अल्ला Videos in Marathi

आमीर इफेक्ट

May 13, 2013

आमीर इफेक्ट

ग्रेट भेटमध्ये आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांनी बॉलिवुड सुपरस्टार आमीर खान याची मुलाखत घेतली. पण आमीर च्या स्टारडमपेक्षाही त्याचं सामाजिक भान, सामाजिक बांधिलकी असणारं व्यकितिमत्व आणि आपल्या चित्रपटात वेगवेगळे प्रयोग राबवणारा कलावंत असे आमीरच्या व्यक्तिमत्वाचे विविधांगी पैलू यात उलगडले गेले.निखिल वागळे : आपला गजनी सध्या भरपूर चर्चेत आहे. त्यात तुम्ही तुमचा लुक संपूर्ण बदलला. एवढे स्ट्राँग मसल्स मिळवण्यासाठी मेहनत केलीत. तुमची ही कमिटमेंट तुमच्या प्रत्येक चित्रपटात दिसून येते. ही कमिटमेंट, ही पॅशन कुठून येते ? आमीर खान : मी ज्या क्षेत्रात काम करतो, ते मला स्वत:ला भरपूर आवडतं. सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुमचं काम तुम्हाला आवडलं पाहिजे. जर मी काम करताना आनंदी नसेन, तर ही कमिटमेंट, ही पॅशन कामात आणणं अवघड आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझा हा स्वभावच आहे. मी जे काम करतो, त्यात स्वत:ला पूर्ण झोकून देतो. नाहीतर करतच नाही. त्यामुळे हे जमतंनिखिल वागळे : पण तुमची ही कमिटमेंट वेगळीच आहे. 'तारे जमी पे' चे तुम्ही दिग्दर्शक होता. 'लगान' चे तुम्ही प्रोड्युसर होता. त्यावेळेस ठीक आहे. पण 'रंग दे बसंती', 'मंगल पांडे' अशा सगळ्याच फिल्म्समध्ये तुमची तेवढीच कमिटमेंट होती. तुम्हाला असं वाटतं का की मी स्वत: सगळ्यात लक्ष घातलं पाहिजे ?आमीर खान : मी सुरुवात केली ती असिस्टंट डायरेक्टर म्हणून. मी असं मानतो की मी डायरेक्टरपेक्षा चांगला असिस्टंट आहे. फिल्म डायरेक्ट करणं, हे खूप अवघड काम आहे. डायरेक्टर या सगळ्या प्रक्रियेत अगदी एकटा असतो. तो एक हाती सगळं काम करत असतो. काही वेळा त्याला मधेच असं वाटतं की मी सगळं चुकीचं केलंय. अशा वेळी त्याला कोणाच्या तरी मदतीची गरज असते. ती मदत करायला मी कायम तयार असतो. त्याला वाटतं की मी फिल्मच्या रशेस पहाव्यात, त्यावर माझं मत द्यावं, माझा सल्ला हवा असेल आणि जेव्हा जेव्हा त्यांना मदतीची गरज लागते, तेव्हा तेव्हा मी कायम तयार असतो. आशुतोष गोवारीकर असेल, जॉन मॅथ्यू असेल किंवा राकेश मेहरा. हे सगळे खूप कर्तबगार डायरेक्टर आहेत. त्यांची जी कोअर टीम असते, कॅमेरामन, एडिटर वगैरे वगैरे, त्या कोअर टीममध्ये येऊन मी त्यांना मदत करावी अशी डायरेक्टरची इच्छा असेल, तर मी कायमच तयार असतो. माझं काम झालं की मी जातो, हा कामापुरता अ‍ॅटिट्यूड माझा कधीच नसतो.निखिल वागळे : ताहिर हुसेन तुमचे वडील होते. नासीर हुसेन तुमचे काका होते. 'यादों की बारात' मध्ये तुम्ही लहानपणापासून काम केलंय. मला असं कळलंय की पहिल्यापासूनच तुम्हाला फक्त अ‍ॅक्टिंगमध्ये कधीच रस नव्हता. तुम्हाला सिनेमाच्या प्रत्येक क्षेत्रात रस होता. कयामत से कयामत मध्येही तुमचा हाच अटिट्यूड होता. हे खरं आहे का ?आमीर खान : यातलं सगळच काही खरं नाही. 