धुळे, 10 सप्टेंबर : रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांकडे पालिकेचं लक्ष वेधण्यासाठी धूळे शहर भाजपाच्यावतीनं सोमवारी अनोखे आंदोलन करण्यात आलं. फुलवाला चौक परिसरात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांभोवती भाजप कार्यकर्त्यांनी रांगोळ्या काढल्या. यानंतर खड्ड्यांमध्ये प्रतिकात्मक लहान बाळ ठेवत त्याचं बारसंही करण्यात आलं. गणेशउत्सव दोन दिवसांवर आला असूनही हे खड्डे बुजवण्याकडे पालिका दुर्लक्ष करत असल्यानं त्यांनी निषेध केला. महापालिकेने रस्त्यावरील खड्डे बुजवले नसल्याने भाजपाच्या कार्यकर्त्यानी घोषणाबाजी करत महापालिकेच्या भोंगळ कारभाराचा निषेध केला. खड्ड्यांमुळे नागरिकांना रस्त्यावरून वाहतूक करणे त्रासदायक झाले असून, गणेशउत्सवात याचा फटका बसणार असल्याने सर्वच स्तरावरून नाराजी व्यक्त होतेय. दरम्यान, महापालिकेने तात्काळ खड्डे बुजवावेत अशी मागणी आदोलकांनी केलीय.