#अध्यक्ष

Showing of 9647 - 9660 from 9974 results
लिट्टेप्रमुख प्रभाकरन ठार

बातम्याMay 18, 2009

लिट्टेप्रमुख प्रभाकरन ठार

18 मे, कोलंबो लिट्टे प्रमुख प्रभाकरन मारला गेल्याची माहिती श्रीलंकन लष्कराचे प्रवक्ते ब्रिगेडीयर उदय नयनकारा यांनी दिली आहे. प्रभाकरनच्या मृत्यूमुळे श्रीलंकेतल्या लिट्टेच्या तीन दशकांच्या दहशतवादाचा अखेर शेवट झाला आहे. आज पहाटे प्रभाकरन पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना लष्कराच्या गोळीबारात तो ठार झाला. लष्कराच्या गोळीबारात प्रभाकरनचा मुलगा चार्ल्स अन्टोनीसुद्धा ठार झाल्याचं लष्कारनं सांगितलं आहे. प्रभाकरनचे ज्येष्ठ सहकारी पोट्टू अम्मान आणि सुसाई यांचासुद्धा मृत्यू झाला असल्याची माहिती आहे. प्रभाकरनचा मृतदेह तो पळून जात असलेल्या ऍम्ब्युलन्समध्ये सापडला आहे. श्रीलंकन लष्कराच्या गोळीबारात लिट्टेचे मोठे नेते सरकारने गोळ्या घालून ठार केल्याची बातमी काही वृत्तसंस्थांनी दिली होती. मात्र श्रीलंका सरकारने याबाबत अधिकृतपण सांगता येणार नसल्याचं म्हटलं आहे. प्रभाकरन आज एका गाडीतून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना लष्कराने त्याच्या गाड्यांच्या ताफ्यावर हल्ला केला. या हल्ल्यात प्रभाकरन मारला गेल्याचं समज आहे. लष्कराच्या हल्ल्यात त्याच्या गाडीलाही आग लागली, अशी माहितीही मिळाली आहे. लिट्टेप्रमुख प्रभाकरन ठार झाल्याची खात्री आता पटलीय. श्रीलंका सरकारनं त्याला अधिकृत दुजोरा दिला आहे. लिट्टेवर विजय मिळवल्याबद्दल श्रीलंकेचे अध्यक्ष महिंदा राजपक्षे यांच्या घरी आज मोठा समारंभ आयोजित करण्यात आला होता. राजपक्षे उद्या देशाला उद्देशून भाषण करणार आहेत.अखेर प्रभाकरन ठार झाला. त्याचबरोबर तामिळ इलम म्हणजेच स्वतंत्र तामिळ देशाचं स्वप्न मातीआड झालं. प्रभाकरननं सायनाईडचं कॅप्सुल घेऊन आत्महत्या केली नाही. तर श्रीलंकेच्या लष्कराच्या गोळीचा तो शिकार बनला. अशा मृत्यूचा त्यानं कधीही विचार केला नसेल. कारण गळ्यात सायनाईडचं कॅप्सुल बांधायला त्यानंच सुरवात केली होती. त्याच्या सहकार्‍यांनी प्रभाकरनचंच अनुकरण केलं. शत्रूच्या तावडीत सापडल्यावर सायनाईड खाऊन आत्महत्या करण्यासाठी हा उपाय होता. पण खुद्द प्रभाकरनच्याच तो कामी आला नाही. लिट्टेच्या गुप्तचर संघटनेचा प्रमुख पोट्टू अम्मान आणि सुसाई हेसुद्धा ठार झाले. ऍम्ब्युलन्समधून पळून जाण्याच्या प्रयत्नात हे सर्वजण होते. त्यापूर्वी प्रभाकरनचा मुलगा चार्ल्स ऍन्थनीसुद्धा करायमुल्लाईवैक्कल इथं लष्कराच्या गोळीबारात ठार झाला होता. करायमुल्लाईवैक्कल हे लिट्टेचं शेवटचं ठिकाण होतं. लिट्टेचे अनेक बडे नेते