'यादों की बारात' च्या वेळेस मी खूपच लहान होतो. त्या वेळेस मला अ‍ॅक्टिंगमध्ये अजिबातच रस नव्हता. त्या वेळी मला फक्त क्रिकेट आडायचं. मग सेटच्या मागे आम्ही जेव्हा क्रिकेट खेळायचो, तेव्हा खूप मजा यायची. मी 'कयामत से कयामत' जेव्हा केला, तेव्हा मी आदी चार वर्ष असिस्टंट म्हणून काम केलं होतं. माझा भाऊ मन्सूर खान जेव्हा 'कयामत से कयामत' करत होतो, तेव्हा मी त्याचं शेड्यूल बनवण्यापासून प्रत्येक गोष्टीत त्याला मदत केलीय. म्हणजे मला क्रेडिट नाही मिळालं, पण त्याला जेव्हा जेव्हा गरज होती, तेव्हा तेव्हा मी असिस्टंट म्हणून उभा राहिलो. त्याच वृत्तीनं मी पुढेही काम केलं. मी विचार करत नाही की माझा किती वेळ जातोय किंवा हे माझं काम नाहीये.मला असं वाटतं की आहे तो क्षण जगणं ही माझी फिलॉसॉफी आहे. माझं एक खूप आवडतं वाक्य आहे, बिटल्समधले प्रसिद्ध गायक जॉन लेनन यांचं. ते सांगतात 'लाईफ इज व्हॉट हॅपन्स टू यू, व्हेन यू आर बिझी इन मेकिंग अदर प्लॅन्स.' फिल्म रिलीज होते दोन वर्षांच्या कठोर मेहतीनंतर. ती लोकप्रिय होईल की नाही, ते आपल्याला माहीत नसतं. पण ती कशी बनावी, कोणत्या स्पीरीटनं बनावी, हे तर आपल्या हातात आहे... आपण ती प्रक्रिया किती एन्जॉय करतोय, आपलं टॅलेंट किती क्षमतेनं वापरतोय हे महत्त्वाचं आहे. त्यातच खरी मजा आहे.निखिल वागळे : तुमचा परिवार मौलाना आझादांशी संबंधित आहे...आमीर खान : हो. आणि मला त्याचा प्रचंड अभिमान आहे. ते माझे पणजोबा होते.निखिल वागळे : आम्ही आमीरला फक्त एक कलाकार म्हणून, अभिनेता म्हणून ओळखत नाही. त्याला सामाजिक भान आहे. राजकीय जाण आहे. तुम्ही कोणत्याही विषयावर मग भले ते ऑलिम्पिक्स असेल, नर्मदा बचाओ आंदोलन असेल किंवा गुजरातच्या जातीय दंगली. बर्‍याच स्टार्सना हे जमत नाही. हे कुठेतरी तुझ्या परिवारातून आलंय का ?आमीर खान : खरं सांगायचं तर हे सगळं मला फॅमिलीतून मिळालं, असं वाटत नाही. शाळेत माझा एक मित्र होता- सत्यजित भटकळ. आम्ही बरेच वर्ष मित्र आहोत. त्याचे जे विचार आहेत, सामाजिक भान आहे, त्यामुळे मी खूप प्रभावीत झालो होतो. एका अर्थानं त्यानं मला हे सामाजिक भान दिलं. मी असं मानतो की देशाचे नागिक म्हणून जर खरंच तुम्हाला तुमच्या देशाविषयी प्रेम असेल, तर चुकीच्या गोष्टींवर टीका करताना तुम्ही बेधडक असलं पाहिजे. तुम्हाला वाटतंय की हे चुकीचं चाललंय, तर तुम्ही टीका करायला पाहिजे. 26/11 नंतर नागरिक जागृत झालेत. आणि ही खूप चांगली गोष्ट आहे. ही प्रक्रिया जी सुरू झालीय, ती थांबयला नकोय. आता आम्हाला सुरक्षा हवीय, चांगले नेते हवेत, स्वच्छ राजकारणी हवेत, न्याय हवाय आणि त्यासाठी मला पुढे जायला हवंय. आणि प्रत्येक नागरिकाला हे जाणवलं, तर चांगलं आहे. नाहीतर काय आहे की समाजात प्रत्येक जण स्वत:पुरतं बघेल. मी खूप चांगला मोठा अ‍ॅक्टर आहे, यशस्वी आहे, माझं कुटुंब सुखी आहे, मग मला काय देणं घेणं आहे की कुठे काय चाललंय ? पण मी जेव्हा पेपरमध्ये वाचतो कोणीतरी अडचणीत आहे, तेव्हा मला फार वाईट वाटतं. असाह्य वाटतं. मला वाटतं की भारत एवढा चांगला देशआहे, तर का नाही सगळे आनंदी होऊ शकत ?निखिल वागळे : ही प्रत्येक भारतीयाची भावना आहे. प्रत्येकाला काही ना काही करायचं असतं, पण सामान्य माणूस ते करू शकत नाही. तुम्हाला काय वाटतं की सामान्य माणसानं काय करायला हवं ?