आणि प्लॅनिंग कमिशनचे महाराष्ट्रातील एकमेव सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर यांची मुलाखत घेतली. प्रतिकुल परिस्थितीशी झगडत ओबामा यांनी अमेरिकेचं अध्यक्षपद मिळवलं. भारतातही ओबामांशी नातं सांगणारी अनेक माणसं आहेत. डॉ. भालचंद्र मुणगेकर त्यापैकीच एक. कोकणातल्या एका छोट्याशा खेड्यातून झगडत झगडत डॉ. भालचंद्र मुणगेकर आज प्लॅनिंग कमिशनच्या सदस्यत्वापर्यंत पोहोचले आहेत. प्लॅनिंग कमिशनवरचे महाराष्ट्रातले ते एकमेव सदस्य आहेत. याआधी ते मुंबई युनिव्हरसिटीचे कुलगुरू होते. यानंतरही भारतीय समाजकारणात आणि राजकारणात ते महत्तवाची भूमिका बजावतील असं मानलं जात आहे.बराक ओबामांचा संघर्ष आणि मुणगेकरांचा संघर्ष यात काहीतरी नातं आहे. त्याविषयी बोलताना डॉ. मुणगेकर म्हणाले "ओबामांचा अमेरिकन अध्यक्षपदापर्यंतचा प्रवास हा एक क्रांतिकारक प्रवास आहे. केवळ अमेरिकेच्याच नव्हे तर जागतिक राजकीय आणि सांस्कृतिक इतिहासातली क्रांती आहे. त्यांच्या संघर्षाला अमेरिकन समाजाने ज्याप्रकारे प्रतिसाद दिला, त्यातून भारतीय समाजालाही बरच काही शिकण्यासारखं आहे. ओबामांचा प्रवास किंवा त्याआधी नेल्सन मंडेलांचा संघर्ष किंवा मार्टिन ल्यूथर किंग यांचा प्रवासहा माझ्याच नव्हे तर माझ्यापुढील अनेक पिढ्यांना बरंच काही शिकवणारा प्रवास आहे. स्वातंत्र्य, समानता आणि बंधुभाव जगात प्रस्थापित करण्यासाठी धडपडणार्‍या प्रत्येकाशी ओबामांचं भावनिक नातं आहे. फुले, आंबेडकरी चळवळीत वाढलेल्या प्रत्येकाशी ओबामांचं स्फूर्तीचं नातं आहे."गेल्या 60 वर्षातील देशाच्या प्रगतीविषयी बोलताना डॉ. मुणगेकर म्हणाले "गेल्या 60 वर्षात देशाच्या सर्व क्षेत्रात जो विकास झाला, त्याचे स्फायदे माझ्या मते सर्व उपेक्षित समाजघटकाला आवश्यकतेमुळे मिळालेले नाहीत. याचं कारण इथल्या समाव्यवस्थेत, इथल्या सत्ताधारी वर्ग जातींच्या अभिलाषेमध्ये सापडतं. पण हे फायदे जोपर्यंत सर्व समाजघटकांना मिळत नाहीत, तोपर्यंत या देशाची लोकशाही, निर्णयप्रक्रिया आणि एका अर्थानं या देशाची संस्कृती खर्‍या अर्थानं संपन्न होऊ शकणार नाही." पण आजही आपण उपेक्षितांच्या विकासात कुठेतरी कमी पडतोय, याचं कारण सांगताना डॉ. मुणगेकर म्हणाले "स्वत:च्या हितसंबंधांपेक्षा समाजाचे हितसंबंध आणि प्रगती जास्त महत्त्वाची आहे, हे समाजात आजही रुजलेलं नाही. आपण कुठेतरी जातीच्या, धर्माच्या. भाषिक, प्रदेशिक पातळीवर विचार करतो. एक समाज म्हणून जो विचार करायला हवा, त्यात आपण कुठेतरी कमी पडतोय. बेकारीचाही विचार आपण प्रादेशिक पातळीवर करतो. पण एक देश म्हणून आपल्याला एक आर्थिक धोरण स्वीकारावं लागतं, याचा आपण विचार करतच नाही. दहशतवाद, इथली सबंध सांस्कृतिक व्यवस्था, भाषिक संकुचितवाद म्हणजे प्रत्येक भाषेला स्वत:चं स्थान आहे, पण त्याहीपलीकडे