या कारवाईत ठार झालेत. तर अनेकांनी यापूर्वीच शरणागती पत्करलीय. लिट्टेवर विजय मिळवल्याची घोषणाच कालच श्रीलंकेचे अध्यक्ष महिंदा राजपक्षे यांनी रविवारीच केली होती. __PAGEBREAK__वेलुपिल्लाई प्रभाकरनचा जन्म 26 नोव्हेंबर 1954 रोजी जाफनामधल्या वेल्वित्तीथुराई शहरात झाला. चार भांवडांत वेलुपिल्लाई सर्वात छोटा. सातव्या इयत्तेनंतर त्याने शाळा सोडली. शाळेत तो एक सर्वसामान्य बुद्धीचा आणि लाजाळू मुलगा होता. सुभाषचंद्र बोस आणि भगतसिंग हे प्रभाकरनचे आदर्श होते. त्यांच्या स्वातंत्र्यलढ्यापासून प्रभाकरनने प्रेरणा घेतली आणि त्याचा मार्गच बदलला. 1972 मध्ये त्याने तामिळ न्यू टायगर्स नावाची संघटना स्थापन केली. 1975 मध्ये त्याने पहिला राजकीय खून जाफनाच्या महापौरांचा केला. 5 मे 1976 मध्ये तामिळ न्यू टायगर्सचं नाव बदलून लिट्टे म्हणजेच लिबरेशन टायगर्स ऑफ तामिळ इलम असं करण्यात आलं. 1983 मध्ये त्यानं 13 सैनिकांची हत्या करत श्रीलंकेविरोधात गरिला वॉर सुरू केलं. त्यानं एक शिस्तबद्ध सशस्त्र लढा सुरू केला. 1984 मध्ये तेव्हाच्या मद्रास म्हणजेच आताच्या चेन्नईमध्ये त्यानं माथिवथानी इराम्बू हिच्याशी लग्न केल्याचा दावा केला जातो. 1987 मध्ये भारतानं श्रीलंकेत शांतीसेना पाठवली. लिट्टेविरुद्धच्या संघर्षात एक हजार भारतीय सैनिकांचा बळी गेला. 1990 मध्ये भारतानं लष्कर परत बोलावलं. 21 मे 1991 मध्ये लिट्टेच्या सुसाईड बॉम्बरनं राजीव गांधींची तामिळनाडूतल्या श्रीपेरांबदूरमध्ये हत्या केली. याच वर्षी लिट्टेने श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष प्रेमदासा यांनाही ठार मारलं. 2002 मध्ये नॉर्वेच्या मध्यस्थीनंतर लिट्टे आणि श्रीलंका सरकामध्ये शस्त्रसंधी झाली.2003 मध्ये लिट्टेनं शांतता चर्चा रद्द करत शस्त्रसंधी मागे घेतली. 2005 मध्ये श्रीलंकेच्या अध्यक्षपदी महिंदा राजपक्षे निवडून आले. 2006 मध्ये जिनिव्हामधली शांतता चर्चा पुन्हा अयशस्वी झाली. 2007 मध्ये श्रीलंका सरकारने लिट्टेच्या पूर्वेकडचा महत्त्वाचा भाग ताब्यात घेतला. 2008 च्या जानेवारीत श्रीलंका सरकारने लिट्टेविरोधात जोरदार मोहीम उघडली. जानेवारी 2009 मध्ये श्रीलंका लष्करानं किलिनोच्ची ही लिट्टेची राजधानी ताब्यात घेतली. एप्रिल 2009 मध्ये लिट्टेनं केलेला शस्त्रसंधीचा प्रस्ताव श्रीलंकेनं धुडकावला. सरकारनं लिट्टेला शरण येण्यासाठी 24 तासांची मुदत दिली होती. मात्र प्रभाकरन अखेरपर्यंत लष्कराच्या हाती लागला नाही. शेवटपर्यंत त्यानं श्रीलंका सरकारशी टक्कर दिली. पण महिंदा राजपक्षे यांच्या कठोर भूमिकेमुळे गेली तीस वर्षं श्रीलंकेत घोंघावत असलेलं वादळ अखेर शांत झालं.