आमीर खान : माझ्या मते प्रत्येकानं आत्मपरीक्षण करायला हवं. समाजात सकारात्मक बदल घडवायचे असतील, तर सुरुवात स्वत:पासून व्हायला हवी. प्रत्याकानं विचार करायला हवा की मी कुठे चुकतोय ? मी कळत नकळत कोणत्या भ्रष्टाचारात सहभागी आहे का ? आणि जर आपल्या चुका लक्षात आल्या तर त्या सुधारायला हव्यात. जर मी स्वत: बरोबर वागत असेन, तर मी इतरांकडून बरोबर वागण्याची अपेक्षा करू शकतो. माझा आवाज तेव्हा बुलंद असेल, ठाम असेल. दुदैर्वानं एक समाज म्हणून आपल्यात कुठेतरी कमतरता आहे. आपण सगळेच कुठल्या ना कुठल्या प्रकारे भ्रष्टाचारी समाजाचा भाग आहोत. मग जर आपण आंदोलन करायचं, तर कोणाविरुद्ध करायचं ? आणि त्याला नैतिक आधार काय ? त्यात किती ताकद असेल ? पण प्रत्येक नागरिक जेव्हा आत्मपरीक्षण करेल आणि स्वत:मध्ये सुधारणा घडवून आणेल, तेव्हा या सुधारणेच्या प्रक्रियेला कुठेतरी सुरुवात होईल.निखिल वागळे : तुम्ही सांगताय आपण प्रामाणिक असायला हवं, स्वच्छ असायला हवं, हे सगळं मान्य आहे. पण हे एवढं सोपं आहे ? मी प्रामाणिक आहे, पण माझ्यासमोर मतदान करायला तेवढा चांगला उमेदवार नाहीये. मी जाऊन जातीय दंगली थांबवू शकत नाही. मी महात्मा गांधी नाहीये.मग काय करायचं ?आमीर खान : तुम्ही बरोबर बोलताय. हे सगळे प्रश्न खरंच खूप अवघड आहेत. साधा शिक्षणाचा मुद्दा घ्या, त्यात हिंसा पण नाही, तरीही तो सोडवायला अवघड आहे. पण आपल्याला बर्‍याच पातळ्यांवर काम करायला पाहिजे. पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे मी समोरच्याला हे नाही सांगणार की तू तुझ्यामध्ये ही सुधारणा घडवून आण. मी हा विचार करायला हवा की मी स्वत:मध्ये काय सुधारणा घडवून आणणार ? यानंतर आपल्यात सामाजिक भान रुजायला हवं. यात आपण मुलांना काय शिकवतो, ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. मला असं वाटतं की आज बहुतेक लोक आपल्या मुलांना स्पर्धा करायला शिकवतात. प्रत्येक गोष्टीत, मग भले ते क्रिकेट असेल, तायक्वांदो असेल किंवा अगदी पियानो जरी कोण वाजवत असेल, तर त्यातही आपला मुलगा आपल्यालाला पहिला यायला हवा असतो. ही पहिली येण्याची भावना आपण प्रत्येक मुलामध्ये रुजवतो. भले आपले पालक ते आपल्या भल्यासाठी करत असतील, पण आणि जेव्हा सगळ्या मुलांना आपण ही शिकवण देतो, तेव्हा आपण एक स्वार्थी समाज निर्माण करतो. आपण आपल्या मुलांना स्वत:साठी जगायला शिकवतो. आपण जर कोणत्या गोष्टीत पारंगत असाल तर पहिलं येण्यात मोठेपणा नाहीये. मोठेपणा यात आहे की कसं आपण आपल्या कौशल्याचा वापर करून आपल्यापेक्षा कमकुवत मुलांना पुढे नेतो. आपल्या मुलांना आपण केअरिंग बनवायला हवं. हे संस्कार जेव्हा आपल्या मुलांमध्ये रुजवू, तेव्हा बदल घडून येईल. आज मुलगा तीन-चार वर्षांचा असेल. पण आत्तापासून आपण मुलांवर हे संस्कार केले तर तो जेव्हा 15-16 वर्षांचा होईल, तेव्हा आपल्याला समाजात झालेला बदल दिसून येईल.निखिल वागळे : पण हे संस्कार होणार कसे ? आपण आपल्या मुलांना कन्झ्युमरिस्ट कल्चरमध्ये, मॉल कल्चरमध्ये ढकलतोय. टीव्ही असेल, फिल्म्स असतील, पुस्तकं असतील, ते हे संस्कार देऊ शकत नाहीयेत. मग हे मुलांपर्यंत कोण पोहचवणार ?