जाऊन भारत म्हणून जो एक देश आहे, ज्याला 5000 वर्षांची संस्कृती आह, जिथे लोकशाही ही एका अर्थानं क्रांती आहे, हे आव्हान आपण स्वीकारायला हवं. इथले विचारवंत ही स्वत:ला पुरोगामी म्हणवत असले, तरी ते आपापल्या कोशात जाऊन बसतात. त्यामुळे एक समाज म्हणून एका व्यापक पातळीवर उदारमतवादी, समानतेच्या पातळीवर जाऊन लोकशाही प्रक्रियेतून या देशाचे प्रश्न कसे सोडवायचेस याचंजात, धर्म, भाषा, प्रदेश यांच्या पलीकडे जाऊन हे दर्शन जे फुले, आंबेडकर, रानडे यांच्या विचारातून घडलं, ते दर्शन आजच्या निर्णयप्रक्रियेत, राजकारणात, समाजकारणात प्रत्यक्ष प्रतिबिंबित होण्याची गरज आहे."या देशाच्या नेतृत्वाविषयी बोलताना डॉ. मुणगेकर म्हणाले "आज राजकीय पक्षांमध्ये अंतर्गत लोकशाहीचा अभाव आहे. अंतर्गत लोकशाही एक चांगले नेतृत्व देता येतं. पक्षीय पद्धतीच्या बाहेर राहून 1954 पासून 1974 पर्यंत राजकारणाच्या बाहेर राहूनही जयप्रकाश नारायण यांनी जे नेतृत्व दिलं, म्हणजे माझे आज त्यांच्याशी मतभेद असले तरी त्यांचं नेतृत्व लोकांना मान्य होतं. तेव्हा साहित्यिक, वैचारिक पातळीवरअशा नेतृत्वाची आज गरज आहे. आपल्या भारतामध्ये विचारवंतांची व्याख्याच फार खुजेपणाने होत राहिली आहे. म्हणजे विचारवंतांमध्ये एक दार्शनिकता असावी लागते, पुढच्या 50-100 वर्षांसाठी त्यांची व्हिजन होते. डिग्रीज, पुस्तकं यापेक्षा स्वातंत्र्य, समानता, बंधुभाव, न्याय याकडे समाजाला घेऊन नेण्यासाठी आपल्या हातातील ताकद म्हणजे मग शब्द, तत्त्वज्ञान, वैचारिक ताकद किती चिकाटीने रेटता, ही कमिटमेन्ट, हा प्रामाणिकपणा माझ्या मते जास्त महत्त्वाचा आहे." डॉ. मुणगेकर यांनी आत्मचरित्र लिहिलं आहे. पण त्यात वयाच्या 18 व्या वर्षापर्यंतचाच इतिहास आहे. त्याविषयी बोलताना डॉ. मुणगेकर म्हणाले "मी नंतर कुलगुरू झालो, लोक मला अर्थतज्ज्ञ म्हणतात, मी प्लॅनिंग कमिटीचा सदस्य आहे, पण मला असं असं वाटत नाही की गेल्या 35 वर्षांत मी काही मूलभूत असं काही शिकलो नाही. माझी जी काही जडणघडण झाली, ती वयाच्या 18 व्या वर्षापर्यंत फार प्रगल्भतेने झाली. त्या प्रेरणा घेऊन मी पुढे जगण्याचा प्रयत्न केला. माझं गाव आहे, मला समाजवाद शिकवणारे माझे वडील, मला शिकता यावं म्हणून शिक्षण सोडणारी माझी बहीण, माझे नातेवाईक हे कुठेतरी खोलवर माझ्या आत आहेत. आणि याच गोष्टी ठरवतात मी काय करावं, मी काय बोलावं. मी निसर्गाचा अत्यंत कृतज्ञ आहे की मी 14 वर्ष गावात वाढलो. नागरी संस्कृतीत मी पुढे जगलो, प्रगती झाली तरी मी गावाशी जोडला गेलोय. तुमच्या जगण्याची प्रेरणा काय ? सातत्यानं वर जाणं आणि मागे बघून इतरांना वर आणणं, ही माझ्या जगण्याची प्रेरणा आहे. गावात मी जे अनुभवलं, म्हणजे कोणाला अडचण आली तर आपापसातली भांडणं विसरून लोक कसे मदतीला पुढे सरसावतात, निरोगी