आमीर खान : अर्थातच पालक देणार. माझी मुलंही टीव्ही बघतात. संस्कार करणं म्हणजे मुलांना समाजापासून तोडणं नाही. एक लक्षात घ्या, आपली मुलं स्मार्ट आहेत. त्यांनाही कळतं. जेव्हा आपण त्यांना विचार करायला प्रवृत्त करू की आपण टीव्हीवर बघतोय, त्याचा अर्थ काय ? तर त्यालाही कळेल की आपण कन्झ्युमर सोसयटीकडे वाटचाल करतोय. महत्त्वाचं हे आहे की पालक मुलांना कोणते संस्कार, कोणती मूल्य देत आहेत. निखिल वागळे : तुला असं वाटतं का की या सगळ्याला मीडिया जबाबदार आहे ?आमीर खान : मी कोणा एकावर सगळा दोष टाकणार नाही. आपण सगळे चुकतोय. पण आपल्यातही काही असे लोक आहेत, जे बरोबर वागतायत. प्रत्येक क्षेत्रात आपल्याला हेच चित्र पहायला मिळेल. आपला विश्वास उडत चाललाय. कधी काळी आपल्यासाठी डॉक्टर म्हणजे देवाचं रुप होतं. पण आता आपण विचार करतो की डॉक्टर माझ्यावर उपचार करतोय की माझ्याकडून पैसे उकळतोय ? प्रत्येक प्रोफेशनमध्ये चांगली आणि वाईट अशी दोन्ही प्रकारची माणसं आहेत. आज खरी गरज कसली असेल, तर माझ्या मते विचार करण्याची. म्हणजे वैद्यकीय क्षेत्राचं उदाहरण घेतलं तर मी विचार करतो की पेशंट तर ठीक आहे, पण जर मी त्याला अजून घाबरवलं तर तो आणखीन तीन-चार टेस्ट करून घेईल. त्यानं फार तर काय होईल ? मी जी मोठी गाडी घेणार होतो, ती जरा छोटी घेईन. पण मिळणारं समाधान खूप मोठं असेल. निखिल वागळे : सामान्य माणसाला वाटतं की तू एक सेलेब्रिटी आहेस, म्हणून तू हा आयडिअलिस्टिक अ‍ॅप्रोच ठीक आहे. पण आम्हाला रोजचं जीवन जगायचंय. आम्ही हे करू शकू का ?आमीर खान : हा खूप चांगला प्रश्न आहे. लोभ आणि हाव या अशा गोष्टी आहेत, ज्याला अंत नाही. त्यामुळे आमीरकडे सगळं आहे, म्हणून तो हे म्हणू शकतो, हे बरोबर नाही. माझ्याकडे आज एक गाडी आहे... मला दहा हव्यात. मग मला हेलिकॉप्टर हवंय... मग प्रायव्हेट विमान. माझ्याकडे बंगला आहे... मला राजवाडा हवाय. मी वीस वर्ष इंडस्ट्रीत आहे. मी आज जेवढे पैसे मिळवलेत, त्याच्या किमान दहा पट जास्त मी कमवू शकलो असतो. मी वर्षात एकच फिल्म करतो, त्या दहा करू शकलो असतो. स्टेज परफॉर्मन्स केले असते. रिबीन कापल्या असत्या आणि त्याचे पैसे घेतले असते... पण मी आजपर्यंत सामाजिक कामासाठी जिथे जिथे गेलोय किंवा जर अशा कार्यक्रमाला गेलोय, जिकडे मला जावसं वाटत होतं, तेव्हा तेव्हा मी एक रुपयाही घेतला नाही. प्रश्न परिस्थिती किंवा पोझिशनचा नाहीये. प्रश्न वृत्तीचा आहे. जर मला सामाजिक भान असेल, संस्कार आणि मूल्य पटत असतील, तर माझी परिस्थिती कशीही असू देत, मी चांगलच मानतो. मी आज जर एवढा मोठा अ‍ॅक्टर नसतो, माझी कमाई एवढी जास्त नसती, तरी मी असंच जगलो असतो. सचिन जर एवढा मोठा क्रिकेटर नसता, कुठेतरी क्लार्क म्हणून काम करत असता, तरीही त्याची वृत्ती बदलली नसती. मी 'तारे जमीं पे' का केला ? त्यात हिरॉईन नव्हती, खूप मोठा ड्रामा नव्हता, तो एवढा हीट होईल, याची मला कल्पना नव्हती.पण मला ती करायची होती. ती माझी सामाजिक बांधिलकी आहे. मला नंबर वन बनायचं असतं तर मी करण जोहर बरोबर फिल्म केली असती, मोठ्या बॅनर्सच्या फिल्म्स केल्या असत्या. या सगळ्याचं सार एवढच आहे, प्रश्न पैसे किंवा परिस्थितीचा नाही. तुमची जर ती वृत्तीच असेल, तर तुम्ही कितीही गरीब असाल, तुम्ही पैशांमागे धावत नाही. पण जर तुमची ती वृत्तीच नसेल, तर तुम्ही कितीही श्रीमंत बना, तुम्ही पैशांच्या मागे धावत रहाल.निखिल वागळे : मी तुमच्या चित्रपटांकडे वळतो. 1999 मध्ये तुम्ही 'सरफरोश' केलात. तोपर्यंत, तुमची इमेज एका लव्हर बॉयची होती. पण त्यानंतर आलेल्या फिल्म्स म्हणजे 'सरफरोश', 'रंग दे बसंती', 'तारे जमी पे' या सगळ्या फिल्म्सनंतर तुमची इमेज एकदमच बदलली. हे परिवर्तन कसं काय झालं ?आमीर खान : मी त्याही आधी एक फिल्म केली होती. 'गुलाम.' त्यातही सामाजिक आशय होता. बेरोजगार तरुणांची उर्जा कशी वाया चालली आहे, हे त्यात दाखवलं होतं. यात माझं जे कॅरेक्टर होतं- सिद्धार्थ मराठे, त्याची लढाई स्वत:शी होती. सिद्धार्थ आधी स्वत:मध्ये मश्गूल असतो. कुठे मारामारी कर, कुठे भंपकगिरी कर हेच त्याचं आयुष्य होतं. नंतर सिद्धार्थची ओळख एका बेडर समाजसेवकाशी होते. तो कुठे मार खात असतो, जखमी होत असतो, पण आपलं काम तो सुरूच ठेवतो. त्याला जेव्हा सिद्धार्थ विचारतो की 'यार ये सब तू क्यों कर रहा हैं ?' तेव्हा तो सांगतो की 'मै जब कभी अपने आप को आईने में देखू, तो मुझे शर्म नही आनी चाहिये.' आणि पुढे जेव्हा त्या समाजसेवकाचा खून होतो, तेव्हा सिद्धार्थ अंतर्बाह्य हादरून जातो. आणि मग तो सत्यासाठी, न्यायासाठी लढण्याचं ठरवतो. त्यात सिद्धार्थच्या वडिलांची एक ट्रॅजेडी दाखवली आहे. ते मुलांना सांगत असतात की मी स्वातंत्र्यसैनिक आहे, पण एका वेळी ते घाबरले असतात. पण आपल्या मुलांना ते कायम चांगले संस्कार देण्याचे प्रयत्न करतात. त्यात एक खूप छान डायलॉग होता. 'लेहरों के साथ तो कोई भी तैर सकता हैं, लेकिन असली इन्सान वह हैं जो लेहरों को तोड के आगे निकल जाता हैं. आणि मग सिद्धार्थ ठरवतो की मी ते बनून दाखवीन, जे माझ्या वडिलांना मला बनवायचं होतं. त्या प्रक्रियेत सिद्धार्थला स्वत्व सापडतं. माझ्या मते माझी सोशल कॉन्शसनेस होती, ती माझ्यामध्येच कुठेतरी होती. मी कधी खूप विचार करून सामाजिक आशयाच्या फिल्म्स करण्याचा निर्णय घेतला नाही. पण आतमध्ये कुठेतरी खोलवर माझे हे विचार चालू होते. आणि मग ते पडद्यावर प्रकट होत गेलं. गुलामसारख्या चित्रपटांकडे मी नकळत आकर्षित होत गेलो.'निखिल वागळे : तुम्हाला असं वाटतं का की आजच्या तरुणाईच्या आत जाऊन, त्यांना विचार करायला प्रवृत्त केले पाहिजे ? तुमची 'रंग दे बसंती' असेल, 'मंगल पांडे' असेल, 'लगान' असेल किंवा तुम्ही आत्ताच सांगितलं त्याप्रमाणे 'सरफरोश' असेल, त्यात तुम्ही आजच्या पिढीला इतिहासाशी जोडून सिस्टिमच्या विरुद्ध, वाईट प्रवृत्तींविरुद्ध विचार करण्यास प्रवृत्त केलं. हा नेमका काय प्रयोग होता ?आमीर खान : हा कोणताही प्रयोग नाही. माझ्या आतमध्ये खोलवर असं काहीतरी आहे ज्यामुळे मी या विषयांकडे खेचला जातो. मी जेव्हा 'सरफरोश' ची स्टोरी ऐकतो तेव्हा मला वाटतं की यामुळे समाजात काही तरी सकारात्मक बदल घडून येईल. असंच मला 'लगान' बाबत वाटलं. माझ्यात जर ही सेन्सेटिविटी नसती तर मी अशा फिल्म्सकडे वळलो नसतो. मी विचार केला असता की 'लगान' कोणाला आवडणार ? म्हणजे धोतरात फिरणारी माणसं आजच्या जमान्यात कोणाला आवडणार ? पण मला वाटलं ही एक सकारात्मक संदेश देणार्‍या सामान्य माणसाची स्टोरी आहे. जर इच्छा असेल तर काहीही करता येतं, हा संदेश देणारी ही फल्म आहे. मी काहीही ठरवून केलेलं नाही. पण मी पण एक माणूस आहे. मलाही भावना आहेत, आजूबाजूला घडणार्‍या गोष्टींचा माझ्यावर परिणाम होतो. मग माझ्याकडे जेव्हा 'रंग दे बसंती' येते तेव्हा मला ती आवडते. कारण ही माझ्या मनाला ते पटतं.