माणसं, शेअरिंगची भावना, एकमेकांचा विचार करण्याची जी वृत्ती होती, ते मला गावात मिळालं." पण याच गावानं डॉ. मुणगेकरांना अस्पृश्यतेचा अनुभव दिला. त्याविषयी बोलताना ते म्हणाले "पिकनिकला गेल्यावर आम्हा काही मुलांना देवळात जाऊ दिलं नव्हतं. गावातल्या देवळात आम्हाला प्रवेश नव्हता. आताही मी देवळात जातो, ते एक सांस्कृतिक ठिकाण म्हणून. गावात चहाच्या दुकानात आमच्यासाठी वेगळे कप असत. ते आम्हाला स्वत: धुवावे लागत. हे जे मी अनुभवलं, त्यातून अस्पृश्यता दूर करण्यासाठी झगडणं, त्यासाठी फुले-आंबेडकरांच्या विचारांचा वारसा घेणे, या प्रेरणा मला गावातून मिळाल्या. हे मांडत असताना त्याचं रौद्र स्वरूप मी मांडलेलं नाही आणि मुख्य म्हणजे असं काही मी ठरवलं नव्हतं. ते सहज घडत गेलं."बरेच विद्रोही साहित्यिक या अनुभवांविषयी प्रचंड कडवटपणे बोलतात. पण मुणगेकरांच्या लेखनातून तो जाणवत नाही. त्याविषयी बोलताना मुणगेकर म्हणाले "साधारपणपणे 70 च्या दशकात विद्रोही साहित्यात जो कडवटपणा आला, त्याचं मी समर्थन करतो. कारण प्रस्थापित समाजाचा तो आक्रोश होता. माझ्या लेखनात तो आला नाही कारण माझी जडणघडण आणि माझे अनुभव. माझी प्राथमिक जडणघडण गावच्या शाळेत आणि पुढे नवभारतमध्ये झाली. त्याही काळात कोणतेही धार्मिक उत्स साजरे न करणारी ती एकमेव शाळा होती. त्यामुळे मला जे अनुभव ालेच नाहीत, ते मी कसे मांडणार ? माझे अनिभव हे माझे स्वत:चे आहेत, ते मी मांडले. मग तो जो आवेश असतो, ज्याला विद्रोहीपणा म्हणतात, तो माझ्या साहित्यात फारसा उमटला नाही. हे दलित समाजाचं सार्वत्रिक चित्रण नाही. भालचंद्र मुणगेकरचे ते वैयक्तिक अनुभव होते. एका बाजूला अस्पृश्यता आणि सातवी पास झाल्यावर संपूर्ण गावानं मला मुंबईला सोडण्यासाठी स्टॅन्डपर्यंत येणं, असे संमिश्र अनुभव मला मिळाले."आपल्या शाळेविषयी बोलताना डॉ. मुणगेकर म्हणाले "साधारण तिसरी चौथीपासून मॅट्रिकपर्यंत जे धडे, कविता होते, त्यांचा माझ्यावर खूप मोठा प्रभाव होता. पण एक तत्वज्ञान म्हणून लोकशाही समाजवाद मी स्वीकारला त्याला कारण माझे शाळेतले संस्कार आणि वि. स. खांडेकर. त्यांच्या क्रौंचवध या कादंबरीनं मी अमुलाग्र बदललो. पुढे मॅट्रिकला जाताना आमच्या समारोपाच्या भाषणात आमचे चित्रे सर म्हणाले की देशाला साहित्यिक हवेत, चित्रकार हवेत, डाक्टर्स हवेत तसेच चांगले अर्थशास्त्रज्ञही हवेत. तोपर्यंत मी इंग्रजी लिटरेचर किंवा फिलॉसॉफी घेणार होतो. पण त्या वाक्यानं माझा निर्णय बदलाल. मुळात अर्थशास्त्र हे भूकेचं शास्त्र आहे. अन् कसं निर्माण होतं, त्याचं वितरण कसं होतं, काही लोक उपाशी का रहातात, विषमता, बेरोजगारी, दहशतवाद का निर्णाण होतात ? प्रादेशिक पक्ष का निर्माण होतात, एक ा राज्यातले लोक दुसर्‍या राज्यातल्या लोकांना का मारतात ? या प्रश्नांची उत्तरं अर्थशास्त्रात मिळतात. पण तरीही मी स्वत:ला अर्थतज्ज्ञ मानत नाही. आज देशात ज्या लोकांना अर्थतज्ज्ञ म्हटलं जातं, त्यातल्या 90 टक्के लोकांना मी अर्थतज्ज्ञ मानत नाही. त्यांना फार तर अर्थशास्त्राचे अभ्यासक म्हणता येईल. अर्थतज्ज्ञ हे मानवी समाजावर भाष्य करण्याच्या कुवतीचे असावे लागतात. काही प्रमाणात हा दृष्टीकोन धनंजयराव गाडगीळांनी मांडला, वि.