निखिल वागळे : 'गुलाम', 'सरफरोश', 'रंग दे बसंती', 'तारे जमीं पे'... सगळ्य फिल्म्समध्ये देशा घडवण्याची गोष्ट आहे. संदेश आहे. या फिल्म्स करताना तुम्ही नर्मदा आंदोलनात पीडितांची बाजू घेतली. जातीय दंगलींमध्ये गुजरात भरडला जात असताना तुम्ही मोदींविरुद्ध स्टेटमेंट दिलं. आमीर खान नॅशनलिस्ट आहे का ? म्हणजे एख अ‍ॅक्टर म्हणून तुम्ही पडद्यावरून जे सांगता, तसेच वैयक्तिक जीवनातही वागता. तुमचं वैयक्तिक जीवन या गोष्टींशी जोडलं गेलंय का ? आमीर खान : तुम्ही म्हणता ते बरोबर असावं. मी हे काही ठरवून करत नाही, पण मी अशा फिल्म्सकडे खेचलो गेलो. आणि माझं वैयक्तिक आयुष्य आणि माझा अभिनय या दोन्ही गोष्टी मी संपूर्ण वेगवेगळ्या ठेऊ शकत नाही. मी जो कोणी आहे, माझ्या ज्या भावना आहेत त्या माझ्या अभिनयातून आणि वैयक्तिक आयुष्यातूनही समोर येतात. मी परत परत तेच सांगतोय की मी हे काही ठरवून करत नाही, पण जर माझ्या देशाविषयी मला अभिमान असेल, मी जर एक देशभक्त असेन, तर माझ्या प्रत्येक गोष्टीतून ते समोर येईल. आणि मला असं वाटतंय की 26/11 नंतर लोकांमध्ये एकतेची भावना लोकांमध्ये रुजतेय. मी हिंदू असेन, मुसलमान असेन, शीख असेन किंवा इसाई. सगळ्यांना कळतंय की आम्ही सगळे एक आहोत. या वेळेस पहिल्यांदाच हिंदू-मुस्लीमचा मुद्दा समोर आला नाही, उलट देघेही एकत्र येऊन या लढाईत उतरले. वाईटातून जर काही चांगलं घडलं असेल, तर हेच आहे. त्यांना कळतंय की आम्ही सगळे एक आहोत, आणि आम्ही जर एक असू, तर आमची ताकद दहापटीनं वाढते. इथं आणखीन एक गोष्ट समजून घ्यायला हवी की आपल्या राज्यकर्त्यांना आपण एका रात्रीत बदलू शकत नाही, पण आपण आपल्या भावना त्यांच्यापर्यंत पोहचवला पाहिजे आणि मला वाटतं की ही प्रक्रिया सुरू झाली आहे.निखिल वागळे : तुम्ही तुमच्या ब्लॉगवर असं लिहिलंय की आता देशातल्या सगळ्या तरुणांनी एकत्र येऊन आपला राजकीय पक्ष काढावा. असा पक्ष निघालाच तर तुम्ही त्यात जाणार का ?आमीर खान : मी राजकारणी नाही. पण अशी पार्टी तयार झालीच, ज्यात ध्येयवादी तरुणांचा भरणा आहे, त्यांना देश घडवायचाय, तर मीच काय आपण सगळेच त्यांच्या पाठीशी उभं राहू. आणि हे नक्कीच शक्य आहे. आपण जेव्हा आयुष्य जगायला सुरुवात करतो, तेव्हा आपली स्वप्न असतात. मला डॉक्टर व्हायचंय, अ‍ॅक्टर व्हायचंय, पत्रकार व्हायचंय. तसंच सामाजकारणात जाण्याचं किंवा राजकारणात करिअर करण्याचं स्वप्न बघणार तरुण पुढे यायला हवेत. या प्रक्रियेला वेळ लागेल, आज सुरुवात केली तर 5 वर्ष, 10 वर्ष लागतील, पण हे स्वप्न नक्कीच प्रत्यक्षात येईल. निखिल वागळे : मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याने सगळा देश हादरला. 'फना' मध्ये तुम्ही एका दहशतवाद्याची भूमिका केली होती. त्यावेळेस तुम्ही दहशतवाद्याच्या मनाचा अभ्यास केला होता का ? लोक दहशतवादी का बनतात ? तुम्हाला काय वाटतं ?