म. दांडेकरांनी मांडला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तर अर्थतज्ज्ञ होतेच. केन्स, आगरकर अर्थतज्ज्ञ होते. त्यांचा सर्वसमावेशक दृष्टीकोन ज्याला मांडता येईल, त्याला अर्थतज्ज्ञ म्हणावं."एकीकडे खांडेकरांच्या आदर्शवादाचा डॉ. मुणगेकरांवर प्रभाव होता, त्याच काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा प्रभाव त्यांच्यावर पडला. त्याविषयी बोलताना डॉ. मुणगेकर म्हणाले "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मातर केलं, तेव्हा मी पाचवीत होतो. त्यावेळेस मी आजोळी होतो. तेथेच मी दीक्षा घेतली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शाळेतले जे सहकारी होते, अनंतराव चित्रे, त्यांचे चिरंजीव डॉ. शरद चित्रे माझे शिक्षक होते. मी 11 वी नंतर धनंजय किर यांनी लिहिलेलं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र वाचलं. त्यानंतर बी.ए. एम.ए. ला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी मी एवढा झपाटला गेलो होतो की माझं असं स्पष्ट मत आहे की भारताच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक जीवनाचा विचार ज्याला करायचा आहे, त्या एकाही व्यक्तीला म्हणजे साहित्यिक, अर्थतज्ज्ञ, विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ, पत्रकार कोणालाही डॉ. बाबासाहेबांचे विचार समजून घेतल्याशिवाय आपल्या विषयाला न्याय देता येणार नाही. त्यांचा वैयक्तिक संघर्ष विलोभनीय आहेच, पण त्यातला मुख्य जो मुद्दा होता की अस्पृश्यता निर्मुलन, 1936 ला बहिष्कृत भारत या संघटनेची स्थापना केल्यापासून 1956 पर्यंत त्यांनी एकाकी संघर्ष केला आहे. त्यानंतर त्यांची प्रतिभा म्हणजे मला वाटत नाही की फारशा सोयी उपलब्ध नसताना त्यांनी जे लेखन केलं, तसं इतर कोणी केलं असेल. या सगळ्या गोष्टींमध्ये केवळ भारतीय नाही तर संपूर्ण मानवी समाज स्वातंत्र्य, समानता, बंधुत्व आणि न्यायावर आधारित हवा. कोणत्याही एका घटकाने दुसर्‍या घटकाचं शोषण करू नये. आणि अंतिमत: शांतता आणि करुणा यावर आधारलेल्या बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा स्वीकार ही त्यांची धारणा होती. बाबासाहेबांची व्हिजन, त्यांचा व्यासंग, त्यांचा संघर्ष आदर्शवत आहे. त्यांनी फुल्यांना गुरू मानलं होतं. भारतानं बाबासाहेबांवर खूप अन्याय केला आहे. तो दोन पातळ्यांवर. एक म्हणजे बाबासाहेब समजून न घेणं आणि दुसरा म्हणजे या समाजाचे प्रश्न अधिकाधिक तीव्र होत जातील, तसतसे डॉ. आंबेडकरांचे विचार आवश्यक भासतील. किमबहुना राजकीय दलीत चळवळीने देखील त्यांच्यावर अन्याय केलाय. प्रत्येकाला या समाजव्यवस्थेत व्यक्तिगत वाटा हवाय. पण त्यासाठी वाट्टेल त्या तडजोडी करणं आणि वाटा मिळाला की डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानिाशी फारकत घेणं, हे अयोग्य आहे. आज मी म्हणालो की महाराष्ट्रातली दलीत चळवळ ही पूर्वाश्रमीचा महार समाज, ज्यानं मोठ्या प्रमाणावर धर्मांतर केलं, त्यांच्यापुरतीच मर्यादीत राहिली आहे. इतर दलीत समाज, हिंदू समाजांतर्गत मोडणार्‍या दलितांनी डॉ. आंबेडकरांचं समग्र तत्त्वज्ञान स्वीकारण्याची तत्परता दाखवली नाही, असं म्हटलं गेलं, तर त्याचादेखील विचार प्रस्थापित दलीत चळवळीनं करण्याची गरज आहे."11 वी नंतर मुणगेकर मुंबईत आले. जो लोकशाहीवादी समाजवादाचा धडा मुणगेकरांनी गावात गिरवला, तो मुंबईत आल्यावर युवक क्रांती दल, दलीत पँथर यांच्या चळवळीने पक्का झाला. त्याविषयी बोलताना डॉ. मुणगेकर म्हणाले "मी स्वाभाविकपणे युक्रांतमध्ये गेलो. ही चळवळ तत्कालीन महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाची चळवळ होती. तेव्हा या युवक चळवळीनं महाराष्ट्र ढवळून काढला होता. दलीत पँथरच्या निर्मितीची मुळे देखील कुठेतरी युक्र ांदमध्ये होती. 1956 नंतर दलीत चळवळीचं सुवर्णपान म्हणजे दलीत पँथर चळवळ. दलीत पँथर बरखास्त करण्यात आली, हे दलीत चळवळीचं फार मोठं नुकसान होतं. हिंसेला विरोध आणि अहिंसा हे सर्वेत्कृष्ट हत्यार, या भावनेतून मी युक्रांदमध्ये गेलो."नामांतराच्या आंदोलनात डॉ. मुणगेकरांनी तुरुंगवासही भोगला. त्याविषयी बोलताना डॉ. मुणगेकर म्हणाले "6 डिसेंबर 1979 ते 14 डिसेंबर 1979 पर्यंत मी आणि प्रताप आसबे एकाच तुरुंगात होतो. रामदास आठवले वेगळ्या तुरुंगात होते. त्या वेळेस मी तुरुंगात दलीत पँथरच्या कार्यकर्त्यांची शिबिरं घेतली. तुरुंग म्हणजे प्रस्थापीत समाजव्यवस्थेशी लढा. इथे तुमच्या प्रेरणा, बांधिलकी, विचारांची कसोटी लागते."डॉ. मुणगेकर रिझर्व्ह बँकेत नोकरी करत होते. पण ती सोडून त्यांनी आंबेडकर कॉलेजमध्ये प्राध्यापकी स्वीकारली. त्याबद्दल डॉ. मुणगेकर म्हणाले "लोकांना याचं आश्चर्य वाटलं, पण माझ्या दृष्टीनं ती स्वाभाविक गोष्ट होती. मला तिथे दोन इन्क्रिमेन्ट्स पण मिळाली नाहीत. मला इतर कॉलेजकडूनही ऑफर्स होत्या. पण ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पिपल्स एज्यूकेशन सोसायटीची स्थापना केली आणि मला शिक्षणाची संधी मिळाली, त्याविषयी ही कृतज्ञता होती. मला रिझर्व्ह बँकेनं दिलेल्या नोकरीमुळे मी शिकू शकलो, म्हणून मी कृतज्ञ आहेच, तसंच माझ्या बायकोनं या सगळ्या प्रवासात माझ्या बायकोनं मला दिलेलं सहकार्य आणि साथ याविषयीदेखील मी कृतज्ञ आहे."