आमीर खान : 'फना' च्या वेळी मी दहशतवाद्यांच्या मानसिकतेचा अभ्यास केला नव्हता. कारण तो दहशतवादावरचा पिक्चर नव्हता, ती एक लव्ह स्टोरी होती आणि त्याला दहशतवादाचा संबंध होता. आता लोक दहशतवादी का बनतात ? याबद्दल बोलण्यास मी अधिकारी व्यक्ती नाही. पण तरीही मला जितकं समजलंय त्यावरून लोक दहशतवादाकडे वळण्याची वेगवेगळी कारणं आहेत. गरिबी हे पहिलं कारण असू शकतं. एखाद्या व्यक्तीचा एवढा ब्रेन वॉश केला जातो, की तो दहशतवादाकडे वळतो. कित्येक वेळा त्याला कळतंही नसेल की आपण काय करतोय ? कधीकधी वैयक्तिक आयुष्यातली दुर्घटना कारणीभूत असेल. कारणं वेगवेगळी असतील. जर मला कोणी मारायला गेलं, तर मी मी आधी पळ काढेन. मग लपून बसेन. पण तरीही जर मला कोणी शोधून काढलंच तर एका वेळ अशी येईल की जेव्हा मी समोरच्या माणसावर हल्ला करेन. यात आपण विचार करायला हवा की मी कोणत्याही पद्धतीनं दहशतवादाला कारणीभूत तर ठरत नाहीये ना ? परिस्थिती काहीही असो, पण आपण स्वत:ला सुरक्षित करायला हवं. दहशतवादी हे का करतोय ? याचा विचार आपण नंतर करू, पण आत्ता तर तो आपल्याववर हल्ला करतोय ना ? निरपराधांना मारतोय ना ? तिसरी गोष्ट म्हणजे काही वेळा समाजातील काही लोकांचे फायदा त्यात अंतर्भूत असेल. ते लोकांचं ब्रेन वॉशिंग करतील, त्यांना पैसे आणि शस्त्र देतील. म्हणजे चेहरा वेगळा असेल, पण या चेहर्‍यांमागे नक्की कोण आहे ? याचा विचार करायला हवा. आज सगळ्या धर्मात आपल्याला मूलतत्ववादी दिसतात. हा मुलतत्ववाद समाजाला दहशतवादाकडे घेऊन जातो. त्यांना वाटतं ते देवासाठी करतायत, अल्लासठी करतायत, जीझस ख्राईस्टसाठी करतायत. पण कोणताही धर्म आपल्याला हिंसा शिकवत नाही. माझा देवावर पूर्ण विश्वास आहे. पण देव, अल्ला किंवा ख्राईस्ट, कोणीच आम्हाला दहशतवाद शिकवत नाही. इस्लाममध्ये तर एवढंही सांगतलंय की युद्धातही स्त्रिया आणि मुलींवर वार करू नये. निशस्त्र लोकांवर हल्ला करू नये. म्हणजे आपण म्हणतोे 'एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर'. पण इस्लामनुसार तर 'यू हॅव टू बी फेअर इन वॉर ऑलसो'. पण हे दहशतवादी काय करतायत ? ते इस्लामच्या सगळ्या तत्वांचा भंग करतायत. ते जर म्हणत असतील की आम्ही हे सगळं इस्लामसाठी करतोय, तर ते मूर्ख आहेत.निखिल वागळे : मी परत एकदा 'गजनी' कडे वळतोय. तुमच्या गेल्या काही फिल्म्समध्ये सामाजिक संदेश होता. 'गजनी' सर्वस्वी वेगळा आहे. त्यातही काही सामाजिक संदेश आहे का ?आमीर खान : नाही. अजिबातच नाही. ही एक अ‍ॅक्शन फिल्म आहे. मी 'गजनी' एवढ्याचसाठी करतोय की मला 'गजनी' चा विषय भावनिक दृष्ट्या खूप जवळचा वाटला. आणि मला भावनिक दृष्ट्या जे अपील होतं, ते सगळं मला प्रचंड प्रिय असतं. 'गजनी' ची पटकथा मला खूप आवडली. मी जेव्हा साउथचा गजनी बघितला, तेव्हा मला तो खूप आवडला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला लोकांना सरप्राईज द्यायला खूप आवडतं. मला माझ्या दर्शकांनाही आश्चर्याचा धक्का द्यायला खूप आवडतो. निखिल वागळे : तुम्ही रागावू नका, पण मी एर टिपिकल फिल्मी वाटणारा प्रश्न विचारतो. आम्ही गेले काही दिवस तुम्हाला टीव्हीवर सतत वर्क आउट करताना पहातोय. बॉडी ट्रेनिंग पहातोय. काही दिवसांपूर्वी शाहरुखनेही हेच केलं होतं. शाहरुखशी स्पर्धा म्हणून तुम्ही हे केलंत का ? आमीर खान : असं काहीही नाही. याचा पुरावा मी तुम्हाला देतो. जेव्हा 'तारे जमी पे' चं शूट पूर्ण झालं, त्याआधीच मी 'गजनी' साईन केला होता. तारे चं शूट संपल्यानंतर लगेचच मी ट्रेनिंग पूर्ण केलं. 