मुंबई विद्यापीठाचे पहिले दलीत कुलगुरू असं डॉ. मुणगेकरांचं वर्णन केलं जातं. त्याविषयी बोलताना डॉ. मुणगेकर म्हणाले "युनिव्हरसिटी चालवताना धर्म, भाषा, अंतर्गत राजकारण, प्रादेशिकता या सगळ्याच्या पलीकडे विद्यार्थ्यांना मी घेऊन गेलो. मी लोककला अकादमी सुरू केली,जगन्नाथ शंकरशेठ स्कॉलरशिप सुरू केली, क्लब रोडवरच्या ऑडिटोरीयमचं नाव बदलून त्याला शाहीर अमर शेखांचं नाव दिलं, सावित्रीबाई फुले वसतीगृह बांधलं, व्याख्यानमाला सुरू केल्या, विद्यापीठ पातळीवर साहित्य संमेलन सुरू केलं. रिटायर्ड होणार्‍या कर्मचार्‍यांसाठी तात्काळ पेन्शन मिळण्याची व्यवस्था केली. गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी 1 कोटी रुपयांचा फंड सुरू केला. आपल्या समाजात विद्यापीठं ही राजकारणाचे अड्डे झालेत. पाश्चात्य देशात विद्यापीठं जशी फक्त विद्येची केंद्र आहेत, तसंच मुंबई विद्यापीठ हे शिक्षणाचं केंद्र बनवण्याचा मी प्रयत्न केला. त्याला विरोध झाला, वादही झाले. मला बदनाम करण्याचाही प्रयत्न झाला. मी साधारण सव्वा चार वर्ष कुलगुरू होतो, पण मी अभिमानानं सांगू शकतो की व्यक्तीगत पातळीवर माझ्याकडे बोट दाखवता येईल, असा एक ठिपकाही नाही. हे काम करत असताना राजकीय दबावही आला. पण कुठेतरी राजकारण्यांनाही कळलं होतं की मी दबावाला बळी पडणार नाही. माझं तत्त्व होतं की not for anybody's favor and not under anybody's fear. कुलगुरू म्हणून निर्णय घेण्याची माझी स्वायत्तता मी प्राणपणानं जोपासली."कुलगुरू पदाचा पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करण्याआधीच डॉ. मनमोहन सिंग यांनी डॉ. मुणगेकरांना प्लॅनिंग कमिशनवर बोलावून घेतलं. त्याबद्दल बोलताना डॉ. मुणगेकर म्हणाले "1991 साली डॉ. मनमोहन सिंग अर्थमंत्री असताना त्यांनी नवीन आर्थिक धोरण राबवलं. आणि 2004 ला ते पँतप्रधान झाले. या कालखंडात त्यांच्या आर्थिक दोरणांविषयींच्या विचारात बराच फरक पडला. त्यांना हे जाणवलं असावं की केवळ मार्केटवर अवलंबून राहून चालणार नाही. विकास हा सर्वसमावेशक असावा. कॉर्पोरेट भांडवलशाहीचे फायदे समाजातल्या तळागाळापर्यंत पोहचला पाहिजे, हे माझं मत त्यांना पटलं. त्यामुळेच त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही बनवलेला 11 वा प्लॅन हा वेगवान आणि अधिक सर्वासमावेशक बनवला आहे. त्यांच्याशी बोलताना बोलताना, प्लॅनिंग कमिशनसमोर माझे विचार असताना 1991 पासूनचे माझे विचार मी स्पष्टपणे मांडले. मार्केट हे अतिशय महत्त्वाचं आहेच , पण मार्केटने मिळवलेला फायदा भारतासारख्या देशात समाजातल्या तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी शासनव्यवस्थेचा गुणवान हस्तक्षेप अतिशय गरजेचा आहे." एकीकडे प्लॅनिंग कमिशनचे अध्यक्ष मॉन्टेकसिंग आहलुवालिया हे वर्ल्ड बँकेतून आले आहेत. एकीकडे असा माणूस आणि दुसरीकडे डॉ. मुणगेकरांसारखा फुले-आंबेडकरी विचारांचा माणूस असल्यामुळे फरक पडलाय का ? या प्रश्नाचं उत्तर देताना डॉ. मुणगेकर म्हणाले "असं विधान मी करणार नाही. कोणतंही क्रेडिट घेण्याच्या मी विरोधात आहे. पण मी सांगतो की मॉन्टेकसिंग हे उत्कृष्ट पॉलिसी फ्रेमर आहेत. आमच्या चर्चा या पूर्णपणे लोकशाही मार्गाने होतात. त्यांच्यासकट सगळ्यांना मान्य आहे की स्टेट वर्सेस मार्केट नाही तर स्टेट ऍन्ड मार्केट ही भूमिका मान्य झाली आहे. त्याअंतर्गत सामाजिक अजेन्डा आम्ही बनवला आहे. ग्रामीण विकास योजनेअंतर्गत आम्ही एक लाख कोटी रुपये खर्च करत आहोत. जगातला हा एकमेव प्रकल्प आहे जिथे अनस्किल्ड माणसाला देखील वर्षभरात 100 तासांचा रोजगार मिळेल. सर्वसिक्षा अभियानाचा दर्जा सुधारायचा आम्ही प्रयत्न करतोय. ग्रामीण विकास, आरोग्य, नवीन आयआयटी-आयआयएम काढणे असा अनेक कल्याणकारी योजनेत आम्ही 96 हजार कोटी रुपये आम्ही पुढच्या पाच वर्षात खर्च करणार आहोत. आदिवासींना त्यांचे पारंपरिक हक्क देण्याचं विधायक आहे. 60 वर्षांनंतरही शिक्षणाचा अधिकार मूलभूत नव्हता. तो आम्ही देत आहोत. आमची टीम पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली चागलं काम करायचा प्रयत्न करत आहोत."योजना बनतात, पण त्याचे फायदे गरिबांपर्यंत पोहचत नाहीत. त्यादृष्टीने अर्थव्यवस्थेचं मूल्यमापन करताना डॉ. मुणगेकर म्हणाले "याचं सर्वात मोठं कारण म्हणजे सार्वजनिक जीवनातला भ्रष्टाचार. आणि दुदैर्वानं त्याविषयी फारशी चर्चा होत नाही. लोकांनी संघटीत व्हायला हवं. इथे भ्रष्टाचारी संघटीत आहेत आणि पीडित विखुरलेले."डॉ. मुणगेकरांच्या राजकारण प्रवेशाविषयी चर्चा होत आहे. मुणगेकर राज्यसभेत जाणार, लोकसभा निवडणूक लढवणार, पुन्हा मनमोहन सिंग यांचं सरकार आलं तर ते मंत्री होणार, असंही बोललं जात आहे. त्याबद्दल डॉ. मुणगेकर म्हणाले "यातल्या कशाविषयीही मला कल्पना नाही. मी गेल्या 25-30 वर्षांत जे काही काम केलं, त्यामुळे लोकांची तशी इच्छा असेल, तर मी जनतेचा आभारी आहे. पण त्याविषयी मी अद्याप काही ठरवलं नाही. याला माझा विरोधही नाही. पण जर मी राजकारणात आलो, सत्ता मिळालीच तर उपेक्षितांसाठी मी अतिशय अमुकुलतेनंवापर करेन. लोकांचा माझ्यावरील विश्वास आणि सदिच्छा ही माझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्याची कमाई आहे, असं मी मानतो"या मुलाखतीचा शेवट करताना आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे म्हणाले "सत्तेवर जाउनही गरिबांना न विसरणारी फार कमी माणसं असतात. डॉ. भालचंद्र मुणगेकर हे त्यांपैकी एक. म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे खरे शिलेदार डॉ. मुणगेकर आहेत."

ताज्या बातम्या