13 महिने मी ट्रेनिंग घेतलं. त्यानंतरही आज सात-आठ महिने झाले आहेत. मी ट्रेनिंग जेव्हा सुरू केलं, तेव्हा शाहरुखच्या सिक्स पॅक अ‍ॅब्जची कुठेच चर्चा नव्हती. बहुतेक शाहरुखला समजलं असेल की आमीर बॉडी बनवतोय, मग त्यानेही सुरुवात केली असेल. शाहरुख काय करतो, याकडे मी कधीच लक्ष देत नाही. मी माझ्या कामावर लक्ष देतो. माझ्या कामाची, डायरेक्टरची जी मागणी असेल, ती पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करतो. शाहरुखनं बॉडी बनवली, चांगलं आहे. मी त्याच्यासाठी खुश आहे. पण माझ्या बिल्टशी त्याचा संबंध नाही.निखिल वागळे : आता आपण मुलाखतीच्या शेवटाकडे वळतोय. माझ्याकडे वेळ पार कमी आहे. मला तुझ्या आवडीनिवडींबद्दल सांग. तू कोणत्या फिल्म्स बघतोस ? काय वाचतोस ?आमीर खान : तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण मी फारशा फिल्म्स बघत नाही. पण मी जेव्हा बघतो, तेव्हा त्यात पूर्णपणे गुंतून जातो. मी त्या बघताना हसतो, रडतो, इमोशनल होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचं कुटुंब बरच सनातनी होतं. आम्हाला फिल्म्स बघण्याची परवानगी नव्हती. सहा सहा महिन्यांनंतर आम्हाला फिल्म बघण्याची परवानगी मिळायची. जरा मोठा झाल्यावर तरुणाईत फिल्म्स बघण्याची मला परवानगी मिळायची. मग व्हिडिओ आल्यावर कॅसेट्स घेऊन मी फिल्म्स बघितल्या. याच काळात गुरुदत्तचा 'प्यासा' बघितला. तो मला प्रचंड आवडला. दूरदर्शनवर रविवारी हिंदी आणि शनिवारी रिजनल फिल्म्स बघितल्या. पुस्तकांचं बोलायचं तर ती लहापणापासूनच मला प्रचंड आवडतात. आजही जेव्हा मी घरी येतो, तेव्हा माझा हात डीव्हीडीकडे जात नाही, तर पुस्तकांकडे जातो. मला सगळ्या प्रकारची पुस्तकं आवडतात. फिक्शन, नॉन फिक्शन मी सगळं बघतो. रोज गाडीत जाताना आणि झोपताना मला पुस्तक हवंच असतं. दिवसातून किमान दोनदा मी पुस्तक वाचतोच. साधारण तीन महिन्यातून एकदा मी फिल्म बघतो. कधी मुलांबरोबर, कधी माझ्या कलिग्जनी बोलवलं तर...निखिल वागळे : 2008 आता संपत आलंय. 2008 च्या अखेरीस आणि 2009 च्या उंबरठ्यावर तू लोकांना काय सांगशील ?आमीर खान : मला असं सांगावासं वाटतंय की आपण आपल्याकडून स्वत:ला ओळखण्याचा प्रयत्न केले पाहिजे आणि आपल्यातल्या कमतरता सुधारणा करण्याचा प्रयत्न करायला हवा. जर समाजातल्या प्रत्येकानेच असा प्रयत्न केला, तर आपले सगळे प्रश्न संपतील. आपल्या सगळ्यांनाच वाटतय की समाजातली सगळी दु:ख, दैन्य, दारिद्र्य संपावं. सगळ्यांनाच वाटतंय की आपण पुढे जावं. आणि आपण त्या दिशेने प्रयत्न करायला हवेत. नव्या वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा. रविंद्रनाथांचा एक कविता आहे. 'व्हेअर माईंड इज विदाउट फिअर अँड हेड इज हेल्ड हाय' ही कविता मला प्रचंड आवडते आणि याच कवितेप्रमाणे, रविंद्रनाथांच्या इच्छेप्रमाणे आपला देश असा बनावा.निखिल वागळे : मला माहीत होतं की या मुलाखतीला भाषेचं बंधन असणार नाही. आमीरनं शेवटी व्यक्त केलेली इच्छा हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं स्वप्न आहे.